केदार साखरदांडे
मूडदुशीचं अजून एक बरं असतं. तिला खाण्यासाठी कसल्याही मोठ्या सोहळ्याची गरज नसते. पाहुणे यायला हवेत, सण असायला हवा किंवा खास बेत असलाच पाहिजे, असा तिचा हट्ट नाही. साध्या वाराच्या दिवशीसुद्धा ती ताटात आली की ते जेवण आपोआप खास होऊन जातं.
मूडदूशी माझ्या आयुष्यात नक्की कधी आली ते आठवत नाही; पण मला जेव्हापासून कळू लागलं, तेव्हापासून ती माझ्या आयुष्यात, म्हणजे आपलं-ताटात होतीच. मला अंधुकसं आठवतं ते असं की, मी लहानपणी एका तापातून उठलो होतो. तोंडाला चव नव्हती आणि अंगात जाम अशक्तपणा आला होता. तेव्हा आजीने आईला सांगितल्याचं ऐकलं, ‘त्याला मस्तपैकी मूडदूशीची आमटी करून दे जेवणात. गेलेली शक्ती भरून येईल आणि तोंडाची चव परत येईल बघ.’
आईने ती आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच पाट्यावर खोबरं आणि मसाला वाटायला घेतला. दाट खोबरं, मसाला वाटून छानपैकी वाटण काढलं आणि बरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्याने कैरी घालून एक भारीभरकम आमटी करून दिली. तेव्हाच त्या मूडदूशीचं पहिलं दर्शन झालं. सफेद सुंदर मोत्याचा रंग आणि कमनीयतेत शेवग्याच्या शेंगांशी स्पर्धा करणारा आकार. वास अजिबात नाही; पण चव मात्र दैवी – प्रत्यक्ष स्वर्गातल्या इंद्रानेही हेवा करावा अशी! तेव्हापासून जो मूडदुशीच्या प्रेमात पडलो, तो आजतागायत.
मूडदुशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच दिखाऊपणा करत नाही. सुरमई, पापलेट किंवा रावस यांच्यासारखा तिचा मोठेपणा नाही, बाजारात तिच्यासाठी झुंबड उडत नाही; पण एकदा का ती ताटात आली की बाकी सगळ्या पदार्थांची चमक आपोआप फिकी पडते. तिच्या साधेपणातच तिचं खरं सौंदर्य दडलं आहे. अगदी माणसांप्रमाणेच काही व्यक्ती पहिल्या भेटीत लक्ष वेधून घेत नाहीत; पण सहवास वाढला की त्यांच्याशिवाय करमत नाही. मूडदूशीचंही अगदी तसंच आहे.
पहिला घास आमटीत मुरवलेल्या मूडदुशीचा, मग दुसरा, मग तिसरा… त्यात खंड नाही. मध्येच आचमन केल्यासारखा आमटीचा घोट; पण मग पुन्हा लक्ष मूडदुशीकडे. ही मूडदुशी कशाबरोबरही मानून घेते. मग ती शेवग्याची शेंग असो, अथवा मुळ्याची संगत असो किंवा कैरी असो. सगळ्यांचा ''मूड'' सांभाळून राहते. कधी तिचं छान वाटण काढून आमटी करावी, कधी अशीच रवा लावून चुरचुरीत भाजावी, नाहीतर कांदा घालून सुकी करावी. ती कुठेही, कुठल्याही परिस्थितीत संसार करते.
मूडदुशी खातानाही एक शिस्त असते. तिचा तो मधला काटा अलगद बाजूला काढायचा आणि मग निवांतपणे प्रत्येक तुकड्याचा आस्वाद घ्यायचा. घाईघाईने खाल्ली तर तिच्यावर अन्यायच होईल. आमच्या घरी तर आमटीच्या भांड्यात एखादा तुकडा जास्त दिसला की तो कोणाच्या ताटात जाणार यावर नजरानजर व्हायची. कुणी काही बोलायचं नाही; पण प्रत्येकाची नजर त्या तुकड्यावरच! शेवटी आईच पंच बनून तो तुकडा कोणाला द्यायचा ते ठरवायची. त्या एका तुकड्याचं अप्रूप आजच्या मोठमोठ्या मेजवान्यांतही सापडत नाही.
आणि हो, मूडदूशीचं अजून एक बरं असतं. तिला खाण्यासाठी कसल्याही मोठ्या सोहळ्याची गरज नसते. पाहुणे यायला हवेत, सण असायला हवा किंवा खास बेत असलाच पाहिजे, असा तिचा हट्ट नाही. साध्या वाराच्या दिवशीसुद्धा ती ताटात आली की ते जेवण आपोआप खास होऊन जातं. उलट मला तर वाटतं, पापलेट आणि सुरमईला थोडा रुबाब जास्त; पण मूडदूशी मात्र अगदी आपल्यातली. कुठलाही आव न आणता ताटात येते, मन जिंकते आणि शांतपणे निघून जाते. म्हणूनच तिच्यावर प्रेम करावं लागत नाही, ते आपोआप जडतं.
काटा सुद्धा मध्यभागी. नाही म्हणायला तोंडाकडे बारीक बारीक काटे असतात; पण ते तुकड्याबरोबरच स्वाहा करायचे असतात आणि गळ्याला अजिबात लागत नाहीत. मूडदूशी जितकी बारीक, सडसडीत तितकी तिची चव उच्च. तर अशी ही मूडदूशी… अहाहा! मूडखुशी करणारी. मूडदूशीला इंग्रजीमध्ये लेडी फिश म्हणतात म्हणे. जसं भेंडीला लेडी फिंगर म्हणतात तसं.
हे नाव बहुतेक तिच्या कमनीय, सडपातळ बांध्यावरून पडलं असावं. असो बापडं! पण मला मात्र तिचं नाव नाही, चवच जास्त भावते. कशी वाटते सांगू का? अगदी कोवळ्या आडसराच्या तलम मलईसारखी. अलगद जिभेला कुरवाळत उदराकडे प्रयाण करणारी. आणि भाषेची एक गंमत बघा. याच मूडदूशीला तुळू आणि कन्नडमध्ये काणे म्हणतात. आता एवढ्या देखण्या लेडी फिशला काणे म्हणायचं म्हणजे जरा गमतीचंच वाटतं! अशावेळी पट्टीचा मत्स्यप्रेमी जे करेल तेच मी करतो. नावाकडे सरळ काणाडोळा करतो आणि मूडदुशीच्या पहिल्या घासावर तुटून पडतो.
आजही बाजारात एखादी ताजी, बारीक सडसडीत मूडदुशी दिसली की हात आपोआप तिच्याकडे वळतो. त्या दिवशी दुसरा कोणताही मासा घरी आला नाही तरी चालतो; पण मूडदुशी मात्र हवीच. कारण तिचं आणि माझं नातं हे केवळ जिभेचं नाही, तर आठवणींचं आहे. तिचा पहिला घास घेतला की आजीच्या त्या शब्दांची आठवण हमखास होते – "मूडदुशीची आमटी करून दे, ताकद येईल."
खरंच, ताकद किती आली माहीत नाही; पण तिच्यामुळे मनाला मिळणारी उभारी आणि मूडला मिळणारी खुशी मात्र आजही तितकीच कायम आहे. आताही हा लेख (पान) लिहायच्या आधी पानात वाढलेल्या मूडदुशीचा फडशा पाडून झाल्यावर मगच हा लेख लिहायला घेतला. पानात वाढलेल्या माशाच्या आणि त्यातही मूडदुशीच्या तुकड्याला आदर देणे हे शास्त्र आहे आणि ते पाळणे माझ्यासारख्या सारस्वताचे आद्यकर्तव्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.