गोव्यात सुरू असलेल्या शांघाय सहकार्य बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आपले विचार मांडले. जयशंकर यांनी दहशतवाद जगासमोरील मोठे आव्हान असल्याचे आधोरेखित करत, सीमापार दहशतवादाला देखील आळा घालण्याची गरज असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे.
शांघाय सहकार्य बैठकीच्या दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो, रशियाचे सर्गे लेवरोव, चीनचे किन गँग व इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते.
काय म्हणाले डॉ. परराष्ट्रमंत्री जयशंकर?
'जग सध्या कोरोना आणि त्याच्या परिणामांचा सामना करत आहे. मात्र, दहशतवादाचा धोका अव्याहतपणे सुरूच आहे. सीमापार दहशतवादासह कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दहशतवादाला आळा घातला पाहिजे. दहशतवादाचा मुकाबला करणे हा SCO च्या मूळ उद्देशांपैकी एक आहे.'
'SCO च्या सुधारणा आणि आधुनिकीकरणाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे ही आनंदाची बाब आहे. इंग्रजी ही SCO ची तिसरी अधिकृत भाषा व्हावी यासाठी सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा देण्याची मागणी मी करतो.' असेही एस जयशंकर यावेळी म्हणाले.
दहशतवादाचा अद्याप पूर्णपणे समूळ नायनाट झालेला नाही. दहशतवादाला न्याय्य ठरवता येणार नाही आणि त्याला सर्व प्रकारात आळा घालण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांनाही आळा घालण्याची गरज आहे. सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवण्याची गरज आहे, असे जयशंकर यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
दरम्यान, बिलावल भुत्तो बैठकीत सहभागी होण्यासाठी येत असताना जयशंकर यांनी त्यांचे स्वागत नमस्ते करून केले. यानंतर बिलावल यांनीही हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे काही अंतरावर उभे राहून फोटो काढण्यात आले. फोटो सेशन पूर्ण झाल्यानंतर, जयशंकर बिलावल यांना काहीतरी बोलताना दिसत आहेत आणि नंतर हात दाखवून त्यांना पुढे जाण्यास सांगतात. यानंतर बिलावल भुत्ताे छातीवर हात ठेवून आभार मानताना दिसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.