पणजी : अपक्ष आमदार गोविंद गावडे (Govind Gaude) भाजपत येत असल्यास त्यांचे स्वागतच असेल. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास प्रियोळमधून त्यांनाच उमेदवारी द्यावी लागेल. तो पक्षाचा निर्णय असेल, अशी घोषणा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे. मात्र आता प्रियोळमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
गोविंद गावडे यांना भाजपा प्रवेश दिल्यानंतर भाजप बहुसंख्य कार्यकर्ते नाराज होणार आहेत. संदीप निगळ्ये यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते, मतदार कुठे जाणार? ते स्वाभिमानी प्रियोळकर असून त्याच झेंड्याखाली त्यांचे कार्य सुरू आहे. माशेलसारख्या ठिकाणी आपले कार्यालयही थाटले आहे. गावडे यांनी अनेक वेळा भाजप प्रवेशाबद्दल कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे, त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. आता रविवारी कदाचित म्हार्दोळात महालसा देवीच्या दर्शनानंतरच्या सभेत ते निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
प्रियोळ मतदारसंघात सध्या मगो, स्वाभिमानी प्रियोळकार (निगळ्ये), गोविंद गावडे यांच्या मतदारांशी गाठीभेटी सुरू आहे. कोणी सदिच्छा भेट घेतो, तर कोणी घर घर चलो अभियान राबवतो, कोणी सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो, अशी स्थिती प्रियोळमतदारसंघात आहे. म्हार्दोळात रविवारी महालसेला नमन आणि जाहीर सभेचे गोविंद गावडे यांनी आयोजन केलेले आहे. त्या ठिकाणी प्रचंड संख्येने मतदार व कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. प्रियोळ मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीतून हजारो कार्यकर्ते सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी बसेसची सोयही करण्यात आली आहे.
दरम्यान गोविंद गावडेंना उमेदवारी दिल्याच्या परिस्थितीत कोणी पक्षविरोधी बंड केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रियोळ भाजप मंडळ पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यातच ज्या नेत्यांचे त्यांच्या मतदारसंघात प्राबल्य आहे, अशांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेचही सुरु आहे.
मतदारांसाठी संगीत मैफल
गोविंद गावडे यांनी महेश काळे यांची मैफल आयोजित केली त्यानंतर मगो पक्षातर्फे (MGP) महम्मद रफी यांच्या स्मरणात मैफलीचा आयोजन केले असून संदीप निगळ्येही अशाच मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीत आहे. त्यांचे कार्यकर्ते मतदारांना एकत्र आणण्यासाठी चर्चा करीत आहेत. गोविंद गावडे यांच्या विरोधात भाजपचे 50 टक्के कार्यकर्ते संदीप निगळ्ये यांच्यासोबत घरोघरी भेटी देत आहेत. प्रियोळातील 80 टक्के वाड्यावाड्यावर संदीप निगळ्ये पोचले असून गोविंद गावडे यांनी वाड्यावाड्यावर भेटी दिल्या आहेत. विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्ताने गोविंद गावडे आठवड्याला किमान चार ठिकाणी भेटी देत आहेत. भूमिपूजन झाल्यानंतर भाषणात पुन्हा संधी देण्याबाबत ते आवर्जून आवाहन करतात.
पत्रकाद्वारे गावडेंना विरोध
प्रियोळ मतदारसंघात गोविद गावडे यांना भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे पत्रक विविध मिडीयाग्रुपवर फिरत आहे. त्यात गावडे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी दुय्यम वागणूक दिली. भापज कार्यकर्त्यांचा अपमान केला. ते भाजपच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप आहे, अशा नेत्याला भाजपात घेऊ नये, असे भारतीय जनता पार्टी, गोवा प्रदेशच्या बनावट लेटरहेडवर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रावर संदीप निगळ्येसह काहींच्या नावाने बनावट हस्ताक्षरही केलेले आहे. हे पत्र बनावट असेल, बदनामीसाठी केलेले असले तरीसुद्धा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध मात्र दिसत आहे. कारण संदीप निगळ्ये यांच्यासोबत भाजपच्या राज्यकार्यकारिणीतील काही सदस्य आहे. शिवाय प्रियोळातील भाजपच्या काही आजीमाजी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदे घेऊनही संदीप निगळ्ये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तानावडे यांच्या वक्तव्याने भाजप कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.