खरी कुजबुज: मुख्यमंत्री साहेब ‘त्या’ धनगराच्या पोराचे काम होणार?

Khari Kujbuj Political Satire: राजकारण्यांनी जनतेच्या विशेषतः बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainiak Gomantak
Published on
Updated on

...अन् रितेश झाले भावुक

काल फोंडा इथे साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांच्या नाट्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. म्हाडगुत यांनी आपले हे पुस्तक माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांच्या स्मृतींना अर्पण केल्यामुळे कार्यक्रमात रवींचा उल्लेख येणे अपरिहार्य होते. आणि तो आलाही. म्हाडगुत यांनी यावेळी रवींच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले रवींचे ज्येष्ठ पुत्र रितेश बरेच भावूक झाल्यासारखे दिसले. आपल्या वडिलांच्या आठवणी हे आपले सामर्थ्य असून त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू असे ते नंतर आपल्या भाषणात बोलून गेले. त्यांच्या भाषणातला प्रत्येक शब्द भावनेने ओतप्रोत भरल्यासारखा वाटत होता. त्यामुळे सभागृहातले वातावरण भावनाप्रधान होऊन प्रेक्षकही हेलावले. ‘जाने वाले कभी नही आते, जाने वालों की याद आती है’ हेच शेवटी खरे. नाही का? ∙∙∙

पत्रकार परिषद झाली... पण तपास कुठे गेला?

दरोडा प्रकरणात संशयितांना थेट दिल्लीतून गोव्यात आणलं, मोठ्या थाटात चौकशी सुरू झाली आणि लगेच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी ‘मोठं काम’ केल्याचंही सांगितलं. पण गंमत म्हणजे त्यानंतर चौकशीत नेमकं काय बाहेर आलं, काय धागेदोरे मिळाले, कोणत्या दिशेने तपास चाललाय... याबाबत मात्र शांतता पाळली गेली आहे. आता राज्यात चर्चा अशी की, पत्रकार परिषदेत माईक जास्त बोलले आणि तपास कमी! काही लोक म्हणतात, त्यांना दिल्लीहून आणण्याचा प्रवास तरी समजला, पण तपासाचा प्रवास कुठपर्यंत पोहोचला हे अजून कुणालाच कळलेलं नाही. आता पुढे पोलिसांकडून तपासाची खरी माहिती बाहेर येणार की ‘चौकशी सुरू आहे’ हेच कायमचं अधिकृत वाक्य राहणार, याकडे सगळ्यांचं लागलंय लक्ष! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

लोकांना जाग कधी..?

गोव्यात एकीकडे स्टाफ सिलेक्शन कमिशन कडक शिस्तीत परीक्षा घेऊन मेरिटवर नोकऱ्या देत असताना, दुसरीकडे या ‘सुहानी’ यासारख्या महिलांनी समांतर ‘रिक्रूटमेंट बोर्ड’च उघडल्यासारखे वाटते. गंमत बघा, साखळी मतदारसंघातील एकामागून एक अशा महिला समोर येत आहेत, ज्यांचा रुबाब बघितला तर साक्षात कमिशनचे चेअरमनही ‘कॉम्प्लेक्स’मध्ये येतील! या महिला स्वतःला थेट मंत्रालयाची बदली-बढतीची फाईल समजतात आणि लोकही इतके भोळे की, ‘परीक्षा-इंटरव्ह्यू’च्या पारदर्शक प्रक्रियेपेक्षा या ताईंच्या ‘गॅरंटी’वर जास्त विश्वास ठेवतात. १८-१८ लाख रुपये देऊन लोक ड्रायव्हर किंवा क्लार्क व्हायला बघतात, हे बघून हसावे की, रडावे तेच कळत नाही. मुळात लोकांच्या मनात शॉर्टकटची इतकी हाव आहे की, त्यांना समोरची बाई स्वतः कंत्राटी कामगार आहे, हे दिसत नाही, पण ती मंत्र्यांच्या जवळची आहे हा भास मात्र नक्की होतो. जोपर्यंत सामान्य माणसाला मेहनतीपेक्षा ‘सेटिंग’वर जास्त प्रेम आहे, तोपर्यंत गल्लीबोळात अशा ‘फेक चेअरमन’ तयार होतच राहणार आणि बिचाऱ्या साध्या तरुणांना गांडवत राहणार. खरे तर, जाहिरात येण्याआधीच या महिलांच्या घरातून ‘जॉब ऑफर’ सुटतात, हेच लोकशाहीचे मोठे दुर्दैव आहे! ∙∙∙

देर आये दुरुस्त आये....

अखेर मडगाव पालिका वाचनालयाला पूर्णवेळ ग्रंथपाल लाभला. तब्बल नऊ वर्षे ग्रंथपालपद रिक्त होते. आता या खुर्चीवर रोशनी नाईक देसाई या विराजमान झाल्या आहेत. त्यापूर्वी सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत होत्या.मागच्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन झाले. रोशनी मॅडम या आपल्या कामात निपुण आहेत.पालिकेच्या या वाचनालयात ग्रंथपाल नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. नऊ वर्षाने का होईना आता या पालिकेला पूर्ण वेळ ग्रंथपाल लाभला हेही नसे थोडके. देर आये दुरुस्त आये असेच मडगाव पालिकेबाबत लोक बोलतात. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Satire: खरी कुजबूज! आता ‘आयआयटी’ कुठे?

बैठकीतले पोलिस अन् पार्किंगमधले नियम!

पणजीत टॅक्सी पार्किंगसाठी नवे नियम आले, चर्चा झाली. कागद फिरले... फक्त अंमलबजावणीच अजून पार्किंग शोधत फिरतेय म्हणे! कारण काय तर, पोलिस उपलब्ध नाहीत. हे ऐकून सामान्य माणूसही गोंधळलाय. कारण शहरात कुणी पोलिसांना शोधायला गेले, की उत्तर ठरलेलं ‘साहेब बैठकीत आहेत.’ आता इतक्या बैठका नेमक्या कशासाठी चालतात, हा संशोधनाचा विषय झालाय. लोक म्हणतात, टॅक्सी पार्किंगचा प्रश्न रस्त्यावर आहे आणि पोलिस मात्र अजूनही कॉन्फरन्स टेबलाभोवतीच ट्रॅफिक कंट्रोल करतायत बहुतेक! एका बाजूला नियम अंमलात आणायला पोलिस कमी पडतात, तर दुसऱ्या बाजूला बैठकांसाठी मात्र खुर्च्या कमी पडत नाहीत, अशीही मिश्किल चर्चा सुरू आहे. आता प्राधान्य रस्त्याला द्यायचं की बैठकीला, हे एकदा खात्यानेच स्पष्ट केलं तर जनतेचंही ‘पार्किंग’ नीट लागेल म्हणे! ∙∙∙

बाळ्‍ळी पंचायत पुन्‍हा काँग्रेसकडे?

केपे आणि कुंकळ्‍ळी अशा दोन मतदारसंघात वाटून गेेलेली बाळ्‍ळी पंचायत ही पूर्वी काँग्रेसकडे होती. त्‍यावेळी काँग्रेसचे गाेविंद फळदेसाई हे सरपंच होते. पण नंतर काही कारणांमुळे गाेविंद फळदेसाई यांना पायउतार होण्‍याची परिस्‍थिती निर्माण झाल्‍याने त्‍यांनी भाजपला साथ दिली आणि काँग्रेसकडे असलेली ही पंचायत भाजपकडे गेली. सध्‍या या पंचायतीचे सरपंच भाजपचे दक्षिण गोवा अध्‍यक्ष प्रभाकर गावकर हे आहेत. प्रभाकर यांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर उपसरपंच बिंदिया गावकर हिच्‍याविरुद्ध अविश्र्‍वास ठराव आणला होता, पण भाजपला साथ देणारे गोविंद फळदेसाई हे या अविश्‍वास ठरावाच्‍यावेळी गैरहजर राहिल्‍याने हा ठराव बारगळला. असे म्‍हणतात, सध्‍या गोविंद फळदेसाई यांनाच पुन्‍हा सरपंच करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यामुळे त्‍यांनी भाजपची साथ सोडली. हे जर खरे असल्‍यास बाळ्‍ळी पंचायतीत लवकरच सत्तापालट होऊन ही पंचायत पुन्‍हा एकदा काँग्रेसकडे येणार असेच सध्‍या सांगितले जाते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Digambar Kamat Political Career: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

असे प्राचार्य, असे विद्यार्थी!

चौगुले कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. विनायक शिरगुरकर यांनी आपल्या प्राचार्यपदाची कहाणी सांगणारे ‘परिवर्तन’ पुस्तक लिहिले आहे.त्याचे प्रकाशन रविवारी झाले. खूप कमी प्राचार्य, प्राध्यापक आहेत, जे असे आपले वैशिष्ट्यपूर्ण आत्मवृत्त लिहितात. महाराष्ट्रातील अनेक बुद्धीवंतांनी गोव्यात खूप महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, व एक पिढी घडवण्यात योगदान दिले आहे. अशातले एक लोकप्रिय प्राचार्य शिरगुरकर. त्यांच्या काळात तयार झालेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात नाव कमावताना दिसतात व राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. त्या अनेकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला. संजना प्रकाशनने हे पुस्तक काढले आहे. ∙∙∙

दर्जेदार सूत्रसंचालन हवं

बक्षीस वितरण सोहळा चालला होता. पालक विद्यार्थी होते. निवेदिका बक्षीस प्राप्त विद्यार्थ्याचं नांव घेतल्यावर तो जर अनुपस्थित असेल तर परत परत हे दुर्देवी आहे की तो अनुपस्थित आहे, असं म्हणत होती. ते सुध्दा इंग्रजीत. मुळात ती इंग्रजी आपल्याला व्याकरणशुद्ध पध्दतीने सफाईदारपणे बोलता येते काय? कोण जर हजर नसेल तर त्यात दुर्दैव ते कसलं? सूत्रसंचालकाला नेमके शब्द ठाऊक असावेत. अनर्थ होतो नाही तर. विचका पचका होत होता कार्यक्रमाचा. सराव पाहिजे. एकटी निवेदिका क्रिकेट समालोचन किंवा निरूपण केल्यासारख्या वेगाने त्या द्रूत लयीत, तशा मात्रांच्या लयीत बोलत होती. भडाभडा. सूत्रसंचालन ही डोकेदुखी न होता, आनंददायी झालं पाहिजे. वेणीतील दोरा दिसत नाही, तसं त्याचं वर्चस्व वा आक्रमकता दिसू नये. भाषणाचा स्वर नको. आर्जवी सुसंवाद साधावा. संक्षिप्त, थोडक्यात. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Ramesh Tawadkar political career: रमेश तवडकर यांची 'श्रम-धाम फळाला, क्रीडा शिक्षक ते सभापतीपदापर्यंत यशस्वी वाटचाल, वाचा त्यांची कारकीर्द

पंचायती दोन, पण सचिव एकच !

मये मतदारसंघातील मये वांयगिणी पंचायत आणि सर्वण कारापूर पंचायत या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने मोठ्या पंचायती प्रत्येकी ११ पंच येथे आहेत. परंतु या दोन्ही पंचायतींचा कारभार पाहण्यासाठी एकाच सचिवाची नियुक्ती करण्यात आली असून दोन्हींकडे या सचिवाला धावाधाव करावी लागते. त्यामुळे सचिव नेमका कोणत्या पंचायतीत आहे, याची आधी विचारणा करावी लागते. नागरिकांना एखादे साधे काम असल्यासही अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. ‘सरकारी काम बारा महिने थांब’ अशी अवस्था दोन्ही पंचायतींमधील नागरिकांची झाली आहे. ∙∙∙

मायकलना अजूनही विश्‍‍वास

राज्‍य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्‍या एका जागी महिला आमदार म्‍हणून डिलायला लोबो यांची वर्णी लागू शकते, अशा बातम्‍या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्‍यापासून सर्वांचेच लक्ष याकडे लागून आहे. परंतु, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप यावर भाष्‍य केलेले नाही. सोमवारी पत्रकारांशी बोलताना, आम्‍हालाही ही माहिती वर्तमानपत्रांतूनच मिळालेली आहे. पण, अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेते, मुख्‍यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक घेतील, असे ते म्‍हणाले. सोबतच दिलायला लोबो यांनी १५ वर्षे सरपंच म्‍हणून काम केलेले आहे. सध्‍या आमदार म्‍हणूनही त्‍या काम करीत आहेत, असेही वक्तव्‍य केले. या वक्तव्‍यातून मायकलनी अजून आशा सोडलेली नाही. आपल्‍या घरात मंत्रिपद येईल, याचा त्‍यांना ठाम विश्‍‍वास असल्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍या आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Telangana Political Crisis: BRS पक्षाचे आमदार, नेते गोव्यात तळ ठोकून का बसलेत? केटी रामाराव यांनी घेतली भेट

कोंकणी नाटकाची इतकी घसरण?

कोंकणी नाटकाचा घसरणारा दर्जा हा विषय कायमच चर्चेत आहे. एका नाटकाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात वक्त्यांनी याचा खरपूस समाचार घेतला. काही नाटके ही सभ्यता, श्र्लीलता यांची मर्यादा ओलांडून पांचटपणाकडे झुकतात व कुटुंबासह ती पाहणे म्हणजे डोकं ठणकावून घेणे असाही एक सूर निघाला. लेखकांनी नाटके लिहून अनेक प्रयोग करून नाटक गांवोगांव पोहोचविले. त्याची दखल कला अकादमी व इतर कोंकणी संस्था घेत नाही. ही उपेक्षेची वागणूक कला क्षेत्रात निरोगी पोषक वातावरण राखत नाही. अपवाद सोडले तर चांगली संहिता देणारे लेखक कोंकणीकडे नाही हे सत्य आहे. कैक कारणांनी जनमानसात कोंकणी नाटकाची छी थू झालीय. कथित बालगड्यांनी हा म्हारू चूड दाखवून घरी आमंत्रित केला आहे, असे लोक म्हणतात. कधी तरी आपल्या गळी पुरस्कार येईल म्हणून बहुतेक कलाकार आस्थापनाविरूध्द बोलून दुश्मनी पत्करत नाहीत. ∙∙∙

मुख्यमंत्री साहेब ‘त्या’ धनगराच्या पोराचे काम होणार?

राजकारण्यांनी जनतेच्या विशेषतः बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. आपल्याकडे ‘पॉवर’ आहे म्हणून बेरोजगारांची अहवेलना करणे योग्य नव्हे. परवा बाबू कवळेकर यांच्या घरी एक भावनिक प्रसंग पहायला मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बाबू कवळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असताना केपे मतदारसंघातील धनगर समाजाचा एक युवक धाडस करून त्यांच्या गाडीकडे गेला व आपण गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची सुरक्षा रक्षक परीक्षा पास झालो असून आपण धनगर समाजातील गरीब कुटुंबातील असूनही आपल्याला सुरक्षा रक्षकाची नोकरी का मिळाली नाही, असा प्रश्‍न त्याने मुख्यमंत्र्यांना केला. मुख्यमंत्र्यांनी बाबूला सांग तो करणार, असे सांगितल्यावर आपण त्याला शंभर वेळा सांगितले तरी काम झाले नाही, असे सांगताच मुख्यमंत्रीही अवाक झाले व तुझे काम करू, असे म्हणून वेळ मारून नेली. मात्र त्या गरीब युवकाला मुख्यमंत्रीही पावला नाही आणि समाजातील बाबूही पावला नाही. बिचारा युवक दिवसभर बाबूंच्या घरी बसून राहून काही एक फायदा झाला नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Political News: भाजपच्या उमेदवारीवर दिल्लीमध्ये खल सुरू! मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

रेजिनाल्ड हाजिर हो!

‘आई जेवू देत नाही आणि वडील भीक मागू देत नाही’ अशा स्थितीत आपण कधी कधी येतो. कुडतरीचे आमदार एकेकाळी गोव्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जायचे. आता त्यांनी सरकार पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे व गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद असल्यामुळे सध्या त्यांनी मौनव्रत घेतले आहे, असे वाटते. विरोधात असताना माध्यमांत रेजिनाल्ड यांचे नाव व कार्य सतत ऐकू यायचे. आता रेजिनाल्ड यांचा आवाज विधानसभेत व विधानसभेबाहेर बंद झाला आहे. पुढच्या निवडणुकीत रेजिनाल्ड कुडतरीतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढणार, अपक्ष म्हणूनच नशीब आजमावणार की, काँग्रेसच्या छत्रछायेत जाणार? याचा नेम नाही. एकमात्र खरे रेजिनाल्ड सामाजिक व्यासपीठावरून गायबच झाले आहेत. आता जनता ‘रेजिनाल्ड हाजिर हो’ असे म्हणून नेटकरी त्यांना ट्रोल करू लागलेत. ∙∙∙

...तर जुवांव सांगणार केपेवर दावा!

खरे म्हणजे काळाप्रमाणे आपल्या देशात जातीय समानता यायला हवी. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे व्हायला आली तरी आपल्या देशातून जातीवर आधारित आरक्षण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.आता राज्यातील एसटी( कुणबी, वेळीप व गावडा) समाजातील लोकांसाठी विधानसभेच्या काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यास सरकारने मान्यता दिली असली तरी या संदर्भात अधिसूचना आलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाने धरणे सुरू केले आहे. जर या समाजाला आरक्षण मिळाले आणि केपे मतदारसंघ आरक्षित झाला तर केपेचे वकील व एसटी आरक्षणाचे प्रमुख शिलेदार जुवांव फर्नांडिस यांचा पहिला दावा असेल यात शंका नाही. अन् सांगे व फातोर्डा मतदारसंघ एसटी आरक्षित झाला तर सुभाष फळदेसाई व विजय सरदेसाई यांची विकेट जाणार हे निश्चित! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Political News: भाजप सरकारने गोव्यातील जनतेसमोर कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करावे! अमित पाटकरांचे मुख्यमंत्र्याना खुले आव्हान

मंत्री, आमदार इंधन वाचवतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे रविवारी आयोजित एका जाहीर कार्यक्रमात देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे (इंधन वाचवण्याचे) आवाहन केले आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करा, असेही त्यांनी सूचविले आहे. या त्यांच्या आवाहानाला गोव्यातील भाजपकडून किती प्रतिसाद मिळतोय ते पहावे लागेल. एखादा मंत्री दुचाकीवरून किंवा सायकलवरून थेट मंत्रालयात पोहोचल्यास पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन नक्कीच होतेय, असे म्हणता येईल. किंबहुना त्यांनी तसे करावेच, पर्रीकर एकदा दुचाकीवरून फिरले होते, अन् त्याची केवढी ‘जाहिरात’ झाली होती... मागेपुढे पोलिसांच्या वाहनांचा ताफा मंत्र्यांनी टाळल्यास त्यातूनही इंधन वाचणार आहे, हे भाजपच्या मंत्र्यांना सांगावेसे वाटू नये एवढेच!. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com