सर्वेश बोरकर
गोवा राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व विभागाच्या नेतृत्वाखाली, जैन वस्तीच्या जीर्णोद्धार प्रकल्पात संरचनात्मक बळकटीकरण, स्थळाचे स्थिरीकरण आणि पुनरुज्जीवन यावर लक्ष केंद्रित करून टप्प्याटप्प्याने संवर्धन कार्य करण्यात आले आहे.
गोव्यात फोंड्याकडे जाणाऱ्या फर्मागुढी टेकड्यांपासून जेमतेम तीन किमी अंतरावर, उजवीकडे वळण घेऊन नागेशी मंदिर ओलांडून बांदोडा येथील सुंदर दिसणाऱ्या जैन वस्तीचे दर्शन होते.या गोव्यातील जैन इतिहासाच्या संरक्षित स्मारकाजवळ सुंदर दिसणाऱ्या बांधकामामुळे ही वस्ती झाकलेली असली तरी, पोर्तुगीजपूर्व काळातील कोसळलेल्या अवशेषांची भव्यता लक्षात येते.
कुडणे, बांदोडा आणि नार्वे येथे असलेल्या जैन बस्तींचे अवशेष सुरुवातीच्या काळात गोव्यात जैन धर्माच्या प्रभावाचे पुरावे म्हणून काम करतात. चालुक्य आणि कदंब यासारख्या महान राजवंशांनी जैन धर्माचे संरक्षण केले. गोव्यातही या राजवंशांच्या प्रभावाखाली आलेल्या या स्मारकाची उपेक्षा आणि नैसर्गिक घटकांच्या विध्वंसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व विभागाने संरक्षण दिलेल्या या स्मारकावर नैसर्गिक घटकांच्या विध्वंसाचा परिणाम दिसून येतो.
१९९३ मध्ये विभागाने या जागेवरील कचरा आणि वनस्पती साफ केल्यानंतर, अधिकाऱ्यांना भगवान गणेशची विकृत प्रतिमा, तीर्थंकराचे धड आणि ‘अमलक’ (छताचा कोरीव स्लॅब) आढळून आला होता.गोवा राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व विभागाच्या नेतृत्वाखाली ,जैन वस्तीच्या जीर्णोद्धार प्रकल्पात संरचनात्मक बळकटीकरण, स्थळाचे स्थिरीकरण आणि पुनरुज्जीवन यावर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिराच्या अवशेषांवर, नैसर्गिक झीज, संरचनात्मक भेगा आणि पावसाळ्यातील तीव्र क्षय रोखण्यासाठी १.१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे टप्प्याटप्प्याने संवर्धन कार्य करण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संग्रहालयातील पुरावे जुन्या गोव्यात त्या काळाचा इतिहास एकत्र करण्यास मदत करतात. जुन्या गोव्यात १४२५ इसवी सनाचा एक कन्नड शिलालेख, बांदिवडे (बांदोडा) च्या जैन बस्तीचा संदर्भ देतो आणि गावाच्या उत्पत्तीवर काही प्रकाश टाकतो. बांदोडा ही जैन बस्ती मंगनंदाचा मुलगा राजा श्रीपाल विरुगप्पा याने स्थापन केली होती, ज्यांनी नेमिनाथचे मंदिर बांधले होते. ‘जैन बस्ती १४२५ मध्ये विजयनगर काळात बांधण्यात आली आणि २७ वर्षांनंतर १४५२ मध्ये दुरुस्त करण्यात आली, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
जैन वस्तींमुळे जैन भिक्षू (श्रावक) आणि शिष्य (श्रमण) यांच्या धार्मिक गरजांसह विविध गरजा पूर्ण होत असत. ‘श्रमणांसाठी अभ्यासिका आणि भटक्या भिक्षूंसाठी राहण्यासाठी निवासस्थाने होती. बस्तीची योजना आयताकृती (१२ बाय १० मीटर) होती, तर चुना आणि दगड असलेले लॅटराइट टिकाऊ आणि विश्वासार्ह सामग्री म्हणून वापरले जात असे. कोसळलेल्या रचनेच्या मागे, प्रतिमा नसलेले तीन कमानदार छतावरील मंदिरे दिसतात. समोरील हॉलमध्ये तीन कमानीही होत्या आणि त्या १.२५ मीटर बाय १.२५ मीटर आकाराच्या चार मोठ्या खांबांवर विसावल्या असाव्यात, असे जाणकारांचे मत आहे.
जुन्या गोव्यातील शिलालेखात देवराय दुसरा यांच्या वतीने लक्कप्पाचा मुलगा त्र्यंबक याच्या राजवटीत बांदोडा येथील नेमिनाथच्या जैन बस्तीला वागुरबेम आणि अक्षय ही दोन गावे देण्याचेही सांगितले आहे. मनोरंजक म्हणजे, तीर्थंकरांपैकी एक, जैन शिल्प,आगशीच्या झुवारी नदीपलीकडे कुठ्ठाळी येथे सापडले होते आणि ते पणजी येथील राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व संग्रहालयात प्रदर्शित केले आहे.
गोव्यात इसवी १३८० ते १४७० अशी अनेक दशके विशाल विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत राज्य केले गेले ज्यात संपूर्ण गोव्याची भरभराट झाली. विजयनगर साम्राज्य स्थापनेनंतर काही दशकांत संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता, एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा हरिहर (द्वितीय) याने इसवी १३४४ ते इ. स. १४०४ या त्याच्या काळात विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभागले.
कोकण (कोकण-राज्य), उत्तर कानरा आणि दक्षिण कानरा (बाराकुर-राज्य आणि मंगळुरू-राज्य), उत्तर आंध्र (उदयगिरी-राज्य) व दक्षिण आंध्र (चंद्रगिरी-राज्य), उत्तर तमिळ (पदैविदु-राज्य), दक्षिण तमिळ (पांडिया-राज्य) आणि पूर्व तमिळ (मुलुवाई-राज्य) अशी विभागणी केली गेली.२९ ऑगस्ट १३८० रोजी हरिहर (द्वितीय) याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच मल्लप्पा वडेयार म्हणजेच वीर वसंत-माधव राया (माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकापट्टण वा आजचं गोवा वेल्हा होती.
माधव मंत्री त्यापूर्वी एकाच वेळी बारकुर-राज्य(दक्षिण कानरा) आणि उत्तर कानराचा राज्यपाल म्हणून काम पाहत होते, विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर द्वितीयच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांने संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले. नागेशी येथील श्री नागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतींवर लावलेला पाषाण मध्ययुगीन काळातील १४१३ इसवी सनाचा शिलालेख मंदिराच्या वैभवाचे दर्शन घडवितो.
मजकुराच्या वर, सूर्य आणि चंद्राची आकृती आहेत. विजयनगरचा राजा देवराय (प्रथम) याने गोवा आपल्या अधिपत्याखाली आणला होता त्या काळात हे कोरले गेले होते. शिलालेखाची सुरुवात श्री गणपतीच्या आवाहनाने होते. पुढे त्यावर राजा देवराय (प्रथम) यांचे वर्णन विजयनगरचे शासक ‘महाराज धीरज परमेश्वर श्री वीर प्रताप देवराय महाराज’ असे केले आहे. त्यात राजा देवराय (प्रथम) यांचे गोव्याचे राज्यपाल नंजन गोसावी यांचाही उल्लेख आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.