खरी कुजबुज: गोव्यात शिंदेसेना...

Khari Kujbuj Political Satire: डिचोलीत ‘शिंदेसेने’च्या राज्य कार्यकारिणीचा मेळावा मोठ्या उत्साहात झाला.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

महिला वर्गाचीही निवडणूक तयारी

यदा कदाचित पुढच्या वर्षी जी विधानसभा निवडणूक होते त्यात काही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर काय करायचे? सध्या राजकीयदृष्ट्या भलताच सक्रीय झालेल्या सावर्डे मतदारसंघात म्हणे त्यावरही उत्तर तयार असून त्या दृष्टीतून दोन इच्छुक महिला राजकारण्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवातसुद्धा केली. त्यापैकी एक म्हणजे सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या दक्षिण गोवा माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर या असून दुसऱ्या सावर्डे पंचायतीच्या सध्या पंच सदस्य असलेल्या सिद्धी पाऊसकर ह्या आहेत. सावर्डेतून निवडणूक लढविण्यास आपणच कसे पात्र उमेदवार आहोत हे पटवून देण्याचा दोघांकडून सध्या प्रयत्न चालू आहे. पाहूया खरेच त्यांचे आमदार बनण्याचे स्वप्न साकार होते का?

‘त्या’ दिलजमाईची चर्चा

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मायकल लोबो आणि माजी मंत्री दयानंद मांद्रेकर एकत्र आले. मांद्रेकर हे शिवोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. सध्या मायकल यांच्या पत्नी दिलायला या शिवोली मतदारसंघाच्या आमदार आहेत. दिलायला काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने, मांद्रेकर भाजपमध्ये असूनही त्यांना उमेदवारी कशी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात एकत्र येऊन त्यांनी ज्या थंडपणे एकमेकांचे स्वागत केले, त्यावरून त्यांच्यात काही दिलजमाई झाली तर नाही ना, अशी चर्चा शिवोली परिसरात रंगू लागली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

म्हापशात सावकारांची ‘एन्ट्री’?

डिसेंबरमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने सध्या म्हापशाच्या राजकीय गल्लीबोळांत एकच कुजबुज सुरू आहे. ती म्हणजे, ‘तेच ते चेहरे पाहून थकलो, आता नवीन मोहरा हवा!’. अशातच समाजसेवक मयूर सावकार यांनी थेट आखाड्यात शड्डू ठोकत आपण भाजपचे किती कट्टर चाहते आहोत, हे दाखवायला सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे समाजसेवा केल्याचा दावा करत त्यांनी थेट विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. म्हणजेच, पक्षाने उमेदवारी देऊन आपल्या भक्तीचे चीज करावे, अशी त्यांची सुप्त इच्छा दिसते. सध्याचे उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासाठी हा नक्कीच चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण सावकारांनी ‘तुम्ही नसाल तर मी आहेच’ असा स्पष्ट पर्याय पक्षासमोर ठेवला आहे. म्हापशात सध्या खासगीत ‘नवीन चेहरा द्या हो’ अशी कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ सुरू असल्याने भाजप या बालेकिल्ल्याचा पुढचा वारसदार कुणाला बनवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, पक्ष जुन्याच जोशमध्ये राहून जोशुआंना तिकीट देतो की सावकारांच्या नव्या चेहऱ्यावर जुगार खेळतो, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. ∙∙∙

आश्‍वासनपूर्ती केव्हा?

फोंड्याच्या पोटनिवडणुकीवेळी ‘हँव करू आणि त्याँव करू’ म्हणून सत्ताधारी भाजपने फोंडावासीयांना आश्‍वासने दिली होती. त्यात महत्त्वाचे म्हणजे फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळाला जिल्हा इस्पितळाचा दर्जा देण्याबरोबर रक्तपेढी उपलब्ध करून देण्याच्या आश्‍वासनाचा समावेश होता. पण पोटनिवडणूक रद्द होऊन आता महिना उलटला तरीही आश्‍वासने हवेतच विरली की काय, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार. मग आश्‍वासनपूर्ती केव्हा, असा सवाल फोंडावासीय करताना दिसत आहेत!∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

धारगळचा पंचायत सचिव चर्चेत

धारगळ परिसरात सध्या बांधकामांना ऊत आला आहे. सरकार कधीतरी बेकायदेशीर व अनियमित बांधकामे नियमित करेल, या आशेने अनेकजण पावसापूर्वी बांधकामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यातच धारगळ पंचायत कार्यालयाजवळ उभी राहिलेली तीन मजली इमारत चर्चेचा विषय ठरली आहे. त्या इमारतीकडे पंचायत सचिवांचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न स्थानिक पातळीवर विचारला जात आहे. पेडणे तालुका नागरिक कृती समिती आता पंचायत सचिवांच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांकडून मते मागवू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेडणे तालुका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा हा प्रयत्न, व्हॉट्सॲपवर का होईना, कौतुकास पात्र ठरत आहे. ∙∙∙

ऑनलाईन जुगार बिनधास्त; पोलिस मात्र सुशेगाद...

गोव्यात मटका जुगार काही नवीन नाही. पूर्वीपासूनच मटक्याचे प्रस्थ असून पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा होती. अर्थात, त्यामागील अर्थकारणही लपून राहिलेले नाही. आता बदलत्या काळानुसार मटकावाल्यांनी ‘ऑनलाईन गॅम्बलिंग’ सुरू केले आहे. मात्र, पोलिस अजूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. कारणही उघड आहे. या ‘गॅम्बलिंग’मध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांसह विरोधी पक्षातील काहींशी सेटिंग साधलेल्या जुगाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. सर्व काही माहित असूनही पोलिस कारवाई करण्यास धजावत नाहीत. ‘डेअरिंग’ करून छापा टाकल्यास प्रकरण अंगलट येण्याची भीती, शिवाय बदली होण्याची शंभर टक्के खात्री. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा सारा मामला बनला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

इलेक्ट्रिक गाड्या सरकारी खर्चावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आणि त्यांनी स्वतःच्या ताफ्यात केवळ दोनच वाहने ठेवल्यानंतर आता इतरही केंद्रीय मंत्री तसेच विविध राज्यांतील मुख्यमंत्री व मंत्र्यांनीही ताफ्यातील वाहनांमध्ये कपात केली आहे. गोव्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य असला, तरी प्रश्न असा आहे की, सध्या वापरात असलेल्या वाहनांचे सरकार काय करणार? तसेच नवीन इलेक्ट्रिक गाड्या सरकारी खर्चातूनच खरेदी केल्या जाणार ना? इंधनावरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत अधिक असते. त्यामुळे हा वाढीव खर्च अखेरीस कुणाच्या माथी पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. ∙∙∙

शिंदेसेना...

डिचोलीत ‘शिंदेसेने’च्या राज्य कार्यकारिणीचा मेळावा मोठ्या उत्साहात झाला. त्यामुळे राज्यात ‘शिंदेसेना’ सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून ‘शिंदेसेने’ने गोव्यासाठी दोन रुग्णवाहिकाही घेतल्या होत्या. त्याही गोव्यात पोहाचल्या आहेत. त्यामुळे ‘शिंदेसेना’ आता समाजकार्याबरोबरच राजकारणाच्या मैदानातही सक्रीय होतान दिसत आहे. निश्चितच, आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते पुढे जातील. गोव्यात शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. ते म्हणाले, महाराष्ट्रात ‘शिंदेसेने’ची भाजपबरोबर युती असली, तरी गोव्यात शिवसेना भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. गोव्यातील भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसैनिक पुढे येतील आणि वेळप्रसंगी मंत्रालयावर धडक देण्याचीही तयारी ठेवतील, आता ही धमकी म्‍हणावी की हुल? हे पुढील दिवसांत कळेलच! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

रोशन रेडकर म्हणतात, ‘गॉड इज ग्रेट’

नागोवा-हडफडे पंचायतीच्या सदस्यपदी दीपिका रेडकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ‘बर्च बाय लेन'' आगीच्याप्रकरणी डिसेंबरमध्ये तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर येथील पंचसदस्याची जागा रिक्त होती, त्या जागी आता त्यांच्या पत्नी दीपिका या बिनविरोध निवडून आल्या आणि रोशन रेडकर यांनी आपल्या प्रसारमाध्यमांकडे मनातील खदखद व्यक्त केली. पत्नीला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांच्या वाड्यावरील सर्वांचे आभार मानले. परंतु कारवाईनंतर भाजपविरोधात जे काही रोशनबाब बोलले होते, ते म्हणे आपण नैराश्यातून बोललो होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय आत्तापर्यंत पंचांनी आपल्यावर आत्तापर्यंत अविश्वास ठराव आणलेला नाही, हेही सांगितले. त्यामुळे अविश्वास ठराव न आणण्यामागील नेमके कारण रोशनबाब यांनाच माहीत असणार आहे. त्यामुळेच ते प्रतिक्रिया देताना ‘गॉड इज ग्रेट'' वारंवार म्हणत असावेत. ∙∙∙

१५ चा दुर्दैवी फेरा

गेल्या १५ महिन्यांत फोंडा तालुक्याला तीन वेळा धक्का सहन करावा लागला. फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार, माजी मंत्री रवी नाईक आणि आता डॉ. केतन भाटीकर. या तिघांनाही दुर्दैवी मृत्यू हा १५ महिन्याच्या कालावधीत आला आणि तिघांनाही मृत्यूने गाठण्याची तारीख नेमकी १५ च होती. मामलेदार हे १५ फेब्रुवारी २०२५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने गेले. रवी पात्रांवनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी या जगाचा निरोप घेतला तर डॉ. केतन भाटीकर यांना काळाने गाठण्याची तारीखही नेमकी १५ च आहे. याला १५ चा दुर्दैवी फेरा असे म्हणायचे का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आरजीपीमधील गटबाजी शिगेला! आल्मेदांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ; सांतआंद्रेत संतापाची लाट

मतदार सुखावले

मांद्रे मतदारसंघ म्हणजे गोव्यातील राजकीय आखाडाच! येथे निवडणूक आली की इच्छुकांची रांग लागते. यंदाही अनेक जण मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, काही जण जिंकण्यासाठी तर काही ‘राजकीय गुंतवणुकीवर’ परतावा मिळतो का हे पाहण्यासाठीच सक्रिय होण्‍याची चिन्‍हे आहेत. अर्थात तेथे सध्‍या बोलबाला जीत आरोलकरांचाच आहे. पेडणेत बाबू आजगावकरांनी आपले बस्तान मजबूत केले असतानाच उत्तम पार्सेकरही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. लगतच्या या दोन मतदारसंघांत यंदा जोरदार फटकेबाजी होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या लगतच्‍या दोन्‍ही मतदारसंघांत यंदा चुरस वाढणार हे नक्‍की असून, ही शक्‍यता गृहित धरून बरेच मतदारही सुखावलेत म्‍हणे! ∙∙∙

सोन्याचे ब्रेसलेट भेट

एका पंचायत सचिवाने सरपंचाच्या मुलीला वाढदिवसानिमित्त सोन्याचे ब्रेसलेट भेट दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. म्हापसा येथे हा कार्यक्रम पार पडला. सध्या सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना, पंचायत सचिव ज्यांचे वेतन कारकूनाएवढे असते, असे खुद्द पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे, ते सोन्याचे ब्रेसलेट भेट देतात, यावरून त्यांच्या उत्पन्नाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरपंच आणि सचिव यांच्यात ‘कमिशन भागीदारी’ सुरू असल्याचे यावरून सिद्ध झाल्याचा दावा काहीजण करत आहेत. संबंधित सरपंच आणि सचिव यांचा लवकरच भांडाफोड करण्याचा विडाही काहींनी उचलल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: मुरगावात भाजपचे शिलेदार भक्‍कम स्‍थितीत, काँग्रेस पक्षासह विरोधक थंडच; माविन गुदिन्‍होंचे स्‍थान मजबूत

पावसाआधी गळती थांबणार?

पणजीतील काही सरकारी कार्यालयांमध्ये सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. कामकाज कधी होईल हे सोडा, पण आधी इमारत टिकेल ना, याचीच कर्मचाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे म्हणे! काही कार्यालयांची अवस्था अशी झाली आहे की, फाईलवर सही होण्यापेक्षा छतावरून पाण्याची गळती होण्याचीच अधिक शक्यता दिसते. पावसाळा तोंडावर आल्याने कर्मचाऱ्यांपासून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांपर्यंत सगळ्यांच्याच नजरा आता छताकडे जास्त आणि अधिकाऱ्यांकडे कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार आधी दुरुस्तीची फाईल मंजूर करणार की गळती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करणार, याचीच उत्सुकता सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. ∙∙∙

अर्ध्यावरचा डाव...

केतन भाटीकर यांच्या अंत्यविधीला लोटलेला जनसागर अचंबित करणारा होता. एखाद्या आमदाराच्या अंत्यसंस्कारालाही एवढी गर्दी झाली नसती, इतकी लोकांची उपस्थिती होती. त्या वेळी अनेकांच्या मनात एकच विचार आला, डॉ. केतन भाटीकर आमदार असते तर...? पण शेवटी नियतीपुढे कुणाचेच चालत नाही. लोकांना इस्पितळात ने-आण करण्यासाठी त्यांनी असंख्य वेळा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली; मात्र स्वतःच्या वेळेला त्याच रुग्णवाहिकेचा त्यांना उपयोग झाला नाही. कारण विष अंगात आधीच भिनले होते. दैवाचे खेळ किती विचित्र असतात नाही का! दुसरीकडे, त्यांच्या निधनामुळे काँग्रेसमधील ‘राजेश की केतन’ हा वादही संपुष्टात आला आहे. केतन यांनी डाव अर्ध्यावरच सोडला. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. तसे झाले, तर मातब्बर सत्ताधारी भाजपसाठी ही परिस्थिती निश्चितच आव्हानात्मक ठरू शकते. तसे घडल्यास फोंड्यातील राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

नागरिकांकडून महापाैरांना सूचना

पणजीतील नागरिकांसाठी सुलभ वाहतूक, सुरक्षित रस्ते आणि अधिक सुव्यवस्थित शहर सुनिश्चित करणे, हे महानगरपालिकेचे प्रमुख प्राधान्य. रहिवाशांना दीर्घकालीन दिलासा देण्यासाठी एक भाग म्हणून ‘आरटीओ‘च्यावतीने शहरात नुकतीच विशेष मोहीम राबवली. ज्याचा उद्देश महत्त्वाच्या सार्वजनिक जागा पुन्हा ताब्यात घेणे आणि त्या मोकळ्या करणे हा होता. वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या एका निर्णायक प्रयत्नाचा भाग म्हणून, शहरात अनधिकृतपणे वाहने उभी केल्याप्रकरणी (पार्किंग केल्याप्रकरणी) ४१ टॅक्सींवर कारवाई करण्यात आली. महापौरांनी याविषयी एक पोस्ट समाजमाध्यमांवरील अकाऊंटवर छायाचित्रे सामायिक केली आहेत. त्यामुळे आता अशी मोहीम दर वारंवार राबवावी, अशा काही सूचनाही महापौरांना नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे या सूचनांचे पालन महापौर किती गांभिर्याने करतात, ते पहावे लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com