

महाराष्ट्रातून व कर्नाटकातून दूध व इतर अन्नपदार्थ गोव्यात येतात. सध्या महाराष्ट्रात अन्न व औषध खात्याची (एफडीए) सूत्रे तुकाराम मुंडे या ‘आयएएस’ अधिकाऱ्याने घेतली आणि महाराष्ट्रात कारवाईचा भडका उडाला आहे. या कारवाईने भेसळ करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी दुधाची व इतर पदार्थांची कमतरता जाणवत आहे; परंतु गोव्यात अशी कोणतीच कमतरता जाणवत नाही. त्यामुळे गोवा व कर्नाटकातून येणारे दूध किंवा इतर खाद्यपदार्थ निर्भेळ आहेत, हे छातीठोकणपणे कोणीही सांगणार नाहीत. महाराष्ट्रात ‘एफडीए’च्या कारवाईला तेथील सरकारने पूर्ण पाठिंबा दिला असून, मुंडे यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील भेसळ मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. गोव्यातही असे काही घडावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. ∙∙∙
‘देर आए दुरुस्त आए’ अशी एक म्हण आहे आणि ती गोव्यातील ‘आयआयटी’ प्रकरणात चपखल बसते. राज्यात ‘आयआयटी’ सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा अट्टहास केला; पण कुठेच जागा सापडेना. एवढ्याशा गोव्यात आधीच जागा कमी त्यात ‘आयआयटी’सारख्या प्रकल्पाला लाखो चौरस मीटर जमीन द्यायची म्हटल्यावर राज्यात मूळ गोयकारांना काय शिल्लक राहणार, हा मुद्दा धरून नियोजित ‘आयआयटी’ला साहजिकच विरोध झाला. सत्तरी, काणकोण, केपे आणि ओपा-खांडेपारला लोकांचा प्रचंड विरोध झाला आणि या संभाव्य जागांवरील ‘आयआयटी’ प्रकल्प गुंडाळावा लागला. वास्तविक सरस्वतीचे प्रांगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्मागुढीतच हा ‘आयआयटी’ प्रकल्प होणे आवश्यक होते आणि स्थानिक राजकारण्यांचीही तशी सूचना होती. मात्र, भाजपने फर्मागुढी सोडून इतरत्र जागा शोधल्या आणि भूमिपुत्रांकडून जबरदस्त चपराक बसल्याने आता सरकार मूळ पदावर आले असून फर्मागुढीच योग्य, असा साक्षात्कार सरकारला झाला आहे. ∙∙∙
काही लोकांना आंब्याची साल जांभ्याला लावण्याची सवय झालेली आहे. कुंकळ्ळीतील एका माजी नगरसेवकाने आपल्या सुमारे अडीच हजार चौ.मी. शेतजमिनीची सेटलमेंट झोनमध्ये रूपांतरण करण्यासाठी गोवा नगर नियोजन खात्याकडे जमीन रूपांतरणाचा अर्ज केला आहे, ज्या माजी आमदाराने जमीन रूपांतरणाचा अर्ज केला आहे ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे समर्थक असल्याचा दावा युरी विरोधक करतात. युरी आलेमाव भू-रूपांतरण प्रकरणावरून सरकारला जाब विचारतात आणि दुसऱ्या बाजूने युरी समर्थकच शेतजमिनीचे रूपांतरण करतात यावरून युरी विरोधक त्या माजी नगरसेवकाबरोबर युरी यांच्यावर टीका करायला लागले आहेत. आता एखादा समर्थक आपल्या जमिनीचे कायदेशीर रूपांतरण करीत असेल तर त्यात युरी आलेमाव यांचा काय दोष? म्हणतात ना ‘कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी’ तशातला हा प्रकार. ∙∙∙
कारापूर-सर्वण येथील प्रस्तावित लोढा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी त्या गावचे स्थानिक लोक, विरोधी आमदार, विरोधी पक्षांचे पदाधिकारी तसेच पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई, शेर्लेकर व इतरांनी पर्यावरण खात्यावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. नेमकी त्याचवेळी एका मंत्र्यांच्या घरासमोर विरोधी पक्षातील आमदाराची गाडी तासभर उभी होती. त्यामुळे त्या गाडीचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले. ती गाडी एका विरोधी आमदाराची असल्याने काहींनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. काहींनी मंत्री आणि आमदाराच्या नावाचे अंदाजही बांधले. मात्र, ज्या पक्षातील आमदार त्या मंत्र्याला भेटला, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही याची कुणकूण लागली होती आणि त्याची चर्चा आंदोलनस्थळावरही झाली. ∙∙∙
राज्यात सर्वाधिक रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आतापर्यंत कुठे झाली असतील तर ती फोंड्यात हे निर्विवाद सत्य आहे. अशी शिबिरे आयोजित करणे यात तसे गैर असे काहीच नाही; पण वारंवार आणि सातत्याने अशी शिबिरे आयोजित करणे त्यातल्या त्यात राजकारणी लोकांकडून म्हटल्यावर त्यात लाभाचा भाग हा आलाच. फोंड्यातील येत्या निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्या सर्वच इच्छुक राजकारण्यांकडून अशी शिबिरे आयोजित केली जात आहेत. लोकांसमोर कायम लायमलाईट राहावे हाच हेतू आहे तो; पण अशा शिबिरांतून मतांची टक्केवारी किती वाढते ते निवडणुकीच्या निकालातून दिसून येईलच. ∙∙∙
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यभरात प्रार्थनांचा वर्षाव झाला. म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी कार्यकर्त्यांसह मोदींच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. मात्र, कार्यक्रमात स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा दिसले नाहीत. चौकशीअंती समजले की, आमदारसाहेब सरकारी कामानिमित्त चंदीगडमध्ये होते. मात्र, प्रार्थना चुकली नाही. जोशुआ यांनी चंदीगडमधील मंदिरात जाऊन मोदींसाठी मनोभावे प्रार्थना केल्याची चर्चा आहे; पण राजकारणात प्रार्थनांनाही उपअर्थ असतात! कारण सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तिकिटावर दावा ठोकल्याने म्हापशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे म्हापसावासीयांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की- मोदींच्या दीर्घायुष्यासोबतच जोशुआ यांनी देवाला, म्हापशात कितीही ‘सावकार’ उभे राहो; पण भाजपचे तिकीट पुन्हा मलाच मिळू दे! असे साकडेही घातले असावे. आता देव कोणाची काळजी घेतो, हे मात्र काळच ठरवणार! ∙∙∙
‘हो, दोन खासदार. दोन भिन्न दृष्टिकोन’ अशा मथळ्याखाली एक पोस्ट काँग्रेसने आपल्या फेसबूक अकाउंटवर अपलोड केलेली आहे. ही पोस्ट भाजपने केलेल्या पोस्टला उत्तर आहे. त्यातील छायाचित्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून कॅप्टन विरियातो फर्नांडिस व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यातील कार्याची तुलना केलेली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सदाभाऊंनी सरकारची स्तुती करणे पसंत केले, तर कॅप्टन विरियातो यांनी सरकारला प्रश्न विचारणे पसंत केले. लोकशाहीला दुसऱ्या प्रकारच्या भूमिकेची गरज असते. गोव्याला अशा आवाजांची गरज आहे जे सत्तेला जाब विचारतील; केवळ आकडेवारी फुगवणाऱ्या आणि गोमंतकीयांवर परिणाम करणाऱ्या खऱ्या मुद्यांवर गप्प राहणारे नकोत. याशिवाय पुढे काँग्रेसने ‘जर संसद केवळ उपस्थितीवर चालली असती, तर १००% उपस्थिती असलेला प्रत्येक विद्यार्थी वर्गात अव्वल आला असता’, असा उपरोधिक टोला लगावला आहे. त्याशिवाय शेवटी चर्चेतील सहभागाचा दर्जा महत्त्वाचा असतो. कोणी काय केले, हे समजण्याइतपत गोमंतकीय सूज्ञ आहेत, असे काँग्रेस मीडियाचे म्हणणे आहे. ∙∙∙
२३ वर्षांपूर्वी गोव्यात आपल्याला ‘एसटी’ दर्जा प्राप्त व्हावा यासाठी गावडा, कुणबी, वेळीप या तीन समाजांबरोबरच धनगर समाजही आंदोलनात उतरला होता. बाबू कवळेकर हे याच आंदोलनातून राजकीय नेते म्हणून लोकांसमोर आले होते; पण काही कारणास्तव एक धनगर वगळता अन्य तिन्ही समाजांना ‘एसटी’चा दर्जा मिळाला. त्यामुळे आता गोव्यातील ‘एसटीं’ना राजकीय आरक्षण मिळत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावूनही आपल्यावर मात्र अन्याय झाला, अशी भावना धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी या धनगर समाजाची आमसभा मडगावात होत आहे. भाजप सरकार आपल्याला न्याय देणार, अशी या समाजाला आशा होती; पण तीही आता फोल ठरते की काय, अशी स्थिती झाल्याने रविवारच्या सभेत त्याचे पडसाद उमटल्यास समाजाला कुणी नाव ठेवू शकेल का? ∙∙∙
‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’, असे म्हणतात ते खरे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने विद्यमान, माजी व भावी आमदार आपापले वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करायला लागले आहेत. राजकीय नेते आपल्या समर्थकांना आमंत्रित करून जंगी पार्ट्या द्यायला लागले आहेत. उत्तर गोव्यातील किनारी भागातील मोठे राजकीय वजन असलेल्या आमदार महाशयांचा क्रांतिदिनी वाढदिवस आहे. यानिमित्ताने आमदार साहेबांनी जंगी पार्टीचे आयोजन केल्याची चर्चा आहे. बर्थडे बॉय आमदाराने आपल्याच नव्हे तर इतर तीन मतदारसंघांतील मतदारांना आमंत्रण पाठविले आहे. काही जवळचे कार्यकर्ते तसेच आजी, माजी व भावी पंचसदस्य आमदारांच्या वाढदिवसाच्या आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी फिरत आहेत. आमंत्रण पत्रिकेबरोबर एक छान छत्रीही भेट देण्यात येते. मतदारसंघातील एकही घर न चुकता आमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचली पाहिजे, याची खबरदारी आमदार साहेब घेत आहेत. त्यामुळे आमदाराची ही बर्थडे पार्टी जंगी होणार हे निश्चित. ∙∙∙
स्मार्ट मीटरच्या नावाखाली आणि मंजूर वीज भार व प्रत्यक्ष वापरातील तफावतीवर दंडाच्या तलवारीने ग्राहकांच्या खिशावर वार करण्याची तयारी सरकारने मोठ्या थाटात केली होती. मात्र, जनतेचा संताप उफाळून आला, विरोधी पक्षांनी आवाज उठवला आणि गंमत म्हणजे सत्तेतील काही मंत्र्यांनीही या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कालपर्यंत जनहिताचा दावा करणाऱ्या सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. निर्णय घेताना जनतेचा आवाज ऐकू न येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तोच आवाज रस्त्यावर घुमू लागल्यावर अचानक शहाणपण सुचले, एवढेच! आता प्रश्न एवढाच की, जनतेवर नवे आर्थिक ओझे लादण्यापूर्वी सरकार विचार करते की, आधी निर्णय घेते आणि नंतर विरोध झाल्यावर स्थगितीचे मलम लावते? जनतेला दिलासा मिळाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाने सत्तेतील समन्वयाचा फ्यूज उडाल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे. ∙∙∙
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या शिखरावर अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि सुमारे दीड किलो वजनाचा सोन्याचा कळस गुरुवारी मध्यरात्री शास्रोक्त पद्धतीने बसविण्यात आला. हा कळस गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी देवीला अर्पण केल्याचे वृत्त आहे. क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री पितळी आवरण घालण्यात आल्यानंतर त्यावर सोन्याचा कळस बसविण्यात आला. त्यासाठी मंदिराच्या चेअरमनपासून काही मोजके कर्मचारी या कामात गुंतले होते; परंतु काही वृत्तवाहिन्यांनी गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी हा कळस देवीला अर्पण केला असल्याचे वृत्त चालविले असल्याने ‘ते’ माजी मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काही माजी मुख्यमंत्र्यांची नावे झटकन अनेकांच्या नजरेसमोरून सरकलीही असतील; पण देणगीदाराचे नाव मंदिर व्यवस्थापनानेही गुपीत ठेवले आहे. मात्र, त्या दान देणाऱ्याच्या नावाची उत्सुकता गोव्यात अनेकांना लागून राहिली आहे, हे नक्की. ∙∙∙
आधी स्वतःच वाईट कृत्ये करायची आणि मग ती लपवण्यासाठी राजकीय नेत्यांची मदत घ्यायची? असे कसे होते की अशा दुष्ट विकृतांना नेहमी मदत मिळते आणि जे सत्याच्या मार्गावर चालतात, फक्त त्यांनाच अन्याय का सहन करावा लागतो? कुशावती जिल्ह्यातील एका उच्च माध्यमिक शाळेतील घटना किळसवाणी आहे आणि तरीही मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याऐवजी, या घटनेवर आवाज उठवला त्या शिक्षिकेलाच निलंबित करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत? देवाच्या सेवेत असलेले हेच मुख्याध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून त्याच हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्ये करत आहेत. मांजराला वाटते की ते डोळे मिटून दूध पिते म्हणून त्याला कोणी पाहू शकत नाही; पण तसे होत नाही. हे मुख्याध्यापक ब्लॅकमेल करून, पोलिसांना आपल्या जाळ्यात ओढून, तपासादरम्यान चार रुपये जास्त देऊन आणि राजकीय पाठिंबा मिळवून आपण केलेला गुन्हा आणखी किती काळ लपवणार? जर तुम्ही रात्रंदिवस देवाच्या सेवेत असाल, तर देवाला थोडे घाबरा. पैसा नेहमीच वरचढ ठरू शकत नाही. तुमची चूक कुठे झाली आहे किंवा त्या व्यक्तीला आपल्या कृतींची जाणीव असली पाहिजे. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही बरे का? ∙∙∙
सावर्डे येथील युवा कार्यकर्ते संकेत आर्सेकर यांचा १८ जून रोजी वाढदिवस असून त्यादिवशी त्यांनी अवयवदान संकल्प शिबिर आयोजित केले आहे. संकेत हे गोव्यातील बजरंग दलाशी संबंधित असून या माध्यमातून ते अनेक युवकांच्या जवळ गेले आहेत, त्यामुळे युवकांचा त्यांना जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. आपल्या वाढदिनी ते सर्व सहकारी युवकांना एकत्र आणून त्यांच्याकडूनही अवयवदानाचा संकल्प वदवून घेणार आहेत. एकाबाजूने अन्य राजकीय नेते आपल्या वाढदिनी पार्टीचा बार उडवत असताना संकेतने मात्र अशा सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे, हे कौतुकास्पद नाही का? ∙∙∙
दिगंबर कामत यांचा स्वभाव तसा शांत. मात्र, प्रसारमाध्यमातील काही उतावळे पत्रकार मुख्य विषयाला बगल देऊन, प्रश्न विचारत असतात, तेव्हा कामत यांचा संतापाचा पारा चढतो याचा अनुभव, गुरुवारी मडगावात पत्रकार परिषदेत आला. त्याचे झाले असे, मडगाव-कारवार एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभी कार्यक्रम मडगावच्या रेल्वेस्थानकावर झाला. यावेळी केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री सोमण्णा हे उपस्थित होते. ते जल खात्याचेही मंत्री आहेत. मंत्र्यांची मीडिया ब्रिफिंग सुरू झाली तेव्हा एका पत्रकाराने त्यांना गोव्यात पाण्याची टंचाई असल्याचे विचारले. यावेळी कामत यांना राग आवरता आला नाही. गोव्यात ही समस्या नाही. प्रत्येक घरात जलपुरवठा करण्याचे काम सरकारने पूर्ण केले आहे, असे त्यांनी त्या पत्रकाराला सुनावले. अर्थात वास्तव लपवले तरी लपत नाही; पण कामतांचा पवित्रा अनेकांना अचंबित करून गेला, हे मात्र खरे. ∙∙∙
फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात नाट्यमहोत्सव सुरू आहे. आज शेवटचे नाटक. ते कोकणी. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थिती अगदी कमी. कालच्याच नाटकाला जेमतेम ५० लोक. लोक यावे म्हणून विविध मंचांवर प्रसिद्धी करायला हवी. लोकांना मेसेजीस पाठवून बोलवायला हवे. फोंड्यात लेखक, कलाकार यांची वानवा नाही. त्यांचे लिस्ट आहे का? कलेचेच आगर हे अंत्रुज. प्रेक्षक नसल्यावर कलाकारांना नाट्यमंचीत करायला ऊर्जा मिळत नाही. सादरीकरणावर परिणाम होतो. सरकारी खर्चातून होणाऱ्या महोत्सवाची हीच काय ती फलश्रुती? करदात्यांच्या पैशांतून चार दिवसांचा हा महोत्सव होत आहे. १० टक्के लोक नसणे, त्याचे कुणाला पडून गेलेले नाही. प्रथा उकरून काढू नये, असे आलेले लोक बोलत होते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.