Operation Sindhur Video: भारतीय लष्कराने गुरुवारी (15 जानेवारी) 'सेना दिना'च्या (Army Day) निमित्ताने एक अत्यंत प्रभावी आणि अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ जारी केला. गेल्या वर्षी मे 2025 मध्ये राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची थरारक दृश्ये या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आली आहेत. यामध्ये भारतीय लष्कराने सीमा पार दहशतवादी तळांना कसे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाचे एअरबेस आणि रडार यंत्रणा कशी निकामी केली, याचे सविस्तर चित्रण करण्यात आले.
तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक पद्धतीने होते. यामध्ये 2001 मधील संसदेवरील हल्ला, 2002 मधील अक्षरधाम मंदिर, 2008 चा मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला, 2016 चा उरी, 2019 चा पुलवामा आणि सर्वात अलीकडचा म्हणजे एप्रिल 2025 मधील 'पहलगाम' येथील हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने या सर्व घटनांना 'मानवतेवरील हल्ले' असे संबोधले असून ऑपरेशन सिंदूर हा या सर्व अत्याचारांना दिलेला ठोस प्रतिसाद असल्याचे व्हिडिओत स्पष्ट होते.
व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, 7 मे 2025 च्या रात्री भारतीय लष्कराने एकाच वेळी नऊ वेगवेगळ्या दहशतवादी (Terrorists) तळांवर समन्वित हल्ले चढवले. उपग्रहाद्वारे मिळवलेली छायाचित्रे आणि ड्रोन फुटेजमध्ये दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहेत. पाकिस्तानचे नाव न घेता व्हिडिओमध्ये सीमाभागातील त्यांच्या गोळीबारानंतरची विदारक परिस्थितीही दाखवण्यात आली आहे. भारताने केवळ बचावात्मक पवित्रा न घेता, पाकचे ड्रोन पाडून आणि त्यांच्या लष्करी चौक्यांना टार्गेट करुन चोख प्रत्युत्तर दिले होते.
व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सीमा पार असलेल्या पाकिस्तानच्या 'एअर डिफेन्स रडार' आणि 'एअरबेस'वरील हल्ल्यांची दृश्ये. जेव्हा पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय लष्कराने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे, तर त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकच्या लष्करी पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकच्या रडार यंत्रणा कशा उद्ध्वस्त केल्या, हे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी शत्रूंना एक कडक इशारा देण्यात आला आहे: "आमच्या शत्रूंसाठी ही एक चेतावणी आहे. त्यांना त्यांच्या भ्याडपणाची किंमत मोजावीच लागेल."
ऑपरेशन सिंदूरची ठिणगी एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे पडली होती. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना थांबवून, त्यांचे धर्म विचारुन 26 निष्पाप लोकांची हत्या केली होती. केंद्र सरकारने याला "धार्मिक हिंसाचार भडकावण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न" म्हटले होते. या भ्याड कृत्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीचे मोठे नुकसान झाले. आज जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि दहशतवादाविरुद्धचे 'झिरो टॉलरन्स' धोरण पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.