

सर्वेश बोरकर
विजयनगर साम्राज्य हे दख्खनस्थित दक्षिण भारतीय साम्राज्य. विजयनगरमधील हंपी या महान शहराचे तपशीलवार वर्णन त्या काळातील पोर्तुगीज प्रवासी नुनिझ आणि पेस यांनी केले आहे. हे दोन्ही लेखक शहराच्या महान भव्यतेच्या आणि समृद्धीच्या कालखंडाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते.
विजयनगर साम्राज्याच्या राजधानीत केलेल्या काही जल नियोजनाच्या कामांकडे पोर्तुगीज प्रवासी नुनिझ आणि पेस आपले लक्ष वेधून घेतात. विजयनगर साम्राज्य १३३६ ते १६४६च्या दरम्यान प्रसिद्धीस आले. विजयनगरमधील संस्कृती, शिल्पे, वास्तुकलेबरोबर राज्यकर्त्यांनी पाणी पुरवठा व्यवस्थेला दिलेले महत्त्व हे त्यांच्या समृद्धीचे मुख्य कारण असावे. राज्यकर्त्यांनी आपली राजधानी म्हणून हंपी निवडण्याचे मुख्य कारण तुंगभद्रा नदी होते. नदीचे पाणी त्यांच्या राज्याच्या अनेक भागांमध्ये लहान धरणे, कालवे आणि तलावांद्वारे वळवण्यासाठी त्यांनी एक प्रणाली तयार केली.
आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने हंपीमधील कोरडवाहू जमिनीसाठी सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आजही वापरात असलेले धरण आणि बसवण्णा जलवाहिनी कोर्रागल येथे १५२१साली त्यांनी बांधली. त्यांचे आणखी एक महान कार्य म्हणजे राजधानीत बांधलेला एक प्रचंड मोठा तलाव. हा तलाव त्याने पोर्तुगीज अभियंता जुआंव द ला पोंते यांच्या मदतीने बांधला. पोर्तुगीज प्रवासी पेस आणि नुनिझ या दोघांनीही या तलावाचा उल्लेख केला आहे. १५२०पूर्वी कृष्णदेवरायाने त्याची आई नागलदेवी हिच्या स्मरणार्थ नागालापूर (आताचे होस्पेट) हे शहर वसवले होते. राजाने ते त्याचे आवडते निवासस्थान बनवले.
विजयनगर साम्राज्यामधील आणखी एक आश्चर्य म्हणजे दगडी ‘बुक्क’ जलवाहिनी. ही २०० मीटर लांबीची दगडी रचना आजही सुस्थितीत आहे. नदीच्या पलीकडील विरुपापूर गड्डी बेटावर अणेगुंडी कालव्यातून पूर्वी पाणी वाहून नेणारी या प्रदेशातील ही एक प्रमुख पाणीपुरवठा वाहिनी होती. आज ही जलवाहिनी अर्धवट अवस्थेत असली तरी तिचे आकर्षण कमी झालेले नाही. आश्चर्य म्हणजे या जलवाहिनीस असलेले १५ फूट उंच दगडी खांब व पाणी जाण्यासाठी प्रत्येक खांबाच्या मधोमध आठ फुटांचे अंतर.
कालव्याची असामान्य उंची त्याला अद्वितीय बनवते. अंजनाद्री टेकड्यांना व हुलिगी कोप्पल जिल्ह्याला जोडणाऱ्या वळणदार रस्त्याच्या बाजूला असलेला जलवाहिनीचा एक दगडी भाग अनेगुंडीमध्ये आजही टिकून आहे. अनेगुंडीपासून सात किलोमीटर अंतरावर सानापुराजवळ तुंगभद्रा नदीचे दोन भाग होतात. त्यातील एक भाग ओलांडून गेल्यावर लगेच ही जलवाहिनी दिसते. या जलवाहिनीने विजयनगरातील नागरिकांना केवळ पाणीपुरवठाच केला नाही तर सैनिकांसाठी दगडी पूल म्हणूनही ती ठामपणे उभी राहिली.
पूर्वी होती त्याहून अर्ध्या लांबीची ही जलवाहिनी अर्धवट अवस्थेत टिकून आहे. १९ किमी लांबीचा अनेगुंडी कालवा विविध गावांतून जातो. गंगावतीपासून सुमारे ४.५ किमी अंतरावर असलेल्या संगापुरा तलावावर तो संपतो. आजही या कालव्यातून सुमारे ८०० हेक्टर शेतजमिनीचे सुमारे १० महिने सिंचन होते.
पूर्वी अनेगुंडी कालव्याचे पाणी बुक्का जलवाहिनीतून विरुपापूर बेटावर नेले जात असे. भात, केळी आणि नारळ पिकवणाऱ्या जमिनींचेही मोठे भूभाग आपल्याला येथे पाहायला मिळतात. कालव्याच्या नावावरून पाहता, ही रचना विजयनगरच्या राजा बुक्कराय पहिला याच्या काळात (१३५६-१३९९च्या सुमारास) बांधली गेली असावी. बऱ्याच ग्रंथांमध्ये १३८० मध्ये हंपीजवळ एक पूल (सेतू) बांधल्याचा उल्लेख आहे.
हंपीमध्ये महानवमी डिब्बाजवळ एक मेत्तिलू कल्याणी (मंदिरालगत असलेली पुष्करणी म्हणजे चार बाजूने पायरी असलेली मोठी विहीर), विरूपाक्ष मंदिराशिवाय मन्मथ, कृष्ण मंदिरासमोरील बालकृष्ण, लोकपावनी आणि अशा अनेक पुष्करणी आहेत.तसेच कमलापूर तलावातून हंपी येथील पाणी वाहून राजवाड्यापर्यंत नेणाऱ्या तीन किमी लांबीच्या कालव्याच्या बाजूने उंच दगडी बांधकामे दिसतात. सानापुरा गावाजवळ तुंगभद्रा ओलांडून सुमारे दीड किलोमीटर वरच्या बाजूला एक लहान धरण आहे. स्थानिक लोक याला ‘बुक्क पूल’ म्हणतात. हे कालवे तत्कालीन स्थापत्यकारांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देतात.
पाण्याची पातळी कमी असली तरी पाणी वाहून जाईल, अशी या कालव्यांची रचना होती. विजयनगरच्या १६ लहान धरणांपैकी बुक्क जलवाहिनीतूनच पाण्याचा पुरवठा एका उंचीवर असलेल्या दगडी पुलावरून केला जात होता. इतर सर्व कालवे जमिनीच्या पातळीवर होते.
हंपी येथे दगडी बांधकाम असलेल्या बुक्का पूल जलवाहिनीला पर्यटक सहसा भेट देत नाहीत. त्यामुळे सुमारे ६०० वर्षांपूर्वीच्या या प्राचीन तंत्रज्ञानाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
पुढे सोळाव्या शतकात तुलुवा साम्राज्याच्या काळात दख्खनच्या सुलतानांशी संघर्ष तीव्र होत गेला. १५६५मध्ये हंपी या राजधानीपासून १०० किमी अंतरावर असलेल्या तालिकोटाजवळ प्रसिद्ध युद्ध झाले. विजयनगर सैन्याचा मोठा पराभव झाल्यानंतर, विजयनगरचा राजा आणि दरबारी राजधानी सोडून पळून गेले. त्यांनी विजयनगरची राजधानी हंपी सलतनत0 सैनिकांच्या दयेवर सोडली गेली. त्यांनी शहराची तोडफोड केली, लाकडी संरचना जाळल्या. हंपी शहर विजयनगरच्या भव्यतेची साक्ष देणारे भग्नावशेष बनून राहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.