

खांडोळा: माशेल येथील गोवा बागायतदार बाजार संकुल आणि कदंबा बसस्थानकासमोरील जंक्शनवरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असतानाही संबंधित विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गोवा बागायतदार बाजार संकुलात येणारे व्यापारी व ग्राहक तसेच कदंबा बसस्थानकाचा वापर करणारे प्रवासी याच रस्त्यावरून ये-जा करतात. परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे पावसात वाहने चालविणे दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट निर्माण होता आहे.
जलवाहिनीसाठी खोदकाम
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना योग्य दर्जाचे काम झाले नसल्याने सुमारे एक फूट रुंदीचा चर निर्माण झाला. त्याच्या कडेला खड्डे पडले असून सततच्या पावसामुळे हे खड्डे अधिकच मोठे झाले आहेत. रस्त्याची डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.