Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Bhandari Community Politics: भंडारी समाजाची असलेली २० टक्के लोकसंख्या, एक समूह म्हणून ओबीसींची बनणारी २७ टक्के मतसंख्या, तरीही त्यांना आपले भरभक्कम नेतृत्व पुढे आणण्यात येणारे अपयश...
Goa Bhandari Community Politics
ravi naikDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भंडारी समाजाची असलेली २० टक्के लोकसंख्या, एक समूह म्हणून ओबीसींची बनणारी २७ टक्के मतसंख्या, तरीही त्यांना आपले भरभक्कम नेतृत्व पुढे आणण्यात येणारे अपयश... २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही हेच नामुष्कीचे खापर भाळी घेऊन फिरण्याची वेळ या प्रबळ समाजातील कार्यकर्त्यांवर येईल काय, हा एक बहुचर्चित राजकीय विषय आहे.

२००७ मध्ये कॉंग्रेस नेतृत्वाने केलेला विश्‍वासघात व रवी नाईक यांची पीछेहाट, तरीही ओबीसींनी त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान करून अपयशाचे उट्टे भरून काढले. परंतु त्यानंतर भंडारी नेतृत्वाला आपली विखुरत चाललेली शक्ती गोळा करून स्वत:ची जबरदस्त आघाडी निर्माण करण्यात अपयश आले व आज तर या समाजाची नवी पिढी या ऐक्यापासून दूरच आहे. तज्ज्ञ मानतात, की या नवीन पिढीकडे पैसा आहे, राजकीय भूमिका घेण्याची धमकही आहे; परंतु समाजाच्या ऐक्यापेक्षा स्वत:ची महत्त्वाकांक्षा जोपासण्यात तो धन्यता मानतो.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

ताळगावचे एक प्रमुख भंडारी नेते दत्तप्रसाद नाईक, जे सधन मानले जातात, त्यांचे वडीलही २०१२ पर्यंत समाजाचे अध्यक्ष होते. राजकीय पक्षातील भंडारी नेत्यांना दोष देताना ते म्हणाले, या नेत्यांनी समाजाचा वापर केला. समाजाच्या निधीत काडीमात्र नवीन भर घातली नाही. उलट समाज संघटनेत राजकारण आणले, नेत्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या दिल्या, त्यातून समाज संघटनेत राजकीयदृष्ट्या तडजोड - शैथिल्य निर्माण झाले.

‘‘पैसा आला; परंतु समाजाचे आधुनिकीकरण - ज्यात विचारधारेचा प्रश्‍न येतो, आज कोणत्या पातळीवर आहे? त्यामुळे वैचारिक धारणा नसल्याने सामाजिक चळवळी होत नाहीत; या चळवळीला राजकीय पाठबळ निर्माण होत नाही. तरुणांची संघर्ष करण्याची तयारी नाही’’, असे समाजकार्यकर्ते तथा शिक्षक युगांक नायक म्हणाले.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

ते पुढे म्हणाले, की भंडारी शिक्षण परिषदेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत; परंतु कितीजणांना तिचे अस्तित्व आणि कार्य माहीत आहे? समाज प्रगल्भ नसल्याने आपली लोकसंख्या, गोव्यातील इतिहास, सामाजिक स्थान व राजकीय चळवळीचे महत्त्व यांची त्यांना कल्पना येत नाही. अशा परिस्थितीमुळे समाजातील नवीन पिढीलाही आपल्या राजकारणातील नेत्यांना मोठे करण्यात अपयश येते, असे ते म्हणाले. युगांक नायक पुढे म्हणतात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर यांना समाजाने मोठे केले नाही. ते राजकारणात यशस्वी झाल्यावरच समाज त्यांच्या पाठीशी राहिला. यावरूनच समाजाची राजकीय अपरिपक्वता दिसून येते.

रवी नाईक (Ravi Naik) हे केवळ भंडारी समाजाचे नेते नव्हते, ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वाची खुबी होती. त्यांच्याकडे असलेले नेतृत्वाचे गुण म्हणजे, ते ‘लोहचुंबका’सारखे होते. कुठेही गेले, की त्यांच्याभोवती घोळका जमे. तसे चुंबक - वैशिष्ट्य भाजपमधील इतर नेत्यांना नाही. भाजपमधील अनेक वर्षे मंत्रिपद भोगलेल्या इतर भंडारी नेत्यांनाही मुळीच असे अस्तित्व नाही, असे मॅग्नेटिक अपिल असणारा भंडारी नेता कोणत्याही पक्षात आज नाही.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

कॉंग्रेसमध्ये तर नेत्यांचा एवढा दुष्काळ आहे, की संपूर्ण गोव्यात प्रतिमा असलेला नेता ना विरोधी नेतेपदी आहे, ना प्रदेशाध्यक्षपदी! या परिस्थितीचा परिणाम म्हणजे, मराठा समाज जो आज आठ टक्के असूनही राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे व एकवेळ तर गोव्यात भाजपची मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे त्या समाजाकडे होती. या समाजाचे आज सरकारात तीन मंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वांत प्रबळ खाती आहेत व मंत्रिमंडळाचा २५ टक्के हिस्सा आहे. मराठा समाजाचे एकूण सात आमदार जिंकून आले आहेत. याउलट भंडारी समाजाकडे सरकारात एकच मंत्रिपद आहे. २०२२ मध्ये समाजाच्या मतांमध्ये फूट पडली, त्याचा हा परिणाम आहे.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

या पार्श्‍वभूमीवर २०२७ मध्ये भंडारी समाजाचा कोणत्याही पक्षात करिष्मा असलेला नेता निवडून येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही व कोणताही पक्ष भंडारी नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही. जेव्हा कॉंग्रेसचे विरोधी नेते युरी आलेमाव फुरफुरत होते, तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्ष जाहीर करणार नाही, असे माणिकराव ठाकरे यांना जाहीर करावे लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आज फातोर्ड्यात जबरदस्त राजकीय खेळी करताना दिसतात, त्यांना २०२७ ची निवडणूक लढविण्याची अनिवार इच्छा आहे; परंतु त्यांचे भवितव्य पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. कारण फातोर्डा त्यांना अजून सुरक्षित मतदारसंघ नाही. कारण थेट लढतीत त्यांचा तेथे सलग तीनवेळा पराभव झालाय.

दामूंचे शल्य म्हणजे, मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले, त्या २०१९ च्या विधानसभा कारकिर्दीत दामू जर आमदार - मंत्री असते तर ते मुख्यमंत्रीही बनू शकले असते; परंतु भंडारी समाजाचा हा तडफदार नेता २०१२, २०१७ व २०२२ अशा सलग तीन निवडणुका हरला व विधिमंडळाच्या राजकारणातून बाहेर फेकला गेला. या काळात खासदारपदाची उमेदवारीही त्यांना लाभली नाही. गिरीश चोडणकरांचेही तसेच. पक्षात राहुलनिष्ठ आणि पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळूनही इतक्यावेळा निवडणूक लढवून त्यांच्या नशिबी जिंकणे नव्हते. आजही ते जेव्हा निवडणूक लढविण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांच्याकडे सुरक्षित मतदारसंघ नाही, संघटनही नाही. भंडारी समाजात ते किती लोकप्रिय आहेत, याचे उत्तर २०२७ च्या निवडणुकीत आहे, जे त्यांचे राजकीय अस्तित्वही निश्‍चितही करणार आहे!

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

राजकीय विश्‍लेषकांच्या मते, भंडारी नेते ढेपाळतात, याचे एक कारण ते संघटना बांधू शकत नाहीत, हे खरे असले तरी या नेत्यांचा अतिआत्मविश्‍वास हे सुद्धा एक कारण आहे. समाजाचे योग्य नेतृत्व करून वेळप्रसंगी समाजाला संघर्ष करण्यास भाग पाडण्यात त्यांचा राजकीय कचखाऊपणा कारण होतो! समाजाचे सक्षमीकरण, लाभाची पदे व सरकारी नोकऱ्या, सतत सरकारला व व्यवस्थेला निकट राहण्यात धन्यता मानणे, संघटना राजकीय लाभार्थींच्या हाती राहणे ही त्यांच्या कमजोरीचीही कारणे बनली आहेत. त्याउलट भंडारी समाजापेक्षा केवळ तीन टक्क्यांनी अधिक असलेला (भंडारी १९.५ टक्के, तर ख्रिस्ती २३ टक्के) ख्रिस्ती समाज व्यूहरचना आखून मतदान करतो. म्हणून हिंदू प्राबल्याच्या मतदारसंघातही आपले उमेदवार जिंकून आणतो, हे बुद्धिचातुर्य न दाखविता येणे हे भंडारी समाजाचे राजकीय अपयशाचे प्रमुख कारण आहे.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: गोवा फॉरवर्डचा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव कुठे अडकला? अमित पाटकरांचा सवाल; 'के. सी. वेणुगोपाल यांनी उत्तर द्यावे'

त्याबाबत अभ्यासक युगांक नायक म्हणाले, या समाजाला आपली लोकसंख्या किती आहे, हे माहीत नाही. सांस्कृतिक मूल्यांचा अभ्यास नाही आणि आपल्या शक्तीची चुणूक दाखवून देण्यासाठी संघर्षाचीही जाणीव नाही. तो रूढी - परंपरेतच फसला आहे.

बऱ्यापैकी राजकीय प्रभाव : परंतु व्यूहरचनेचा अभाव

भंडारी मतांचे प्राबल्य असणारे राज्यात १४-१५ मतदारसंघ आहेत. उत्तर गोव्यात त्या समाजाची ताकद बऱ्यापैकी असूनही त्यांचे उमेदवार जिंकून येत नाहीत, त्यात एक मये मतदारसंघ आहे. त्याशिवाय पेडण्यातील दोन्ही मतदारसंघ, बार्देशमधील शिवोली, साळगाव, हळदोणे, थिवी व म्हापसा मतदारसंघ, तिसवाडीमध्ये कुंभारजुवेत समाजाचे वर्चस्व आहे. त्यानंतर सांत आंद्रे, सांताक्रूझ, दक्षिण गोव्यात शिरोडा, फोंडा व मडकईमध्ये समाज बऱ्यापैकी संख्येत आहे. भंडारी समाजाची श्रद्धास्थाने बऱ्यापैकी प्रबळ व शक्तिशाली आहेत; परंतु तेथेही अनेक वाद आहेत. त्यांचे स्वामीही राजकीयदृष्ट्या क्रियाशील असून समाजाचे संघटन व राजकीय व्यूहरचना यात फारसा रस घेत नाहीत.

Goa Bhandari Community Politics
Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

...यावर कौस्तुभ नाईक काय म्हणतात?

१. येत्या डिसेंबरमध्ये गोव्यात बाबलो मर्तो नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या भंडारी शिक्षण परिषदेला १०० वर्षे पूर्ण होतील. समाजाच्या गेल्या शंभर वर्षांतील एकूण परिस्थितीचा आढावा घेणे आणि पुढील शंभर वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे. खुज्या महत्त्वाकांक्षी लोकांकडे आणि स्वतःच्या आमदारकीपुरते समाजाला जवळ करणाऱ्या नेत्यांकडे समाज संघटनांचे धुरिणत्व देणे टाळले पाहिजे.

२. समाजाचा मुख्य भर हा जास्तीत जास्त युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर असला पाहिजे. त्यांच्या शिक्षणाची व नोकरी-धंद्याची सोय कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे.

३. संस्थात्मक पातळीवर समाजाचे कार्य अगदी नगण्य आहे. स्वतः समाज संघटना राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या दावणीला बांधून कमकुवत झाली आहे. संख्या जास्त असल्याने सगळाच समाज एका छत्राखाली येणे कठीण असले तरी अशक्य नाही. मार्ग वेगळे असले तरी हरकत नाही; पण ध्येय एक असले पाहिजे.

४. भंडारी समाजाने राष्ट्रीय स्तरावरील व्यापक बहुजनवादी चळवळीशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे.

५. समाजाच्या इतिहासाविषयी अनभिज्ञता, ‘आयकॉन्स’चा अभाव आणि एकूणच समाजाशी स्वतःला जुळवून घेण्याचा, स्वतःला भंडारी म्हणून आयडेंटिफाय करण्याचा बऱ्याच लोकांना आजही संकोच वाटतो. यासाठी एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभारावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com