Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Goa Election 2027: आता गोव्याच्या लोकांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या वेळी थोडा पैसा घ्यायचा की भविष्यासाठी प्रामाणिक नेते निवडायचे?
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

गौरेश गावकर

आपल्या लोकशाहीत लोकांकडे नेते निवडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मतदाराने ठरवायचं असतं, की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं. पण आज एक मोठा प्रश्न उभा राहतो की २०२७च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार आमदार होऊ शकतो का?

आजकाल आपण बघतो की निवडणूक लढवायची असेल तर खूप मोठा पैसा लागतो. प्रचार, स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करणे आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी खूप खर्च केला जातो. त्यामुळे अनेक चांगले आणि सक्षम उमेदवार फक्त पैशाची कमतरता असल्यामुळे निवडणूक जिंकू शकत नाहीत. लोक म्हणतात ना तळींराळप च म्हणजे पैसा नसला की जिंकणं कठीण होतं.

जर हा प्रकार असाच चालू राहिला तर फक्त श्रीमंत लोकच निवडून येतील आणि तेच गोव्याच्या लोकांवर राज्य करतील. त्यांच्याकडे योग्य शिक्षण किंवा माहिती नसली तरीही ते सत्तेत येतील. प्रामाणिक आणि मेहनती लोकांना राजकारणात येणं अजून कठीण होईल. जे लोक खूप पैसा खर्च करून निवडणूक लढवतात ते नंतर निवडून आल्यानंतर तो पैसा परत मिळवायचा प्रयत्न करतात, याचा परिणाम विकासावर होतो.

पण २०२२मध्ये सांत आंद्रे मतदारसंघात लोकांनी एक वेगळीच गोष्ट दाखवून दिली. लोकांनी विरेश बोरकर यांना त्यांच्या विचारांवर आणि प्रामाणिकपणावर निवडून दिलं.

त्या वेळी मी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीमध्ये होतो आणि मी स्वतः पाहिलं की त्यांनी पैसा किंवा ताकदीचा वापर न करता निवडणूक जिंकली. पण सध्याचं राजकीय वातावरण पाहिलं तर पैसा नसताना निवडणूक जिंकणं फार अवघड वाटत आहे. आजकाल काही आमदारांनी सभागृहात स्वतःचे छोटे गट तयार केले आहेत. काही मतदारसंघ हळूहळू एखाद्या पक्षाचे मजबूत पॉकेट बनत चालले आहेत.

आणखी एक चिंतेची गोष्ट म्हणजे काही उमेदवार स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवतात पण त्यांच्यामागे पैशांची थैली घेऊन गुंतवणूकदार असतात.

Goa Election
"हा खरा गोवा होता जो मला कधी दिसलाच नव्हता"! ‘गोंयकार’पण जपायचे आहे तर डोळ्यात अंगार हवा, मनात निर्धार हवा...

निवडणूक झाल्यावर ते नंतर एखाद्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात किंवा सत्ताधारी पक्षात सामील होतात. कारण त्यांच्या मागे पैसा टाकलेल्या लोकांना तो पैसा नफ्यासह परत हवा असतो.

त्याचवेळी मतदारांनीदेखील आपल्या भूमिकेचा विचार करायला हवा. अनेक वेळा लोक निवडणुकीच्या वेळी थोडे पैसे किंवा फायदे पाहून मतदान करतात. पण त्यांना हे समजत नाही, की यामुळे त्यांच्या मतदारसंघाला पुढे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Goa Election
Goa IIT Project: गोव्यात 'आयआयटी'ची खरोखरच गरज आहे काय?

लोकांनी प्रतिनिधी निवडताना त्यांची प्रामाणिकपणा, काम करण्याची तयारी आणि कामगिरी बघायला हवी. पण आजची व्यवस्था अशी आहे की प्रामाणिक लोकांना मोठ्या पैशाच्या जोरावर लढणाऱ्या उमेदवारांशी स्पर्धा करणे खूप कठीण होत आहे.

म्हणून आता गोव्याच्या लोकांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या वेळी थोडा पैसा घ्यायचा की भविष्यासाठी प्रामाणिक नेते निवडायचे? जर आपण आज योग्य निर्णय घेतला नाही तर पुढेही आपल्याला रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या साध्या प्रश्‍नांसाठी तक्रार करत बसावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com