

महागाईच्या काळात घरखर्च चालवताना मध्यमवर्गीयांची मोठी ओढाताण होते. पगार झाल्या झाल्या पहिल्या आठवड्यात आपण मुक्तहस्ताने खर्च करतो आणि महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून 'हात आखडता' घेण्याची वेळ येते. अनेकदा बचतीचा कितीही प्रयत्न केला, तरी महिनाअखेरपर्यंत बजेट कोलमडतेच. मात्र, आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर आपण महिन्याच्या पहिल्या तारखेलाच काही शिस्तबद्ध पावले उचलली, तर अनावश्यक खर्च टाळून मोठी बचत करणे सहज शक्य आहे.
बचतीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे 'बजेट'. महिन्याची सुरुवात होताच आपल्या एकूण उत्पन्नाची आणि निश्चित खर्चाची (उदा. घरभाडे, वीज बिल, किराणा, प्रवास खर्च) सविस्तर यादी तयार करा.
यामध्ये महत्त्वाच्या खर्चांनंतर जे पैसे उरतात, त्यातील अनावश्यक गोष्टी जसे की, बाहेरील हॉटेलिंग किंवा विनाकारण ऑनलाइन शॉपिंग यावर किती खर्च करायचा, हे आधीच ठरवून घ्या. आजकाल अनेक मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या रोजच्या खर्चाचा मागोवा (Tracking) घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला तुमचा पैसा कुठे जातोय हे समजते, तेव्हा तो रोखणे सोपे जाते.
बहुतेक लोक खर्च करून उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात, जे चुकीचे आहे. याऐवजी 'पे युवरसेल्फ फर्स्ट' (Pay Yourself First) हे तंत्र वापरा. म्हणजे पगार जमा होताच बचतीची ठराविक रक्कम (उदा. १० ते २० टक्के) बाजूला काढून ठेवा किंवा ती रक्क आवर्त ठेव (RD) किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा.
एकदा का बचतीची रक्कम बाजूला झाली की, उरलेल्या पैशातच महिना चालवण्याची मानसिक तयारी होते. यामुळे तुमच्याकडे खर्चासाठी मर्यादित रक्कम उरते आणि आपोआपच काटकसर करण्याची सवय लागते.
अनेकदा सण-उत्सव किंवा सेलच्या नावाखाली आपण गरज नसतानाही खरेदी करतो. हे टाळण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच मनोरंजन आणि शॉपिंगसाठी एक 'मर्यादा' (Limit) निश्चित करा.
उदाहरणार्थ, बाहेर खाण्यासाठी २ हजार आणि शॉपिंगसाठी १ हजार रुपये असे बजेट ठरवा. एकदा ही मर्यादा संपली की, त्या महिन्यात त्या गोष्टीवर खर्च करू नका. जर एखादा खर्च टाळता येण्यासारखा नसेल, तर तो पुढच्या महिन्याच्या बजेटमध्ये ॲडजस्ट करा. या साध्या वाटणाऱ्या सवयी दीर्घकाळात तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.