कोकणी शिक्षणाचा बट्ट्याबोळ
गोंयकार घरी कोकणी बोलत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोकणी शिक्षकांची कानउघाडणी केली, ते बरे झाले. ‘इंटरेस्ट’ घेऊन शिकवले, तर कोंकणी विद्यार्थ्यांना आवडेल व समजेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मडगाव हे कोकणीचे मुख्य केंद्र. मडगाव, म्हापसा, फोंडा, पणजी कुठेही चला; आई मुलांशी इंग्रजीत बोलताना दिसते. कोकणी बोलायला लाज वाटते. मुलांना ८६७३ ही संख्या कोकणीत सांगता येईल का? मग कसले कोकणी शिक्षण? बरी, गोड, मधाळ कोकणी ऐकायलाच मिळत नाही. त्या सुंदर भाषेचे संवर्धन शिक्षकांनी करायला पाहिजे, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. आपले काय चुकते आहे, हे समजून त्यातून सुधारणा केली, तर बरे होईल. विद्यार्थ्यांची खदखद कोकणी शिक्षणात अव्यवस्थित अध्यापनामुळे धुमसत आहे.∙∙∙
वालंका की सिप्रू?
नावेली मतदारसंघात आपली कन्या वालंका आलेमाव हिला काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी चर्चिल आलेमाव दिल्लीवारी करून परतले. दिल्ली भेटीत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली. त्यामुळे चर्चिल समर्थक वालंकाची नावेलीतील उमेदवारी निश्चित आहे, असे ठामपणे म्हणू लागले आहेत. दुसरीकडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सिप्रू कार्दोज यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन यापूर्वी काँग्रेस पक्षात आणण्यात आले होते. त्यामुळे आता सिप्रू यांनीही नावेलीत काम करण्यास सुरुवात केली आहे. नावेलीत काँग्रेस वालंकाला उमेदवारी देणार की सिप्रूला, असा प्रश्न लोकांना पडला आहे. एकंदर पाहता, नावेलीत पुन्हा एकदा बंडखोरांची फळी निवडणुकीत उभी राहणार, असे वाटते. गेल्यावेळी पाच जणांच्या भांडणात भाजपला नावेलीत लाभ झाला होता. यावेळी पुन्हा तसेच होऊन उल्हासला लॉटरी लागणार तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.∙∙∙
गळक्या बसेस...!
पावसाळ्याला अजून खरी सुरुवात व्हायची आहे; पण दोन-तीन दिवसांच्या पावसानेच काही कदंब आणि खासगी बसेसची पोलखोल झाली आहे. वास्कोतील प्रवाशांनी गळत्या बसेसबाबत नाराजी व्यक्त केली असून समाजमाध्यमांवरही प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. बसच्या छतातून पाणी गळत असताना प्रवाशांनी प्रवास करायचा की पावसाचा आनंद घ्यायचा, असा प्रश्न आता पडला आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जात आहेत, तर दुसरीकडे जुन्या बसेसच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. पावसापासून संरक्षण देणाऱ्या बसच जर पावसाचे पाणी आत आणत असतील, तर प्रवाशांनी तक्रार करायची तरी कुणाकडे? आता अधिकारी गळती थांबवणार की प्रवाशांना छत्री घेऊन बसमध्ये बसण्याचा सल्ला देणार?∙∙∙
‘चे ग्वेरां’चा आधार!
रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी सोमवारी सोशल मीडियाद्वारे आपल्याच पक्षाचे आमदार असलेल्या वीरेश बोरकर यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. आमदार बोरकर चोर आणि गद्दार असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे नाईक यांच्या आरोपांना बोरकर हे मंगळवारी उत्तर देतील असे वाटत होते. पण, बोरकर दिवसभर शांत राहिले. ‘व्हॉट्सअप’ स्टेटसवर मात्र प्रसिद्ध लेखक ‘चे ग्वेरा’ यांचे ‘सत्याला काही काळापुरते दडपले जाऊ शकते, पण त्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही’ इतकेच वाक्य टाकत, ‘आपणच आरजीचा अध्यक्ष असून, पक्ष आपण आपल्या ताब्यात घेणारच’ हे अप्रत्यक्षरित्या नाईक यांना सांगितल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
गुटखा विक्रीचे घ्या पुरावे!
पणजी मार्केटमध्ये सिगारेट व गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे. एखाद्या दिवशी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होते आणि पुन्हा आहे तसाच व्यवसाय सुरू होतो. राज्यात गुटख्यावर पूर्णतः बंदी असली, तरी ती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्यक्षात त्याची खुलेआम विक्री सुरूच आहे. पणजीतील मार्केटमध्ये गुटख्याची विक्री होत असल्याचा पुरावा दाखवणारा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी व्हायरल केला आहे. त्यातून गुटख्याची विक्री किती सहजपणे सुरू आहे, हे त्यांनी दाखवून दिले. आता याविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) छापे टाकेल आणि कारवाईही करेल; मात्र केवळ एकाच ठिकाणी गुटख्याची विक्री होत नाही. इतर ठिकाणीही अशाच प्रकारे विक्री सुरू असल्याने त्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. ∙∙∙
कोकणी संस्थांचा भरभक्कम आशीर्वाद!
कोकणी भाषेचे पितामह शणैं गोंयबाब यांची १४९ वी जयंती मंगळवारी डिचोली येथे थाटात साजरी झाली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कोकणी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकमुखी स्तुती केली. त्यात तथ्यही आहे. एका बाजूला मराठीवाद्यांनी सरकारवर राजभाषेसाठी दबाव आणणे व निवडणुकीत धडा शिकवण्याची भाषा चालवली असताना मुख्यमंत्र्यांनी कोकणीची बाजू जोरदारपणे लावून धरली आहे. कोकणीची बाजू एवढ्या समर्थपणे मांडणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थन करणे कोकणी धुरिणांचे कर्तव्यच बनले आहे. म्हणूनच सर्व कोकणी संस्थांच्यावतीने एक मोठा हारही मुख्यमंत्र्यांना अर्पण करण्यात आला. यावेळी ‘बिम्ब’चे संपादक दिलीप बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना ते पुढच्या कारकिर्दीसाठीही मुख्यमंत्री बनोत, असा तोंडभरून आशीर्वादही दिला. ∙∙∙
कुंकळ्ळीही ‘फॉरवर्ड’च्या वाटेवर?
राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. कुंकळ्ळी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे काही काँग्रेसी समजतात, तो त्यांचा भ्रम आहे. या मतदारसंघातून जनता पक्षाचे उमेदवार निवडून येऊन इतिहास रचला होता. युनायटेड गोवन्स पक्षाच्या उमेदवारीवर आरिसियो डिसोझा निवडून आले होते. एवढेच काय, विकासपुरुष म्हणून गणल्या जाणाऱ्या ज्योकिम आलेमाव यांचा पराभव करून भाजपचे राजन नाईक यांनी इतिहास रचला होता, हे आपण विसरता कामा नये. पुढच्या निवडणुकीत युरी आलेमाव यांना शह देण्यासाठी भाजप व काँग्रेसविरोधी समविचारी नेते ‘स्वाभिमानी कुंकळळीकर’ या बावट्याखाली एकत्र येऊ लागले आहेत. युरी आलेमाव व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्यातील दरी वाढत चालल्यामुळे आता कुंकळ्ळी मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्ष प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा युरी आमदार नव्हते, तेव्हा कुंकळळी मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्ष सक्रिय होता. आता युरींच्या विरोधात गोवा फॉरवर्डवाले ‘चल या फुडें’ म्हणतात की नाही, हे पहावे लागेल. ∙∙∙
कोकणी शिक्षणाचा बट्ट्याबोळ
गोंयकार घरी कोकणी बोलत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोकणी शिक्षकांची कानउघाडणी केली, ते बरे झाले. ‘इंटरेस्ट’ घेऊन शिकवले, तर कोंकणी विद्यार्थ्यांना आवडेल व समजेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मडगाव हे कोकणीचे मुख्य केंद्र. मडगाव, म्हापसा, फोंडा, पणजी कुठेही चला; आई मुलांशी इंग्रजीत बोलताना दिसते. कोकणी बोलायला लाज वाटते. मुलांना ८६७३ ही संख्या कोकणीत सांगता येईल का? मग कसले कोकणी शिक्षण? बरी, गोड, मधाळ कोकणी ऐकायलाच मिळत नाही. त्या सुंदर भाषेचे संवर्धन शिक्षकांनी करायला पाहिजे, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. आपले काय चुकते आहे, हे समजून त्यातून सुधारणा केली, तर बरे होईल. विद्यार्थ्यांची खदखद कोकणी शिक्षणात अव्यवस्थित अध्यापनामुळे धुमसत आहे.∙∙∙
संगम भाजीसदृश्य नाटके
गोव्याच्या ग्रामीण हॉटेलातील पातळ भाजी, मिक्स भाजी रूचकरच. संगम भाजी नावाचा प्रकार आहे. चवळी, वाटाणे, छोले, बटाट सुकी, अळंबी, अळसांदे यातील तीन वा चार मिसळून होते ती संगम भाजी. स्वादिष्ट. काही लेखक सध्या अशी संगम-चौर्य नाटके रचण्यात गुंग आहेत. चतुर्थीची बेगमी. चित्रपट, कादंबरी, नाट्यसंहिता, वेब सिरीज, पदरचे संवाद यांचा सरमिसळ संगम म्हणजे ही नाटके. गोव्यात काही दिग्दर्शक क्राफ्ट, सायक्लोरामा, रेंडीशन, डिलीवरी, कन्सेप्ट अशा संज्ञा परत परत, वारंवार उच्चारतात व त्या वापरल्यावर आपण सत्यजित दुबे झालो असे ते भासवतात. नाट्यक्षेत्राची चिखल-भाजी करण्यापासून या पोकळ वाशासारख्या वीरांना रोखलं पाहिजे, अशी खदखद सच्च्या रंगकर्मींमध्ये चालू आहे. हे खरे सांस्कृतिक उत्तरदायित्व.∙∙∙
सुविधांची पोलखोल
पेडण्यातील तांबोसे-उगवे उड्डाणपूल अजून पूर्णपणे लोकांच्या विश्वासावर उभा राहायच्या आतच त्यावर तडे दिसू लागल्याने विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाल्याचे फित कापून सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला पावसाचे चार थेंब पडताच उड्डाणपुलाला तडे आणि सेवा रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य दिसू लागते. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहनांसाठी बांधला की तक्रारींसाठी, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. विकासाच्या गगनभरारीच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र तडे गेलेले पूल आणि चिखलात रुतलेले रस्तेच नागरिकांच्या वाट्याला येत असतील, तर ‘भक्कम पायाभूत सुविधा’ हा शब्द फलकांवरच शोभून दिसतो, नाही का? ∙∙∙
पालिकेचा सुपरफ्लॉप शो!
‘नेहमी येतो पावसाळा...’ ही म्हण म्हापसा पालिकेला तंतोतंत लागू होते. पहिल्याच पावसात म्हापसा मार्केटमध्ये पाणी साचल्यामुळे पालिकेच्या तथाकथित पूर्वतयारीचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत. पालिकेने पावसाळ्याचे असे काही नियोजन केले की, पहिल्याच साध्या पावसात म्हापसा मार्केट थेट ‘व्हेनिस’ बनले! नुकतेच कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते चकाचक केले होते; तिथे आता लोकांना मोफत ‘स्विमिंग पूल’ मिळाला. बाजारपेठेत घोट्याएवढे पाणी साचल्यामुळे ग्राहकांना खरेदीसोबत फुकट ‘वॉटर पार्क’चा आनंद मिळत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मान्सूनपूर्व कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा पहिल्याच पावसाने पार वाहून नेला. आता पुढे मुसळधार पाऊस आल्यावर दुकानदारांना दुकानात बसण्यासाठी नाही, तर बाजारात होड्या चालवण्यासाठी परवाना काढावा लागणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. प्रशासनाची कमालच म्हणावी लागेल; कारण यांची विकासकामे कागदावर एकदम चकाचक आणि प्रत्यक्षात मात्र ‘तुडुंब पाणीच पाणी’!∙∙∙
कारापूरवासीयांचे आंदोलन शंभरीकडे!
कारापूर-सर्वण येथील ग्रामस्थांनी मेगा गृहप्रकल्पाला विरोध केला आहे. त्या प्रकल्पाविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले असून, त्याला मंगळवारी ८० दिवस पूर्ण झाले. आणखी वीस दिवसांनी त्या आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण होतील आणि राज्यातील आंदोलनांपैकी सर्वाधिक काळ चाललेल्या आंदोलनांमध्ये या आंदोलनाची नोंद होईल. सनदशीर मार्गाने कारापूर-सर्वणचे लोक आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी राजधानीत विविध खात्यांमध्ये जाऊन निवेदने दिली, प्रसंगी दिवसभर ठिय्याही मांडला. क्रांती दिनीही त्यांनी पणजीत धडक दिली. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागली. विशेष बाब म्हणजे या आंदोलनात वयोवृद्धांचा सहभाग दखल घेण्याजोगा आहे. या आंदोलनाला सरकार शंभर दिवस पूर्ण होऊ देणार की त्यापूर्वीच त्या प्रकल्पाविषयी काही पावले उचलणार, हे येत्या दोन आठवड्यांत दिसून येईल.∙∙∙
फुटपाथ माणसांसाठी की झाडांसाठी?
फुटपाथ म्हणजे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर वावरासाठी केलेली व्यवस्था, असे आतापर्यंत सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र, कांदोळीमध्ये या समजुतीलाच छेद देणारे चित्र पाहायला मिळत आहे. येथे चक्क फुटपाथवरच झाडे लावण्यात आल्याने पादचाऱ्यांनी चालायचे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘ग्रीन गोवा’ हा सरकारचा संकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे; परंतु फूटपाथच्या मध्यभागी झाडे लावून तो राबवण्याची कल्पना काहीशी विचित्रच वाटते. या प्रकारावरून काही नागरिक गंमतीने म्हणतात की, कदाचित आता माणसांनी रस्त्यावरून चालायचे आणि झाडांनी फुटपाथचा वापर करायचा, असा नवा नियमच लागू झाला असावा! परिणामी, सध्या गावात एकच चर्चा रंगली आहे, हे अफलातून नियोजन करणारे ‘अति शहाणे’ महाशय नेमके कोण? आणि त्यांनी हा निर्णय घेताना पादचाऱ्यांचा विचार तरी केला होता का?∙∙∙
क्लाफास डायसची चाचपणी सुरू
२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर कुंकळ्ळीतून निवडून आलेले क्लाफास डायस यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, २०२२ च्या निवडणुकीत कुंकळ्ळीच्या मतदारांनी त्यांना नाकारत युरी आलेमाव यांना निवडून दिले. साडेचार वर्षांत कुंकळ्ळीच्या साळ नदीतून बरेच पाणी वाहून गेले असून, साडेचार वर्षे राजकीय वनवासात गेलेले क्लाफास आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. आम आदमी पक्षाने त्यांच्याशी संपर्कही साधला आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने कुंकळ्ळीत आपला उमेदवार म्हणून माजी पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस यांचाही विचार सुरू केला आहे. त्यामुळे आपचा उमेदवार क्लाफास असणार की सॅमी, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेतच.∙∙∙
चिंचोणे पंचायतीवर ‘आप’चा झेंडा!
‘रिकामे भांडे जास्त आवाज करते’ असे म्हणतात. राजकारणातही अशी नुसती बडबड करणारी अनेक रिकामी भांडी आहेत. वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्रुझ सिल्वा हे तसे शांत स्वभावाचे राजकारणी आहेत. आम आदमी पक्षात असूनही त्यांनी आपल्या मतदारसंघात चांगला विकास साधला आहे. ते मीडियाफ्रेंडली नसल्यामुळे त्यांचा प्रभाव कदाचित इतरांना दिसत नसेल. मात्र, आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी व मतदारांच्या उद्धारासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी उदाहरणातून दाखवून दिले आहे. आता त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरही प्रभाव पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे या मतदारसंघातील सर्वांत मोठी पंचायत असलेल्या चिंचोणे पंचायतीवर आम आदमी पक्षाचा झेंडा फडकवण्यात यश मिळाले आहे. ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जॉर्सन गोम्स यांची चिंचोणे पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ‘आप’वाले आता म्हणू लागले आहेत की, क्रुझ सिल्वा यांना प्रसिद्धी नको, काम हवे आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.