Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Goa First Alliance 2027: काँग्रेसशी युती तोडून गोवा फॉरवर्ड पक्ष ‘गोवा फर्स्ट’च्या नावाने काय करू पाहतोय? गोव्यात सर्व विरोधकांची अभेद्य युती व्हावी अशा अपेक्षा असतानाही गोवा फॉरवर्डचे हे आततायी पाऊल आहे काय?
Goa First Alliance 2027
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

राजू नायक

काँग्रेसशी युती तोडून गोवा फॉरवर्ड पक्ष ‘गोवा फर्स्ट’च्या नावाने काय करू पाहतोय? गोव्यात सर्व विरोधकांची अभेद्य युती व्हावी अशा अपेक्षा असतानाही गोवा फॉरवर्डचे हे आततायी पाऊल आहे काय? राष्ट्रीय पक्षांना जमणार नाही असे काय आहे ‘गोवा फर्स्ट’मध्ये, आणि लोक या नव्या संकल्पनेला स्वीकारतील काय?

मला गेल्या आठवड्यात समाधान लाभले की, मी गेले दोन रविवार लिहिल्याप्रमाणे काही नेत्यांची ‘गोवा फर्स्ट’च्या दिशेने पावले पडू लागली आहेत. मी ‘गोवा प्रथम’ असा शब्द वापरला नव्हता, परंतु काँग्रेस पक्ष - जो निवडणुकीच्या तोंडावरही विस्कळित बनलाय आणि त्या पक्षातील लाथाळ्या संपायला तयार नाहीत त्या पक्षाला बाजूला ठेवून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन एक नवा विचार केवळ राजकीय पर्याय नव्हे, तर एक नवी प्रादेशिक संकल्पना तयार का करू नये?

Goa First Alliance 2027
Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

प्रादेशिक पक्ष ही संकल्पना सध्या देशात गटांगळ्या खाते आहे आणि भाजपासारखा केंद्रीकरणावर भर देणारा प्रबळ पक्ष त्यांना तगू देत नाही- यात तथ्य आहे. भाजपाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेची निष्ठूर शकले केली. उद्धव ठाकरे त्याविरोधात ठामपणे उभे आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये ममतांनी आपल्या घामाने वाढविलेला ‘तृणमूल’ अस्तित्व सांभाळण्यासाठी धडपडतोय. उद्धव आणि ममतांना जे जमले नाही ते गोव्यातील ‘छोट्या मानसिकतेच्या’ संकुचित उद्धिष्टांना कवटाळणाऱ्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना कसे जमेल, भाजपा त्यांंना जगू देईल का, असे प्रश्‍न टीकाकार विचारू शकतात.

परंतु राजकारणात अशक्य कोटीतील गोष्टीच शक्य करून दाखवायच्या असतात. त्याशिवाय देशात ३५ टक्के असणाऱ्या ‘जेन-झीं’चा उद्रेक पाहता राजकारणात नवी सुखद झुळूक वाहू लागली आहे, त्यामुळे अनेक तरुण नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत होऊ लागल्या आहेत, हे नाकारता येणार नाही.

निराशेने ग्रासलेल्या राजकीय वातावरणात (केंद्रीकरणात नव्या राजकीय संधी कोमेजून जातात) युवकांनी नवा प्रफुल्लीत मोसम निर्माण करण्याचा जरूर प्रयत्न चालविला आहे. देशातील वातावरण त्यांनी भारून टाकलेले आहे. सर्व राजकीय पक्ष, सरकारे, थिंक टँक, प्रसार माध्यमे युवकांना केंद्रस्थानी ठेवून नव्याने विचार करू लागलीत. शिक्षण व परीक्षा पद्धतीवर विचार सुरू आहे. बेरोजगारी, युवक आकांक्षा यांची पडताळणी सुरू आहे.

भाजपानेही आपल्या नेत्यांना युवकांशी संपर्क साधायच्या, डिजिटल माध्यमांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४ ते २९ वयोगटातील तरुणांची भाषा, त्यांची प्रवृत्ती अभ्यासण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील ‘जेन-झीं’ची संख्या ४०० दशलक्ष आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत १८ ते २५ व २६-३५ वयोगटातील तरुणांकडून भाजपाला प्रत्येकी ३९ व ३७ टक्के मते प्राप्त झाली. ५६ व त्यावरच्या वयोगटातील भाजपाला मिळालेल्या ३५ टक्के मतांपेक्षा तरुणांची ही एकत्रित मते अधिक होतील.

Goa First Alliance 2027
Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

त्यामुळे भाजपाला चिंता आहे. इतर पक्षांना आशा वाटू लागली आहे. राहूल गांधी तरुणांना साद घालीत फिरू लागले आहेत. पुण्यात तरुणींनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला. हा युवक गतीशील आहे. जगभर सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी आक्रमक योगदान दिलेय. ही पिढी अधिक प्रागतिक आहे, मोकळ्या विचारांची आहे. भाजपा, संघ परिवारातील पालकही आपल्या मुलांच्या विचारांमधून चिंतेत आहेत. या पिढीवर भिस्त ठेवून देशात नवीन राजकारण आकार घेतेय आणि गोव्यातील तरुण नेते त्यांच्या विचारांना तरुण-पिढीच्या भावभावना समजून आकार देऊ शकले नाहीत, तर उद्या त्यांना लोक वेड्यात काढतील.

गोव्यातील काँग्रेसचे तसेच काहीसे झालेय. त्यांना वातावरण बदलताना दिसतेय, परंतु हवेला वेग देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही. गेल्या २५ वर्षांतील तोच काँग्रेस पक्ष घेऊन ते २०२७च्या निवडणुकीला सामोरे जाऊ पाहताहेत. आपल्या अवतीभवती काय बदल घडतोय, याचा अभ्यास करण्याची कुवत त्यांच्यात नसावी, किंवा तशी मानसिकताच नाही. निवडणुका निकट आल्याने त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली आहे एवढेच! तरुणांची स्पंदने ओढून घेण्याचा एकही कार्यक्रम किंवा घोषणा त्यांनी पुढे आणलेली नाही. लोकांचा दबाव विरोधी ऐक्यात आहे, आणि ते करण्याची जबाबदारी ‘मोठा भाऊ’ म्हणून आपल्याकडेच उत्तरदायित्व आले आहे, या भ्रमात ते आहेत.

‘गोवा फर्स्ट’ ही संकल्पना त्यांना चकवा देत पुढे आली, त्यामुळे ते हबकले असणार! मी गेल्या आठवड्यात या संकल्पनेवर लिहिले आणि एका इंग्रजी वृत्तपत्रानेही गुरुवारी पहिल्या पानावर त्याचीच री ओढली. त्यात ‘मोठा भाऊ’ नाही. सारे समान आहेत. गोव्याला, राज्याच्या अस्तित्वाला, तरुणांच्या अग्रक्रमांना पुढे घेऊन जाणाऱ्यांची ही आघाडी आहे. या आघाडीची निष्ठा गोव्याशी! ही संकल्पना वेडगळपणाचीही वाटू शकते. कारण राजकीय निरीक्षक सध्या एकाच गोष्टीवर भर देतात की, भाजपासारखा प्रबळ पक्ष हातात सर्व आयुधे घेऊन उभा आहे. प्रचंड पैसा, केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे - मोदींची प्रतिमा त्यांच्यापुढे कोण टिकणार? आणि प्रस्थापित नेत्यांचे सांगाडे कपाटांमध्ये लोंबकळत असतातच.

शेवटी त्याग आणि निष्ठा याचीही म्हणून काही किंमत असतेच. ‘गोवा फर्स्ट’ या संकल्पनेत नेत्यांना प्रसंगी तुरुंगात जायची तयारी ठेवावी लागेल. युवकांनी तसा त्यांना लढण्याचा मंत्र दिला आहेच. शिवाय भीतीसुद्धा काढून टाकली आहे. युवकांना जंतरमंतरवरून हुसकावण्यासाठी सर्व बळांचा वापर करून झाला, परंतु मुले तेथून हलली नाहीत. अजून लढत आहेत. राजकारणासाठी लाठ्या झेलत नेते तुरुंगात जात. सर्वस्व त्याग करीत, मरण स्वीकारत. आपण शिवाजी महाराजांपासून गांधीजी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोसांची उदाहरणे देतो. मग हल्लीच्या राजकारणातून ‘त्यागा’ची भावनी कशी काय लोप पावली?

Goa First Alliance 2027
Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

‘गोवा फर्स्ट’मध्ये ही जाज्वल्य त्यागाची भावना असली तरच लोक त्या संकल्पनेवर विश्‍वास ठेवतील. पदे हवीत, मुख्यमंत्रिपद हवे, प्रबळ मंत्रिपदे, अधाशीपणा यातून ‘गोवा फर्स्ट’ साकार होणार नाही. काँग्रेसने ते समजून घेतले पाहिजे आणि येती निवडणूक आपल्याला आहे तो गोवा आणखी लुटण्याची संधी प्राप्त करून देणार आहे, असा स्वार्थी हेतू बाळगणाऱ्यांसाठी ही घोषणा तर नाहीच नाही. त्यामुळे आपोआपच ‘पक्षांतर’ हा रोग ज्यांना स्पर्शही करू शकणार नाही तेच नेते, तेच पक्ष या संकल्पनेचा भाग बनतील. २०१७ पासून ज्या पक्षांना हा रोग डसला त्यांना आता लोकांच्या शंकांचे निरसन करूनच या नव्या संकल्पनेचा भाग बनावे लागेल. विशेषतः काँग्रेस पक्षाला या उत्तराचे मूळ शोधताना स्वतःला आमूलाग्र बदलावे लागेल. त्यांचे घटक पक्ष त्यांना पुन्हा एकच प्रश्‍न विचारताहेत, तुम्ही १० वर्षांत दोनवेळा फुटलात. तुमचे नेते पुन्हा फुटणार नाहीत कशावरून?

दोन दिवसांपूर्वी कॅप्टन व्हिरियातो व एम. के. शेख हे नेते विजय सरदेसाईंना भेटायला गेले. ही चर्चा निष्फळ ठरली, कारण ही भेट केवळ दिखावा होता. काँग्रेसला दाखवायचे आहे, ते चर्चेसाठी मागे हटत नाहीत. त्याच्या दोन दिवस पूर्वी गिरीश चोडणकर व युरी आलेमाव हे आरजीचे वीरेश बोरकर व नावेलकर यांच्याशी चर्चा करीत आहेत. ही बैठक एक केक शॉपमध्ये उघड्यावर होत असल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसते. यावरून तिला किती गांभीर्य दोन्ही पक्षांनी दिले हे स्पष्ट होते.

त्यानंतर बातमी आली, दोन्ही पक्षांत युतीची बोलणी यशस्वी. काँग्रेस-आरजी युती महत्त्वाची आहे, परंतु जागावाटपाची चर्चा झाल्याशिवाय कधीच यशस्वी म्हणता येणार नाही, हे तेवढेच खरे. तेथेच युतीचे मर्म लपले आहे. काहीजण म्हणतात, आता वीरेश बोरकर नरमले आहेत आणि युती त्यांना स्वतः जिंकून येण्यासाठी हवी आहे, परंतु आरजीचा गट वीरेश बोरकरांपेक्षाही पक्ष मोठा आहे, असे मानतो. त्याच मुद्यावर उद्या मनोज परब प्रगट झाले तर? ‘आप’ने यापूर्वीच हात झिडकारला आहे.

विजय सरदेसाई यांनी काँग्रेसला दूर लोटले असल्याचे स्पष्ट दिसते आहे. याचे कारण गिरीश चोडणकर व युरी आलेमाव दोघेही आहेत. दोघेही स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचा दावा करतात. त्यामुळे दोघांना विजय सरदेसाई नकोत. तसा संकेत सरदेसाईंना त्यांच्या दिल्ली भेटीत आला. सरदेसाई ‘गोवा फॉरवर्ड’ विलीन करण्याच्या प्रस्तावासह नेत्यांना भेटले. त्यांना नकार मिळाला, असा संकेत घेऊन ते परतले. त्यामुळे कसली युती आणि कसल्या वाटाघाटी असा त्यांचा सवाल आहे. याच मानसिकतेतून उद्या इतर प्रादेशिक पक्षांशी युतीची चर्चा होणार असेल तर ती यशस्वी होणार का?

युरी आलेमाव यांचेही नेतृत्व कसोटीला लागेल. त्यांच्याकडे विरोधी नेते म्हणून ज्या जबाबदाऱ्या होत्या, त्यातून भाजपा सरकारवर निशाणा साधण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात काय केले? सार्वजनिक उपक्रम समितीचा वापर करताना पर्रीकर जर सरकारला नामोहरम करू शकतात, तर युरी का नाही? युरी आलेमाव (सार्वजनिक उपक्रम समिती) व कॉंग्रेसचे दुसरे सदस्य एल्टन यांच्याकडे सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्षपद असता, पहिले वर्षभर समित्यांच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यांचे अहवालही त्यांनी तयार केले नाहीत व कोणताच भांडेफोडही केला नाही. प्रसार माध्यमांनी प्रकरणे उघड केली, त्यावर प्रतिक्रियाही दिल्या नाहीत.

Goa First Alliance 2027
Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

शिक्षण क्षेत्र महत्त्वाचे. या विषयावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात या क्षेत्रावर सहा टक्के खर्च अपेक्षित असता राज्य सरकार केवळ ३.६ टक्के खर्च करते. तरुण या विषयावर स्पष्ट धोरणाची अपेक्षा करीत आहेत. या विषयावर काँग्रेसला रणकंदन करता आले असते. तसे न करता विरोधी नेता स्वतःचे नेतृत्व आपोआप चालेल, अशी कशी अपेक्षा करतात? काँग्रेसला आपोआप लोकपाठिंबा मिळून ते सत्तेवर येतील, अशा कोणत्या भ्रमात ते वावरतात? याच प्रवृत्तीमुळे गेल्या निवडणुकीत आरजीला १० टक्के मते मिळाली होती. कॉक्रोच जनता पार्टी उतरली, तर ते २० टक्के मते मिळवतील. कारण तेवढी तडफ, तेवढा आक्रमकपणा काँग्रेस पक्षात नाही. तो जुनी कात सोडायला तयार नाही, आणि आहे त्याच अवस्थेतील काँग्रेस स्वीकारायला लोक तयार नाहीत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com