

कार्यकर्त्यांना तिकिटाची आस
राधाराव ग्रासियस यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून किती कार्यकर्त्यांना या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाऱ्या मिळणार आहेत, असा प्रश्न विचारला आहे. निवडणूक लढविण्याच्या हव्यासानेच अनेकजण कार्यकर्तेपण करतात, अशी मल्लीनाथी करायलाही ते विसरलेले नाहीत. मध्यंतरी काही कार्यकर्ते काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांची आघाडी बनवावी म्हणून दबाव गटासारखे कार्य करीत होते. त्यातही आपल्या काहींना तिकिटे मिळावीत असा हेतू असणार. कारण यापैकी काहींनी गेल्या निवडणुकीत उभे राहाण्याचीही उमेद भागवून घेतली. त्यात त्यांना गंभीर अपयश आले ही गोष्ट वेगळी! त्यामुळे आता काँग्रेसने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी या अनेकांची इच्छा आहे. राधाराव यांनी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे नाव सुचविले आहे. फोन्सेका ज्ञात कम्युनिस्ट आहेत. ते कधी भाजपात जाणार नाहीत. तरी काँग्रेस त्यांचा विचार करील काय?
सगळे काही नुवेतून!
नुवे मतदारसंघात एसटी मतदारांची संख्या कमी असतानाही हा मतदारसंघ एसटीसाठी राखीव करण्याची शिफारस भाजप सरकारने केली आहे. सध्या काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काही ‘बिग बॉस’ना या मतदारसंघाची दारे कायमची बंद व्हावीत, यासाठी ॲलेक्स सिक्वेरा यांनीच दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, सरकारने केलेली जनगणना योग्य नसल्याचा दावा करत आरक्षण प्रक्रियेला आव्हान देणारी याचिकाही नुवेतील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका दाखल करण्यामागे काँग्रेस उमेदवारीवर दावा करणाऱ्या एका धनाढ्याचा हात असल्याचा दावा राधाराव करत आहेत. एकूणच, सध्या राज्यातील सगळ्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू नुवेच ठरला आहे, एवढे मात्र नक्की!
आता सायबर भामटेही
रस्त्यावरील वाहतूक पोलिस वाहन चालकांना लुबाडतात अशा तक्रारी वाढल्यानंतर दंड ठोठावण्याचे अधिकार केवळ निरीक्षकांना आणि अपवादात्मक स्थितीत उपनिरीक्षकांना सरकारने दिले. आता ई-चलनाच्या नावाखाली सायबर भामटेही आता वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वसुलीला उतरले आहेत की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. बनावट संकेतस्थळे आणि खोट्या पेमेंट लिंकद्वारे वाहनचालकांच्या खिशावर डल्ला मारला जात असल्याने परिवहन संचालनालयाला नागरिकांना सावध करण्याची वेळ आली आहे. सरकारी चलन भरण्यासाठीही आता आधी संकेतस्थळ खरे की खोटे, याची खातरजमा करावी लागते. नियमभंगाचा दंड भरण्याआधी फसवणुकीचा दंड भरावा लागू नये, एवढीच काळजी वाहनचालकांनी घ्यावी!
वर्ग मोफत, संपर्क मात्र राजकीय?
सरकारी नोकरीची संधी साधत अनेक मतदारसंघांत मोफत स्पर्धा परीक्षा वर्गांचे पेव फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि इच्छुक नेते युवकांना मार्गदर्शनाचा हात देत आहेत. वरकरणी हा उपक्रम सामाजिक जाणिवेतून सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे राजकीय गणितेही शिजत असल्याची चर्चा आहे. परीक्षेच्या निमित्ताने तरुणांशी ओळख, त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोच आणि त्यातून तयार होणारा जनसंपर्क... असा हा सारा मामला! युवकांना करिअरची दिशा देतानाच स्वतःच्या राजकीय वाटचालीचीही पायाभरणी केली जात आहे का? मोफत वर्गांच्या या उपक्रमांमागे सेवाभाव अधिक की राजकीय संपर्काची मोर्चेबांधणी, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नावेली मतदारसंघात उमेदवारीचा गोंधळ!
नावेली मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू, असा पण काँग्रेसने केल्याचे सांगितले जाते. मात्र, उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसची उमेदवारी आपली कन्या वालांका आलेमाव हिला मिळावी, यासाठी चर्चिल आलेमाव यांनी नेटाचे प्रयत्न चालवले असतानाच दुसरीकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य सिप्रू कार्दोज यांनी काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच निश्चित झाल्याचे सांगत प्रचारही सुरू केला आहे. त्यातच प्रतिमा कुतिन्हो याही ‘लाईट आमगेली डिस्को नाचोता’ म्हणत उमेदवारीसाठी पिंगा घालत आहेत. हा सारा गोंधळ पाहून उल्हासराव मात्र गालातल्या गालात हसत आहेत!
रोहित यांची तयारी जोमात!
आगामी विधानसभा निवडणूक रोहित मोन्सेरात भाजपच्या उमेदवारीवर ताळगाव मतदारसंघातून लढणार, यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. जेनिफर मोन्सेरात यांच्यानंतर या मतदारसंघाचे दायित्व त्यांच्याकडे जाणार, हे स्पष्ट मानले जात आहे. त्यानुसार त्यांचे वडील आणि सध्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे रोहित यांनी सध्या ताळगावातील समस्या जाणून घेण्यास आणि पंचायतींना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, ताळगावचे पंचसदस्य आग्नेल दा कुन्हा आणि माजी सरपंच जानु रुझारिओ यांच्यासमवेत शाळा तसेच परिसरातील पायाभूत सुविधांची पाहणी केली. या हालचालींवरून रोहित यांची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी जोरात सुरू असल्याचे दिसून येते.
उशिरा आलेलं शहाणपण!
‘शिवनेरी’ फेरीबोटीच्या हायड्रॉलिक गिअर बॉक्समध्ये मुलीचे केस अडकले आणि एकच धावपळ उडाली होती. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत गिअर बॉक्स बंद केला आणि उपस्थितांच्या मदतीने मुलीची सुटका झाली. या घटनेचे व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. पण खरी गंमत पुढेच आहे! इतके दिवस उघडा असलेला गिअर बॉक्स कुणाच्याच नजरेस कसा पडला नाही? दुर्घटना घडल्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी गिअर बॉक्स झाकण्याची तत्परता दाखवण्यात आली. म्हणजे धोका आधीपासूनच होता, पण उपायासाठी एखादी घटना घडण्याचीच वाट पाहिली जात होती का? आता इतर फेरीबोटींच्या बाबतीतही असेच काही घडण्याची वाट पाहणार की संबंधित खाते जागे होऊन इतर फेरीबोटींची तपासणी करणार?
आजच्या आमसभेचे इतिवृत्त
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची आमसभा आज, शनिवारी होईल व त्यात सत्ताधारी भाजपाच्या युतीच्या प्रश्नावर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. पक्षाचे प्रमुख सुदिन ढवळीकर गेल्या आठवड्यात पक्षाला हव्या असलेल्या जागा यासंदर्भात बोलले आहेत व त्यासंदर्भात आमसभेला विचारूनच निर्णय होईल असे जाहीररीत्या सांगताहेत. आमसभेची तयारीही जय्यत सुरू आहे आणि लॉबिंगही चालू आहे, परंतु सर्वांना माहीत आहे, शेवटी आमसभेत सुदिनरावांना हवे आहे तेच होईल. भाजपासोबत जाण्याचा ठरावही मंजूर होईल, परंतु यापेक्षा आणखी एक ठराव महत्त्वाचा आहे. तो आहे सुदिनपुत्राला मडकईमध्ये उमेदवारी देण्याचा! सांगण्यात येते त्यानुसार फोंडा व आसपासच्या मगोपच्या अनेक नेत्यांच्या सहीनिशीएक ठराव तयार करण्यात आला असून तो मिथिल ढवळीकर यांना मडकईतून उमेदवारी देण्यासंबंधी आहे.
मुळापर्यंत कोण जाणार?
करासवाड्यात चॉकलेटची १४० खोकी, किंमत अवघी ४० हजार रुपये! अन्न व औषध प्रशासनाने ती नष्ट करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे दाखवून दिले. मात्र, ही चॉकलेट बाजारात पोहोचेपर्यंत तपासणी यंत्रणा नेमकी कुठे होती, हा प्रश्न अनुत्तरितच! गोड पदार्थांच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असेल, तर प्रशासनाने केवळ खोकी नष्ट करण्यापेक्षा अशा मालाला बाजारात येऊ देणारी साखळीच शोधून काढावी. नाहीतर कारवाईचा गोडवा फक्त प्रसिद्धीपत्रकापुरताच राहील!
सारे माझेच, मग गटबाजी कशाला?
मडकई मतदारसंघातील काही पंचायतींमध्ये अलीकडेच सरपंच-उपसरपंच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पंचायत पातळीवरील राजकारणही तापलेले दिसते. याच पार्श्वभूमीवर बांदोडा पंचायत सभागृहाच्या उद्घाटनावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पंचसदस्यांना कानपिचक्या दिल्या. ‘सारे माझेच पंचसदस्य; पण गटबाजी चालते. मी त्यात पडत नाही. गटबाजी करू नका, काय ते स्पष्ट बोला आणि त्यानुसार कृती करा,’ असा सल्ला त्यांनी दिला. ढवळीकरांच्या या सल्ल्यानंतर तरी पंचायतींमधील गटबाजी थांबणार की राजकारणाचा खेळ असाच सुरू राहणार, हे पाहावे लागेल!
उड्डाणपुलांच्या कथा
अनेक दशकांनंतर राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील बांबोळी येथे पादचारी उड्डाणपूल उभारण्याचे शहाणपण प्रशासनाला सुचले. यामुळे ‘फुलांचो खुरिस’ तसेच मानसोपचार रुग्णालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुविधा होणार आहे. या पादचारी उड्डाणपुलात लिफ्ट, एस्केलेटर, जिने तसेच तळमजल्यावर स्वच्छतागृहांची सुविधाही असेल. हे काम आता १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. बांबोळीचा पादचारी उड्डाणपूल प्रामुख्याने पोलादाचा असून, तो आरसीसी खांबांवर उभारण्यात आला आहे. अलीकडेच बांधण्यात आलेला ५.१ किलोमीटर लांबीचा सहापदरी पर्वरी उड्डाणपूल ६४१ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आला आहे. त्यामध्ये स्पॅन, खांब, पोलाद, सिमेंट, काँक्रीट, डांबर अशा विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. दुसरीकडे, बांबोळी पुलासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाकडे लोक भुवया उंचावून पाहत आहेत.
विरोधी नेत्याचा अवमान
विरोधी नेते युरी आलेमाव हे वास्कोला अग्निकांडाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांची अडवणूक करण्यात आली व उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोणताही भाव दिला नाही, आपल्या मोटारीतूनच बसून राहून काचा अर्धवट उघडून त्यांच्याशी बोलले ही गोष्ट विरोधी नेत्याचा अवमान करणारी ठरली आहे. सरकारी अधिकारी सत्ताधाऱ्यांचे शागीर्द असल्यासारखे वागतात, ही बाब त्यामुळे चव्हाट्यावर आली. परंतु त्यानिमित्ताने बाबू नायक, जल्मी, खलप, मनोहर पर्रीकर ही मंडळी विरोधी नेतेपदी असताना प्रशासकीय अधिकारी त्यांना चळाचळा कापत हे वास्तव लपत नाही. बाबू नायक, पर्रीकर स्वतःची वैयक्तिक कामे घेऊन कधीच अधिकाऱ्यांकडे, नेत्यांकडे गेले नाहीत. नोकऱ्या देण्यासाठी काही मंत्री स्वतःहून पर्रीकरांकडे संपर्क साधत. त्यांनी तशी प्रतिष्ठाही कमावली होती! एकेकाळी विरोधी नेत्याचा आम जनतेला प्रचंड आधार, विश्वास वाटत होता.
सुरक्षा रक्षक असूनही
गोवा मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीतील ‘युरोलॉजी’ विभागाबाहेर रुग्णांची प्रचंड गर्दी आणि तणावपूर्ण वातावरण असतानाही अर्चना वीरेंद्र तळकर या महिला सुरक्षा रक्षक आपल्या प्रेमळ वागणुकीने सर्वांना दिलासा देतात. रुग्णांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांचा संयम टिकवून ठेवणे आणि गरजूंना स्वतःहून मदतीचा हात देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य. कर्तव्य बजावताना माणुसकी जपली तर रुग्णालयातील वेदनादायी प्रवासही काहीसा सुसह्य होतो, हे अर्चना ताई आपल्या कृतीतून दाखवून देतात.
अर्जामध्ये कोणाचे हितसंबंध?
ज्यांनी मुंबईचा वकील आणून आदिवासींना मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाला विरोध केला, त्यांना स्वतःला ही निवडणूक लढविण्यात स्वारस्य नाही, परंतु राजकीय भाष्यकार राधाराव ग्रासियस यांचा आरोप ग्राह्य मानायचा तर या ‘कटा’मागे काँग्रेसच्या उमेदवारीवर हक्क सांगणारा एक नेता आहे. या नेत्याने म्हणे काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या आरक्षणाचे जाहीर समर्थन केले होते. या नेत्याला कदाचित ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, तो आरक्षित झाला तर त्याची पंचाईत झाली असती, त्यामुळे त्याने म्हणे प्रचंड पैसा या खटाटोपामागे उभा केला...आता हा खटाटोप करणारा नेता आमदार आहे का, ते मात्र राधारावांनी जाहीर केलेले नाही. अनेकांना संशय आलेलाच आहे. आरक्षण नको असलेले नेते, आमदार सर्वच पक्षात आहेत व ते सध्या खुशीची गाजरे खात आहेत! प्रश्न आहे तो, सरकारला आरक्षण हवे आहे काय? ते आता लवकरच स्पष्ट होणार आहे म्हणा!
हे बोलणे योग्य नव्हे!
खासदारसाहेब, आपण चुकीचे बोललात आणि आपल्या वक्तव्यामुळे स्त्रीचा अपमान झाल्याची टीका आता दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यावर समाजमाध्यमातून होऊ लागली आहे. खासदार विरियातो हे तसे शांत स्वभावाचे; मात्र कुडतरी मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यक्रमात आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करताना ते भलतेच संतापले. यावेळी त्यांनी रेजिनाल्ड यांची तुलना ‘सरोगेट मदर’शी केली. एवढेच नव्हे, तर मुलासाठी आपले मातृत्व देणाऱ्या आईसंदर्भात त्यांनी वापरलेले शब्दही वादग्रस्त ठरले आहेत. खासदारांचे हे वक्तव्य असलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेक महिलांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
बाह्य स्वच्छता काय कामाची?
साळ नदी खारेबांदला काळी पडून दुर्गंधीयुक्त झाली असून, सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमांच्या प्रभावीपणाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदीत सांडपाणी सोडण्यास तातडीने आळा घालणे अत्यावश्यक आहे. साळ नदीत मिळणारे सांडपाणी वाहून आणणाऱ्या नाल्यांवर प्रथम उपाययोजना केल्याशिवाय नदीची स्वच्छता अशक्य आहे. मडगावातील पाच प्रमुख नाले, त्यात जुना बाजार (ओल्ड मार्केट) नाल्याचाही समावेश आहे. हे नदीच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. विविध अभ्यासांनुसार, निकृष्ट अवस्थेतील सोक पीटमधील गळती, धुणीभांड्यांचे सांडपाणी, कत्तलखान्यातून येणारे दूषित पाणी तसेच एसजीपीडीएच्या घाऊक मासळी बाजारातील मासळी कचरा हे या नाल्यांमार्फत साळ नदीत पोहोचणारे प्रमुख प्रदूषक आहेत. नदीतील जलजीवन पूर्णपणे धोक्यात आहे. साळ नदीचे पुनरुज्जीवन केवळ दर्शनी स्वच्छता मोहिमांनी होणार...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.