Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

goa congress crisis: गिरीश चोडणकर यांनी जनमताचा कानोसा घेतल्यास त्यांना परिस्थिती अनुकूल नसल्याचा अनुभव येईल.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

राजू नायक

गिरीश चोडणकर यांनी जनमताचा कानोसा घेतल्यास त्यांना परिस्थिती अनुकूल नसल्याचा अनुभव येईल. दिल्लीहून थेट नेमणुकीचे पत्र घेऊन आल्यामुळे कार्यकर्ते दुखावले, पदाधिकारी नाराज झाले व खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिसही अस्वस्थ झाले. त्याचे पडसाद म्हणजे विनाकारण अमित पाटकर यांना सहानुभूती प्राप्त झाली.

अमित पाटकर यांना काढून तेथे गिरीश चोडणकर यांची पुन्हा वर्णी लागेल. ही बातमी तशी गेले वर्षभर फिरत होतीच. मग आता ती प्रत्यक्ष घडली तेव्हा काँग्रेस व काँग्रेसबद्दल आशा बाळगून असलेल्या घटकांमध्ये असंतोष का व्यक्त झाला?

कारण, तडकाफडकी अमित पाटकरांना काढून टाकले ही पद्धत लोकांना आवडली नाही. मनीषा उसगावकरांची एक प्रतिक्रिया लोकांना आवडली. त्या म्हणाल्या की, पाटकरांंना तुम्ही वर्षभर अभ्यास करायला लावला. परिश्रम करायला लावला आणि ऐनवेळी त्याला परीक्षेलाच बसायला देत नाहीत, हा त्यांच्यावरचा अन्याय आहे.

पहिल्यांदाच असे घडले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले व खासदार पदावरची व्यक्ती कॅप्टन विरियातोंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. फ्रांसिस्क सार्दिन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला - त्यांना न विचारता एका महत्त्वाच्या समितीवर नेमले गेले. त्यांनी आपल्याला कोणी विचारले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. याचा अर्थ स्पष्ट आहे - गिरीश चोडणकरांनी त्यांच्या दिल्लीशी असलेल्या सलगीचा फायदा घेऊन स्वतःच ही समिती नेमली व ती जाहीर करून टाकली.

या प्रवृत्तीमुळे काँग्रेस चाहते नाराज झाले व ख्रिस्ती चर्चनेही आपली अस्वस्थता लपवली नाही. कारण सतत तीन कारकीर्द काँग्रेसला सत्ता स्थापन करता आलेली नाही, हा पक्ष स्वतःच्या कुकर्माने सत्तेपासून दूर जात चालला आहे - याचा सर्वात मोठा त्रास चर्च आणि ख्रिस्ती समाजाला झाला आहे. २०२२मध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट काँग्रेस सोडून सत्तेत निघून गेला!

Goa Congress
Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

पाटकर यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होण्याचे कारण म्हणजे चार वर्षे त्यांनी पक्ष सांभाळला - कधी स्वतःच्या पदराला खार लावून कार्यक्रम केले. कमी कार्यकर्ते असोत, परंतु निषेध कार्यक्रम केला. कधी मोर्चा आणला, परंतु काँग्रेसचा झेंडा लोकांच्या नजरेसमोर ठेवला. मनीषा उसगावकर व एक दोन प्रवक्ते नेते सतत समाजमाध्यमांवर आक्रंदन करताना लोकांनी पाहिले.काँग्रेसला दोन हजार लोक कधी गोळा करता आले नाहीत, परंतु अमित पाटकरांनी ४०-५० कार्यकर्ते मात्र हमखास आंदोलनात उभे केले.

अशा व्यक्तीला पूर्वकल्पनाही न देता, अपमानास्पदरीत्या काढून टाकणे योग्य? वास्तविक कोणत्याही पक्षाची एक विशिष्ट पद्धती असते. अशी कारवाई करण्यापूर्वी एक-दोन निरीक्षक राज्यात पाठवायचे. त्यांनी कानोसा घ्यायचा. पाटकरांना कुडचडे येथे जादा काम करण्यासाठी अवधी देणार म्हणून सांगायचे. केंद्रीय समितीवर त्यांना घ्यायचे, परंतु तशी सर्वमान्य दिलासादायक पद्धत न अवलंबल्यामुळे काँग्रेसवर हा आततायीपणा बुमरँग झाला.

पक्षश्रेष्ठींनी एकच विचार केलेला दिसतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक - हे ओबीसी समाजाचे आहेत. आपणही त्याच समाजातील अध्यक्ष घ्यायचा. कदाचित मुख्यमंत्रिपदाचाही उमेदवार ते असल्याचा देखावा निर्माण करायचा. रवी नाईक निवर्तल्यानंतर गोव्यात ओबीसींमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचा पक्षश्रेष्ठींनी समज करून घेतला असावा. परंतु ओबीसी मते अशी फिरवता येतात काय?

त्यासाठी काँग्रेस पक्षाकडे काय व्यूहरचना आहे? काय नियोजन आहे? गिरीशनी नेतृत्व स्वीकारताच ते रुद्रेश्‍वर देवळात जाऊन आले. तितक्याने भागेल?

निवडणुकीचे गणित एवढे सोपे आहे काय? महत्त्वाचे म्हणजे गिरीश चोडणकर यांनी स्वतः विधिमंडळ निवडणुकीत यश चाखलेले नाही. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी अपयशाचा मात्र पुरेपूर अनुभव घेतला आहे. मग २०२७च्या निवडणुकीतही ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्वतःला सामोरे आणणार की संघटनेत जान निर्माण करण्यासाठी (भाजपासारखी व्यूहनीती) दिवसरात्र खपणार?

एवढा राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नेता गिरीश - परंतु ते भाजपाला पुढच्या निवडणुकीत सहा जागाही मिळणार नाहीत, असे ते वक्तव्य करतात. भाजपा नेत्यांनी त्याची दखलही घेतली नाही. कारण काँग्रेसचेच जे महत्त्वाचे नेते भाजपामध्ये डेरेदाखल झाले आहेत, तेच १० जागा जिंकून आणणार आहेत. विश्‍वजीत राणे-दोन किंवा तीन, बाबूश - दोन किंवा तीन, मायकल लोबो - दोन व दिगंबर कामत यांची एक जागा. तेथे ‘घुसण्याची’ काँग्रेस पक्षाची काय बरे व्यूहरचना आहे?

Goa Congress
Goa Politics: लोबोंना उमेदवारी देऊन चूक! विश्वासघात करणाऱ्यांना आता नाही प्रवेश- गिरीश चोडणकर

त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा प्रश्‍न - काँग्रेसमध्ये तीस तरी ताकदवान उमेदवार आहेत काय? उत्तर गोव्यात आज या पक्षाची नावनिशाणी दिसत नाही, तेथे पक्ष पुनर्जीवित कसा काय करणार आहात? सासष्टी तालुक्यातही आज पक्षाची शक्ती क्षीण झाली आहे. नावेलीसारख्या मतदारसंघात मतविभागणी होऊन कोणीही जिंकून येऊ शकतो. एकाही मतदारसंघात तेथे खात्री दिसण्यासारखी परिस्थिती नाही.

मंगळवारच्या काँग्रेसच्या बैठकीलाही महत्त्वाचे पदाधिकारी अनुपस्थित राहातात. विरोधी पक्षनेताही उपस्थित राहात नाही. त्यांना तरी राजकीय बदल करताना विश्‍वासात घेतले काय, इतर आमदारांना विचारले काय, संशयच आहे.

उत्तर गोव्यात डिचोलीत तीन, सत्तरीत दोन, पेडणे येथे दोन जागा आहेत. तेथे आज काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नाही. उत्तर गोव्यात शिल्लक १३ जागांचा विचार करता पणजी, पर्वरी, कळंगुट, शिवोली अशा मतदारसंघातही काँग्रेसचे अस्तित्व काय आहे? उत्तर गोव्यात पाच-सहा तरी जागे जिंकता येतील अशी काँग्रेसची आज शक्ती राहिलीय काय?

गेल्या निवडणुकीत कळंगुटला मायकल लोबो जिंकले, त्यांनी शिवोलीमध्ये केवळ आपल्या पत्नीला जिंकून आणले नाही, तर साळगावमध्ये केदार नाईक यांना विजयी केले. काँग्रेसने केवळ सांताक्रुझ व कुंभारजुवे हे मतदारसंघ जिंकले. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर आजारी होते, त्यामुळे राजेश फळदेसाई यांना जिंकता आले. त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी ‘विकत’ घेतली होती, असा आरोप झाला आहे व ते पैशांचा पाऊस पाडून स्वतःच्या हिकमतीवर जिंकून आले, हे राजकीय निरीक्षक खात्रीपूर्वक सांगतात.

भाजपाच्या विरोधात जनआंदोलने सुरू आहेत, लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, यातही तथ्य आहे, परंतु ९०च्या दशकात ज्याप्रकारची काँग्रेसची स्थिती होती ती आज ‘भाजपा’ बनली आहे. त्यावेळी काँग्रेसमध्ये अनेक दबंग नेते होते, तशा स्वरूपाच्या नेत्यांनी भाजपाचा आश्रय घेतला आहे. राणे, बाबूश, मायकल असे काही नेते आहेत, ज्यांना जिंकून येण्यासाठी पक्षाच्या चिन्हाची आवश्‍यकता नाही. ते स्वयंभू नेते आहेत. ते स्वतःच्या हिकमतीवर जसे जिंकून येतात, तसे इतर मतदारसंघांवरही प्रभाव टाकतात.

कोणीही सांगेल, ज्याप्रकारे २०१२मध्ये भाजपाच्या बाजूने लाट होती तशी आज परिस्थिती नाही. २०२२ मध्ये डॉ. प्रमोद सावंत केवळ ६६६ मतांनी जिंकले. वरील महत्त्वाच्या नेत्यांनी प्रत्येकी दोन-तीन जागे जिंकून भाजपाची संख्या २०वर पोहोचवली. २०२७च्या निवडणुकीत तोच संच घेऊन भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. ढवळीकर कितीही (पोकळ) डरकाळ्या फोडो, तेही भाजपामागे जाणार आहेत. मडकईत काँग्रेसला कधीच उमेदवार का तयार करता आला नाही? आरजीनेही तिथे ४५०० मते मिळवली. यावेळी भाजपच्या बाजूने रवी नाईक नसतील, परंतु दिगंबर कामत आहेत. हे डायनॅमिक्स बदलणार नाही.

परवा विश्‍वजीत राणेंनी पर्ये मतदारसंघात मोर्ले येथे गर्दीने ओसंडणारी महिलांची सभा घेतली. बोडगेश्‍वरांच्या जत्रेला जावे तशी बायकांनी तेथे गर्दी केली. तेथे काँग्रेस पक्षाची अनामत रक्कम जप्त होईल. अशा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची सभा तरी होईल काय?

तमिळनाडू काँग्रेसला २३४ पैकी केवळ पाच जागा जिंकता आल्या. द्रमुकने त्यांना २९ जागा बहाल केल्या होत्या. युती असूनही त्यांना कमी जागा मिळाल्या. तेथे विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होऊन काँग्रेसने असा काय म्हणून तीर मारला व फुशारकी मारावी? वास्तविक ती त्या पक्षाची लाजीरवाणी हार आहे!

गोव्यातील संघटनात्मक बदल ख्रिस्ती पाठिंब्याबद्दलही संशय व्यक्त करतो. ख्रिस्ती मतदार, पाठिराखे व चर्चही बिथरली आहे. ख्रिस्ती चर्चचा सहज पाठिंबा मिळेल या भ्रमात काँग्रेसने राहू नये. कारण काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून चर्च आता स्वतःची वेगळी व्यूहरचना करते. काँग्रेस काळात १२-१४ ख्रिस्ती आमदार जिंकून येते. २० ते २५ टक्के लोकसंख्येला ती अनुरूप संख्या होती, परंतु भाजपाच्या कारकीर्दीत ख्रिस्ती आमदार-संख्या १८-१९ वर जाऊ लागली. जेथे ख्रिस्ती उमेदवार विजयी होऊ शकतात, तेथे त्यांच्या बाजूने उभे राहाण्याची रणनीती ख्रिस्ती चर्च व मतदारांनी अवलंबली आहे.

पणजी, कळंगुट, शिवोली, म्हापसा - जेथे हिंदू मतदार जादा आहेत तेथेही ख्रिस्ती आमदार जिंकून आणले जातात. त्यांची २२ टक्के लोकसंख्या असूनही ४० टक्के लोकसंख्येएवढे आमदार जिंकून आणले जातात. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा देण्याऐवजी अत्यंत नियोजनपूर्वक रणनीतीद्वारे मतदानातून जादा ख्रिस्ती आमदार जिंकून आणण्याचीच पद्धती ते अवलंबणार आहेत. शक्य झाले तर आपला मुख्यमंत्री निवडण्याची संधी ते घेऊ पाहतात.

केवळ एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचे दिवस आता संपले. काँग्रेस मात्र त्यांची मते आपल्या खिशात असल्याच्याच आविर्भावात आहे. आपल्याला खिजगणतीत घेतले जात नसल्याची ख्रिस्तींची झालेली भावनाही काँग्रेससाठी बुमरँग ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com