Goa Congress Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Congress: काँग्रेस आता तरी कात टाकू शकेल?

Goa Assembly Elections: जनमानसात विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर गिरीश चोडणकरांनी पणजी-मडगाव सोडून ग्रामीण भागात जायला पाहिजे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

जनमानसात विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर गिरीश चोडणकरांनी पणजी-मडगाव सोडून ग्रामीण भागात जायला पाहिजे. तेथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे. भाजपबाबत जनमत बरं नाही, म्हणून काँग्रेस सत्तेवर येईल, अशा आशेवर काँग्रेस राहिली तर तो ‘असेल हरी, तर देईल खाटल्यावरी’ असं समजण्यातला प्रकार ठरू शकेल.

पण तरीही काँग्रेसला फक्त ११ जागावर समाधान मानावे लागले. आणि नंतर त्यातले आठ आमदार भाजपच्या गळाला लागल्यामुळे तीनच आमदार शिल्लक राहिले. आता हा इतिहास समोर असताना परत तेच समीकरण अस्तित्वात आणणे किती योग्य हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीतल्या अपयशाला अनेक कारणे आहेत. आणि त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे उमेदवारांची चुकलेली निवड.

शिरोडा मतदारसंघाचे उदाहरण घ्या. सुभाष शिरोडकर काँग्रेसमध्ये असताना हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे सुभाष शिरोडकर भाजपमध्ये गेल्यानंतर निवडणुकीकरता योग्य उमेदवाराची निवड व्हायला हवी होती. पण ती न झाल्यामुळे काँग्रेसला पाचव्या क्रमांकावर जाण्याची नामुष्की पत्करावी लागली. असे प्रकार अनेक मतदारसंघात झाले. खरं तर प्रदेशाध्यक्षाचे काम असते ते म्हणजे पायाला भिंगरी लावून संपूर्ण राज्यात फिरणे. २००७ साली दिवंगत रवी नाईक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना संपूर्ण गोवाभर फिरताना दिसायचे.

आपला फोंडा मतदारसंघ कार्यकर्त्याच्या भरोसावर सोडून राज्यभर काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या रवीमुळेच त्यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची युती सत्तेवर आली होती, असे स्वतःला झोकून देऊन पक्षाला संजीवनी देणारे प्रदेशाध्यक्षच पक्षाला सत्तेवर आणू शकतात. काँग्रेसला आगामी निवडणुकीत २१ जागा मिळतील, असा विश्वास गिरीश चोडणकर व्यक्त करतात. पण त्या कोणत्या व कशा मिळवल्या जातील, कोणती रणनीती आखली जाईल, याबद्दल ते काहीही बोलताना दिसत नाहीत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आता अमित पाटकरांच्या जागी जुने खिलाडी गिरीश चोडणकर यांची वर्णी लागली आहे. हा पंत गेले राव आले अशातला प्रकार होऊ शकतो का हा बदल गोव्यातील काँग्रेसला खरंच लाभदायक ठरू शकतो, हाच खरा प्रश्न आहे. गिरीश तसे पाहायला गेल्यास पूर्वीही गोवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०२२ सालची निवडणुकही लढवण्यात आली होती. खरं तर त्यावेळी काँग्रेसच्या दृष्टीने राज्यात सकारात्मक वातावरण दिसत होते.

आज राज्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेसची बांधणीच नाही. सासष्टि तालुक्यातील सहा मतदार संघ हीच काँग्रेसची खरी शक्ती. इतर मतदारसंघात ‘किस्मत की हवा कभी नरम कमी गरम’ अशातला प्रकार. उत्तर गोव्यातील बहुतेक मतदारसंघांत तर काँग्रेस पुरती नामशेष झालेली दिसत आहे. सत्तरीतल्या वाळपई व पर्ये या दोन मतदारसंघात तर काँग्रेस कुठे आहे, हे शोधावे लागत आहे.

तीच गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या साखळी तसेच शेजारच्या डिचोली, मये मतदारसंघांची. अनेक मतदारसंघात तर सजग नेतृत्व नसल्यामुळे कार्यकर्त्यांत मरगळ आलेली दिसत आहे. त्यात परत काँग्रेसची विश्वासाहर्ताही लोप पावताना दिसू लागली आहे. यांना निवडून दिल्यावर हे भाजपमध्ये जाणार नाहीत, कशावरून असे लोक विचारताना दिसताहेत. आणि ही विश्वासाहर्ता परत मिळवायची असेल, तर गिरीश चोडणकरांनी पणजी-मडगाव सोडून ग्रामीण भागात जायला पाहिजे.

तेथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे. भाजपबाबत जनमत बरं नाही म्हणून काँग्रेस सत्तेवर येईल, अशा विश्वासावर काँग्रेस राहिली तर तो ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असं समजण्यातला प्रकार ठरू शकेल. समोर भाजप सारखा काळाची पावले ओळखून चालणारा पक्ष आहे, हे काँग्रेसने कधीच विसरता कामा नये. भाजपची खासियत म्हणजे त्यांची झोकून देण्याची प्रवृत्ती. रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत याचा प्रत्यय आला होता.

या निमित्याने कोपरा बैठकांत भाग घेणारे मुख्यमंत्री पाहायला मिळाले होते. आणि याबाबतीत विचारल्यावर मी आधी भाजपचा कार्यकर्ता व नंतर मुख्यमंत्री, असे ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अशी वृत्ती किती काँग्रेसी नेत्यांकडे आहे, याचा विचार व्हायला हवा. ‘इगो’ जोपासणे हाच काँग्रेस नेत्यांचा धर्म बनत चालला आहे. आणि गिरीश चोडणकरांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पुन्हा एकदा याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

आणि या गटबाजीमुळे सध्या राज्यात काँग्रेस मागच्या बाकावर बसताना दिसत आहे. सलग तीन टर्म सत्तेबाहेर असल्यामुळे काँग्रेसकरता आगामी निवडणूक ही शेवटची संधी आहे. त्यामुळेच सत्तेचा सोपान गाठायचा असेल तर गिरीशना ‘रात्र वैऱ्याची आहे जागा रहा’ या धर्तीवर काम करावे लागेल. गाठ भाजपशी आहे, हे जाणून त्याप्रमाणे रणनीती आखावी लागेल.

मुख्य म्हणजे मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा ओतावी लागेल. त्याचप्रमाणे काँग्रेसशी बांधील असलेल्या समविचारी पक्षांची मोट बांधावी लागेल. असे झाले तरच हाती काहीतरी लागण्याची शक्यता अन्यथा आगामी निवडणुकीत काँग्रेसला २१ जागा जिंकून देण्याचा गिरीश चोडणकर यांचा निर्धार ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरेल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT