सुलक्षा मनेष गावस
‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकिॲट्री अँड ह्युमन बिहेवियर’ सारख्या संस्थांमध्ये उपचार घेऊन स्थिर झालेल्या काही रुग्णांना घरी परत नेण्याबाबत कुटुंबांकडून टाळाटाळ केली जाते. रुग्णाला घरी आणले तरी पुढील उपचार, पुनर्वसन, देखरेख आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आधारव्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे उपचारातून स्थिरता मिळाल्यानंतरही पुढील आयुष्याबद्दल अनिश्चितता कायम राहते.
एका ओळखीच्या तरुणाशी बोलत होते. आपल्या मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या भावाची तो आणि त्याची सहचारिणी घेत असलेली काळजी पाहून त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण झाला. त्याची आईही मानसिक आजाराशी झुंजत होती. काही वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. अनेक वर्षे त्याने एकाच वेळी कुटुंबातील दोन मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या व्यक्तींची काळजी घेतली. त्या काळात त्याला आलेले अनुभव, वारंवार समोर उभ्या ठाकणाऱ्या अडचणी आणि भविष्याची चिंता याबद्दल तो मन मोकळे करत होता.
अशी अनेक कुटुंबे आपल्या आजूबाजूला आहेत. प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. कुठे उपचारांचा प्रश्न आहे, कुठे उदरनिर्वाहाचा, तर कुठे रुग्णाच्या भविष्यातील सुरक्षिततेचा. कारण रुग्णाच्या उपचाराइतकाच महत्त्वाचा प्रश्न असतो तो दीर्घकालीन काळजी, देखरेख आणि पुनर्वसनाचा. काही मानसिक आजारांमध्ये दीर्घकाळ आधाराची आवश्यकता असते आणि अशा वेळी कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मानसिक आजारातून एखादी व्यक्ती स्थिर झाली, उपचारांना प्रतिसाद मिळाला, तरी तिचे आयुष्य पूर्वपदावर येतेच असे नाही. आजार नियंत्रणात आला तरी दैनंदिन जीवनातील अनेक कौशल्ये, सामाजिक संबंध, रोजगार किंवा स्वावलंबन हे प्रश्न आवासून पुढे उभे ठाकतात. अनेकदा या पुढच्या टप्प्याची संपूर्ण जबाबदारी कुटुंबावर येते.
पालक हयात असतात तोपर्यंत मुलाची किंवा कुटुंबातील सदस्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्यानंतर काय? ‘आमच्यानंतर याचे काय होणार?’ हा प्रश्न अनेक कुटुंबांना सतावत असतो. हा केवळ भावनिक प्रश्न नाही; तो सामाजिक आणि व्यवस्थात्मक प्रश्नही आहे. गोव्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकिॲट्री अँड ह्युमन बिहेवियर’ सारख्या संस्थांमध्ये उपचार घेऊन स्थिर झालेल्या काही रुग्णांना घरी परत नेण्याबाबत कुटुंबांकडून टाळाटाळ केली जाते. रुग्णाला घरी आणले तरी पुढील उपचार, पुनर्वसन, देखरेख आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आधारव्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे उपचारातून स्थिरता मिळाल्यानंतरही पुढील आयुष्याबद्दल अनिश्चितता कायम राहते.
मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे सहजसोपे काम नाही. व्यक्ती वयाने प्रौढ असली तरी तिच्या विचारांमध्ये आणि वर्तनामध्ये आजारामुळे बदल होत असतात. कधी ती अस्वस्थ किंवा आक्रमक होऊ शकते, कधी आत्महानीचे विचार येऊ शकतात, तर कधी ती बराच वेळ शून्यात नजर लावून बसलेली दिसू शकते. या भावनिक आणि वर्तनात्मक चढ-उतारांचा परिणाम काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होतो.
मानसिक आजार अनेकदा बाहेरून दिसत नाही. त्यामुळे रुग्णाचे वर्तन हे आजाराचे लक्षण आहे, हे न समजल्यास त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात. ‘मुद्दाम त्रास देतो’, ‘हट्ट करतो’ किंवा ‘वागणूक सुधारत नाही’ अशा प्रतिक्रिया उमटू शकतात. सततची काळजी, अनिश्चितता आणि सामाजिक दबाव यामुळे कुटुंबीयांच्या सहनशीलतेचीही कधी कधी अंत होतो. म्हणूनच रुग्णाबरोबरच काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांच्या गरजांकडेही पाहणे आवश्यक आहे.
ग्रामीण आणि शहरी परिस्थितीतही काही फरक जाणवतो. गावाकडे ओळखीची माणसे, शेजारी आणि सामाजिक संबंध यामुळे मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला परिचित वातावरणात वावरण्यास काही प्रमाणात आधार मिळू शकतो. शहरांमध्ये मात्र अशी अनौपचारिक आधारव्यवस्था अनेकदा मर्यादित असते. परिणामी रुग्णाची बहुतांश जबाबदारी कुटुंबावर येते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काही कुटुंबे टोकाचे उपाय करतात; रुग्णाला घरातच बंदिस्त ठेवण्यासारख्या घटना घडू शकतात. याच ठिकाणी समुदायाधारित मानसिक आरोग्य सेवा, आश्रयगृहे, निवासी पुनर्वसन केंद्रे आणि दिवसाच्या काळासाठी उपलब्ध असलेली ‘डे-केअर’ केंद्रे यांची गरज प्रकर्षाने जाणवते.
मानसिक आजार आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला तिच्या माणसांपासून, घरापासून, गावापासून किंवा परिचित परिसरापासून कायमचे दूर करणे हा एकमेव पर्याय नसावा. शक्य असेल तेथे उपचार आणि पुनर्वसनाची प्रक्रिया व्यक्तीला तिच्या परिचित सामाजिक वातावरणाशी जोडून ठेवणारी असावी. सुरक्षितता आणि वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, तिच्या क्षमतेनुसार स्वतंत्र आणि सन्मानजनक आयुष्य जगण्याच्या शक्यता शोधल्या पाहिजेत.त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत.
जागरूकता : उपचाराची पहिली पायरी
मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता वाढवणे ही सर्वात प्राथमिक गरज आहे. अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष होते किंवा त्यांना चुकीचा अर्थ लावला जातो. त्यामुळे निदान उशिरा होते आणि योग्य उपचार मिळण्यास विलंब होतो. मानसिक आजारांची लक्षणे, त्यांचे स्वरूप, उपचारपद्धती आणि उपलब्ध सेवा याबद्दल समाजात सोप्या भाषेत माहिती पोहोचणे आवश्यक आहे. मानसिक आजाराकडे कलंक किंवा भीतीच्या नजरेने न पाहता, इतर आजारांप्रमाणेच त्याकडे आरोग्याच्या प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
उपचारांपलीकडे पुनर्वसन
केवळ औषधोपचार हा अनेक रुग्णांसाठी प्रवासाचा शेवट नसतो. उपचारांमुळे लक्षणे नियंत्रणात आल्यानंतर पुढे दैनंदिन जीवनातील कौशल्ये पुन्हा विकसित करण्याची गरज असू शकते. स्वतःची स्वच्छता राखणे, नियमित दिनचर्या पाळणे, घरातील छोटी कामे करणे, संवाद साधणे, स्वतःची काळजी घेणे अशा अनेक गोष्टींचा सराव पुनर्वसनाचा भाग असू शकतो. त्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण आधार आवश्यक असतो.
क्षमतांना संधी
काही रुग्ण दीर्घकाळ औषधोपचाराने स्थिर राहतात आणि शारीरिकदृष्ट्या सक्षमही असतात. अशा व्यक्तींच्या उरलेल्या क्षमतांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि आवड वेगळी असते. कुणाला हस्तकला जमत असेल, कुणाला बागकाम, कुणाला स्वयंपाकातील एखादे काम, तर कुणाला एखादे साधे रोजगारक्षम कौशल्य शिकता येऊ शकते. अशा छोट्या संधी आत्मविश्वास वाढवू शकतात. काही व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार उत्पन्नाचा आधारही मिळू शकतो. इथे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीला पूर्ण आर्थिक स्वावलंबी बनवणे एवढेच नसावे; तिला काही करता येते, तिचीही एक भूमिका आहे, तिच्या क्षमतेला मूल्य आहे, ही जाणीव निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कुटुंबासाठीही आधाराची गरज
स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या काही दीर्घकालीन मानसिक आजारांमध्ये दीर्घकाळ उपचार, नियमित देखरेख आणि पुनर्वसनाची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. सातत्याने कार्यरत असलेली हेल्पलाइन किंवा हेल्पडेस्क, स्थानिक पातळीवर उपलब्ध मानसिक आरोग्य सेवा, उपचारांबाबत मार्गदर्शन आणि संकटाच्या प्रसंगी संपर्क करता येईल अशी व्यवस्था कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकते.
तितकेच महत्त्वाचे म्हणजे कुटुंबीयांचे सपोर्ट ग्रुप. समान अनुभवातून जाणाऱ्या कुटुंबांना एकमेकांशी बोलता आले, आपले अनुभव आणि अडचणी मोकळेपणाने सांगता आल्या, तर एकटेपणाची भावना कमी होऊ शकते. ‘ही समस्या फक्त आमच्याच कुटुंबात आह’ या भावनेऐवजी‘अशाच अनुभवातून जाणारी इतर कुटुंबेही आहेत’ ही जाणीव आधार देऊ शकते.
काळजी म्हणजे फक्त सुरक्षित ठेवणे नव्हे
मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे म्हणजे केवळ औषधोपचार करणे किंवा तिला सुरक्षित ठेवणे एवढ्यावर गोष्ट थांबू नये. तिलाही इतरांप्रमाणेच सन्मानाने जगण्याचा, माणसांमध्ये मिसळण्याचा, आपल्या क्षमतेनुसार काही काम करण्याचा आणि शक्य तितके स्वावलंबी होण्याचा अधिकार आहे. मानसिक आजारामुळे एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये आणि आचरणात मोठी उलथापालथ होऊ शकते; पण त्यामुळे एक व्यक्ती म्हणून तिचे अस्तित्व संकुचित होता कामा नये. आजाराच्या पलीकडे तिच्याकडे कोणत्या क्षमता आहेत, तिच्या आवडी काय आहेत आणि त्या क्षमतांच्या आधारे तिला अधिक सक्षम कसे करता येईल, याचा विचार व्हायला हवा. यासाठी कुटुंबाची माया व जबाबदारी महत्त्वाची आहेच; पण आरोग्यव्यवस्था, पुनर्वसन सेवा, स्थानिक समुदायाची संवेदनशील साथही आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.