

भाजपमध्ये उमेदवारांची झुंबड, विरोधकांत गटबाजीचा गोंधळ
निवडणुकीच्या चर्चांना सध्या चांगलाच रंग चढलाय. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली असून, एका जागेसाठी दोन-दोन, तीन-तीन इच्छुकांची रांग लागलीय. ज्येष्ठ नेत्यांचे दौरे आणि त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्याचे सत्र सुरू आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ, तर विरोधकांमध्ये मात्र एकमेकांचे पाय ओढण्याची धावपळ! इकडे ‘मला तिकीट, तुला प्रतीक्षा’ तर तिकडे ‘तुझे माझे जमेना’ अशी कसरत. विरोधकांची एकजूट कागदावरच राहिली, तर भाजपला प्रचारापेक्षा विरोधकांच्या भांडणाचाच जास्त फायदा होईल, आता विरोधक एकत्र येणार की भाजपला आयतीच संधी देणार, याचीच उत्सुकता आहे!
पाटकर-पिंटी लागले कामाला
जो जनतेच्या संवादात राहतो, त्यालाच लोकप्रतिनिधी बनण्याची संधी प्राप्त होते. कुडचडे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर विद्यमान आमदार नीलेश काब्राल व रोहन गावस देसाई यांनी दावा सांगितला आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष पिंटी ऊर्फ बालकृष्ण होडारकर व काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आपला दावा सोडलेला नाही. शिवाय पक्षाचे माजी नगरसेवक पुष्कल सावंत यांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे. एक मात्र खरे पाटकर व पिंटी यांनी कुडचडेत आपल्या कार्याची सुरुवात केली आहे. पिंटी सध्या मतदारसंघातील विविध शैक्षणिक संस्थांतील ‘ड’ वर्गीय कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात व्यस्त आहेत. तर, पाटकर शालेय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सच्या घातक दुष्परिणामांबद्दल जागृती करण्यात व्यस्त आहेत. पाटकरना त्यांच्या जुन्या चाहत्यांनी अजूनही वाऱ्यावर सोडलेले नाही. ते त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. एकंदर, काँग्रेसची उमेदवारी मिळो अथवा ना मिळो, अमित व पिंटी रिंगणात उतरणार, असे संकेत मिळत आहेत.
आणि तो पुन्हा स्कुटरवर!
कृषी खात्याच्या दोन-दोन गाड्या दिमतीला असल्याने कुशावती जिल्ह्यातील एक कृषी अधिकारी सरकारी गाडी वापरून स्वत:च्या बा०यकोच्या नावावर सुरू असलेल्या एजन्सीच्या पॉलिसी करण्यासाठी फिरताे ही बाब ‘खरी कुजबूज’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर व्हायचा तो गदारोळ झालाच. ही बातमी वरपर्यंत गेल्याने वरिष्ठांकडून तंबी मिळाल्याने गाडी घेऊन फिरणारा तो अधिकारी पुन्हा म्हणे स्वत:ची स्कूटर घेऊन फिरू लागलाय. या अधिकाऱ्याचे आणखीही काही पराक्रम सध्या चर्चेत आहेत. त्याला आणखीही काही शौक आहेत. अशाच एका शौकात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची बदली करण्यात आली हाेती. मात्र कुणाचे तरी हात-पाय धरून सध्याच्या पदावर तो रुजू झालाय. मात्र या नव्या प्रकारामुळे त्याच्या जुन्या गोष्टींनाही उजाळा मिळू लागला आहे.
पुरावे हाती आले?
‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर यांच्यातील शाब्दिक युद्ध आता कायदेशीर वळणावर पोहोचले आहे. सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांनंतर नोटीस पाठवण्याची भाषा सुरू झाली की कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी होतेच. यापूर्वीही दोन्ही बाजूंनी कायदेशीर कारवाईचे इशारे दिले; पण पुढे नेमके काय झाले, याबाबत स्पष्टता नसल्याने चर्चांना उधाण आले. आता बोरकर यांनी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितल्याने, यावेळी प्रकरण खरोखर पुढे जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. खोलकर यांच्या खजिनदारपदाच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांचे पुरावे हाती लागल्याचीही राजकीय वर्तुळात कुजबूज आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे प्रश्न तोच, यावेळी नोटीस प्रत्यक्ष पोहोचणार, की आरोप-प्रत्यारोपांचे नाटक पुन्हा नव्या अंकात रंगणार?
‘सनबर्न’चे पैसे गेले कुठे?
पेडण्यात सध्या विधानसभा उमेदवारीपेक्षा पैशाचाच विषय अधिक चर्चेत आला आहे. सनबर्न या संगीत महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने आरोप प्रत्यारोप रंगू लागले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचेही प्रकार आहेत. कोणी हे पैसे घेतले ते सांगा, म्हणून ललकारू लागले आहेत तर काहीजणांनी सनबर्नचा विषय आता मागे पडला, असे सांगत पांघरुण घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. निवडणूक जवळ येत जाईल तशी यात गुंतलेल्यांची नावे कोणाच्या तरी तोंडात येतील काय, याकडे मात्र जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
‘चणक’साठी कायपण!
मत्स्योद्योग खात्याने चणक माशाच्या विक्रीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अनेकांनी वाट वाकडी करत जुने गोवे गाठले. केवळ ५०० रुपये किलो दराने चणक मिळते हे आकर्षण होतेच पण जोडीला ताजे फडफडीत चणक मिळणार हे मधाचे बोट होतेच. त्यामुळे मत्सोद्योग खात्याच्या अपेक्षापेक्षा मोठा प्रतिसाद या विक्रीला लाभला आणि लोकांनी चणकसाठी रांगा लावल्या. मासळी बाजारात चणकला एवढी मागणी असेल, याचा खात्यालाही अंदाज आला नसेल! महागाईच्या काळात पाचशे रुपये किलोचा चणक खरेदी करण्यासाठीही लोकांची गर्दी होत असेल, तर चणक आता केवळ मासळी राहिलेली नाही, तर प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. बाकी, चणक खाणाऱ्यांच्या खिशाला काटा लागला तरी चवीपुढे पैशाचे काय!
रजा कर्मचाऱ्यांची अडवली, शिक्षा ‘साहेबांना’ मिळाली!
कर्मचाऱ्यांना सतत त्रास देणे आणि हक्काची रजा नाकारणे एका पोलिस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. वारंवार विनंती करूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना रजा मिळत नव्हती. ही स्थिती समजून घेत, अधीक्षकांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केली. मात्र, वरिष्ठांनी रजा मंजूर केल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकाने त्या कर्मचाऱ्यांना कामावरून सोडण्यास थेट नकार दिला. यावरून पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. वरिष्ठांच्या आदेशाला उघड आव्हान देणे या निरीक्षकाला चांगलेच भोवले असून, संतापलेल्या अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारत तडकाफडकी त्याची रवानगी एका तपासाच्या कामासाठी थेट शिलाँगला केली. कर्मचाऱ्याची रजा अडवण्याच्या नादात स्वतःवर ही वेळ ओढवल्याने सध्या गृहविभागासह पोलिस खात्यात हा प्रकार चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
संकेत पुन्हा सेंटर स्टेजवर
सावर्डे मतदारसंघातून भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी युवा नेते संकेत आर्सेकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक रविवारी कुठला ना कुठला कार्यक्रम आयोजित करून मतदारसंघातील युवा कार्यकर्त्यांना आपल्याजवळ ओढण्याचे त्याचे प्रयत्न चालूच असतात. त्यामुळे संकेतच्या घरी नेहमीच गर्दी दिसते. मात्र याच मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर इतरांनीही दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार हा प्रश्र्न अंधातरी आहे. अशा परिस्थितीत काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे पणजीत झालेल्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतानाचा संकेत आर्सेकरांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांच्यामागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेसुद्धा दिसतात. त्यामुळे संकेत पुन्हा एकदा सेंटर स्टेजवर आला आहे, असे त्यांचे कार्यकर्ते म्हणू लागले आहेत.
भूमिपूजनांचा धुरळा, कामांचा पत्ताच नाही
मडगावकरांना विकास हवा आहे, भूमिपूजनांचे सोहळे नकोत. निवडणुकीचा हंगाम जवळ आला की पार्किंगपासून नगरपालिका इमारतीपर्यंत विकासाच्या घोषणा आणि नारळ फोडण्याची लगबग सुरू होते. पण नारळ फुटल्यानंतर कामाचे श्रीफळ प्रत्यक्षात कधी मिळणार, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नसते! पार्किंगचा प्रश्न वर्षानुवर्षे नागरिकांना सतावतोय, तर पालिका इमारतीत दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचे प्रश्नही कायम आहेत. दरवाजे, खिडक्या, दिवे बदलण्यापासून निकामी कपाटे हटवण्यापर्यंत अनेक कामे प्रलंबित असताना विकासाच्या गप्पांना मात्र तोटा नाही. आता मडगावकरांनाही भूमिपूजनाच्या फोटोंपेक्षा प्रत्यक्ष कामाचे फोटो पाहायचे आहेत. कारण नारळ फोडून विकास होत असता, तर मडगावचा चेहरामोहरा केव्हाच बदलला असता!
लोकशाहीतील घुसळण व चघळण
गोव्यात निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे. ॲथलेटिक्समधील गड्यांना लाजवेल अशा अनपेक्षित, धक्कादायक लांब उड्या, उंच उड्या या पक्षातून त्या पक्षात मारल्या जात आहेत. हळूहळू त्या आणखी वाढतील. निष्ठा गेली चुलीत! प्राप्त परिस्थितीत कोण कुठल्या पक्षात असेल, हे कोणालाच माहीत नाही. तरीही प्रचाराची सरगर्मी, पार्ट्या, सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले की गंमत वाटते. आदू, सदू, दादू हे सगळ्या राजकीय पार्ट्यांच्या चिकन पार्ट्यांमध्ये स्वतःला निःपक्ष म्हणत हजर असतात. सरगर्मीयांमुळे त्यांना चघळण व रवंथ करायला उद्योग मिळतो.
नाक्या-नाक्यावर हप्ता!
गोव्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी होते की खिशांची, असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना पडू लागलाय. भाजी, दूध, खडी घेऊन येणाऱ्या वाहनांना अडवायचं आणि ‘चिरिमिरी’ घेतल्याशिवाय पुढे जाऊ द्यायचं नाही, अशीच जणू काही अलिखित नियमावली. मोले आणि पत्रादेवी चेकनाक्यांवरील दक्षता खात्याच्या कारवाईने या चर्चेला चांगलाच ऊत आलाय. या वसुलीचा भार शेवटी व्यापारी ग्राहकांवर टाकत असतील, तर महागाईच्या बिलात या ‘हप्त्याचाही’ वाटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न एवढाच, दोन नाक्यांवर कारवाई झाली, पण बाकीच्या नाक्यांवरील ‘दुकानदारी’ कधी बंद होणार? की तिथे अजूनही वसुलीचा धंदा बिनबोभाट सुरूच राहणार?
सांस्कृतिक भूक जिरतेय?
गोव्यात सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा इतका सुकाळ आहे की, आयोजकांना रसिकांची आठवण राहते की नाही, हाच प्रश्न पडावा. संगीत संमेलने, पुस्तक प्रकाशने, व्याख्याने... सगळीकडे मंचावर मान्यवरांची मांदियाळी; पण खुर्च्या मात्र रिकाम्या! कॅमेऱ्यांचा रोखही मंचावरच, त्यामुळे मंडपातील शुकशुकाटाची कुणाला खबरच नाही. कार्यक्रमाचा दर्जा उत्तम, आयोजकांचा उत्साह दांडगा; पण दर्दी रसिकांनीच पाठ फिरवली तर सांस्कृतिक भूक भागणार कशी? हातातल्या स्मार्ट फोनवर मनोरंजनाचा महापूर वाहतोय, मग प्रत्यक्ष कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनीही काहीतरी नवे शोधायला नको? नाहीतर मंचावर टाळ्या वाजवणारे दहा-बाराजण आणि खाली रिकाम्या खुर्च्याच एकमेकांचे कौतुक करत राहतील!
सुदिनमुळे आशा पल्लवित
मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी आमदारांच्या पक्षांतराविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवल्याने पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पक्षांतर केलेल्यांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या, हा त्यांचा सल्ला अनेक पदाधिकाऱ्यांना चांगलाच भावलाय. त्यातच मगोने बारा मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरू केल्याने इच्छुकांच्या आशांना नवे धुमारे फुटलेत. आता भाजपसोबत युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची संधी मिळेल आणि आपलीही वर्णी लागेल, अशी स्वप्ने काहीजण रंगवू लागले आहेत. सुदिन यांचा पक्षनिष्ठेचा मंत्र ऐकून कार्यकर्ते खूश आहेत; पण उमेदवारीच्या वेळी हा मंत्र प्रत्यक्षात उतरतो की युतीच्या गणितात विरून जातो, हे पाहणेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
पाण्याची नासाडी
पेठेचावाडा-कोरगाव रस्त्यावर गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची नासाडी सुरू आहे. मात्र, संबंधित यंत्रणेच्या कानावर अद्याप पाणी पडलेले दिसत नाही. रस्त्यावर पाणी वाहून जात असताना ते रोखण्यासाठी कुणी पुढे येत नाही. ‘पाणी वाचवा, पाणी जपून वापरा’ असे संदेश देणाऱ्या यंत्रणांना प्रत्यक्षात वाहून जाणारे पाणी दिसत नसावे. पंधरा दिवसांत गळती रोखता येत नसेल, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेची गळती किती मोठी आहे, याचा अंदाज यावरूनच यावा!
स्वच्छतागृह शोधा, सभ्यतेचा पत्ता द्या
मॉलमध्ये खरेदी, हॉटेलमध्ये मेजवानी, पेट्रोलपंपावर इंधन आणि व्यापारी संकुलात व्यवहार...सगळ्या सुविधा झकास. पण नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह विचारले, की काही ठिकाणी व्यवस्थापनाची मात्र बोलती बंद. ग्राहकांकडून पैसे घेताना तत्पर असणाऱ्यांना त्यांची मूलभूत गरज भागवण्यासाठी सुविधा देण्याचा विसर कसा पडतो? स्वच्छतागृह ही चैन नसून गरज आहे, हे काही आस्थापनांना कोण समजावणार? इमारतींची उंची वाढली, सजावट महागली; पण माणसाच्या मूलभूत गरजांचा विचार मात्र खुजाच राहिला. आता अशा आस्थापनांना एकच सांगावेसे वाटते, फक्त इमारती चकचकीत असून चालत नाही, माणुसकीची व्यवस्थाही स्वच्छ हवी!
कार्यकर्ता म्हणून जगावे, कार्यकर्ता म्हणून मरावे?
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, उद्योजकाचा मुलगा उद्योजक, वकिलाची मुले वकील होतात, तर राजकारण्याच्या मुलाने राजकारणात आले तर काय बिघडले? असा दावा राजकारणात ‘फॅमिली राज’ आणणारे राजकारणी करतात. जर एकाच घरात दोन-दोन, तीन-तीन आमदार झाले, तर मग सामान्य कार्यकर्त्यांचे काय? कार्यकर्त्याने कार्यकर्ताच म्हणून जगावे आणि कार्यकर्ताच म्हणून मरावे का? यावर आता समाजमाध्यमांवर चर्चा व्हायला लागली आहे. ‘कार्यकर्ता मी कार्यकर्ता’, असे म्हणून राजकीय कार्यकर्त्याने केवळ पालखीचे भोई व्हावे, नेत्याचे बॅनर लावणे, हातात झेंडे घेऊन रॅलीत चालणे, एवढेच काम काय त्याचे? असा प्रश्न आता निष्ठावान कार्यकर्ते विचारायला लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.