Goa Mine: गोव्यातील चार खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सरकारने सुरू केल्याचे सांगितले जात असले तरी तो प्रत्यक्षात कधी होतो व सर्व सोपस्कार पूर्ण होऊन खाणी कधी सुरू होतात, ते मात्र अजून स्पष्ट होणे कठीण आहे. पण त्यासाठी थांबण्याची स्वतःस खाण अवलंबित म्हणविणाऱ्यांची तयारी नसावी. खरे खाण अवलंबित याची नव्याने व्याख्या करण्याची गरज आहे, असे एका वर्गाचे म्हणणे आहे.
कारण खाणी बंद होऊन दहा वर्षे उलटून गेले असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. अनेकांनी नवे पर्याय शोधले, अन्य राज्यातील ड्रायव्हर व कामगारांनी आपले गाव गाठले, खाणींवर अवलंबून असलेले अन्य व्यवसाय बंद झाले. त्यामुळे नेमके खाण अवलंबित किती आहेत ते शोधणे अपरिहार्य आहे. अन्यथा अन्य सरकारी योजनांप्रमाणे बोगस लाभधारक शोधण्याची वेळ येईल, असे भाजपवालेच सांगत आहेत.
म्हापसा आणि कुंकळ्ळीतील साम्य
म्हापसा आणि कुंकळ्ळी या राज्यातील दोन टोकांवरील नगरपालिका. एरवी म्हणजे आकार, उत्पन्न वगैरेबाबतीत त्यांच्यात कोणतेच साम्य नाही. ते आहे एकाच बाबतीत म्हणजे स्थैर्याच्या. नगरपालिका निवडणुकीपासून तेथे स्थिर मंडळे आहेत. त्यांना जरी दोन वेगवेगळ्या पक्षांचा आश्रय असला तरी अधूनमधून अविश्वास ठरावाच्या, नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या घटना घडत असतात. म्हापशात भाजप समर्थक मंडळ आहे; पण तेथे या हालचाली अधिक आहेत. मात्र यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. पण यात मधल्या मध्येच नगराध्यक्षांची अधिक कुचंबणा होते. कुंकळ्ळीत तर ते प्रत्यक्ष जाणवतेही.
गृहिणींची दिवाळीतही ‘चांदी’
राज्यातील महिला सध्या खूश आहेत. याचे कारण काय माहीत आहे का? गृहआधार योजनेचे पैसे चतुर्थीनंतर आता दिवाळीलाही या महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महिला प्रचंड खूश आहेत. मध्यंतरीच्या काळात गृहआधार योजनेतील अर्थसाहाय्याचा पत्ताच नव्हता.
त्यातच नवीन लाभार्थींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. मात्र, आहे त्या महिलांना लगोलग गृहआधारचे पैसे मिळाल्याने यंदा महिलांची दिवाळी मस्तपैकी साजरी झाली. आता एक मात्र खरे, यापुढे गृहआधारच्या पैशांसाठी चतुर्थी किंवा दिवाळीची वाट पाहायला लावू नका म्हणजे झाले, असे आम्ही नव्हे, गृहिणीच म्हणतात!
होडारकर यांच्यानंतर वेंझी व्हिएगस
कुडचडेचे माजी नगराध्यक्ष पिंटी होडारकर यांच्याशी झालेल्या मंत्री नीलेश काब्राल यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच शनिवारी बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांच्याशी झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंत्री काब्राल लोकांना शिव्या देतात, असा आरोप वेंझी यांनी केल्याने काब्राल यांचा पारा भलताच चढला.
मी कुणाला शिव्या दिल्या हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी वेंझी यांना दिले. मागच्यावेळी काब्राल यांनी वेस्टर्न बायपास रोड कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्या बैठकीला त्यांनी स्थानिक आमदार वेंझी व्हिएगस यांना आमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे वेंझी हे काब्राल यांच्यावर खार खाऊन होते.
सांडपाणी प्रकल्पाचे पाणी साळ नदीत सोडल्याने काब्राल यांना कात्रीत पकडण्याची आयतीच संधी व्हिएगस यांना मिळाली आणि त्यांनी ती सोडलीही नाही. वेंझी यांनी डिवचल्यावर काब्राल भलतेच गरम झाले. त्यांच्यातील हा वाद नेटकऱ्यांनी लागलीच व्हायरलही केला.
अखेर जेनिफर दिसल्या!
जनतेला भेटण्यासाठी वेळ नसलेल्या राजकीय नेत्यांनी किमान सोशल मीडिया किंवा पोस्टर्सच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला असल्याचे दिसून येते. यात ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात देखील आघाडीवर आहेत. जेनिफर या ताळगावच्या मतदारांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांच्यावर वारंवार होत आहे.
परंतु आता पोस्टर्सद्वारे जेनिफर मोन्सेरात यांनी ताळगावच्या मतदारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात होणाऱ्या जॉब फेअरच्या निमित्तानेही त्यांनी बेरोजगार युवकांना आवाहन करणारी पोस्टर्स ताळगाव मतदारसंघात लावली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात नसल्या, तरी पोस्टरद्वारे जेनिफर मोन्सेरात अखेर ताळगाववासीयांना दिसल्या, हेही नसे थोडके.
गिरीश खरेच समाधानी?
गत निवडणुकीत सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी पत्करून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावरून बाजूला झालेले गिरीश चोडणकर राजकारणातून अंग काढून पुन्हा आपल्या जुन्या शिक्षकी पेशाकडे वळल्याची चर्चा होती; पण नंतर आठ कॉंग्रेस आमदारांनी भाजप प्रवेश केल्याने त्यांनी आपला बेत बदललेला असावा.
म्हापशात त्यांनी या दलबदलू आमदारांच्या विरोधात केलेले आंदोलनाचे नेतृत्व तेच दर्शवत आहे. पण मुद्दा तो नाही. या आठजणांविरुध्द अपात्रता याचिका दाखल करण्याबाबत पीसीसी अध्यक्ष अमित पाटकर यांनी घेतलेल्या निर्णयाप्रती गिरीशसरांनी जो आनंद व्यक्त केला, तो त्यांच्यातील बदलाचा संकेत तर नाही ना, अशी चर्चा मोजक्याच उरलेल्या काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे.
कारण सुरुवातीपासून गिरीश आणि पाटकर यांचे सूर कधीच जुळले नव्हते. यानिमित्ताने ते जुळले तर पक्षासाठी ते फायदेशीरच ठरेल. आता प्रश्न आहे तो अपात्रतेचा. यापूर्वी दहा आमदारांबाबत गिरीशसरांनी दाखल केलेल्या याचिकेचे काय झाले ते माहीत असले तरी या नव्या याचिकेची प्रतीक्षा त्यांना लागली आहे.
तेंडुलकरांचा ‘चहा ड्राईव्ह’
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे सध्या गोवा दौऱ्यावर असून ठिकठिकाणी मिळणाऱ्या स्वादिष्ट गोमंतकीय खाद्यपदार्थांचा ते आस्वाद घेत आहेत. हल्लीच एका स्थानिक कॅफेमध्ये तेंडुलकर यांनी रूचकर गोवन पदार्थांचा आस्वाद घेत त्या पदार्थांची तोंडभरून स्तुती केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कॅफेमध्ये त्यांनी पुरी, हळसांदे भाजी, बटाटा भाजी आणि बन्स पारंपरिक गोमंतकीय पाककृतीची चव चाखली.
खासकरून हळसांदे भाजी आणि बन्स यांच्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोव्यातील तेंडुलकर यांचे चाहते खुश झाले आहेत. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या तेंडुलकरांनी आपल्या घरीही जेवणासाठी यावे, अशी इच्छा काहीजणांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तेंडुलकर यांच्या स्ट्रेट ड्राईव्हवर फिदा असलेले त्यांचे चाहते आता त्यांच्या चहा ड्राईव्हनेही मोहीत झाले आहेत. आता हा क्रिकेटचा देव कोणाच्या आदरातिथ्याचा स्वीकार करतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.
ई-वाहने गेली कुठे?
मडगाव शहरातील स्वच्छतेसाठी खास मुंबईहून मागवलेली दोन ई-वाहने सध्या कुठे आहेत, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. या वाहनांसाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल आठ लाख रुपये पालिकेने मोजले आहेत. शहरातील पदपथ, पेव्हर्स, रस्ता विभाजक, इतकेच नव्हे, तर सार्वजनिक शौचालयेही स्वच्छ करण्याची या अद्ययावत वाहनांची क्षमता आहे.
खोलात चौकशी केल्यावर कळले, की या वाहनांवर काम करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच पालिका किंबहुना संबंधित कंपनीला मिळालेले नाहीत. याच्यावर पालिकेच्या एका अभियंत्याने मार्मिक टिप्पणीही व्यक्त केली आहे. एकप्रकारे हा पालिकेसाठी घरचा अहेरच. पालिका किंवा कंपनीला या वाहनांवर काम करण्यासाठी कामगार मिळू नयेत, यासारखे दुर्भाग्य कोणते? जनतेचे लाखो रुपये खर्चून आणलेली ही वाहने आणखी किती दिवस गंजत ठेवणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.