खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Khari Kujbuj Political Satire: काणकोणच्या पिचवर खेळण्यास चेतन मंजू देसाई सज्ज झाले असून त्यांच्यापुढे अनुभवी राजकीय ‘स्पिनर’ रमेश तवडकर यांचे आव्हान असणार आहे.
Khari Kujbuj Political Satire:
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

शतक कोण ठोकणार, ‘बोल्‍ड’ कोण होणार?

काणकोणच्या पिचवर खेळण्यास चेतन मंजू देसाई सज्ज झाले असून त्यांच्यापुढे अनुभवी राजकीय ‘स्पिनर’ रमेश तवडकर यांचे आव्हान असणार आहे. आता या राजकीय पिचवर चेतन शतक ठोकतात की रमेश गुगली टाकून त्‍यांना बोल्ड करतात, हे बघावे लागणार. काँग्रेसच्या ‘गोंय राखण’ यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी चेतननी आपल्‍या खांद्यावर घेतली असल्याचे समजते. काँग्रेसनेही त्‍यांना ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे, आता पाहुया, चेतनची नवी इनिंग कशी होते?

प्रतिमा-सावित्री रमल्‍या आठवणींत

एकेकाळी प्रतिमा कुतिन्‍हो आणि सावित्री कवळेकर या दोघीही काँग्रेस पक्षात होत्‍या. त्‍यावेळी रस्‍त्‍यावर उतरुन आवाज उठविणाऱ्या महिला कार्यकर्त्या अशी ओळख त्‍यांनी बनविली हाेती. कालांतराने प्रतिमा आणि सावित्री या दोघीही काँग्रेसमधून बाहेर पडल्‍या. प्रतिमा व्‍हाया ‘आप’ करून पुन्‍हा काँग्रेसमध्‍ये आल्‍या असल्‍या तरी सावित्री अजूनही भाजपमध्‍येच आहेत. आठ वर्षांपूर्वी प्रतिमा व सावित्री या दोघींनीही पॅरा शिक्षकांवर होणाऱ्या अन्‍यायाविरोधात आवाज उठवत आंदोलनात सहभाग घेतला होता. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर गुन्‍हाही नाेंद झाला होता. या प्रकरणाच्‍या सुनावणीच्‍या निमित्ताने काल म्‍हापसा न्‍यायालयासमोर प्रतिमा आणि सावित्री दोघी पुन्‍हा एकत्र आल्‍या आणि दोघींनीही समदु:खी असल्‍याच्‍या आवेशात जुन्‍या आठवणींना उजाळा दिला.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

अंजलीताईंचा उभा सत्याग्रह

‘गोवा रक्षण’ यात्रेत पावलोपावली नवनवे राजकीय रंग भरले जात आहेत. फोंड्यात पाय घसरून हात फ्रॅक्चर झाल्याने डॉ. अंजलीताई निंबाळकर कुंकळ्ळीत प्लास्टर घातलेला हात गळ्यात अडकवून दाखल झाल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत दोन किलोमीटर चालण्याची जिद्द त्यांनी दाखवली; पण सभास्थळी पोहोचल्यावर खुर्च्यांवर नवख्या पदाधिकाऱ्यांनीच कब्जा केल्याचे म्हणतात. सहप्रभारी असूनही व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही आणि भाषणाच्या यादीतही नाव नाही. मग अंजलीताईंनी बसण्याऐवजी उभे राहूनच सत्याग्रह केला म्हणे. हाताला प्लास्टर, मनात राग आणि पदाला मान नाही, अशी तिहेरी कसरत करत त्यांनी अखेर खानापूरचा रस्ता धरला.

इति! स्‍नेहा उवाच...

अंगावर बुमरँग होणे म्‍हणजे काय, हे जर जाणून घ्‍यायचे असेल तर भाजपच्‍या महिला कार्यकर्त्या डॉ. स्‍नेहा भागवत यांच्‍याशी संपर्क साधावा लागेल. काँग्रेसचे खासदार बिमोल अकोईजम यांनी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्‍याचा आराेप करून भाजप महिला माेर्चाने सोमवारी देशभरात मोर्चे काढले. मडगावातही असा मोर्चा काढला असताना काही पत्रकारांनी मोर्चात सामील असलेल्‍या भागवत यांना, सध्‍या देशभरात पोलिसांनी आंदोलनात उतरलेल्‍या विद्यार्थिंनींचा विनयभंग केल्‍याची अनेक उदाहरणे असताना त्‍याविरोधात तुम्‍ही आवाज का उठविला नाही, असा प्रश्‍‍न केला. या अनपेक्षित प्रश्‍‍नाने त्‍या भांबावून गेल्‍या. ‘शरीराच्‍या खासगी अवयवांना जोपर्यंत हात लावला जात नाही, तोपर्यंत तो विनयभंग हाेत नाही’ अशा शद्बांत त्‍यांनी स्‍पष्‍टीकरण देण्‍याचा प्रयत्‍न केला. वास्‍तविक महिला आंदोलकांना हाताळायाचे असेल तर त्‍या जागी महिला पोलिसच असायला पाहिजेत, अशा सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या मार्गदर्शक सूचना असतानाही कित्‍येक ठिकाणी पुरुष अधिकाऱ्यांनी महिला आंदोलकांना हाताळल्‍याचे व्‍हिडिओ व्‍हायरल झाले आहेत. अशा परिस्‍थितीत स्‍नेहा भागवत यांचे हे विधान ऐकल्‍यास विरोधकांच्‍या हाती आयतेच कोलीत दिल्‍यासारखे झाले ना? या विधानामुळे महिला मोर्चाच्‍या गाेवा अध्‍यक्ष सुवर्णाताईही सध्‍या अडचणीत आल्‍या आहेत.

भाजपचे कुंकळ्‍ळीत प्रयोग?

‘इफ यू कान्ट बीट देम, देन जॉईन देम’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. भाजपसाठी कुंकळ्‍ळी मतदारसंघ आजपर्यंत हुलकावणी देत आला आहे. अपवाद राजन नाईक भाजपच्या तिकिटावर निवडून आले तो काळ. कुंकळ्‍ळीत ‘कमळ’ फुलणे जरा कठीणच, याची जाणीव भाजपलाही आहे. तेथे आपला आमदार निवडून येत नसेल तर समविचारी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपने यापूर्वी प्रयत्‍न केले आहेत. आता भाजपने आपल्या विरोधी गटातील उमेदवाराला काँग्रेसविरोधात उभा करण्यासाठी प्रयत्न चालविल्‍याची चर्चा आहे. काँग्रेसमधील एका नेत्याला बाहेरून पाठिंबा देऊन निवडून आणण्याची योजना भाजपने आखली आहे, अशी कुजबूज काँग्रेस गोटात सुरू झाली आहे.

युरींचे शक्तिप्रदर्शन यशस्वी

‘ज्याच्यासोबत जनता त्याच्याकडे सत्ता’ हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आता जनतेला आपल्याकडे कसे आकर्षित करावे याचा मंत्र प्रत्येक नेत्याकडे असायला हवा. विरोधी पक्षनेते व कुंकळ्‍ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आपल्‍या मतदारसंघात झालेल्या ‘गोंय राखण’ यात्रेत आपले शक्तिप्रदर्शन यशस्वी करून दाखविले. हजारोंच्‍या संख्येने मतदार या रॅलीत सहभागी झाले होते. युरी हे गोवा काबीज करायला निघाले आहेत. त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांना ‘युरी मुख्यमंत्री होणार’ अशी स्वप्ने पडत आहेत. मात्र कुंकळ्‍ळीत युरींची स्थिती कमजोर असल्याचा दावा विरोधक करत आहेत. काँग्रेस पक्षातीलच युरींचे काही विरोधक यात्रा फ्लॉप होणारा असा दावा करत होते. मात्र उद्या निकाल काहीही होवो, युरींनी तूर्त आपल्या विरोधकांची तोंडे बंद केली, हे मात्र खरे.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

प्रकरण मिटवण्यासाठी हातमिळवणी

पर्यटक पोलिस युनिटमध्ये कार्यरत असलेल्या आयआरबी जवानांची कथित अरेरावी आणि दादागिरी उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात, विशेषतः कळंगुट आणि बागा परिसरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकतीच बागा येथील प्रसिद्ध टिटोज् लेनमध्ये रात्रीच्या वेळी घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. साध्या वेशात असलेल्या काही आयआरबी पोलिसांच्या एका गटाने एका तृतीयपंथीयावर अचानक हल्ला चढवत त्याला काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीची ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच प्रकरण स्थानिक पोलिस आणि थेट स्थानिक लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचले. वाढता दबाव आणि प्रकरण आपल्यावरच शेकणार याची जाणीव होताच, संबंधित पोलिसांनी कारवाईपासून वाचण्यासाठी जखमी व्यक्तीची मनधरणी करत थेट आर्थिक तडजोडीचा मार्ग अवलंबल्याची आणि प्रकरण कसेबसे मिटवल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. आता तरी दादागिरी कमी होईल, ही अपेक्षा.

पाचवं वरीस धोक्याचं!

राजकारणात पाचवं वर्ष म्हणजे घोषणांचा पाऊस आणि आश्वासनांचा महापूर! साडेचार वर्षे शांत असलेले काही इच्छुक अचानक जनतेच्या प्रश्नांवर आवाज चढवू लागतात. कुणाला गावातील पाण्याची आठवण होते, कुणाला बेकायदेशीर विक्रेत्यांची, तर कुणाला विकासकामांची! कालपर्यंत जनतेच्या नजरेत न पडणारे नेते आता आंदोलनांच्या अग्रभागी आणि तिकिटांच्या शर्यतीत दिसू लागतात. गळ्याच्या शिरा ताणून भाषणे होतात, निवेदनांचा मारा सुरू होतो आणि सत्ताधाऱ्यांनाही अचानक जनतेच्या अडचणी दिसू लागतात. काही ठिकाणी नियमितीकरण, पेन्शन आणि इतर मागण्यांबाबत घोषणांनाही वेग येतो. पण मतदारही आता कमी हुशार नाहीत. पाच वर्षांत काम किती झाले आणि शेवटच्या वर्षात आश्वासनांचा आवाज किती वाढला, याची बेरीज त्यांना करता येते. खुर्चीला कायमची चिकटपट्टी लावली म्हणून ती कायमची आपली होत नाही! मतदानयंत्रावरील एक बटण सत्ताधाऱ्यांचे गणित बदलू शकते. म्हणूनच पाचवं वर्ष नेत्यांसाठी संधीचे असले, तरी मतदारांच्या परीक्षेत नापास होण्याचा धोकाही तितकाच मोठा आहे!

नाकापेक्षा मोती जड

निवडणुकीचा मुहूर्त जवळ येऊ लागला की समाजसेवकांचे पीक जोमाने बहरते! कालपर्यंत गावात शोधूनही न सापडणारे हवशे, नवशे, गवसे अचानक जनतेच्या सेवेसाठी धावू लागतात. प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांना आव्हान देण्यासाठी चार-पाच इच्छुक तयार, तर पक्षांच्या कार्यालयांत तिकिटासाठी रांगच रांग. काहींचा आत्मविश्वास इतका दांडगा की आमदारांनाच घरी बसवण्याची भाषा. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची अवस्था ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी झाली आहे. तिकीट द्यायचे कुणाला आणि नाराज होऊन दुसऱ्याच्या तंबूत जाणाऱ्यांना थांबवायचे कसे, हा मोठा प्रश्न. गोव्यात विजयाचा फरक कधी हजारांत, तर कधी शेकड्यांत असतो. त्यामुळे एखाद्या इच्छुकाची नाराजीही सत्तेचे गणित बिघडवू शकते. आता समाजसेवेचा हंगाम खरा की तिकिटासाठीचा, हे निवडणुकीनंतरच कळेल.

मॅडम, आम्ही कॉपी केली तर ते पाप?

‘फुडले जोत वता तशे फाटले जोत वता’ अशी कोकणीत एक म्हण आहे. परीक्षेत कॉपी करणे हा गुन्हा व पाप असल्‍याची शिकवण मुलांना लहानपणातच शाळेत दिले जाते. याचा अर्थ सगळेच विद्यार्थी संत असतात व कॉपी करत नाहीत असे नाही. गोव्यातील एका शाळेत एक असाच मजेशीर मात्र विचार करण्यासारखी कॉपी करण्याची घटना घडली. शिकण्यात कमजोर असलेल्या विद्यार्थ्याने म्हणे परीक्षेवेळी कॉपी आणली होती. शिक्षिकेने त्या मुलाची कॉपी पकडली. प्रकरण मुख्याध्यापक मॅडमकडे पोहोचले. मॅडमने पालकांना बोलावले. त्या विद्यार्थ्याला दम दिला. पाप-पुण्याचे डोस पाजले. गुन्ह्याची जाणीव करून दिली.मात्र जाता जाता त्या मुलाने शिक्षकांना व मुख्याध्यापकांना केलेला प्रश्न विचार करण्यासारखा होता. ‘‘मॅडम, जर आयआयटीत शिकणारे अतिहुशार व बुद्धिवान विद्यार्थी कॉपी करत असतील तर आम्ही बोंड्यांनी (शिक्षणात ‘ढ’) कॉपी केली तर ते कसले पाप?’’.

लुथरांची वेगळी बाजू

लुथरा बंधूंची उच्च न्यायालयाच्या आवारात एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. एका आदरार्थी व्यक्तीच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेताना त्यांनी आजूबाजूला कोण उभे आहेत, वकील पाहत आहेत की नाहीत किंवा सामान्य जनता काय म्हणेल, याचा विचार केला नाही.आता आरोप कितीही गंभीर असोत, त्यांचा निकाल न्यायालयच ठरवेल; पण या एका कृतीने उपस्थितांमध्ये मात्र चर्चेला नवा विषय मिळाला. काहींनी संस्कारांचे कौतुक केले, तर काहींनी मिश्किलपणे म्हटले, ‘न्यायालयात कायद्याची लढाई सुरू असली, तरी संस्कारांची बाजू मांडायला विसरले नाहीत!’ अखेर माणसाची प्रत्येक बाजू सारखीच असेल असे थोडेच आहे. लुथरा बंधूंची ही बाजूही चर्चेत राहिली, हे मात्र नक्की!

Khari Kujbuj Political Satire:
Goa Assembly Women Representation: गोवा विधानसभेत महिलांचा आवाज आहे कुठे?

बोलक्या फलकाची चर्चा

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकावर भाजप प्रदेशाध्यक्षांचे छायाचित्र नाही आणि पक्षाचे चिन्हही गायब! त्यामुळे हा शुभेच्छांचा बॅनर आहे की राजकीय अंतर दाखविणारा फलक, असा प्रश्न पडल्यास नवल नाही. सणांच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना पक्षाची आठवण झाली नाही की जाणीवपूर्वक टाळली, हे मात्र आर्लेकरच सांगू शकतील. राजकारणात कधी छायाचित्रे बोलतात, तर कधी छायाचित्र नसणेही बरेच काही सांगून जाते!

खुर्ची बदलली की...

उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकपदी बिगरगोमंतकीय आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका जवळ आल्या की आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने वाढणार, हे प्रशासनाला ठाऊक आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती हाताळण्यासाठीच ही नियुक्ती केली का, असा सवाल उपस्थित होत आहेत. उद्या एखादे आंदोलन पेटले, तर निर्णय घेण्याची जबाबदारी नव्या अधिकाऱ्याची आणि त्यावर चर्चा करण्यासाठी लोक मोकळे! आता ही शक्कल प्रशासनाची की मंत्रालयातील रणनीतीकारांची? अर्थात, नियुक्तीमागचं खरं गणित संबंधितांनाच ठाऊक; पण पोलिस अधीक्षकांची खुर्ची बदलली आणि राजकीय चर्चांना मात्र नवी दिशा मिळाली.

नवरंग महापौरांचे, डोकॅलिटी कोणाची?

महापौर रोहित मोन्सेरात यांचे समाजमाध्यमांवरील पेज सध्या नवरंगात न्हाऊन निघत आहे. ‘नाईन शेड्स ऑफ पणजी’ या उपक्रमातून दररोज एका रंगाला साजेशी पणजीतील इमारत छायाचित्रांतून दाखवली जात आहे. पहिल्या दिवशी केसरी रंगात मारुतीगडावरील मंदिर, दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगात सांतिनेजचे गणेश मंदिर आणि तिसऱ्या दिवशी कला अकादमी! पणजीच्या इमारतींना रंगांचे लेबल लावण्याची ही कल्पना भन्नाटच! आता उरलेल्या सहा रंगांत कोणत्या वास्तू न्हाऊन निघणार, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, या कल्पनेचे श्रेय महापौरांना द्यायचे की पडद्यामागील कल्पक सल्लागाराला, यावरच खरी कुजबुज सुरू आहे. कारण राजकारणात फोटो कुणाचा, पोस्ट कुणाची आणि डोकॅलिटी कुणाची, याचा हिशेब कधीच सरळ नसतो!

इच्छुकांचे टोचले कान

भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी गोव्यात येऊन आमदार, मंत्री आणि पक्षसंघटनेचा आढावा घेतला. या बैठकीत पक्षांतर्गत इच्छुकांकडून विद्यमान आमदारांविरोधात सुरू असलेल्या कुरबुरींचीही दखल घेण्‍यात आली. इच्छुकांनी पक्षाचे काम जरूर करावे; पण आपल्या आमदारांविरोधात जाहीरपणे बोलणे टाळावे, असा कानमंत्र त्‍यांनी दिला. तिकीट कुणाला द्यायचे, हा निर्णय होईपर्यंत विद्यमान आमदारांविरोधात ‘ब्र’ही काढू नका, असा संदेश गेल्याने काही आमदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नीलेश काब्राल, गणेश गावकर, राजेश फळदेसाई, प्रवीण आर्लेकर यांच्या गोटातही त्यामुळे दिलासा मिळाला आहे म्‍हणे. पक्षश्रेष्ठींचा संदेश स्पष्ट आहे, ‘तिकिटासाठी स्पर्धा करा, पण घरातील भांडण चौकात आणू नका’. आता इच्छुकांनी तोंडाला कुलूप लावायचे की मनातला असंतोष मतदानाच्या दिवशी व्यक्त करायचा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Water Crisis: आज पाणी वाहून जातेय, उद्या थेंबासाठी वणवण! संभाव्य पाणीटंचाईवर आताच नियोजन करा

दहावा रंग चेहऱ्यावर खुलू दे

नवरात्रीत सरकारी कार्यालयांत नजर टाकली की नऊ रंगांची उधळण दिसते. कुणाची पांढरी साडी, कुणाचा लाल सदरा, तर कुणाचा निळा पेहराव! वातावरण प्रसन्न होते; पण या नऊ रंगांत एक रंग मात्र अनेकदा हरवलेला दिसतो, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य! कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला दोन प्रेमाचे शब्द, गरजूला योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येकाच्या कामाची अगत्याने विचारपूस, हाच खरा दहावा रंग. नवरात्रोत्‍सव संपला की नऊ रंग कपाटात जातील; पण दहावा रंग वर्षभर चेहऱ्यावर राहिला तर? संत कबीरांनी मनाच्या बदलत्या रंगांविषयी सांगितलेच आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आता कपड्यांचे रंग बदलण्याबरोबर कामाची वृत्तीही बदलावी. कारण नागरिकांना कार्यालयात रंगीत कपडे पाहण्यापेक्षा आपले काम हसतमुखाने होणे अधिक महत्त्वाचे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com