Dussehra 2021: गोव्यातील शस्त्रपूजनाची अनोखी परंपरा

आज गोव्यात ज्या परंपरा शस्‍त्रांसंदर्भात (Dussehra 2021) रूढ आहेत त्यातून इथल्या लोकमानसातल्या क्षात्रधर्माच्या मूल्यांचे दर्शन घडते.
Dussehra 2021: Unique tradition of arms worship in Goa
Dussehra 2021: Unique tradition of arms worship in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अश्‍मयुगीन आदिमानवाचे वास्तव्य जेव्हा या पृथ्वीतलावर होते, तेव्हा त्याच्या भोवताली महाकाय आणि भयानक प्राण्यांचा वावर होता. त्यांच्यापासून आत्मसंरक्षण करण्यासाठी आदिमानव दगडांचा वापर करू लागला. गारगोटीसारख्या कठीण दगडाचा पुराश्‍मयुगात परशुसारख्या आयुधाची निर्मिती करण्यात यश मिळवले. या आयुधाद्वारे जंगली श्‍वापदांना मारणे आणि जमिनीतील कंदमुळे उकरणे सुलभ झाले. दगडाचे तुकडे पाडून व ते एकमेकांवर घासून त्याने ओबडधोबड हत्यारे तयार केली. त्यामुळे प्राण्यांची शिकार करणे शक्य झाले. आपल्या परिसरात असणाऱ्या सावजावर दुरून प्रहार करता यावा म्हणून या दगडी आयुधांना दांडा लावला.

दगडी बाणाच्या टोकाचा आणि धनुष्याचा वापर तो करू लागला. शिकारीवेळी येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवानुसार त्याने भलालमुख, पाते, शरमुख, ऋकच, घर्षणी, तासणी, छेदक, दाभण सारख्या शस्त्रांची निर्मिती केली. मध्याश्‍मयुगात हिमवर्षाव कमी झाल्यावरती त्याने जनावरांच्या हाडांपासून शस्त्रे तयार केली. भारतात नद्यांच्या खोऱ्यात गारगोटी व पाषाणाचे परशु अनेक ठिकाणी सापडले आहेत. ते बदामी आकाराचे, धारदार; पण ओबडधोबड आहेत. मध्य-पुराश्‍मयुगातील आयुधे आकाराने लहान, घडणीचे तंत्र वेगळे व दगड चांगल्या पोताचा होता. नवाश्‍मयुगातील दगडी हत्यारे घोटून गुळगुळीत व धारदार होती. दगडी आयुधानंतर जंगली श्‍वापदांच्या हाडापासून तर ताम्रयुगात धातूपासून शस्‍त्रे निर्माण झाली.

Dussehra 2021: Unique tradition of arms worship in Goa
गोव्यातील तरुण वर्ग नरकासुर बांधण्यात मग्न

प्राचीन काळी तिक्ष्ण आणि घाव घातल्यावर छेद किंवा जखम करणाऱ्या व मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आयुधाला शस्त्र ही संज्ञा लाभली आणि अशा शस्त्राचा वापर माणूस वेगवेगळ्या कारणांसाठी करू लागला. पशुप्रमाणे जीवन जगणाऱ्या आदिमानवाने हात, पाय, दात व नखे यांचाच उपयोग प्रारंभी मारामारीसाठी, आत्मसंरक्षणासाठी किंवा कंदमुळे उकरून काढण्यात केला होता. त्यानंतर दगड, हाडे, लाकडे, झाडेझुडपे यांचा उपयोग करू लागला. परशु, कुऱ्हाडीसारख्या आयुधांचा वापर करणारा माणूस दगड दुरून शत्रूवर किंवा पशुपक्ष्यांवरती फेकता यावे म्हणून कल्पकतेने गोफण तयार केली. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत परशु, भाले , खंजीर, तलवारी, गोफणी, धनुष्यबाण, गदा आदी आयुधे सापडली असून, त्यात परशु व गदा ही आयुधे दगडाची तर अन्य शस्त्रे तांबे किंवा कांस्य या धातूंंपासून तयार केली होती. वैदिक संस्कृतीत लोखंडाच्या आयुधांचा वापर होत असे. त्यात पट्टा, भाला, सुरी, कोयता, धनुष्य, त्रिशुल, गदा, खडग आदी आयुधांचा उपयोग केला जायचा.

सांगे, धारबांदोडा आणि सह्याद्रीच्या परिसरात जेव्हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी संशोधन आरंभले तेव्हा त्यांना येथील आदिमानव वेगवेगळ्या कारणासाठी दगडापासून तयार केलेल्या आयुधांचा उपयोग करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सत्तरीतील रिवे येथे अश्‍मयुगीन मानव कुमेरीसारख्या शेतीच्‍या पध्दतीत दगडी हातकुऱ्हाडींचा उपयोग करत असल्याचे उघडकीस आलेले आहे. सांगे तालुक्यातल्या रिवणजवळच्या धांदोळेत कुशावती नदी किनाऱ्यावरच्या जांभ्या दगडावरती जी जंगली श्‍वापदांची चित्रे कोरलेली आहेत, त्यांच्या शरीरावरती ज्या खुणा आढळलेल्या आहेत, त्यावरून त्यांची दगडी हत्यारांच्या आधारे शिकार केल्याचा निष्कर्ष पुरात्त्वशास्त्रज्ञांनी काढलेला आहे. शिकारीसाठी त्या काळी उपयोग केल्या जाणाऱ्या हत्यारांची प्रस्तर चित्रे फणसायमळ येथे आढळलेली आहे.

सत्तरीतील म्हाऊस गावातल्या रवळनाथ मंदिराशेजारी झर्मे नदी पात्रात जी प्रस्तर चित्रे आढळलेली आहेत, त्यांच्या एकंदर स्वरूपावरून तत्कालीन आदिमानवाने टोकदार आणि तीक्ष अशा दगडी आयुधांचा वापर केले असल्याचे स्पष्ट होते. आज गोव्याच्या विविध भागात ज्या देव-देवतांच्या पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत, त्या प्रामुख्याने शस्त्रसज्ज अवस्‍थेत आहेत. युध्दाच्या वेळी मस्तकाचे रक्षण करण्यासाठी धातूचा किंवा अन्य पदार्थांपासून तयार केलेल्या शिरस्त्राणाचा वापर व्हायचा आणि छाती, दंड, हात, पाय यांच्यासाठी वेगवेगळी कवचे वापरली जायची. शरीराचे रक्षण करण्यास चिलखताचा उपयोग व्हायचा हे इथे आढळलेल्या पाषाणी मूर्ती वरून स्पष्ट झालेले आहे.

Dussehra 2021: Unique tradition of arms worship in Goa
फिटो अंधाराचे जाळे

गोव्यातल्या शिल्पकलेत गणपती, रवळनाथ, भैरव, वेताळ, सूर्य, विष्णू, सप्तमातृका त्याचप्रमाणे रिपुसंहारक दुर्गेच्या ज्या मूर्ती आढळलेल्या आहेत त्यात विभिन्न प्रकारांची, विभिन्न आकाराची शस्‍त्रे पाहायला मिळतात. भाला, तलवार, धनुष्यबाण, खंजीर, ढाल, त्रिशूल, परशु, खड्ग, गदा, चक्र आदी आयुधांप्रमाणे मुसळ, अंकुश, पारा आदींचा शस्त्र म्हणून वापर केल्याचे स्पष्ट झालेले आहे. मध्‍ययुगात गोव्यात प्रामुख्याने जी शस्त्रे उपयोगात होती. आणि युध्दात परिणामकारक ठरायची त्यांचा कल्पकतेने वापर शिल्पकारांनी आपण ज्या मूर्ती कोरल्या त्यात केलेला आहे. त्यामुळे आराध्य दैवतांचे पूजन करताना त्याने हाती धारण केलेल्या शस्त्रांची पूजा गंधफुल, कुंकूम अर्पण केली जायची. महिषासुर दैत्याचा अंतकरणासाठी दुर्गेने धारदार खड्गाचा उपयोग करताना त्याचे वार चुकवण्यासाठी खेटक म्हणजे ढालीचा वापर केला होता. गोव्यात सातेरी, भूमिका, माऊली, शांतादुर्गा त्याचप्रमाणे विठ्ठलादेवी म्हणून ज्या पाषाणी मूर्ती पूजल्या जातात. त्यांना मूर्तीकाराने महिषासुरमर्दिनीच्या संहारक रूपात कोरलेली आहे. तिच्या हाती खड्ग, खेटक, मुसळ, त्रिशुल आदी शस्त्रे दर्शविलेली आहेत. त्यामुळे देवीसमवेत तिच्या विभिन्न शस्त्रांच्या पूजनाला प्राधान्य दिले जाते.

मान्सूनच्या पावसानंतर येणाऱ्या आश्‍विनात जुन्या काळी राजेसरदार आपल्या राज्याच्या विस्तार आणि संरक्षण करण्यासाठी कैक युध्दाचा मोहिमा हाती घेत. पावसाने घरात वास्‍तव्यास असल्याने आलेली मरगळ, नैराश्‍य, झटकून टाकण्यासाठी नवरात्रौत्सवानंतर येणाऱ्या विजयादशमीच्या पूर्वदिनी त्याचप्रमाणे नवमी म्हणजे खड्ग नवमीला शस्त्रपूजन करून वीररस जागृत करायचे. विजयादशमीला ढोल-ताशांच्या गजरात दैवतांची प्रतीके तरंगोत्सवात सीमोल्लंघनास सिध्द व्हायची. पूर्वी राजे, सरदार व सैनिक या दिवशी किंवा एक दिवस अगोदर खंडेनवमीला आपापल्या युध्दात उपयोगात आणल्या जाणाऱ्या समस्त आयुधांची पूजा करीत असे. शत्रूविरुद्ध लढल्या जाणाऱ्या युध्दात यश लाभावे म्हणून भारतीय लोकमानसाने दैवी अधिष्ठान महत्त्वाचे मानलेले आहे. आणि त्यासाठी विजयादशमीला शस्त्रपूजनाच्या परंपरेला प्राधान्य दिले होते.

खंडे नवमीला गोव्यातल्या पूर्वाश्रमीच्या राजेसरदार यांच्या घरी असलेल्या तलवारी, ढाली, बंदुका, तोफा आदी शस्त्रे पूजेला लावतात. आपले पूर्वज जी शस्‍त्रे घेऊन युध्दे लढले त्यांचे जतन इतिहासाचा समृध्द वारसा म्हणून त्यांच्या वारसदारांनी आत्मीयतेनं आणि अभिमानाने केलेले असून खंडे नवमी किंवा दसऱ्याला त्यांचे गंधपुष्पे अर्पण करून पूजन परंपरेने केले जाते. गोव्यात काही ठिकाणी धारदार शस्त्रांनी एखाद्या प्राण्याचा बळी लोकदैवताला दिला जातो तर काहीजण प्रतिकात्मक बलिदानासाठी यादिवशी कोहळा कापतात. सांगेतील हाणपेट विधी फाल्‍गुन पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लोकवाद्यांवरती संपन्न होतो. त्यावेळी व्रतस्थ गडा शस्त्राने आपल्या शरीरावरती प्रतिकात्मक हाणून घेतो. आज गोव्यात ज्या परंपरा शस्‍त्रांसंदर्भात रूढ आहेत त्यातून इथल्या लोकमानसातल्या क्षात्रधर्माच्या मूल्यांचे दर्शन घडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com