

मडगाव पालिकेत अनागोंदी कारभार सुरू होता. त्याला काही प्रमाणात गेल्या आठवड्यात आळा बसला आहे. गेल्या सोमवारी विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यात मंत्री दिगंबर कामत यांनी कानपिचक्या देताना पालिकेच्या कामात हलगर्जीपणा मुळीच खपवून घेणार नाही, असा सज्जड दम दिला होता. आता लोकांची कामे तत्काळ मार्गी लागतात की नाही, हे कळायला काही मार्ग नाही. मात्र, गणवेश आणि गळ्यात ओळखपत्र न घालता येणारे पालिका कर्मचारी आता सुतासारखे सरळ झाले आहेत. ते गणवेश आणि ओळखपत्र घालूनच कामावर येतात, हेही नसे थोडके! ∙∙∙
आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारच आपल्याला विजयपथावर पोहोचवतात, असे थोर सांगतात. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात स्तुती करण्यासारखा एक गुण म्हणजे त्यांची सकारात्मकता. कितीही मोठे संकट आले, तरी ‘भिवपाची गरज ना’ असे सांगण्याची धमक दाखवणे तितके सोपे नसते. आता राज्यातील राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रमोद सावंत यांना आव्हान देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. घरचे भेदीही प्रमोद सावंत यांचे पंख छाटण्याची फिल्डिंग लावण्यात व्यस्त असतील. अशा परिस्थितीत रविवारी ‘आयर्न मॅन’ या अनोख्या क्रीडा स्पर्धेत युवकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान चांगलेच गाजले. ‘पुढचा मुख्यमंत्री मीच असणार,’ असे सांगण्याचे धाडस त्यांनी निवडणुका तोंडावर असताना दाखवले. मुख्यमंत्र्यांचे समर्थक असोत वा विरोधक, त्यांच्या या आत्मविश्वासाची आणि धाडसाची प्रशंसा करावीच लागेल. बरोबर ना!∙∙∙
भाजपचे (BJP) संकेत आर्सेकर यांनी रविवारी ‘आयर्नमॅन ७०.३’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही त्यांची सलग तिसरी आयर्नमॅन स्पर्धा आहे. संकेत हे उत्तम ॲथलीट असून, नेहमीच अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. लोकांनी आपल्या आरोग्याला आणि तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करताना त्यांनी, ‘हे शरीर देवाने दिलेली भेट आहे आणि त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. तंदुरुस्ती हे केवळ कधीतरी गाठायचे ध्येय नसून, ती एक जीवनशैली असायला हवी,’ असे म्हटले. सध्या संकेत यांनी मैदानावरील रेस फत्ते केली आहे. आता निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवण्याच्या ‘रेस’मध्येही त्यांची धाव अशीच सुरू राहणार का, याची चर्चा रंगू लागली आहे! ∙∙∙
राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. भाजपने मात्र तयारीत आघाडी घेतली असून, राज्यात सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे, पेपरफुटी आणि ‘एसआयआर’सारख्या विषयांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यांचे पडसाद देशपातळीवरही उमटत असल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत भाजपवर होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोलताना, पुढील वर्षीही मुख्यमंत्री म्हणून आपणच या कार्यक्रमांना उपस्थित राहू, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना मिळाले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ∙∙∙
जो प्रांत आपले मूळ, भूगोल आणि इतिहास विसरतो, त्या प्रांताला सशक्त भविष्य नसते, असे जाणकारांनी लिहून ठेवले आहे. जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या कळंगुट पंचायत क्षेत्राला लाखो पर्यटक भेट देत असतात. कळंगुट मतदारसंघात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पुतळे आणि कमानी उभारलेल्या पाहायला मिळतात. पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा पुतळाही कळंगुट क्षेत्रात उभारण्यात आला आहे. कळंगुट पंचायतीने आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करण्यासाठी भारताचे राष्ट्रचिन्ह (अशोकस्तंभ) उभारण्याचे प्रयत्न केले होते. आता पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक बेटावर बळीराजा नांगरणी करत असल्याचा पुतळा उभारण्याची मागणी माजी उपसरपंच गीता परब यांनी ग्रामसभेत केली. आता आमदार मायकल लोबो आणि सरपंच जोजफ या मागणीला मान्यता देतात की नाही, हे पाहावे लागेल! ∙∙∙
राज्यातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या ‘मगो’ने जणू आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकारच केलेला दिसत नाही. या पक्षाचे अधिकृत समाजमाध्यम खातेही अजून कुठे दिसत नाही. तुलनेत इतर पक्ष मात्र समाजमाध्यमांवर आपली प्रसिद्धी जोरात करताना दिसतात. मगोपच्या पाठोपाठ स्थापन झालेले गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्ससारखे पक्ष समाजमाध्यमांशी जोडले गेले आहेत. अगदी अद्याप स्थापनही न झालेल्या ‘गोवा काँग्रेस पार्टी’नेही फेसबुकवर खाते उघडले आहे. सध्याच्या काळात पक्षाचा विस्तार करायचा असेल, तर समाजमाध्यमांशी जोडले जाणे आवश्यक आहे. हे मगोपमधील नेत्यांना कधी कळणार, असा प्रश्न समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले मगोप्रेमी विचारत आहेत. ∙∙∙
फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘पीपल्स पार्क’चे उद्घाटन धूमधडाक्यात केले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. हे सर्वच केवळ फातोर्ड्यातील होते, असे म्हणता येणार नाही. विजयबाबांच्या चाहत्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. आता निवडणूक जवळ आल्याने या गर्दीत नगरसेवकपदाची उमेदवारी मिळवू इच्छिणारे, तसेच मडगाव, फोंडा, काणकोण, कुडचडे आणि गोव्यातील अन्य मतदारसंघांतून गोवा फॉरवर्डची उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असलेले अनेक जण होते. विजयबाबांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने त्यांची भेट घेण्याची संधी अनेकांनी साधली. गोवा फॉरवर्डने अद्याप कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. त्यामुळे पक्षाने ‘एकला चलो’चा निर्णय घेतल्यास आपल्याला उमेदवारी मिळावी, या अपेक्षेने अनेक जण विजयबाबांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली. ∙∙∙
कदंब महामंडळाने स्मार्ट ट्रान्झिट कार्डाचा वापर करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जाणारी सवलत १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.नियमित प्रवाशांना आर्थिक दिलासा देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. नवीन सवलतीनुसार, स्मार्ट ट्रान्झिट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांना प्रत्येक व्यवहारावर २० टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासखर्चात बचत होणार आहे. रविवारपासून कदंब महामंडळातर्फे राज्यातील प्रमुख बसस्थानकांवर सात दिवसांच्या स्मार्ट ट्रान्झिट कार्ड नोंदणी व विक्री शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पणजी, म्हापसा, साखळी, मडगाव आणि फोंडा या पाच प्रमुख बसस्थानकांवर ही शिबिरे भरवली जातील. गोव्यावर शेकडो वर्षे राज्य केलेल्या कदंब राजवंशाचा इतिहास कदंब महामंडळाने पुढे आणला आहे. सुरुवातीच्या काळात खोतोडे, उगे, होंडा, गालजीबाग, लोलयें ही गावांची नांवे बसफलकारवर दिसली की गोव्याचा दुर्मिळ भूगोल उमजे. ∙∙∙
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित ‘वोट बचाओ, देश बचाओ’ रॅलीला गोव्यातील काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी रविवारी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ‘आम्ही दिल्लीत आहोत’ हे दाखवण्यासाठी या सर्वांनी रॅलीतील रिल्स आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल केली आहेत. त्यात गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रतीक्षा खलप, प्रवक्ते समील वळवईकर, ॲड. अमित पालेकर, कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर आणि वास्कोतील नेते नंदादीप राऊत यांच्यासह राज्यातील काही परिचित पक्षनेत्यांचा समावेश आहे. मात्र, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या छायाचित्रांमध्ये आणि रिल्समध्ये पक्षाचे काही महत्त्वाचे नेते दिसलेच नाहीत. त्यामुळे ते या रॅलीला गेले नव्हते काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ∙∙∙
२०२२ मध्ये झालेल्या पराभवापासूनच्या साडेचार वर्षांत कधीही काँग्रेसचे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्ते म्हणून जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर न उतरलेले किंबहूना पणजीतील काँग्रेस भवनातही कधी दृष्टीस न पडलेले काही ‘निष्ठावंत’ दिल्लीतील रामलिला मैदानावर आयोजित रॅलीत सहभागी झाले आहेत. स्वत:चे फोटो सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर टाकत आपणही रॅलीत सहभागी झालो आहे, हे ते गोमंतकीय जनतेला दाखवून देत आहेत. गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हे ‘निष्ठावंत’ सक्रिय होण्यामागे केवळ निवडणुकीतील ‘तिकीट’ हाच त्यांचा स्वार्थ असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙
सध्या एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अत्यंत नाजूक बनला आहे. उटा संघटनेने शनिवारी मडगावात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील वाटचालीबाबत विचारविनिमय केला. मात्र, या बैठकीला एसटी समाजाचे चार आमदार गैरहजर राहिल्याने सर्वत्र, विशेषतः एसटी समाजात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. समाजाचे मंत्री आणि आमदारच उटा किंवा एसटी समाजाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहू लागले, तर या समाजाचे प्रश्न आणि समस्या कशा सुटणार, असा प्रश्न एसटी समाजबांधव विचारत आहेत. हे चारही आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि जवळ येऊन ठेपलेली निवडणूक यामुळे सत्ताधारी भाजप पक्ष प्रचंड दबावाखाली आहे. त्यामुळे पक्षानेच या आमदारांना पक्षाला बाधक ठरू शकणाऱ्या कोणत्याही बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा आदेश दिला नसेल ना, अशी शंकाही काही जणांनी उपस्थित केली आहे. ∙∙∙
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मतदारसंघात प्रचार करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असते. मात्र, राजकीय पक्ष ऐनवेळी उमेदवारी जाहीर करतात आणि त्यामुळे उमेदवारांची धावपळ होते. कुंकळ्ळी मतदारसंघात मात्र तिघा इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाने अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केली नसली, तरी भाजपचे विशाल देसाई, काँग्रेसचे विद्यमान आमदार युरी आलेमाव आणि ‘स्वाभिमानी कुंकळ्ळीकर’ म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणारे, सध्या काँग्रेसमध्ये असलेले एल्विस गोम्स यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तिघेही इच्छुक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता यांपैकी कोणाला मतदारराजा हात देतो आणि कोणाला नारळ देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल! ∙∙∙
गोव्याच्या कृषी क्षेत्रात एका कृतीशील पर्वाची सुरुवात होत आहे. डिचोलीतील शेतकरी उत्पादक संघटना आधुनिक शेतीसाठी जर्मनीच्या कृषी पद्धतींचा अभ्यास करणार आहे. या शेतकरी उत्पादक संघटनेने ओसाड आणि पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आधुनिक यांत्रिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी पर्यटनाच्या संधींचा शोध घेतला जात आहे. जर्मन तज्ज्ञांनी डिचोलीत शेतकरी उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात जर्मनीतील आधुनिक कृषी पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण आणि पायाभूत सुविधांची उभारणी यांची माहिती देण्यात आली. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर ती हरितक्रांतीची सुरुवात ठरू शकते. हे लोण इतर तालुक्यांतही पोहोचायला हवे. फुले, फळे, धान्य आणि मसाल्यांच्या उत्पादनासाठी गोव्याने आत्मनिर्भर होणे अत्यंत गरजेचे आहे. डिचोलीने यासाठी एक उदाहरण घालून दिले आहे. ∙∙∙
कोलव्यात सध्या अंदर-बाहरचा खेळ जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होत असल्याचेही बोलले जाते. दिवाळीत मटका बंद असल्याने या खेळाला आणखी बहर येण्याची शक्यता आहे. पोलिसांना याची खबर नाही, असे म्हणणे धाडसाचेच! मग कारवाई का नाही? याचे उत्तर शोधताना हप्त्याच्या चर्चेपर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे या जुगाराच्या खेळात नेमका कोणाचा हात आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच! हा अंदर-बाहरचा खेळ आणखी किती काळ चालणार, याकडे मात्र कोलवावासीयांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
गेल्या वर्षी नरकासुर वधाच्या रात्री सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हातात हात घालून ऐक्याचे प्रदर्शन केले होते. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यानंतर विरोधकांच्या एकजुटीला तडे गेले. काही पक्षांत फूट पडली, काहींचे अध्यक्ष बदलले आणि परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप वाढले. आज ऐक्याची गरज असताना विरोधकांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत. आता चतुर्थी, नवरात्र आणि दसरा संपून दिवाळी आली आहे. या दिवाळीत तरी पोह्यांच्या विविध पदार्थांप्रमाणे विरोधक एका ताटात एकत्र येणार का? गोमंतकीयांना हाच प्रश्न पडला आहे.∙∙∙
काजूच्या टरफलाचे द्रवरूप आणि नैसर्गिक बांबूचे तंतू वापरून तयार केलेल्या मिश्रित पदार्थाने हलक्या वजनाच्या गोळीरोधक (बॅलिस्टिक) संरक्षणासाठी आशादायक क्षमता दाखवली आहे. प्रायोगिक चाचण्यांदरम्यान या पदार्थाने गोळ्यांचा आघात यशस्वीपणे रोखल्याचे दिसून आले . गौरीश सामंत यांनी यांत्रिकी अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांनी हा पदार्थ विकसित केला आहे. काजू प्रक्रिया उद्योगातील कचऱ्याचा उपयुक्त वापर करता येऊ शकतो हे या युवा संशोधकाने सिद्ध केले आहे. फणसापासूनही चिप्ससह अनेक पदार्थ तयार करता येतात आणि त्यातून उद्योग उभारता येऊ शकतात. मात्र, केवळ लिहिणे आणि बोलणे सोपे असते; त्यासाठी प्रत्यक्ष कृतीशीलता हवी! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.