शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Mahikavati Bakhar History: दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य गोव्याच्या कदंबांनी हिसकावून घेतलेले होते.
Mahikavati Bakhar History
Mahikavati Bakhar HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य गोव्याच्या कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती.

सरस्वती नदीच्या काठी असलेल्या पालणपूर देशात अणहिलवाड पाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता.

Mahikavati Bakhar History
Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना तेव्हा आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य गोव्याच्या कदंबांनी हिसकावून घेतल्याने गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजल्याने शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.

प्रताप बिंब चांपानेरवरून थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.

प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुलकर्णी नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली.

त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत लोकांच्या हातून अशा लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्‍ध्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे, असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

Mahikavati Bakhar History
Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उलथून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या सरदाराचा अंमल होता. तो बाळकृष्णास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला.

तिथून तो जुहूमार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो आनंदला. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि ‘येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा’ अशा आशयाचे पत्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला. गेल्या ५० वर्षांतील लढाया-जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैराण होऊन गेला होता, की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. बाहेरून लोक आणून देश पुन्हा वसवणे हे काम नक्कीच सोपे नव्हते.

शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतात की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती.

Mahikavati Bakhar History
Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

बखरकार लिहितात की, त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी महिकावती बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहण समारंभ करून घेतला. ह्या सोहळ्यानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत यांस पाहाड गाव इनाम दिला, असे महिकावती बखरकार लिहितो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com