

मधू य. ना. गावकर
आपल्या हिंदू धर्मात रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये लिहिली गेली, त्याचे अनेक भाषांनी अनुवादित होऊन ती जगमान्यतेस पात्र ठरली. महाभारत काव्यातील सार घेऊन कवी जयदेवाने गद्य आणि पद्यात ‘गीतगोविंद’ हे नाट्यरुपात प्रसिद्ध केले. त्या जयदेवाचा जन्म बंगालातील विरभूम जिल्ह्यातील किंदू-बिल्व गावात झाला असे काही इतिहासकार मानतात तर काहीजण ओडिशातील जगन्नाथपुरीमध्ये झाला असे मानतात. श्रीकृष्णाचे दुसरे रूप पद्मावती चरणचार चक्रवर्ती. रामायणात राम आदर्श राजा होऊन गेला. तो देव मानला, त्याचे दुसरे रूप कृष्ण तो भगवान, त्याने मानवाला गायन, क्रीडा आणि जगण्यासाठी भूमीशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला, म्हणून तो हरी झाला.
रामाने जलसमाधी घेतली, कृष्णाने भिल्लाकडून मरण पत्करले, म्हणजे मरण कुणालाच चुकलेले नाही, तो पर्यावरणाचा भाग आहे. श्रीकृष्णाने जन्मापासून भूमी-मातेशी आपली नाळ जोडून जंबू बेटाला ‘सुवर्ण भारत’ ही पदवी मिळवून दिली. त्याने गवळ्याच्या घरी जन्म घेऊन गोपालनाच्या ताकदीवर प्रमुख अन्न, सत्व, दूध आणि नंदीबैलाच्या सहाय्याने हातात नांगर धरून कृषी पिकाने देश सोनेरी केला.
त्या कृषी-पीकाची ज्योत आजच्या कलियुगातही पेटत राहिली आहे. माती, पाणी, हवा, प्रकाश आणि आकाश या तत्त्वाला त्याने देव मानून त्यांच्या ताकदीच्या सामर्थ्याने पूर्वकाळापासून ते आजपर्यंत पिकणारे धान्य हे जीवाश्म आणि मानवाचे ऊर्जास्थान आहे. निळ्या आकाशातून येणारे ढग पृथ्वीकडे झेप घेत नाचत येणारे अमृताचे थेंब मातीत सामावून तो बालक्रीडेत रमणारा पाऊस म्हणजे श्रीकृष्ण आहे.
गोव्यात श्रीकृष्णाची अनेक देवळे आहेत, त्याच प्रकारे शिवाचीही मंदिरे आहेत. शिवाय भूमाता म्हणजे सातेरी किंवा शांतादुर्गा नावाने ओळखली जाणारी अनेक मंदिरे आहे. मात्र ‘देवकीकृष्ण’ नावाने प्रसिद्ध असलेले एकच देऊळ, फोंडा तालुक्यातील वरगाव गावच्या माशेल भागात आहे.
या देवळाचा इतिहास जाणून घेतल्यास ते पूर्वकाळी चोडण बेटावर माडेल भागात असावे, कारण चोडण माडेलात देवकीकृष्ण देवालय हल्लीच्या काळात उभारले आहे, तरी चोडण गावचे भाविक माशेलात येऊन दरवर्षी त्याची पूजा बांधून उत्सव साजरा करतात.
पूर्वकाळी व्यापारी कारखाने गोव्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि विदेशी व्यापाऱ्यांची गलबते मांडवीतून येत होती, हे कुडणे, लामगाव, खांडोळा, हरवळे ठिकाणच्या पगोडा गुफांच्या वास्तूंनी सिद्ध झाले आहे. मात्र नंतरच्या काळात पोर्तुगीज येऊन त्यांनी इसाई धर्मप्रसारासाठी गोव्यातील सासष्टी, मुरगाव, तिसवाडी आणि बार्देस तालुक्यातील हिंदूंच्या देवालयांची मोडतोड केल्याने भाविकांनी आपले देव घेऊन सात तालुक्यांत डिचोली, फोंडा, केपे या भागात मराठा राजवटींचा आश्रय घेतला.
चोडण बेटावरील देवकीकृष्ण आणि त्यांचे संलग्न पंचायतन देव, चोडणकडून डिचोलीतील नार्वे पंचगंगा तीरावर आणले, आज तिथे गोकुळाष्टमीला जत्रा भरते. नंतर त्याला फोंडा तालुक्यातील माशेल येथे आणून देवकीकृष्णाची स्थापना करून भव्य मंदिर उभारले. त्या देवाबरोबर भक्तही येऊन माशेलात स्थायिक झाले.
माशेलच्या देवकीकृष्ण देवाचे वर्षाकाठी येणारे उत्सव म्हणजे आषाढ एकादशीचा चिखलकाला, दिवाळीचा पोळा पाडवा, कार्तिकातील कालोत्सव, रामनवमी, रथसप्तमी, मालिनी पौर्णिमा हे उत्सव साजरे होतात.
माशेलात उच्च दर्जाचे अनेक कलाकार होऊन गेले, ढोलकी वाजवणारे गोविंद आमोणकर, हार्मोनियमवादक वसंत आमोणकर, सारंगीवादक रामकृष्ण आमोणकर, शहनाईवादक गोविंद माशेलकर, तबलापटू नाना नावेलकर, माशेलातील जुने कलाकार कृष्णावर आधारीत रातकाला नाट्य आणि चिखलकाला साजरा करायचे.
चिखलकाला उत्सवाची सुरवात आषाढ एकादशीला दुपारी बारा वाजता करून दुसऱ्या दिवशी बारा वाजता समाप्ती केली जाते. चिखलकाल्याचे खेळ देवकीकृष्ण मैदानावर चिखलात खेळून साजरा करतात. दाट पावसाने मैदानावर भरपूर चिखल होऊन, त्या चिखलावर तेरा, तायखळा, कुर्डूक रानभाज्या उगवत होत्या, त्यात गालीचा प्रमाणे हरयाळी वाढून संपूर्ण मैदान हिरवेगार व्हायचे.
त्या मैदानावर देऊळ वाड्यावरीलच लोक देवळाकडे जमून खोबरेल अंगाला लावून घेण्यास बाजारात, पलंग, तिमले, खोलकर, गोवेकर यांच्या दुकानावर जाऊन, तेलाने माखून देवळाकडे यायचे, देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून हरिदासाने हाक मारल्यावर मृदंग आणि झांज वाजवीत मैदानावर जाऊन वेगवेगळी गौळण-गाणी, कवने, विटीदांडू, लगोऱ्या, दोरी ओढ, कापडाने विणलेली दोरी पाठीवर मारणे, असे बाळकृष्णाचे खेळ खेळून, संपूर्ण हिरवे मैदान तुडवलेल्या शेताप्रमाणे लाल भडक चिखलमय करायचे. संध्याकाळी चिखल जमिनीवर बसून त्या चिखलावरून स्वच्छ पाणी मैदानावर फुटणाऱ्या झऱ्यातून वाहत असायचे. चिखलकाल्यास प्रसाद म्हणून पुरणपोळी आणि पोहे वाटून सांगता व्हायची.
गेल्या दोन तीन वर्षांपासून चिखलकाल्याचे आयोजन सरकार करते, आता स्थानिक गोपाळांसोबत, संपूर्ण गोव्यातून येणारे भक्त आणि शेजारच्या राज्यातील लोक चिखलकाल्यात भाग घेऊन आनंद लुटतात.
पुढील काळात विदेशी पर्यटकही प्रसंगी भाग घेऊन मजा लुटू शकणार नाहीत का? याचे उत्तर तो श्रीकृष्णच देऊ शकेल. संजय नावेलकर चिखलकाल्याचा फलक उभारीत होते. त्या फलकावर श्रीकृष्णाचा फोटो असायचा, आता फलकावर माणसांचे फोटो दिसतात. काही का असेना, हल्ली चिखलकाला ‘कोटी’ रूपात साजरा होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.