Shivrajyabhishek Sohala: 6 जून 1674... जेव्हा सह्याद्रीच्या कुशीत स्वाभिमानाचा यज्ञ पेटला; हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आजच्या दिवशी साडेतीनशे वर्षांचा कालावधी लोटला
Chhatrapati Shivaji Maharaj
Shivrajyabhishek SohalaDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आजच्या दिवशी साडेतीनशे वर्षांचा कालावधी लोटला, तरी या दिवसाला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भारतात ज्यावेळी मोंगल सम्राट औरंगजेबाने आपल्या पराक्रमाने आणि षडयंत्रांनी दबदबा निर्माण केला होता.

त्या प्रतिकूल कालखंडात दख्खन आणि सहयाद्रीच्या या भूमीत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून स्वाभिमानाने जगण्याचा आपल्याला हक्क आहे आणि त्यासाठी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने शत्रू पक्षाला नामोहरण करण्याची एकमेव संधी न सोडता, त्यांनी भारतीयत्वाला जागवण्याचा यज्ञ प्रज्वलित केला.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: स्वराज्यहितासाठी वज्रासारखी कठोर आणि धोरणी निर्णयक्षमता, शत्रूच्या अथांग फौजेला नमवणारा शिवरायांचा बुलंद बाणा!

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रायगड किल्ल्यावरती हा सोहळा गागाभट्ट यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आणि हिंदवी स्वराज्याचा कारभार कुशलपणे पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली करण्यात आली. महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्याभिषेकापासून महाराजांनी नव्या कालगणनेचा शिव राज्याभिषेक शकाचा प्रारंभ करून, शिवराई नाणे चलनात आणले. आदिलशाही, निजामशाही, सिद्दी, मोंगल, पोर्तुगीज, डच, इंग्रज आदी एकापेक्षा एक मातब्बरांनी घेरलेले असताना, मराठ्यांची सार्वभौम सत्ता स्थापन होणे, हे केवळ मृगजळ अशी मानसिकता निर्माण झालेली होती. त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना ही क्रांतीदर्शी घटना होती. त्यामुळे शिव राज्याभिषेकाच्या सोहळ्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान लाभलेले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: युद्धाच्या ज्वाळांतही अभय देणारा राजा, शत्रूच्या स्त्रियांना मिळालं शिवछत्रपतींचं कवच; स्त्रीत्वाची थोरवी जपणारे 'महाराज'

खरं तर१६४७ साली दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हिंमतीवर व जबाबदारीने कोंढाणा व पुरंदर किल्ले शिताफीने काबीज करून स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा केला. राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित इंग्रजी वकील हेन्री ऑक्सझेंडन यांनी महाराजांचे वर्णन करताना नमूद केलेले आहे, शिवाजीचा चेहरा सुंदर व पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने रंग गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बाकदार व जरासे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीच्या खाली टोकदार केलेली, मिशा बारीक असून मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा व जागरुकता स्पष्ट दिसतात.

छत्रपतींच्या राज्यात रामनगर, जव्हार, भिवंडी, कल्याण, चेरुल, राजपुरी, जावळी, दाभोळ, राजापूर, कुडाळ, भिवगड ,अकोले, कोकण प्रांताचा त्याचप्रमाणे पुणे, सुपे बारामती, मावळ, वाई, सातारा, कऱ्हाड ,खटाव ,माण, फलटण, मलकापूर ,पन्हाळा, तारळे, आजिरे ,जुन्नर, मुतसील गड ,कोल्हापूर, बेळगाव, संपगाव गदग, लक्ष्मेश्वर, नवलगुंद ,कोप्पळ, हल्याळ ,बेटगिरी..... आदी प्रदेश हिंदवी स्वराज्यात समाविष्ट व्हायचा.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj: सह्याद्रीचा छावा धडकला, बुऱ्हाणपूरच्या 17 पेठांत मराठ्यांचा झंझावात; शंभूराजांच्या स्वारीनं हादरली मुघल सल्तनत

शिव राज्याभिषेक ही खरंतर मध्ययुगीन भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवा प्रतिकार करत, आपल्या निर्भयी, पराक्रमी आणि त्यागी मावळ्यांच्या साथीने, त्यांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि मराठा साम्राज्याचा पाया भक्कमपणे घातला, ही बाब प्रेरणादायी अशीच होती. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याने, त्यांच्या सभोवताली असलेल्या आदिलशाही, मोंगलांना झणझणीत चपराक बसली.

गोव्यातल्या जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देस आणि मुरगावसह सासष्टी हे महाल पोर्तुगीजांच्या अपरिमित अत्याचाराबरोबर धर्म समीक्षणाची शिकार झालेले असताना, त्यानंतर नव्या काबिजादीवर शिवशाहीचा ध्वज फडकत असल्याने, पोर्तुगिजांवर धार्मिक व सांस्कृतिक छळवादावर निर्बंध घालण्याची पाळी आली. महाराजांनी स्वराज्य विस्तार जेव्हा कोकणात केला, तेव्हाच त्यांनी सत्तरी, डिचोली, पेडणे, फोंडा, केपे, सांगे व काणकोण महालांवर सत्तेची पकड घट्ट केली.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: गनिमी काव्याचा विळखा अन् सह्याद्रीचा सखा, शिवबांनी डोंगरांना कसं बनवलं आपलं लष्करी शस्त्र?

राज्याभिषेकापूर्वी त्यांनी जेव्हा डिचोलीत प्रवेश केला, तेव्हा हिंदोळे म्हणजे आताच्या नार्वेत विकल स्थितीत कदंबांचे राजदैवत सप्तकोटीश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आणि त्यानुसार १६६८ साली कामाला प्रारंभ केल्याच्या संदर्भातला शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवला.

तेव्हा पोर्तुगीज सत्तेसमोर महाराजांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. मैत्रिपूर्ण संबंध राखण्यात शिवाजी महाराज आणि तत्कालीन पोर्तुगीज राज्यकर्ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत असले तरी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयीच्या आत्मीयतेची जाणीव माहीत होती, त्यामुळे धर्म समीक्षणाच्या वावटळीवर निर्बंध घालण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.

Chhatrapati Shivaji Maharaj
Sada Shivaji Maharaj Statue: सडा येथे शिवप्रेमींकडून सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ, शिवपुतळा न हलवण्याची मागणी

राज्याभिषेकानंतर महाराजांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला होता आणि जेव्हा महाराजांचे वास्तव्य डिचोलीत होते, तेव्हा पोर्तुगीजांचा वकील रामोजी कोठारी याला विसरईने २४ नोव्हेंबर १६६७ रोजी डिचोलीत बोलणी करण्यास पाठवला होता. १६६८ साली सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांनी केल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. परंतु तत्पूर्वी १६३६ च्या कागदपत्रात मये आगर दानपत्रात वेदमूर्ती केसभट वाळुवे यांचा उल्लेख असून, १९ नोव्हेंबर, १६६८ रोजी केसभटाचा पुत्र पुरुषोतम भट यांना कुडाळ जवळील चेंदवण गाव दान दिल्याचा संदर्भ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी ज्या वेदोभ्यास आणि हिंदू धर्म ग्रंथांचा व्यासंग असणाऱ्या ब्राह्मणांना निमंत्रित केले होते, त्यात पुरुषोत्तम भट वाळवे, एक होते, याचा उल्लेख डॉ. अ. रा. कुलकर्णी आणि अन्य इतिहासकारांनी केलेला आहे. परंतु वेदमूर्ती पुरुषोत्तम भट वाळवे यांच्या संदर्भातील पत्रावर छत्रपती शिवरायांचा शिक्कामोर्तब नसून, मर्यादामुद्राही नाही, त्यामुळे इतिहास अभ्यासक गजानन मेंहदळे यांनी वाळवे कुटुंबीयांकडे असणारे पत्र छत्रपती राजाराम यांचे पुत्र शिवाजी (द्वितीय) यांचे असल्याचे नमूद केलेले आहे. १६७५ साली त्यांनी फोंड्याच्या किल्ल्यावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com