Goa Water Bill Hike : राज्यात अनेक तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची असताना सरकारने केलेली 5 टक्के पाणी दरवाढ सर्वसामान्यांवर बोजा आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. ही दरवाढ येत्या 15 दिवसांत मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
गोवा फॉरवर्डचे नेते संतोष सावंत म्हणाले, पाणी दरवाढीच्या निषेधार्थ गोवा फॉरवर्ड पक्षाचे अनेक कार्यकर्ते विरोध करणार होते. परंतु सार्वजनिक बांधकाम मुख्यालयात अधिक जणांना येण्यास प्रवेशबंदी असल्याने तीन सदस्यीय शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.
1 ऑक्टोबरपासून ही पाणी दरवाढ लागू होणार आहे. भाजपने निवडणुकीवेळी निवडणूक जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबीयांना 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनपर्यंत काही जणांना ते सुद्धा मिळत नाही. ही वाढलेली बिले गरिबांना भरणे कठीण होणार आहे. 24 तास पाणीपुरवठा देण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. चोडणमध्ये आठवड्यातून 3 ते 4 दिवस 2 तास पाणी येते. मयेतील पाण्याची पाईपलाईन बदलण्यात आलेली नाही, त्यामुळे अमर्यादित पाणीपुरवठा होता. या सरकारने ही दरवाढ करून गरिबांना झटका दिला आहे, असे ते म्हणाले. या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये संतोष सावंत, विकास भगत व ऋणाल केरकर यांचा समावेश होता.
फक्त घोषणाबाजी
सरकारने यापूर्वी वर्षाला तीन मोफत सिलिंडर व 16 हजार लीटर पाणी देण्याची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली होती. त्यानंतर हे सिलिंडर फक्त दारिद्र रेषेखालील लोकांना मिळतील, असे स्पष्ट केले गेले. मात्र अजूनही त्यांच्या योजनांचा थांगपत्ता नाही, फक्त घोषणाबाजी केली जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात 100 टक्के ‘हर घर जल’ योजना पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र घेऊन लोकांची धूळफेक केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.