
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. दोना पावला परिसरातील उद्योजक धेंपो यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचे आरोपी अजूनही सापडलेले नाहीत. पोलिसांनी विदेशातील टोळी या चोरीमागे असल्याचा प्राथमिक मजबूत निष्कर्ष काढून प्रकरण अद्यापि तपासाच्या चौकटीत अडकवून ठेवले आहे. पोलिसांना या दरोड्यातील आरोपी अजिबात सापडत नाहीत, हे पोलिसांचे उघड अपयश मानावे लागेल. एका बाजूला सरकार चोरीच्या घटना कमी झाल्याचे सांगत आहेत. परंतु काही प्रकरणेच नोंदली जात नाहीत असेच दिसते. विशेष बाब म्हणजे काँग्रेस पक्षानेही असाच आरोप केला आहे. कदंब पठरावरील गेरा कॉम्प्लेक्समधील एका बंगल्यामध्ये ८ लाखांची चोरी झाली आहे, परंतु त्या चोरीची कुठेच नोंद झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी हा चोरीचा प्रकार दडपलाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ∙∙∙
गोवा विधानसभेत हमरीतुमरीवर येणारे नेते बाहेर हातात हात घालून कसे खिदळतात, त्याचे छायाचित्र आम्ही गेल्या वर्षी छापले होते. अधिवेशनाचा आढावा घेणारा एक भाजप नेता सांगत होता, या अधिवेशनातही कोणामध्येच गांभीर्य दिसत नाही. मंत्र्यांना प्रश्न विचारताना विरोधी सदस्य ‘आपला मित्र’ असा मंत्र्यांचा उल्लेख करतात व लुटुपुटुची लढाई खेळतात. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार, एका मंत्र्याने पर्वरीतील एका मित्राच्या बंगल्यावर गेल्या बुधवारी पार्टी दिली, तिला मंत्री तर होतेच, शिवाय अनेक विरोधी सदस्यही उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी रंगली होती व चविष्ट ड्रिंक्ससह रूचकर मासळीवर सगळे ताव मारत होते. दुसऱ्या दिवशी ‘गटारी’ असल्याने असेल कदाचित - उद्या अधिवेशन आहे - याचा विसर पडून सारे सदस्य रंगात आले होते. ∙∙∙
राजभवनातील नवे दरबार सभागृह. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचा शपथविधी होतो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सारे मंचाकडे वळतात. एवढ्यात मंचाच्या एका बाजूला असलेले दाक्षिणात्य पेहरावातील काही व्यक्ती मंचावर जाऊ पाहतात. गोव्यातील मंत्री आमदारांना आधी जाऊ द्या, तेथे असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचा निर्णय. त्यावेळी ते थोडे भांबावतात. त्यातील एक तर केंद्रीय मंत्री असतो. तेथील एकाने येथे असलेले सारेच मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष वैगेरे आहेत, असे थोड्या चढ्या आवाजात सांगताच. तो आवाज मंचावर पोचला आणि त्या व्यक्तींचा मंचावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे मंत्र्यांना ओळखणारे तेथे का तैनात केले नव्हते, अशी चर्चा मात्र उपस्थितांत होती. ∙∙∙
आतापर्यंत गाेव्यातील तियात्र गोव्याबाहेर मुंबई पुरताच मर्यादित होता. मात्र आता या तियात्राने गुजरातही पादक्रांत केले आहे. आणि त्यामुळे गोव्याच्या तियात्राच्या शिरपेचात आणखी एक़ मानाचा तुरा खोवला गेला आहे. गोव्याच्या यंदाच्या तियात्र स्पर्धेत पहिला पुरस्कार प्राप्त झालेला फा. मिल्टन रॉड्रीगीस यांच्या ‘डॅडीज होम’ या तियात्राचा रौप्य महाेत्सवी प्रयोग नुकताच अहमदाबाद येथे साजरा झाला. गुजरातातही काही गोवेकर वास्तव्य करुन आहेत. या गोवेकरांनी या तियात्राचा आनंद घेतलाच. त्याशिवाय जवळच्या राज्यातील कोंकणी भाषिक लोकही या तियात्राला आले होते. तियात्र अकादमीच्या आर्थिक सहाय्याने गुजरात दौऱ्यावर गेेलेल्या या तियात्राने खरोखरच आपला डंका वाजवला, असे म्हणावे लागेल. ∙∙∙
बेती ही फेरीबोट चोडण फेरी धक्क्यावर का बुडाली याचे कारण सरकार दडवू पाहत आहे हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी नांगरून ठेवलेल्या फेरीबोटीत पावसाचे पाणी शिरले. ते टाक्यांत साठले गेले आणि वजनाने फेरीबोट पाण्यात बुडाली. त्यावेळी फेरीबोटीत कर्मचारी होते. भरती ओहोटीचा वेळ पाहून धक्क्यावर बांधलेला दोरखंड सैल, घट्ट करण्याची जबाबदारी त्यांची होती. ती पार न पाडल्याने फेरीबोट बुडाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर लाखो रुपये खर्च करून खासगी कंपन्यांच्या मदतीने फेरीबोट बाहेर काढण्यात आली. आता तर खासगी कंपनीचे कर्मचारी सरकारी यंत्रणेला मदत करत होते असे सांगण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे फेरीबोट बुडण्यास जबाबदार कोण, हे गुलदस्त्यातच राहिले आहे. ∙∙∙
गतवर्षी राज्यातील खराब झालेल्या रस्त्याचा विषय बराच गाजला होता. त्यावेळी पावसातही रस्त्याची कामे केली गेल्याने सरकारवर चोहोबाजूने टीका होत होती. त्यामुळे सरकारने हा विषय गंभीरतेने घेत राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी निश्चित केली होती. २७ सप्टेंबर २०२४ रोजी २७ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे जाहीर केले होते. या कंत्राटदारांना दोनदा कारणे दाखवा नोटिसा दिल्या होत्या म्हणे. परंतु काँग्रेसच्या आमदारांनी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम खात्याविषयी प्रश्न विचारला, त्यावर खात्याकडून लेखी उत्तर दिले गेले आहे. विशेष बाब म्हणजे आमदारांनी मागील तीन वर्षांत साबांखाने खात्याने खराब कामामुळे किती कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले आहे, असे विचारले. या प्रश्नावर मात्र खात्याने दिलेले उत्तर सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारे आहे. म्हणे की एकही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले नाही. त्यामुळेच गतवर्षी २७ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे केलेली जाहीर घोषणा ही घोषणाच होती की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ∙∙∙
सर्वसामान्य नागरिकांना शिस्तीचे धडे देण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांमध्येच सध्या बेशिस्तपणा वाढत चालल्याचे त्यांच्या परक्रमावरून दिसत आहे! अलीकडे काही मुजोर अन् बेशिस्त पोलिसांमुळे पोलिस खात्यावर शरमेने मान खाली घालण्याची वेळ वारंवार ओढवत आहे. नुकताच पणजीत एका पबबाहेर दोघा पोलिसांनी महिला सुरक्षा रक्षकासोबत असभ्य वर्तन केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, सध्या पोलीस ठाण्यातील प्रमुखांनी आपल्या अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा शिस्तीची आठवण करून दिली आहे. आता किती पोलिसांनी यांनी आपल्या प्रमुखांच्या शिस्तीच्या सांगण्याकडे कान देऊन ऐकले आणि किती जणांनी नाही, हे भविष्यात दिसेल. कारण अलीकडे पोलिस प्रमुखांच्या आदेशापेक्षा राजकीय तगादा लावून किंवा फोन करून आपल्याला हवी तशी ड्युटी करण्यात धन्यता मानत आहेत, हे देखील तितकेच महत्त्वाचे ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.