Vijayadashami 2022 Dainik Gomantak
ब्लॉग

Vijayadashami 2022: विजयादशमीला पौराणिक संदर्भ आहेतच; पण हवं विचारांचं सीमोल्लंघन!

दैनिक गोमन्तक

Vijayadashami 2022: विजयादशमीला पौराणिक संदर्भ आहेतच. पण आपणही काही चांगले संदर्भ लावू शकतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आपणही आपल्या मनातील, कृतीतील वाईट गोष्टीवर मात करून विजय मिळवला पाहिजे. आपल्या मनातील रक्तबीजरूपी वासना, द्वेष, मत्सर असुरांना नामोहरम केले पाहिजे. मनाचे सीमोल्लंघन केले पाहिजे. म्हणजे हा विजयोत्सव आणखीनच वैशिष्टयपूर्ण ठरेल.

जिथे भगवान कृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्थात अर्जुन आहे, तेथे विजय, लक्ष्मी, कल्याण आणि शाश्वत नीती आहे, असे महर्षी व्यास यांनी गीतेच्या अंतिम श्लोकात म्हटले आहे. योगेश्वर कृष्ण म्हणजे ईश्वर कृपा आणि धनुर्धर अर्जुन म्हणजे मानवी प्रयत्न. या दोघांचा जेथे सुयोग होतो, तेथे कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही.

माणसाचे सकारात्मक प्रयत्न आणि ईश्वर कृपा जेथे एकत्र येतात तेथे विजयाचा शंखनाद नेहमीच ऐकायला येईल, हे निर्विवाद सत्य आहे. दसरा हा उत्सव शक्ती आणि शक्तीचे महत्त्व सांगणारा उत्सव- नवरात्रीच्या नऊ दिवसात जगदंबेची उपासना करून श़क्तिशाली बनलेला माणूस विजयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल. हे अगदी स्वाभाविक आहे. या दृष्टीने बघितले तर दसऱ्याचा उत्सव विजयासाठी प्रस्थान करण्याचा उत्सव आहे, हे समजते.

भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाजातील तमाम घटकांमध्ये विरता प्रकट होण्यासाठी दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. युद्ध जर अनिवार्य असेल तर शत्रूच्या आक्रमणाची वाट न बघता त्यांच्यावर आक्रमण करून त्याचा पराभव करणे हीच कुशल राजनीती आहे.

शत्रू आपल्या राज्यात घुसून, लूट केल्यानंतर लढाई करण्याची तयारी करणारे आमचे पूर्वज नव्हते. तर शत्रूचा दुष्ट व्यवहार समजूनच त्याच्यावर आक्रमण करत असत. रोग आणि शत्रूला निर्माण झाल्याझाल्याच नष्ट करायला पाहिजे. अन्यथा त्यांचे प्राबल्य वाढते.

दसरा म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणूनच या दिवसाला विजयादशमीदेखील म्हणतात. प्रभुरामचंद्रांच्या काळापासून दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्रांनी रावणाचा नाश याच दिवशी केला होता. म्हणून आजही या दिवशी प्रतिकात्मक रूपाने रावणदहन करतात. इतिहासात या दिवशी विजय -प्रस्थान करण्याची अनेक उदाहरणे सापडतात. या उत्सावामागे काही नैसर्गिक ऋतुमानांचेही संदर्भ आहेत.

दसऱ्याच्या वेळी वर्षाऋतु येऊन गेलेला असतो. वरुण देवाच्या कृपेने मानव अन्नधान्याने समृद्ध झालेला असतो. त्याचे मन आनंदाने भरलेले असते. नसानसात उत्साहाचे कारंजे उडत असल्यामुळे विजय-प्रस्थान करण्याचे त्याचे मन होणारच. या दिवसात पाऊस गेलेला असतो. चिखलाने माखलेले रस्ते सुकलेले असतात.

हवामान अनुकूल असते. आकाश स्वच्छ असते. असे वातावरण विजयाला पूरक असते. शिवाय नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्रयत्न केलेली शक्तीदेखील शत्रूचा संहार करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून यादिवशी विजयासाठी अर्थात चांगल्या कामाची सुरुवात करण्याची पद्धत आहे.

देवी जगदंबेने सतत नऊ दिवस युध्द करून चंड-मुंड, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांचा वध केला होता. तिच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दसरा साजरा केला जातो. तसेच पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर येउन आपली लपविलेली शस्त्रे शमीच्या झाडावरून याच दिवशी बाहेर काढली होती. म्हणून या दिवशी सीमोल्लंघन करतात आणि येताना आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना वाटतात.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्टीला सन्मान दिला जातो आणि त्यांचे पूजनही केले जाते. यामध्ये वृक्ष -वनस्पतीसुध्दा सामील आहेत. चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला कडुनिंबाची पूजा केली जाते. वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. सोमवती आमावस्येला तुळशीची पूजा केली जाते.

भाद्रपद महिऩ्यात येणाऱ्या कुशग्रहिणी आमावस्येला कुशाची पूजा केली जाते आणि कार्तिक महिन्यात नवमीला आवळे नवमी म्हणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. त्या-त्या वनस्पतीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व जाणून त्याचे पूजन केले जाते. जेणेकरून मानव या उपयुक्त वृक्षांचे संवर्धन करेल.

दसऱ्याला आपट्याची पाने देण्यामागे विजय आणि उल्हासाची भावना असते. तसेच समृध्दीची कामनाही केली जाते. याच दिवशी काही भागात अपराजिता (विष्णुकांता) या वनस्पतीचेही पूजन केले जाते. ही वनस्पती विष्णुला प्रिय आहे. या धार्मिक संदर्भाबरोबर तिचे काही वैद्यकीय गुणधर्म आहेत. ती अतिशय आरोग्यदायी आहे.

कफविकारांवर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. विजया-दशमीला दुर्गापूजन, अपराजिता पूजन, नवरात्रीचे पारणे इत्यादी विधी केले जातात. भारतात कुलु, म्हैसूर येथील दसरासुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि राजेशाही असतो. संपूर्ण देशभर दसरा विजयोत्सव म्हणूनच साजरा केला जातो.

सीमोल्लंघन म्हणजे मनातील राग, लोभ, मत्सर, द्वेष, अंधश्रद्धा, सूड या वाईट भावना दूर करून मनाचं, विचारांचं एक प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवशी आपल्यातील चांगल्या गुणांना उजाळा द्यायचा असतो. समाजात वावरताना असंख्य वाईट प्रवृत्ती आपल्या भोवताली दिसत असतात.

त्यांना पाहून हे जग वाईटच आहे का अशी पुसट शंकाही मनात येते. पण या नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक विचारांची पेरणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे आत्मविश्वास तर दृढ होईलच, पण तेच खऱ्या अर्थाने विचारांचं सीमोल्लंघन ठरेल. आपल्याला स्वतःबद्दल वाटणाऱ्या मर्यादांच्या सीमा ओलांडून कर्तृत्त्वाच्या कक्षा रुंदावणे हेही सीमोल्लंघन नाही का होऊ शकत?

राम, कृष्ण, पांडव, जगदंबा ही सारी पुण्याईची प्रतिकं नसून ती आत्मसात करण्यासाठी समोर ठेवलेली प्रमाणं आहेत. या प्रमाण मार्गावरून मार्गक्रमण केल्यास विजय निश्चित आहे. हाच संदेश या पौराणिक कथांमधून मिळत असतो. म्हणूनच या विजयादशमीला जुन्या, बुरसटलेल्या विचारांना मागे सारून त्यांच्या कोशातून बाहेर पडून वैचारिक सीमोल्लंघन करून नवे विचार धारण करुया!

वाईट गोष्टीवर मात करीत 'विजय'

विजयादशमीला पौराणिक संदर्भ आहेतच. पण आपणही काही चांगले संदर्भ लावू शकतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आपणही आपल्या मनातील, कृतीतील वाईट गोष्टीवर मात करून विजय मिळवला पाहिजे. आपल्या मनातील रक्तबीजरुपी वासना, द्वेष, मत्सर या असुरांना नामोहरम केले पाहीजे. मनाचे सिमोल्लंघन केले पाहिजे. ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ असं म्हटलं जातं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT