Kala Academy: परीक्षक लाचप्रकरणी कला अकादमीच्या अध्यक्ष, सचिवांकडून धक्कादायक उत्तरे! ‘कला राखण’कडून पोलखोल; तपास संथ गतीने

Kala Academy Bribery Case: कला अकादमीला यापूर्वी लाच देण्याच्या या प्रकरणात गुंतलेल्या दोघाही कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवावा, अशी मागणी ‘गोवा कला राखण मांड’ने यापूर्वी केली होती.
Kala Academy
Kala Academy Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: परीक्षकांना लाच द्यायच्या प्रकरणाचा कला अकादमीचा तपास कुठवर आला आहे, याची माहिती करून घेण्यासाठी ‘गोवा कला राखण मांड’च्या सदस्यांनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर आणि सदस्य सचिव शंकर गावकर यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून प्राप्त उत्तरे ‘गोवा कला राखण मांड’च्या सदस्यांसाठी अनपेक्षित अन् धक्कादायक अशीच होती.

या प्रकरणाचा खुलासा मागण्यासाठी कला अकादमीने महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पाठवलेल्या पत्राला अजून उत्तर मिळालेले नसल्याने कला अकादमीचा तपास थांबला आहे, असे कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी यावेळी सांगितले.

मात्र दै.‘गोमन्तक’ सारख्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रातून कला अकादमीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारासंबंधी पहिल्या पानावर आलेल्या बातमीचा तपास अशा उथळ पद्धतीने कला अकादमीकडून व्हावा याबद्दल ‘कला राखण मांड’च्या सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताच गावकर यांनी यापुढे तपासात गती आणण्याचे मान्य केले.

अशा तपास कामात प्रशासनिक प्रक्रियेला महत्त्व असते आणि त्यामुळे तपास संथ गतीने होत राहतो, हे शंकर गावकर यांचे उत्तर ऐकताच कला राखण मांडच्या सदस्यांनी त्यांना अशा प्रकारच्या भ्रष्टाचार विरोधातील प्रशासनिक प्रक्रियेची इतर उदाहरणे देऊन (यातील काही उदाहरणे कला अकादमीतील इतर प्रकरणासंबंधीही होती) गावकर यांचा युक्तिवाद किती पोकळ आहे, हे त्यांना दाखवून दिले.

१६ नंतर आंदोलनाची पुढील दिशा

कला अकादमीला यापूर्वी लाच देण्याच्या या प्रकरणात गुंतलेल्या दोघाही कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवावा, अशी मागणी ‘गोवा कला राखण मांड’ने यापूर्वी केली होती. आज कला अकादमीच्या उच्चपदस्थांबरोबर झालेल्या बैठकीत ‘कला राखण मांड’ने या मागणीचा पुनरुच्चार केला व त्यासंबंधी पावले उचलण्यासाठी कला अकादमीला १६ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. कला अकादमीने तोपर्यंत जर ठोस पावले जर उचलली नाहीत, तर ‘कला राखण मांड’ या प्रकरणासंबंधी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवेल, असा इशाराही कला राखण मांडच्या सदस्यांनी यावेळी त्यांना दिला.

रिपर्टरी कंपनीचा सामान कक्ष दयनीय स्थितीत

या बैठकीत कला अकादमीच्या नाट्य महाविद्यालयाची दु:स्थिती, नाट्य रिपर्टरी कंपनीचे पुनरुज्जीवन, स्पर्धेतील विजेत्या नाटकांचा महोत्सव घडवून आणणे, कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी मनाई करणे इत्यादी विषयांवर ‘कला राखण मांड’ने अध्यक्षांशी चर्चा केली. ‘मांड’ने सुचवलेल्या अनेक उपायांबद्दल अध्यक्षांनी सहमती दर्शवली व त्यासंबंधी पावले उचलण्याचे आश्वासन दिले. ‘मांड’च्या सदस्यांनी रिपर्टरी कंपनीच्या दयनीय स्थितीतील सामान कक्षालाही भेट दिली. गाठोड्यात कसेबसे गुंडाळून ठेवलेले नाटकांचे पोशाख, खराब झालेले नेपथ्य, ट्रंकमध्ये सांभाळून ठेवलेली थोडीफार प्रॉपर्टी असेच तिथले दृश्य होते.

Kala Academy
Goa Kala Academy: आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर 'एफआयआर' नोंदवा, 'कला राखण'ची अध्यक्षांकडे मागणी

...तरी भ्रष्ट अधिकाऱ्याची भलावण

‘या लाच देण्याच्या प्रकरणात परीक्षकांनी लाच घेण्याचे नाकारून स्पर्धेची प्रतिष्ठा एक प्रकारे उंचावली आहे.’ हा कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांचा खुलासा ‘ कला राखण मांड’च्या सदस्यांसाठी सर्वात धक्कादायक होता. कुठल्या स्तरावर जाऊन हे अधिकारी आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची भलावण करत आहेत हा त्यावेळी पडलेला प्रश्न त्या साऱ्यांना अस्वस्थ करणारा होता. यानंतर ‘मांड’च्या सदस्यांनी सदस्य सचिवांवर प्रश्नांचा भडीमार केला त्यातील कोणत्याही प्रश्नांचे उत्तर सदस्य सचिव सुसंगतरित्या देऊ शकले नाहीत.

Kala Academy
Kala Academy Natyaspradha: कला अकादमीचे अंगांग कुजवणाऱ्या 'जखमा' भरून येण्यासाठी 'पावले' उचलण्याची गरज आहे..

‘तो’ चहा पिण्यापुरता बैठकीत!

कला अकादमीच्या ज्या अधिकाऱ्यांवर परीक्षकांना लाच देण्याचा आरोप झाला आहे, त्यांच्याकडून कामाचा चार्ज काढून घेतला आहे, हे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी ‘कला राखण मांड’च्या सदस्यांना सांगताच, मांडच्या सदस्यांनी, तसे असल्यास आज झालेल्या ‘टास्क फोर्स’च्या महत्त्वाच्या बैठकीत त्यापैकी एक अधिकारी, सुशांत नायक कसे सहभागी झाले हा प्रश्न करताच सदस्य सचिव पुरते गडबडून गेले. ‘चहा पिण्यापुरते ते या मीटिंगमध्ये सहभागी झाले होते’ असा चक्रावून टाकणारा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com