

पणजी: इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानातील अपेक्षित कौशल्ये आत्मसात केली आहेत की नाही, हे तपासण्यासाठी गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (जीएससीईआरटी) ‘गोवा फाउंडेशनल लर्निंग सर्व्हे’ सुरू करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच या दोन इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाचे राज्यस्तरीय पद्धतशीर मूल्यांकन केले जाणार आहे.
माहितीनुसार, १० ऑक्टोबरनंतर हे सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता असून राज्यातील सर्व शाळांना त्यात सहभागी होणे अनिवार्य असेल. शाळेचे माध्यम किंवा विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी यानुसार कोणताही भेद केला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणितातील वयाला अनुरूप मूलभूत कौशल्यांची माहिती या सर्वेक्षणातून घेतली जाणार आहे. मात्र, हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांची वैयक्तिक गुणवत्ता तपासण्यासाठी किंवा शाळांची क्रमवारी ठरविण्यासाठी केले जाणार नाही. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीचे तालुकानिहाय विश्लेषण करून विद्यार्थ्यांना कोणत्या कौशल्यांमध्ये अडचणी येत आहेत, हे शोधले जाणार आहे. त्यानुसार आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेप आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी शिक्षकांना मदत होणार आहे.
‘निपुण’ मूल्यांकनाचाही अनुभव
दरम्यान, गोव्यात यापूर्वीही पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात आले आहे. २०२५ मध्ये ‘निपुण’ मूल्यांकनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्नमंजुषा आणि चॅटबॉटचा वापर करण्यात आला होता. गणित आणि इंग्रजी विषयांतील प्रत्येकी २० प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून त्यांच्या कौशल्यांचे डिजिटल पद्धतीने मूल्यमापन करण्यात आले होते.
‘एनईपी’च्या उद्दिष्टाशी जोडले
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-फाउंडेशनल स्टेज आणि केंद्राच्या ‘परख’ उपक्रमाशी या सर्वेक्षणाचा संबंध जोडण्यात आला आहे. तिसरी इयत्ता पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करावे, हे या राष्ट्रीय उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गोव्यात यापूर्वी ‘परख’अंतर्गत तिसरीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते. आता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखण्यासाठी ‘गोवा फाउंडेशनल लर्निंग सर्व्हे’चा वापर केला जाणार आहे.
प्रगतीची तुलना करणे शक्य
वर्षातून दोनदा मूल्यांकन होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगतीची तुलना करणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे कोणत्या भागात किंवा कोणत्या कौशल्यात विद्यार्थ्यांना अधिक मदतीची गरज आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या मूल्यांकनातून शैक्षणिक हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेता येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.