Khari Kujbuj Political Satire Dainiak Gomantak
गोवा

खरी कुजबुज: सात कोटींचा रस्ता खोदला!

Khari Kujbuj Political Satire: बाळ्ळी ते केपे रस्त्याच्या कामासाठी सात कोटींचा खर्च केला गेला. आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या पुढाकारामुळे हा रस्ता झाला खरा, पण आता रेल्वेच्या कामासाठी हा रस्ता खोदल्याने डिकॉस्ता यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले आहे.

Sameer Amunekar, दैनिक गोमन्तक डिजिटल

‘दुधाची तहान ताकावर’ असे मराठीत एक बोध वाक्य आहे. मोठमोठ्या मंदिरात देवदेवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते म्हणून वेळ नसलेल्या भक्तासाठी मुख दर्शनाची सोय असते. मुख्यमंत्र्याच्या वाढदिनी हजार समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कुडचडे मतदार संघातील मुख्यमंत्र्याच्या समर्थकांनी व हितचिंतकांनी म्हणे मुख्यमंत्र्यांना आपल्या हातांनी लिखित संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. काही लोकांनी आपल्या इच्छा आकांक्षाही संदेशात लिहून मुख्यमंत्र्यांना पाठविल्या, असे हजारो संदेश म्हणे समर्थांनी लिहून दिले, जे मुख्यमंत्र्याच्या जवळच्या शुभचिंतकांनी मुख्यमंत्र्याकडे पोचते केले. हे एवढे संदेश मुख्यमंत्र्यांनी वाचले का? याबाबत ज्यांनी संदेश वाहकाचे काम केले, तेच सांगू शकणार नाही का?

अकादमीची सुमार पातळी!

कोकणीत आतापर्यंत कैक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. पण यंदाचा पुरस्कार इतका वादग्रस्त ठरला, की निश्चितच अकादमीची पत तळाला पोचली. हल्लीच हे पुरस्कारार्थी लेखक पारमेल गोव्यात एका कार्यक्रमात सहभागी होऊन गेले. एक टीव्ही मुलाखत सोडल्यास कुणालाच त्याची वार्ता नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची. गोव्यात कोणीही त्यांचे पुस्तक वाचलेले नाही, हे विशेष. त्यांचे पुस्तक म्हणजे पुस्तिका. इतक्या पातळ व गुणवत्तासुमार पुस्तिकेला पहिल्यांदाच गौरविण्यात आले गेले. सुधीर रसाळ, सरदेशमुख यांची समीक्षा पुस्तके वाचल्यास समीक्षा म्हणजे काय? ते कोकणीवाद्यांनाच कळेल. मंगळूरस्थित अकादमीच्या कोकणी निमंत्रकांनी दोन परीक्षक सोईस्करपणे मंगळूरचे ठेवले. ते अग्रणी सीनियर लेखक नव्हते. एक गोव्याचे. या पुस्तकात निमंत्रकाच्याच कवितेचा उदो उदो करून महती गायली आहे. तीच कोकणी काव्य समीक्षा. प्रकाशकही निमंत्रक स्वत:च. किती खाली येऊन पाताळात जावे, याचे हे उदाहरण. हे कोकणीच्या पाचवीला पुजलेले आहे. खापर शेवटी साहित्य अकादमीवरच फुटते!

राजेश वेरेकरांची ‘रणनीती’

आजच्या बदलणाऱ्या राजकारणात रणनीती हा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच तर प्रशांत किशोरसारखे रणनीतीपटू देशभर प्रख्यात होताना दिसतात. माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक हेही रणनीती आखण्यात वाकबगार असायचे. मात्र त्यांची रणनीती प्रासंगिक असायची. प्रसंगाप्रमाणे ते मोहरे बदलताना दिसायचे. पण त्यांच्या पदरी ही सल्ला देण्याकरता चांगले रणनीतीपटू असायचे. आता फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनीही आगामी निवडणुकी करता आपली वेगळी रणनीती आखायला सुरुवात केली असल्याचे समजते. त्याकरता त्यांनी म्हणे फोंड्याच्या राजकारणातल्या काही ‘बाजीगर’ व्यक्तींशी सल्ला मसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राजेशराव हेच जर तुम्ही गेल्या निवडणुकीत केले असते, तर जो निसटता पराभव तुमच्या पदरी पडला, तो पडला नसता. हे आम्ही नाही लोकच बोलताहेत हो. आता बघूया ‘देरसे आये दुरुस्त आये’ असे वाटणारे राजेशराव ‘रणनीती’द्वारा आगामी निवडणुकीत कोणता तीर मारतात ते पहावे लागले? ∙∙∙

सात कोटींचा रस्ता खोदला!

बाळ्ळी ते केपे रस्त्याच्या कामासाठी सात कोटींचा खर्च केला गेला. आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या पुढाकारामुळे हा रस्ता झाला खरा, पण आता रेल्वेच्या कामासाठी हा रस्ता खोदल्याने डिकॉस्ता यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले आहे. आता याप्रकरणी पोलिसांत तक्रारही झाली आहे. सतरा वर्षानंतर या रस्त्याचे भाग्य उजळले होते आणि हा रस्ता वाहतुकीसाठी हॉटमिक्स झाला होता. कोकण रेल्वे प्राधिकरणाने म्हणे कोणतीही परवानगी न घेता हा रस्ता खोदला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारचा रेल्वे प्रकल्प असल्याने रस्ता खोदण्यास भाजपचे राज्यातील सरकार आडकाठी कशी आणणार? हाही प्रश्न आहे. पण आता यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ∙∙∙

भाजप समर्थक मराठीप्रेमी!

गोव्याची राजभाषा मराठी झालीच पाहिजे, असा निग्रह मराठीवाल्यांनी केला आहे. फोंड्यातील मराठी समर्थकांची मोठी जाहीर सभा झाली. त्यावेळेला उपस्थितांची संख्याही तशी लक्षणीय होती. या सभेत मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. प्रसंगी सत्ताधारी भाजपाला सत्ताच्यूत करण्याचा निश्‍चयही झाला. भाजपवाले केवळ मराठी लोकांच्या मतांवर आघाडी घेतात, असेही विधान सभेत करण्यात आले, जे रास्त आहे, कारण बहुतांश मराठीप्रेमी हे भाजप समर्थक आहेत. आता हे भाजप समर्थक मराठीसाठी कितपत पक्षाच्या विरोधात जातील, हा खरा प्रश्‍न आहे.

सभ्यता इथे आणि तिथे!

असभ्य भाषेत वास्को येथील सभेत भाषण केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी अटक केलेल्या गौतम खट्टर याला जामीनावर सुटल्यावर पत्रकारांनी त्याच्या छातीत दुखत होते, त्याचे काय झाले? असा सवाल केल्यावर गोव्यातील पत्रकारांनी या व्यवसायाला अपेक्षित असलेली सभ्यता पाळावी, असा अनाहूत सल्ला गौतमने दिला. त्यावर आता अनेक राजकारण्यांनी त्याची निंदा केली आहे. त्यात भाजपा ते काँग्रेस व्हाया ‘आप’ असा राजकीय प्रवास केलेले राजकारणी रामराव वाघ यांचाही समावेश आहे. पत्रकारांना सभ्यता शिकवणाऱ्या गौतम खट्टर याची वास्कोत जाहीर भाषण करताना सभ्यता कुठे गेली होती? असा सवाल करून असल्या माणसांनी गोवेकरांना सभ्यता शिकवू नये, असा योग्य प्रकाराचा सल्ला दिला आहे. मात्र एक प्रश्न राहतो तो असा, हे वाघ साहेब भाजप पक्षात असताना भाजपमध्ये सभ्यता होती का? की अशी सभ्यता नाही, म्हणून त्यांचीही घुसमट झाल्याने त्यांनी भाजप सोडला? की त्यांनीही आता ‘तेपा परमणे, माथ्याक कुरपणे’ हे धोरण तर स्वीकारलेले नाही ना? ∙∙∙

रमेश तवडकरांचे आता श्रमदान!

भूतकाळाच्या पुण्याईवर वर्तमान जिंकता येत नाही. राजकारणात जो सतत सक्रिय राहतो, मतदारांच्या संपर्कात राहतो, तोच यशस्वी परंपरा कायम ठेवू शकतो. काणकोण मतदारसंघात विद्यमान आमदार व मंत्री रमेश तवडकर यांच्या पुढे विधानसभेच्या निवडणुकीत ताकतवान विरोधकांचे आव्हान उभे राहणार आहेत, असे संकेत मिळायला लागल्याने मंत्री काणकोण मतदारसंघात सक्रिय व्हायला लागले आहेत. रमेशराव श्रमधाम योजनेंतर्गत कुडचडे व प्रियोळ मतदारसंघात श्रमधाम योजना नेण्यात बिझी होते. आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे श्रमधाम बाजूला ठेवून रमेश काणकोण मतदारसंघात श्रमदान करायला लागले असल्याचा दावा रमेश विरोधक करायला लागले आहेत. प्रियोळ व कुडचड्याची श्रमधाम लाभार्थी आपल्याला निवडणुकीत कामाला येणार नाहीत, राजकारणात तग धरायचा असेल तर काणकोणात अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. ∙∙∙

शिकारीला लोक जातातच कसे?

राज्यातील वन्यप्राण्यांवर आफत आली आहे. कायदा कितीही कडक केला तरी गुन्हेगार आपल्याला हवे तेच करणार. आता हेच पहा. साकोर्ड्यात पट्टेरी वाघाचा मृतदेह सापडला. आता वाघ आपल्या कर्माने मेला की त्याला मारले? हे कळायला मार्ग नाही. कारण पंधरा दिवस उलटून गेले आहेत. वास्तविक पट्टेरी वाघांचे अस्तित्व कमी झाले आहे. त्यातच अशाप्रकारे कुणाकडून जर शिकार होत असेल तर तो मोठा गुन्हा आहे. कारण यापूर्वी पाच वाघ मृतावस्थेत सापडले आहेत. मूळात शिकारीला लोक जातातच कसे? हा प्रश्‍न आहे. वन खात्याकडून रानात चोरीछुपे शिकारीसाठी ‘भोवंडी’ काढणाऱ्याना आधी ताब्यात घ्यायला हवे. तरच असे प्रकार रोखले जातील. ∙∙∙

पत्रकारांबाबत ‘मौन’ का?

‘गोंयचो सायब’ म्‍हणून जगभर प्रसिद्ध असलेल्‍या सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्‍ये करणाऱ्या हिंदुत्‍ववादी गौतम खट्टरला अटक करण्‍यात आली. त्‍यानंतर त्‍याची शनिवारी जामिनावर सुटकाही झाली. पण, या सुटकेनंतर खट्टरने थेट पत्रकारांनाच शिंगावर घेतले. गोव्‍यातील पत्रकारांना पत्रकारितेची शिस्‍त माहीत नाही. त्‍यांनी ‘नैतिकता’ जपावी, अशी मुक्तफळेही उधळली. त्‍याच्‍या या वक्तव्‍यांचा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) निषेध नोंदवला. परंतु, आमदार विजय सरदेसाई यांच्‍या व्‍यतिरिक्त एकाही राजकारण्‍याने पत्रकारांच्‍या या अपमानावर भाष्‍य केले नाही. किंबहुना खट्टरचा साधा निषेधही केला नाही. एरव्‍ही, पत्रकार दिनाच्‍या कार्यक्रमात पत्रकारांवरील अन्‍यायाला वाचा फोडण्‍याच्‍या गप्‍पा मारणारे हे राजकारणी खट्टरबाबत मौन का बाळगून आहेत? या प्रश्‍‍नाचे उत्तर आता जनताही शोधत आहे. ∙∙∙

खट्टरला दररोज प्रसिद्धी?

वास्कोत १९ एप्रिल रोजी गौतम खट्टर याने केलेल्या वादग्रस्त भाषणापूर्वी त्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल, तेवढी प्रसिद्धी त्याच्या वादग्रस्त भाषणानंतर मिळाली आहे, हे कोणीही मान्य करेल. विशेष म्हणजे त्याची अटक होईपर्यंत तो प्रसारमाध्यमांचा विषय ठरला. त्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून त्याचा दररोज उल्लेख होऊ लागला आहे. दररोज कोण ना कोण राजकीय नेता खट्टरवर आपले मत व्यक्त करीत आहे. त्यामुळे हरिद्वार-उत्तराखंड या भागात परिचित असलेल्या गौतम खट्टरची आता राष्ट्रीय पातळीवर निश्चित ओळख निर्माण झाली असेल, एवढा गवगवा गोमंतकीय नेत्यांनी केला आहे, असे म्हणता येऊ शकतो. भलेही त्याच्यावर टीका झाली असेल, पण त्याचा उल्लेख केल्याशिवाय ते शक्य होत नाही. त्यामुळे आता खट्टर हा विषय किती चघळायचा हे आपल्याच हाती आहे. ∙∙∙

‘बेल’ नावाचे जालीम औषध

राजकारणी कुणीही असो, त्याची अर्धी लाकडे मसणात गेली, तरी त्यांना कुठलेही पद मिळाले, तर त्यांची प्रकृती ठणठणीत होते. कुठल्याही गुन्हेगारांचेही तसेच असावे, जर त्यांना अटक केली, तर त्यांच्या छातीत लगेच दुखू लागते आणि त्यांना इस्पितळात भरती केले जाते. पण त्यांना त्या अवस्थेत असताना न्यायालयाने जामीन दिला, तर ते लगेच ठणठणीत बरे होतात. हल्लीच असा प्रकार गोव्यातही घडला, त्यावर राजकीय विश्लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो यांनी आपल्या फेसबुकवर सूचक मल्लिथानी केली आहे. ते म्हणतात, ‘बेल’ हे एक असे जालीम औषध आहे, की ते इस्पितळात भरती झालेल्यांनाही ठणठणीत बरे करते. आता ॲड. कुतिन्हो यांनी कुणाला उल्लेखून हा पोस्ट टाकला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. जर त्यावर अधिक भाष्य केले, तर कदाचित आम्हालाही ‘एथिक्स’चा डोस मिळू शकतो, हो की नाही! ∙∙∙

‘सुंभ जळला, तरी पीळ कायम’

‘गोंयचो सायब’ म्‍हणून जगभर प्रसिद्ध असलेल्‍या सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त वक्तव्‍याप्रकरणी अटक झालेला हिंदुत्ववादी कार्यकर्ता गौतम खट्टर शनिवारी जामिनावर मुक्त झाला. तो बाहेर आल्‍यानंतर पत्रकारांनी त्‍याच्‍याभोवती गराडा घालत त्‍याला काही प्रश्‍‍न विचारले. पण, कुठल्‍याशी प्रश्‍‍नांची उत्तरे न देता स्‍वत:च्‍या पत्रकारितेची मिजास मिरवत गोव्‍यातील पत्रकारांना त्‍याने ‘पत्रकारितेची नैतिकता’ पाळण्‍याचा सल्ला दिला. त्‍यामुळे पत्रकारांनीही त्‍याच्‍यावर याच विषयावरून हल्लाबोल चढवण्‍यास सुरुवात केल्‍यानंतर त्‍याच्‍यासोबत असलेल्‍या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’चा नारा देत त्‍याला कारमध्‍ये बसवले. हा प्रसंग पाहताना ‘सुंभ जळला तरी पीळ कायम’ या म्‍हणीची आठवण झाली. ∙∙∙

निवडणुकीचे काय?

आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांच्‍यावरील कारवाईनंतर रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षात (आरजीपी) सुरू झालेली अंतर्गत धुसफूस अजूनही कायम आहे. याआधी आंदोलने, पत्रकार परिषदांच्‍या माध्‍यमातून चर्चेत राहणारे या पक्षाचे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर दोघेही सध्‍या शांत असून, त्‍यांनी फेसबुकवर एकमेकांना ‘अनफॉलो’ही केले आहे. या प्रकरणांनंतर या दोघांमध्‍ये फूट पडल्‍याचेही वारंवार समोर येत आहे. अशा स्‍थितीत गत विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेसला घाम फोडलेला ‘आरजीपी’ दहा महिन्‍यांवर येऊन ठेपलेल्‍या विधानसभा निवडणुकीस धैर्याने सामोरा जाणार? की निवडणुकीआधीच ढेपाळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

अशुद्ध कोकणी बातमीपत्र!

आकाशवाणीवर कोकणी बातम्यांचा रतीब चालू आहे, पण त्यात विविधांगी चुका असतात. इतक्या की विश्लेषण करणे अवघड जावे. एकेकाळी बातम्या ऐकणे म्हणजे आनंद असे, तेच आता गाडीत बातम्या ऐकताना वेदनादायी अनुभव ठरत आहे. कंटाळून वाचणे, साधा कोकणी शब्द असताना मराठी ठोकून देणे, जीव नसल्यासारखे नीरस रटाळ निवेदन करणे, ऊर्जा नसणे, यामुळे श्रोते कंटाळले, वैतागले आहेत. कटिबध्द आसा, हे चूक नव्हे. परंतु ते ‘लागणुकेक सरकार बांदिल्लें आसा’, हे अधिक सुटसुटीत, शुध्द, गोड लागते. मुळातच शब्दागणीक अडखळणाऱ्या निवेदकांना जोडाक्षरी संस्कृतप्रचुर शब्द (कटिबध्द, प्रद्युम्न, कृतकृत्य) उच्चारायला किती महत्प्रयास होईल, याची कल्पना करवत नाही. एकही नियमित वृत्तनिवेदक नसणे व सर्व मदार योग्य प्रशिक्षण नसलेल्या निवेदकांकडे दिल्यावर बातम्यांची उंची वाढणे शक्य होईल का? ∙∙∙

कुंकळ्ळी, कुठ्ठाळीत आमदार भाजपाचा?

माणसाने आशावादी असायला हवे. जगात अशक्य असे काहीही नसते, जर दोन खासदारांनी सुरू झालेला भाजपा संपूर्ण देशावर व नव्वद टक्के राज्यात सरकार स्थापन करू शकते, तर कुंकळ्ळी व कुठ्ठाळीत या मतदारसंघात कमळ फुलविण्यात काहीही कठीण नसल्याचे सांगून समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुंकळ्ळी व कुठ्ठाळी मतदारसंघातील मरगळ आलेल्या भाजपा कार्यकर्त्यात नवीन शक्ती फुंकण्याचा प्रयत्न केला. भाजपा कार्यकर्त्यांना यशाचा मंत्र पाठ शिकवताना सकारात्मक पद्धतीने काम केल्यास यश मिळणे अशक्य नाल्याच्या मंत्र सुभाष फळदेसाईंनी कार्यकर्त्यांना दिला असला तरी कुठ्ठाळीत भाजप समर्थक अपक्ष असताना तिथे कमळ कसे फुलणार? कुंकळ्ळीत युरी असताना भाजपाला यश कसे मिळणार? यावर कार्यकर्ते चिंतन सभेत चिंतन करण्यात गर्क होते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gajkesari Yog 2026: चंद्र-गुरुचा अद्भुत मिलाफ! 'गजकेसरी योग' उजळणार 5 राशींचं भाग्य, धनलाभ आणि मानसिक शांती लाभणार; गुंतवणुकीसाठीही सुवर्णसंधी

Goa Agriculture Export: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गोव्यातून कृषी निर्यात वाढणार; मोपावर लवकरच 'निर्यात पॅक हाऊस'

Road Accident: "जखमींना वाचवायला गेले अन् स्वतःच काळ बनून आलेल्या कारखाली चिरडले!" भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू; मदतीला धावणारी माणुसकी ठरली 'टार्गेट'

Goa Murder Case: कौले ठेवण्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीचे मानेवर सपासप वार, दोन भावांच्या हल्ल्यात काकाचा तडफडून मृत्यू; खाजोर्डा हादरले!

Narve Panchayat Gram Sabha: नार्वेत मेगा प्रकल्पांना ‘नो एंट्री’! ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय एकाही प्रकल्पाला परवानगी न देण्याचा ठराव; पंचायतीच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT