Ponda Municipal Election Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Election: फोंड्यात भाजप-मगोची सत्त्‍वपरीक्षा!

मतपरीक्षा : 13 प्रभागांतून 43 उमेदवार रिंगणात; दोघांची बिनविरोध निवड

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipal Election फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार दि. 5 मे रोजी मतदान होत असून कोण किती पाण्यात आहे याचा अंदाज येईल तर कोण पास आणि कोण नापास होणार, हे 7 मे रोजी कळणार आहे. उमेदवारांच्या राजकीय भवितव्याच्या चाव्या मतदारांच्या हातात आहेत. मात्र त्‍या कशा फिरवतात हे आज समजणार आहे.

फोंडा पालिकेच्‍या 15 पैकी 13 प्रभागांमध्‍ये उद्या निवडणूक होणार असून एकूण 43 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप समर्थक दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. गेले 20-22 दिवस अटीतटीचा प्रचार झाला असून काही प्रभागात ‘तू तू मै मै’चेही प्रकार बघायला मिळाले.

तरीसुद्धा गेल्या खेपेएवढी यंदाच्या प्रचाराला धार नसल्यामुळे काही प्रभागांत ‘ठंडा ठंडा-कूल कूल’ असे वातावरण आहे. 3 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचार बंद झाल्यानंतरही अंतर्गत प्रचार सुरू होता. ‘रात के अंधेरे मे’ बऱ्याच गोष्टी शिजल्या असल्‍याचे समजते.

तेराही प्रभागांत भाजपने आपले उमेदवार उतरविले असून त्यांचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. ‘रायझिंग फोंडा’ पॅनलने आपले 12 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

त्यांनी प्रामुख्याने ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला आहे. या पॅनलचे नेते डॉ. केतन भाटीकर हे स्वतः सर्व प्रभागांत फिरताना दिसले.

काँग्रेस समर्थक उमेदवार पाच प्रभागांत आहेत. त्‍यांनी प्रभाग क्रमांक 6, 11 व 12 या तीन प्रभागांवर जास्त लक्ष केंद्रीय केले आहे. फोंड्यातील काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे प्रामुख्याने प्रभाग 11 व 12 मध्ये फिरताना दिसले. मात्र या पक्षाचा दुसरा कोणताही राज्यस्तरावरील नेता प्रचारात दिसला नाही.

मगोचा ‘वन मॅन शो’

1. ‘रायझिंग फोंडा’ पॅनल मगोचे असले तरी डॉ. केतन भाटीकर यांच्‍याशिवाय दुसरा कोणताही नेता प्रचारासाठी फिरताना दिसला नाही. या पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा या निवडणुकीबाबतचा त्रयस्थ दृष्टिकोन अनेक प्रश्न उपस्थित करून गेला.

2. उमेदवारांच्या प्रचारकार्डावरसुद्धा त्‍यांचे फोटो नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्‍यात आले. यामुळे भाटीकरांचा ‘वन मॅन शो’ मतदारांच्या हृदयात किती उतरला आहे याचे उत्तर ७ मे रोजी मिळणार आहे. त्‍यामुळे ही फोंडा पालिका निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध डॉ. भाटीकर अशी ठरली आहे.

भाजपने लावलीय पूर्ण ताकद

भाजपने आपल्या नेहमीच्या स्टाईलने ही निवडणूक घेतली असून विरोधकांसाठी कोणतीही संधी राहू नये याची खबरदारी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे स्वतः या निवडणुकीत जातीने लक्ष घालताना दिसत होते.

त्यांच्याबरोबर राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक हेसुद्धा वावरताना दिसले. या नेत्यांमुळे भाजप पॅनलच्या उमेदवारांचे मनोधैर्य वाढले आहे.

काही ‘डेंजर झोन’मध्ये असलेल्या उमेदवारांचे त्यांनी पुनर्वसन केल्याचे समजते. त्‍यास किती प्रतिसाद मिळालाय हे निकालानंतरच कळू शकेल.

काँग्रेस पक्ष असून नसल्‍यासारखाच

काँग्रेसने सर्व प्रभागांत आपले उमेदवार का उतरविले नाहीत, हे कळू शकले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे राजेश वेरेकर यांना ६८६० अशी चांगली मते मिळूनही काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तिनिशी पालिका निवडणुकीत का उतरू शकला नाही याचे उत्तर गुलदस्त्यातच राहिले आहे.

विविध प्रभागांतून एकमेकांसमोर आव्हान उभे केलेले उमेदवार ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’ असेच म्हणत असल्यासारखे वाटत होते. मात्र प्रत्येक उमेदवाराची ‘कल क्या होगा किसको पता’ अशी स्थिती आहे, हेच खरे.

रंगतदार लढती

प्रभाग १ : रॉय रवी नाईक (भाजप) वि. नंदकुमार डांगी (रायझिंग फोंडा)

प्रभाग २ : वीरेंद्र ढवळीकर

(भाजप) वि. राजेश तळावलीकर (रायझिंग फोंडा)

प्रभाग ३ : ज्योती नाईक (भाजप) वि. शेरॉल डिसोझा (रायझिंग फोंडा)

प्रभाग ४ : संदीप घाडी आमोणकर (भाजप) वि. व्यंकटेश नाईक (अपक्ष)

प्रभाग ५ : रितेश नाईक (भाजप) वि. सुशांत कवळेकर (रायझिंग फोंडा)

प्रभाग ६ : शौनक बोरकर (भाजप) वि. लिविया फर्नांडिस (काँग्रेस)

प्रभाग ८ : विद्या नाईक (भाजप) वि. अॅड. प्रतीक्षा नाईक (रायझिंग फोंडा)

प्रभाग ९ : रुपक देसाई (भाजप) वि. व्‍हिन्सेंट फर्नांडिस (रायझिंग फोंडा)

प्रभाग ११ : शुभलक्ष्मी शिंक्रे (काँग्रेस) वि. वेदिका वळवईकर (रायझिंग फोंडा)

प्रभाग १२ : विराज सप्रे (काँग्रेस) वि. शिवानंद सावंत (रायझिंग फोंडा)

प्रभाग १४ : आनंद नाईक (भाजप) वि. सूरज नाईक (रायझिंग फोंडा)

प्रभाग १५ : संपदा नाईक

(भाजप) वि. गीताली तळावलीकर (रायझिंग फोंडा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT