

डिचोली : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आपल्या आवडीच्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची चुरसही वाढल्याचे दिसून येत आहे.
डिचोली तालुक्यातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.२७ इतकी आहे. तालुक्यातून यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या १,७१४ विद्यार्थ्यांपैकी १,६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची कसोटी लागण्याची शक्यता आहे.
डिचोली तालुक्यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला असून, बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मिळवले आहेत.
सर्व शाखांचे एकत्रीकरण करून अकरावीत प्रवेश देण्यात येईल, असे सरकारने मागील शैक्षणिक वर्षापूर्वी जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात या पद्धतीची यंदाही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही पूर्वीप्रमाणेच अकरावीत प्रवेश देण्यात येणार आहे. सध्या विद्यालयांच्या आवारात विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसत आहे.
चांगल्या गुणांनी, म्हणजेच विशेष व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र गुणवत्तेच्या निकषावरच विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.
डिचोलीत फक्त चार विद्यालयांमध्ये विज्ञान शाखेची सोय आहे. आपल्या पाल्यांना आवडीच्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांचीही धडपड सुरू आहे. काही पालक राजकीय वशिल्याचाही आधार घेत असल्याचे दिसून येते.
डिचोली (Bicholim) तालुक्यात श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय (डिचोली), विजयानंद उच्च माध्यमिक विद्यालय (तिखाजन-मये), विविधा उच्च माध्यमिक विद्यालय (न्हावेली-साखळी), सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय (साखळी), सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालय (वेळगे) आणि ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालय (मुळगाव) अशी सहा हायर सेकंडरी आहेत. याशिवाय साळकर उच्च माध्यमिक विद्यालय (चोडण-तिसवाडी) आणि भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय (पर्ये-सत्तरी) ही दोन उच्च माध्यमिक विद्यालये डिचोलीजवळ आहेत.
डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीसाठी यंदाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी या प्रक्रियेला प्रारंभ झाला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखा मिळून सुमारे साडेपाचशे विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात येणार आहे.
पहिल्याच दिवशी बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मिळवून नोंदणी केली आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या निकषावरच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी मंगळवारपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती विद्यालयाकडून देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.