Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
ब्लॉग

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेची आश्‍वासक उब

दैनिक गोमन्तक

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या ‘नफरत छोडो; भारत जोडो!’ यात्रेची सांगता काश्मिरात यशस्वीरीत्या झाली, हे यश लहानसहान नाही. गेल्या कित्येक वर्षांत एखाद्या राजकीय नेत्याने एवढी प्रदीर्घ यात्रा काढून असा देशव्यापी लोकसंपर्क साधला नव्हता, हा तर या यशाचा भाग आहेच; परंतु त्यातून जो विचार पुढे आणण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला,

त्याचे महत्त्व सध्याच्या काळात विशेष आहे. या यात्रेची सांगता महात्मा गांधी यांच्या 75व्या पुण्यतिथीस झाली, यालाही एक विशेष औचित्य होते. महात्माजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी अथक परिश्रम केले. सहिष्णुता, सामंजस्य, सलोख्याचा विचार ते मांडत होते. अलीकडच्या काळात सलोख्यालाच छेद जाईल, अशी ध्रुवीकरणाची राजनीती जोर धरताना दिसते आहे.

या पार्श्वभूमीवर सलोख्याच्या, सहमतीच्या राजकारणाला पुनश्च एकवार चालना द्यायला हवी, असे अनेकांना वाटत होते. राहुल गांधींच्या यात्रेने अशांना एक उमेद आणि दिलासा नक्कीच दिला आहे.

श्रीनगर येथे होत असलेल्या हिमवर्षावाची पर्वा न करता राहुल यांनी ‘शेर-ए-काश्मीर’ स्टेडियममध्ये केलेल्या छोटेखानी भाषणात एकीकडे भावनिकता आणि संवेदनशीलता होती, तर त्याचवेळी भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे दोन बडे नेते -नरेंद्र मोदी आणि अमित शहा- यांना थेट आव्हान देण्याची भाषाही होती.

काश्मीरला स्वायत्तता देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यापासून धरतीवरील नंदनवनात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा भाजप आणि विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत आहेत.

त्याच शहा यांनी ‘काश्मीरमध्ये येऊन जम्मू ते श्रीनगर अशी पदयात्रा काढून दाखवावी!’ असे जाहीर आव्हान राहुल यांनी दिले आहे. हे आव्हान शहा यांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी राहुल यांनी दिलेले नाही.

तर कलम 370 रद्द केल्यानंतरही तेथे ‘टार्गेट किलिंग’चे प्रकार कसे सुरू आहेत आणि त्यामुळे काश्मीरच्या खोऱ्यातील जनतेच्या मनात कशी आग धुमसत आहे, ते प्रत्यक्ष येऊन बघण्यासाठी दिलेले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर रविवारी बोलताना राहुल गांधी यांनी हे आव्हान दिले आणि ‘हे आव्हान शहा स्वीकारणार नाहीत; कारण ते घाबरत आहेत’, असा टोलाही त्यांनी समारोपाच्या भाषणात लगावला.

कन्याकुमारी ते काश्मीर हे साधारण साडेतीन-चार हजार किलोमीटरचे अंतर पार करताना राहुल गांधींनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील जनतेशी नव्याने ऋणानुबंध प्रस्थापित केले. राहुल यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, त्यांना या देशाशी काही घेणेदेणे नाही,

इथल्या प्रश्नांची त्यांना जाणीव नाही, अशा प्रकारे समाजमाध्यमांतील मोहिमांतून त्यांची प्रतिकूल प्रतिमा निर्माण करण्यात आली होती. ती या यात्रेने आरपार बदलून टाकली. या संपूर्ण प्रवासातील राहुल यांची भाषणे आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेशी साधलेला संवाद ही त्यांची नवी प्रतिमा अधोरेखित करत होता.

आपल्या समारोपाच्या भाषणात राहुल यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करणेही अपरिहार्यच होते. मात्र, ती आठवण अत्यंत भावपूर्ण शैलीत सांगत त्यांनी थेट उपस्थितांच्या हृदयास हात घातला. ‘जे लोक हिंसा करतात वा घडवून आणतात, ते जनतेचे दु:ख जाणून घेऊ शकत नाहीत,’ असाही टोला त्यांनी हाणला.

देशाचे पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेत नसताना राहुल हे रोजच्या रोज पत्रकारांच्या तोफगोळ्यांना शांतपणे सामोरे जात होते आणि त्यांचे शंकानिरसन करत होते, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवणारी आहे.

राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर या यात्रेतून लगेच जादूची कांडी फिरेल, असे नाही. याचे कारण विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी जे एक किमान परस्परविश्वासाचे, सामंजस्याचे वातावरण लागते, ते अद्याप तरी तयार झालेले नाही

राहुल यांच्या यात्रेच्या समारोप सोहळ्यास देशभरातील विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण अनेक नेते उपस्थित राहू शकले नाहीत. या सगळ्यांच्या अनुपस्थितीमागे राजकीय कारणे शोधण्याची गरज नसली तरी काश्मिरात यात्रेच्या सांगतेच्या निमित्ताने विरोधी ऐक्याचा एक आश्वासक असा दृश्य आविष्कार घडविण्याची संधी साधता आली नाही, हे वास्तव उरतेच.

शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव हे या समारोप सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत, हे आधीच स्पष्ट झाले होते. प्रतिकूल हवामानासह इतरही अडचणी इतर नेत्यांना आल्या असणार. तरीदेखील राहुल गांधी यांनी विरोधकांमध्ये दुही नाही, असे स्पष्ट करीत काँग्रेसची भविष्यातील रणनीती स्पष्ट केली आहे.

त्रिपुरा विधानसभेच्या तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी केलेली आघाडीही तेच सांगत आहे. राहुल यांचा हा पवित्रा, अन्य विरोधी पक्षांनी या वर्षांत होऊ घातलेल्या नऊ राज्यांमध्ये वेगळा विचार करायला लागेल, असेच संकेत देत आहे.

राहुल गांधी यांनी या यात्रेत मांडलेल्या महागाई, बेरोजगारी आदी विषयांमुळे आगामी निवडणुकांचा काँग्रेसचा अजेंडाच पुढे आला आहे. देशातील अन्य विरोधी पक्षांनाही आता हेच मुद्दे घेऊन पुढे जावे लागणार आहे, यात शंका नाही. राहुल यांनी देशवासीयांना घातलेली ‘नफरत छोडो’ ही भावनिक साद महत्त्वाची आहे. कारण तीच आपल्या देशाची संस्कृती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT