

वाळपई: दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी विद्यार्थी तसेच तरुण अनेकदा ‘इथेच जायचे आहे’ असे सांगून हेल्मेट न घालता वाहन चालवतात. वेगमर्यादा न पाळणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे यामुळे गंभीर अपघात घडतात. प्रत्येक वाहनचालकाने स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी केले.
डिचोली वाहतूक सेलतर्फे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई व होंडा (हातवाडा, सत्तरी) येथे रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम मंगळवारी राबविण्यात आली. होंडा जंक्शन, वाळपई हातवाडा तसेच आयटीआय परिसरात झालेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून नियमांची माहिती देण्यात आली.
दिवसेंदिवस रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, तसेच इतर वाहतूक नियम न पाळणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांविषयी माहिती असलेली पत्रकेही वाटप करण्यात आली.
गावस पुढे म्हणाले, पालकांनीही आपल्या मुलांना वाहन चालवायला देताना विशेष खबरदारी घ्यावी. आम्ही शाळा व महाविद्यालयांत सातत्याने वाहतूक जनजागृती कार्यक्रम राबवितो. सुरक्षित वाहन चालविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
या मोहिमेत डिचोली वाहतूक पोलिस खात्याचे हवालदार पुंडलिक सावंत तसेच इतर वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक खात्याच्या या उपक्रमामुळे वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी मोठ्या प्रमाणात विना हेल्मेट परिधान करणारे आढळून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.