Goa Politics: मुरगावात भाजपचे शिलेदार भक्‍कम स्‍थितीत, काँग्रेस पक्षासह विरोधक थंडच; माविन गुदिन्‍होंचे स्‍थान मजबूत

Mavin Godinho Political Stronghold: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले असले तरी भाजप वगळता इतर राजकीय पक्षांच्या सर्व आघाड्यांवर अद्याप सामसूम दिसत आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले असले तरी भाजप वगळता इतर राजकीय पक्षांच्या सर्व आघाड्यांवर अद्याप सामसूम दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी या चारही मतदारसंघांत विद्यमान आमदार त्या-त्या मतदारसंघाचे ‘राजे’ असल्याचे दिसून येत आहे.

मुरगाव तालुक्यात मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी असे चार मतदारसंघ येतात. गत विधानसभा निवडणुकीत मुरगावातून काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर निवडून आले होते. तथापि, त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. वास्कोतून दाजी साळकर, दाबोळीतून माविन गुदिन्हो हे भाजपचे उमेदवार निवडून आले. तर, कुठ्ठाळीतून अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ निवडून आल्यावर त्यांनी भाजपला समर्थन दिले आहे.

मिलिंद नाईक यांची बांधणी, आमोणकरांचा विकासाचा ‘संकल्‍प’

मुरगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार संकल्प आमोणकर यांनाच उमेदवारी मिळेल, असे बोलले जात आहे. या मतदारसंघातून भाजपचे २०२२चे पराभूत उमेदवार मिलिंद नाईक हे निवडणूक लढविणार यात शंकाच नाही. नाईक हे तीनवेळा मुरगाव मतदारसंघातून जिंकले होते. आता गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आपले पत्ते खोलण्यास आरंभ केला आहे. त्यांना त्यांच्या सात समर्थक नगरसेवक-नगरसेविकांची साथ आहे.

Goa Politics
Goa 11th Admission: अकरावीसाठी आजपासून प्रवेश, शिक्षण विभाग सज्ज; वाणिज्य, विज्ञान शाखेत चुरस अपेक्षित

मात्र ते कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेसतर्फे काँग्रेस प्रदेश समितीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर इच्छुक आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणूक लढविलेले सामाजिक कार्यकर्ते जयेश शेटगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने चोपडेकर यांना शेटगावकर यांची साथ मिळू शकते.

माजी नगरसेवक नीलेश नावेलकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये प्रवेश केल्याने तेसुध्दा इच्छुक उमेदवार असू शकतात. उद्योजक संजय सातार्डेकर यांचेही नाव इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जात आहे. मध्यंतरी त्यांनी बराच धडाका लावला होता. परंतु आता तो धडका दिसत नाही.

माविन गुदिन्‍हो यांनी मतदारांना जिंकले

दाबोळी मतदारसंघात माविन गुदिन्हो यांच्‍याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. आपला दाबोळी मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत गोव्यात अव्वल असल्याचे ते नेहमी सांगतात. गत विधानसभा निवडणुकीत विद्यमान खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी गुदिन्होंसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, गुदिन्हो हे १,५७० मताधिक्याने निवडून आले.

त्यावेळी ‘आप’चे प्रेमानंद नानोस्कर यांना २५३३ मते, ‘आरजी’चे गजानन बोरकर यांना ११२९, राष्ट्रवादीचे जुझे फिलीप डिसोझा यांना १०३७ मते मिळाली होती. यंदा काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस येथे सामाजिक प्रश्नापासून दूर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास फळदेसाई यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.

आंतोनियो वाझ यांनी राखला जनसंपर्क

या मतदारसंघातून गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ हे निवडून आले. त्यांच्यासमोर काँग्रेसचे ओलेन्‍सियो सिमॉईस यांचे आव्हान होते. पण वाझ हे ११७८ मताधिक्याने विजयी झाले.

तृणमूल काँग्रेसचे गिल्बर्ट मारियानो रॉड्रिग्ज यांना ३२४६ मते, अपक्ष उमेदवार व सांकवाळचे पंच गिरीश पिल्ले यांना ४२५१, आरजीपीचे इनासियो कॉस्तो यांना २४८०, भाजपचे नारायण नाईक यांना २३९२ तर माजी मंत्री व ‘आप’चे उमेदवार एलिना साल्ढाणा यांना १३५५ मते मिळाली होती. या मतदारसंघात दुहेरी रेलमार्गचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे. गिल्बर्ट मारियानो रॉड्रिग्ज, एलिना साल्ढाणा, गिरीश पिल्ले निवडणूक लढवतील असे सध्‍या तरी दिसते. असे असले तरी वाझ यांनी भक्कम जनसंपर्क ठेवला आहे.

Goa Politics
Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

अनेक इच्‍छुक, सध्‍या दाजीच वरचढ

या मतदारसंघात सध्या तरी विद्यमान आमदार दाजी साळकर यांचा बोलबाला आहे. गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारे व दोनवेळा आमदार असलेले कार्लुस आल्मेदा हे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्याने साळकर यांच्यासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. साळकर यांना आल्मेदा व त्यांचे समर्थक नगरसेवक-नगरसेविका यांची साथ मिळणार आहे. तसेच त्‍यांनी बरीच विकासकामे केल्याने त्यांना त्याची पावती मिळणार असे वाटते. या मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे नंदादीप राऊत यांनी जोर लावला आहे.

ते साळकर यांच्या काही विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्‍थित करत आहेत. मध्यंतरी भाजपचे नगरसेवक दीपक नाईक यांचेही नाव चर्चेत आले होते. त्यांनी आपले कार्यालय बायणा येथे सुरू केले आहे. तथापि, ते आता म्हणावे तसे चर्चेत नाहीत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर सैफुल्ला खान हे राजकारणापासून दूर गेल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा हे यावेळेस वास्को की दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार, हे अद्याप उघड झाले नाही. गेल्या निवडणुकीत त्यांनी दाबोळीतून निवडणूक लढविली होती.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुरगावची मतदार संख्या २०,४१८, वास्कोची मतदार संख्या ३५,५५२, दाबोळीची मतदार संख्या २४,६६१ तर कुठ्ठाळीची मतदार संख्या ३०७८२ होती. परंतु एसआयआरअंतर्गत काहींची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या चारही मतदारसंघातील मतदार संख्या कमी झाली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत मुरगावातून काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांना ९,०६७ मते, तर भाजपचे मिलिंद नाईक यांना ७,१२६ मते मिळाली होती. वास्कोतून दाजी साळकर यांना १३,११८ मते तर काँग्रेसचे कार्लुस आल्मेदा यांना ९,४६१ मते, दाबोळीतून भाजपचे माविन गुदिन्हो यांना ७,५९४ मते तर काँग्रसेचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना ६,०२४ मते मिळाली होती. कुठ्ठाळीतून अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ यांना ५,५२२ मते तर काँग्रेसचे ओलेन्‍सियो सिमॉईस यांना ४,३४४ मते मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com