मागच्या आठवड्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाला गोव्यात अॅलोपॅथी मेडिकल कॉलेज (ईएसआयसी) सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या गोव्यातील हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज होऊ शकते, याची पडताळणी फ्रान्सिस्को सार्दिन यांच्या दक्षिण गोवा खासदारकीच्या काळात, म्हणजे २०२३-२४ मध्ये झाली होती.
कोविडच्या आधी, गोव्यासाठी (Goa) अखिल भारतीय आयुर्वेद विज्ञान संस्थान (एम्स)ची शाखा मिळू शकते, अशी चर्चा होती; पण तसे झाले नाही. दरम्यान, कोविडनंतरच्या काळात सत्तापक्षात असलेल्या उत्तर गोव्याचे खासदार श्रीपादभाऊंना गोव्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (आयआयए) मिळविण्यात यश आले. मी एकदा भाऊंना गोव्यासाठीच्या एम्सचे काय झाले, असे विचारल्यास केंद्र सरकार गोव्याला ईएसआयसी मेडिकल कॉलेज देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. यावेळी भाऊंच्या मनात, एम्स चांगले की ईएसआयसी, याविषयी शंका होती. विषय निघालेलाच असल्याने चर्चा झाली व एम्सपेक्षा ईएसआयसी मेडिकल कॉलेज कसे गोव्यासाठी जास्त सोयीस्कर होईल, याबद्दल वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून माहिती मी त्यांना दिली होती. आता गोव्यात ईएसआयसी मेडिकल कॉलेज येणार असल्याचे निश्चित झाल्याने, याविषयी थोडी उजळणी करूया.
गोव्यात अॅलोपॅथी म्हणजे पाश्चात्त्य वैद्यकीय शिक्षणाची मुहूर्तमेढ आधी १७ व्या शतकाच्या अखेरच्या दशकात रोवली गेली. जुन्या गोव्यात पसरलेल्या महासाथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी व्हॉइसरॉय रॉड्रिगो द कोस्टा यांनी वैद्यकीय शिक्षणाची मागणी केली. त्यानुसार १६९१ मध्ये ‘औला द मेडिसिना’ (वैद्यकीय वर्ग) सुरू झाला. त्याच्या ९० वर्षांनंतर, म्हणजे १८०१ मध्ये डॉ. अँटोनियो जोस द मिरँडा ई आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली वैद्यक व शस्त्रक्रिया वर्ग केला. पुढे जाऊन, ५ नोव्हेंबर १८४२ रोजी व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को झेविअर द सिल्व्हा परेरा यांनी पणजी येथे ‘हॉस्पिटल रियल द सांताआना’सोबत ‘एस्कोला मेडिको-सिरुर्जिका दे नोव्हा गोवा’ची अधिकृत स्थापना केली.
पोर्तुगीज साम्राज्यातील पाश्चात्त्य वैद्यकीय शिक्षणाचे हे मुख्य केंद्र बनले होते. समकालीन ब्रिटिश राजवटीतील सुरू झालेली सुरवातीची मेडिकल कॉलेज अशी होती: कोलकाता मेडिकल कॉलेज (२८ जानेवारी १८३५), मद्रास मेडिकल कॉलेज (२ फेब्रुवारी १८३५), ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई (पायाभरणी : १८४३; स्थापना : १८४५), ‘आग्रा मेडिकल स्कूल’ (स्थापना : १८५४). तसेच, भारतातील फ्रेंच वसाहतीमधील पुडुचेरी येथे आताच्या जिपमेर मेडिकल कॉलेजची स्थापना १८२३ साली ‘एस्कोला द मेडिसिन द पाँडिचेरी’ या नावाने झाली. थोडक्यात, भारतात पाश्चात्त्य वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था ब्रिटिश सरकारच्या आधी पोर्तुगीज व फ्रेंच सरकारांनी आणली होती. पोर्तुगीज राजवटीत ख्रिस्ती धर्मांधांनी केलेली लुडबुड व अन्याय वगळल्यास, ब्रिटिश राजवटीपेक्षा सरस व प्रगत मानली जाते. आज पुडुचेरी व आपला गोवा, भारतापेक्षा वेगळा वाटतो, तो याचमुळे.
डिसेंबर १९६१ मध्ये गोवा भारताचा भाग झाल्यानंतर ‘एस्कोला मेडिको-सिरुर्जिका दे नोव्हा गोवा’च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. १९६३ मध्ये याचे नाव बदलून ‘गोवा मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्यात आले आणि ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. ‘एस्कोला मेडिको-सिरुर्जिका’मधून पदविका घेतलेल्यांना बॉम्बे मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करण्यासाठी इंग्रजीतून ब्रिज कोर्स करावा लागला. तसेच, गोवा मेडिकल कॉलेजची मान्यता द मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) अंतर्गत झाल्याने, त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुरूप वरिष्ठ वैद्यकीय शिक्षक गोव्यात उपलब्ध झाला नाही.
परिणामी, संपूर्ण भारतातील अशी पात्र मंडळी गोव्यात आली व पुढील चार दशके गोव्यावर राज्य करून गेली. १९८६ मध्ये गोवा विद्यापीठाची स्थापना झाली व आपसूकच गोवा मेडिकल कॉलेज मुंबई विद्यापीठाशी विभक्त होऊन गोवा विद्यापीठाशी जोडले गेले. गोवा विद्यापीठ सुरू झाल्यानंतरची आमची दुसरी बॅच होती व आमचे शिक्षण अर्धे होईपर्यंत गोवा विद्यापीठ आमच्याच इमारतीत वास्तव्याला होते. आज इतक्या वर्षांनंतर गोवा विद्यापीठाला ईएसआयसीच्या रूपाने अॅलोपॅथी मेडिकल कॉलेज, अजून एक मेडिकल कॉलेज संलग्न होत आहे. गोव्यात पुढे कधी एम्स आलेच, तर ते गोवा विद्यापीठाला संलग्न होणार नाही, कारण त्यांना स्वतःचे असे विद्यापीठाचे अधिकार आहेत व ते केंद्र सरकार सोडून आणखी कोणाचे ऐकत नाही. एनआयटी व आयआयटीचे व्यवस्थापनही असेच असते.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) वैद्यकीय महाविद्यालयांच्या शृंखलेची सुरवात साधारणपणे २०१०-२०११ मध्ये झाली. त्यांचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय बेंगळुरू (राजाजीनगर) येथे २०१२ मध्ये स्थापन झाले. यानंतर २०१३ मध्ये कोलकाता (जोका), चेन्नई (के. के. नगर), गुलबर्गा, फरिदाबाद (२०१५), हैदराबाद (२०१६) अशी साखळी वाढत गेली आहे. या साखळीत यंदा गोव्यासाठी एक व पुण्यासाठी एक, अशी दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालये जोडली गेली आहेत. दोन्हीकडे सुरवातीची प्रवेशमर्यादा पन्नास जागांची आहे. यातील ५०% जागा स्थानिकांसाठी असून, त्यांची भरती राज्य आरक्षण धोरणानुसार होणार आहे.
राहिलेला १५ टक्के हा ‘ऑल इंडिया’ कोटा असणार आहे, तर उर्वरित ३५% कोटा हा ‘आयपी कोटा’ म्हणजे भारत सरकारच्या ‘कामगार आणि रोजगार मंत्रालया’अंतर्गत वैद्यकीय विमा योजनेखाली नोंदणीकृत खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव असणार आहे. या दोन्हीमध्ये आरक्षण असणार आहे; पण ते राष्ट्रीय टक्केवारीनुसार असणार व प्रवेशप्रक्रियाही राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. एम्स मेडिकल कॉलेजमध्ये राज्यासाठी वेगळा कोटा नसतो. त्यावेळी श्रीपादभाऊंना हाच तांत्रिक मुद्दा समजावून सांगितला. श्रीपादभाऊंची एक वेळची भावना अशी होती की, गोव्यासाठी एम्स मिळत असेल, तर आम्ही का घेऊ नये? पण पर्रीकर एम्सला अनुकूल नव्हते. भाऊ सहज म्हणून गेले की, आता कळले पर्रीकर एम्ससाठी का अनुकूल नव्हते. पार्सेकर सर मुख्यमंत्री असताना सहज बोलण्यात विषय आला असता, एम्सचा गोव्याला जास्त फायदा होणार नाही, याविषयी मी व डॉ. जिंदाल सरांनी त्यांना सांगितले होते.
काहीही असो, नवरात्रीच्या शुभेच्छांसह गोव्यासाठी नवीन मेडिकल कॉलेजची अनोखी भेट जाहीर केली आहे. यासाठी प्रवेशप्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात होणार असल्याचे जाहीर झाल्याने, याच शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू करू म्हणून युद्धपातळीवर काम करणाऱ्या शिक्षक मंडळींची थोडी हिरमोड झालेली असणार; तर दुसऱ्या बाजूला घडी व्यवस्थित बसवायला अजून दहा महिने मिळाल्याचे समाधानही मिळाले असणार. नवीन कॉलेजसाठी गोव्यातील आतापर्यंत ४५ डॉक्टर येथे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत व अजून शे-सव्वाशे गोमंतकीय युवा डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षक पेशात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पाटणा ईएसआयसी कॉलेजच्या अधिष्ठानपदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. बिनय बिश्वास यांच्याकडे या नवीन कॉलेजची जबाबदारी देण्यात आली आहे. मित्रत्वाच्या नात्याने एकत्र चहा घेणे होते, कधी त्यांच्याकडे तर कधी आमच्याकडे. तशातच, गोव्यातील ईएसआय हॉस्पिटलशी माझे संबंध १९९९ पासूनचे, कोविड काळात अजून जवळ आलेले. या हॉस्पिटलचे मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर झाल्याने, या हॉस्पिटलचे पुढील काळातील स्वरूप कसे असेल, या मेडिकल कॉलेजमुळे दक्षिण गोव्यातील आरोग्य यंत्रणेत कोणते बदल येतील, याविषयी अधिक जाणून घेऊया, पुढच्या आठवड्यात. गोवा मराठी अकादमीचा विषय परत एक-दीड महिन्यानंतर. खात्रीने अगदी परखड तपशिलासह!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.