खरी कुजबुज: वड्याचे तेल वांग्यावर

Khari Kujbuj Political Satire: काल मंगळवारी काँग्रेस पक्षाची ‘गोवा राखण यात्रा’ सुरू झाली. त्यासंदर्भात सोशल मीडियावर दिवसभर मोठी चर्चा चालली होती.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

वड्याचे तेल वांग्यावर

काल मंगळवारी काँग्रेस पक्षाची ‘गोवा राखण यात्रा’ सुरू झाली. त्यासंदर्भात सोशल मीडियावर दिवसभर मोठी चर्चा चालली होती. मध्येच तिथे एकाने कैक महिन्यांअगोदरच्या कोकणी कथामालेसंदर्भातल्या खऱ्या कुजबूजवर लिहिले. कोकणी मंडळाचा कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याने दबलेल्या व नशा चढलेल्या वृत्तीमुळे प्रवक्त्याचा ठेका आपणच घेतलाय अशा अविर्भावात त्या माजी पदाधिकाऱ्याने लिहिले म्‍हणे. मंडळाचा इतिहास सर्वज्ञात आहे. भाषावादावर तर ब्र कधीच नाही. अवितरीत सीडी आणि पुस्तके ऑफिसात खच्चून वर ठेवली होती, ती एका लेखकाच्या डोक्यावर पडता पडता तो बचावला होता. जे मंडळाची ‘वायंगणी आदोगाशी’ करायला पुढे सरसावले त्यांनाच ती खरी कुजबूज तारवट्या (लवंगी) मिरचीसारखी झोंबली. कृतीप्रवण ज्येष्ठांना निरूद्योगी म्हणताना आपण काय करतो हे खऱ्या निरूद्योगींनी अंतर्मुख होऊन तपासणे इष्ट ठरेल.

घराघरांत पोहाेचल्‍या पोटल्या!

फोंड्यातील लोकांची यंदा चतुर्थीला चांदी झाली. तीन इच्छुक उमेदवारांनी घराघरांत पोटल्या पोहोचविल्या. दोघांनी कडधान्य तर एकाने देवाचे साहित्य पोचते केले. वाढत्या महागाईच्या वणव्यात गरिबांना तेवढाच दिलासा. सध्या फोंड्याला आमदार नसल्याने आमदार होण्याची जबरदस्त इच्छा अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे लोकांना अर्थातच मतदारांना आपल्याकडे कसे आकृष्ट करायचे याचा विचार करून कोणत्याही स्थितीत फोंडेकरांना खूष ठेवायचे, असे तंत्र इच्छुक उमेदवारांनी अवलंबले आहे. राज्यातील अन्य मतदारसंघात बडे बडे नेते आहेत, पण चतुर्थीच्या भेटीची दानत या बड्या नेत्यांनी दाखवली नाही. या राजकारण्यांनी हात आखडता घेतला, मात्र फोंड्यात इच्छुक उमेदवारांचा हात मोकळा सुटला आहे.

Khari Kujbuj Political Satire
IPL Auction Goa: गोव्यात पुन्हा रंगणार 'आयपीएल'चा लिलाव; डिसेंबरमध्ये होणार भव्य आयोजन, 15-16 तारखेची शक्यता

पडदा उघडला, स्क्रीनही तयार!

आता खरे राजकारण सुरू झाले म्हणायचे! राज्यातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने यात्रा काढली आणि सरकारवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या. आरोप किती खरे आणि किती राजकीय, हा विषय वेगळा. पण सध्या चर्चेला रंग चढलाय तो सरकारमधील एका मंत्र्याच्या विधानाने. विरोधकांची ‘चॅटिंग’ मोठ्या स्क्रीनवर दाखवणार, असे त्यांनी सांगितले. आता मोठी स्क्रीन म्हटल्यावर उत्सुकता तर वाढणारच ना! कारण याच मंत्र्याने यापूर्वी दोन आमदारांचे चॅटिंग ‘पब्लिक’ करण्याचे जाहीर केले होते. त्याचीही बरीच चर्चा झाली, पण तो कार्यक्रम अद्याप पडद्यावर आला नाही. त्यामुळे आता विरोधकांमध्ये चर्चा सुरू आहे, जुना शो अजून बाकी आहे तोच नव्या शोची तयारी सुरू झाली की काय?

त्या कंत्राटी शिक्षकांचे काय?

सरकार राज्यात शिक्षणाचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याची चिंता शिक्षणतज्‍ज्ञ व्यक्त करायला लागले आहेत. राज्यात अनेक गैरअनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळा उघडल्या आहेत. खासगी शाळांचे मोठमोठे ब्रँड गोव्यात यायला लागले आहेत. उच्च शिक्षणात गोव्यात पाच खासगी विद्यापीठे उभी राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक सुरू झाले आहे तर दुसरे सुरू होण्याच्या वाटेवर आहे. शिवाय आणखी खासगी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था आल्‍या आहेत. अशा स्थितीत पीएचडीसारखी उच्च पदवी प्राप्त, दहा-बारा तर काही शिक्षकांनी वीस-बावीस वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम केले आहे, त्यांचे काय? मुख्यमंत्री म्हणतात गोवा विकसित झालाय? डॉक्टर साहेब, हाच काय तो विकसित गोवा? असा प्रश्न शिक्षणतज्‍ज्ञ विचारायला लागले आहेत.

नावेलीत सिप्रू, प्रतिमा की वालंका आलेमाव?

नावेली मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मारामारी होणार असे संकेत मिळायला लागले आहेत. आपल्याला पक्षाच्या हायकमांडने काम सुरू करण्याचा आदेश दिल्‍याचा दावा सिप्रू कार्दोझ या इच्‍छुक उमेदवाराने केलाय. तर, काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच असा ठाम दावा प्रतिमा कुतिन्हो करतात. दुसरीकडे हायकमांड आपल्या बाजूने असल्याचा भक्कम दावा वालंका आलेमाव करतात. आता यापैकी ज्याला काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, तो उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्यास भाजपचे पुन्हा एकदा बल्लेबल्ले होणार हे निश्चित.

शरीफ दर्ग्यात पोहोचले विजय

गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी या दोघांनी एकत्र येऊन गोव्‍यात ‘गोवा फर्स्ट’ ही आघाडी सुरु केल्‍यानंतर अनेकांनी टीका केली. त्‍या०त काहींनी थेट विजय सरदेसाई यांना टार्गेट केले. त्‍यानंतर लगेच विजय यांनी दुर्गादास कामत, अकबर मुल्‍ला या आपल्‍या सहकाऱ्यांसह अजमेरचा शरीफ दर्गा गाठला. तेथे त्‍यांनी फुलांची चादरही अर्पण केली. असे म्‍हणतात, शरीफ दर्ग्यात जो कोण जातो, तो आपली कुठली ना कुठली मागणी घेऊन जातो. विजयला असे काय बरे मागायचे होते, म्‍हणून ते तेथे सहकाऱ्यांबराेबर गेले. याचे उत्तर लवकरच मिळेल म्‍हणा.

Khari Kujbuj Political Satire
Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा संघटनात्मक बदल; भारती पवार प्रभारी तर अनिल अँथनी सहप्रभारी

सिद्धेश यांच्या बर्थडेला गिरीश-दामूची हजेरी

नावेली मतदारसंघातील फायरब्रॅण्‍ड राजकारणी सिद्धेश भगत यांचा वाढदिवस मंगळवारी थाटात साजरा झाला. आपल्या बर्थडे निमित्त त्यांनी मतदारसंघात जागोजागी फलक लावले होते. आपला वाढदिवस त्‍यांनी घरीच साजरा केला असला तरी त्याची जाहिरातबाजी केली होती. त्यांच्या बर्थडेला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थिती लावली. सिद्धेश हे सध्या कुठल्याही राजकीय पक्षात नाही हे खरे असले तरी नावेलीत त्यांचे काम जोमात सुरू आहे. दामू व गिरीशने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कुठला राजकीय गुरुमंत्र दिला हे कळायला मार्ग नसला तरी त्यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत अशी आतील खबर आहे. बघुया, पुढे काय घडते ते. तूर्त वेट अ‍ॅण्ड वॉच.

कोर्टाची नजर पडली, आता तरी जागे व्हा!

सरकारच्या कारभारावर जनता प्रश्न उपस्थित करते, आरोप करते, टीका करते. हे काही नवीन नाही. शेवटी लोकशाहीत जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहेच. पण एखाद्या सरकारी यंत्रणेच्या कामकाजावर न्यायालयातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर विषय जरा गंभीर होतो. पंचायत संचालनालयाच्या एका प्रकल्पातील भूमिका आणि काम करण्याची पद्धत पाहून न्यायालयानेच त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. म्हणजे आतापर्यंत जनता म्हणत होती म्हणून दुर्लक्ष करता येत होते; पण आता न्यायालयानेही आरसा दाखवला. त्यामुळे पंचायत संचालनालय आता त्या आरशात स्वतःचा कारभार पाहून काही दुरुस्ती करणार की ‘सगळं व्यवस्थित आहे’ असा चेहरा करून झोपेचे सोंग घेणार?

भाजप नव्या चेहऱ्यांच्‍या शाेधात!

यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजप नवे प्रयोग करण्याच्‍या प्रयत्नात असल्‍याचे समजते. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत कोणाच्याच ध्यानीमनी नसलेल्या महिला उमेदवाराला दक्षिणेतून उमेदवारी दिली, तसेच काहीसे होणार आहे. सावर्डे, सांगे, कुडचडे, कुंकळ्‍ळी, सांताक्रुझ, पेडणे, नुवे, फातोर्डा या मतदारसंघांत भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता त्‍यात तथ्य किती, हे भाजप नेतेच सांगू शकतील. तूर्तास ‘वी विल कीप फिंगर्स क्रॉस’.

कृषी शिक्षण भिंतींच्या पलीकडे

गुरूदेव टागोर सांगून गेले, मुलांना झाडं, पाखरं, फांद्या वर्गाबाहेर नेऊन दाखवा. ते घडू लागलंय. शेती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हायड्रोपोनिक्स (मातीविना शेती) आणि किचन गार्डनिंग (घरगुती बागकाम) प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अन्न उत्पादनाच्या नावीन्यपूर्ण पद्धतींची ओळख करून दिली. कृषी शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, पिके कशी घेतली जाऊ शकतात, हे प्रात्यक्षिकांसह मुलांना दाखविण्यात आले. शेतीचं महत्व अशा प्रकारे कोवळ्या मुलांच्या मनात बिंबवलं तर फुलं, फळं, भाज्या यात गोवा आत्मनिर्भर करणारी पिढी नक्कीच घडेल ही आशा बाळगायला हरकत नाही.

रीळरिळाट - अनियंत्रित सुळसुळाट

रीळांच्या सुळसुळाटामुळे दर्जा सुमार होत आहे. दृश्यांची मांडणी विस्कळीत, ध्वनी-चित्र समन्वय अपुरा आणि कथनशैलीत आकर्षणाचा अभाव जाणवतो. कुणीही बेबी, बॉबी रीळ काढतो. लक्ष वेधण्यासाठी आवश्यक ती सर्जनशीलता आणि गती यांचं कुणाला पडून गेलेलं नाही. विषय, आशय, संपादनात काटेकोरपणा नसल्याने दृश्ये नीरस वाटतात. तेच तेच चेहरे (कथित नट) विनोदाच्या नावावर झिजलेले वाचलेले तेच तेच चिपाड देत असतात. विषयाकडे असंबंधित गाणे वा पार्श्वसंगीत यामुळे रीळाचा बोजवारा उडतो. या बिनभांडवली धंद्यात, ॲक्टर बनण्याची हौस, संहिता लेखक होण्याची महत्वाकांक्षा हे कैक फायदे असतात. अभिरूची खलास होता कामा नये. रीळांचा निर्मिती दर्जा सुधारण्यास आकाशाएवढा वाव आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

बॅंकांचा संप, खातेदारांना कंप

सरकारी व अन्य क्षेत्रात मनुष्यबळाची कमी व काम वाढतं, अशी स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २८,२९,३० सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. वेतनवाढ, कामकाजाच्या अटी सुधाराव्यात तसेच खासगीकरणाला विरोध ही प्रमुख मागणी आहे. संघटनांच्या मते, सार्वजनिक क्षेत्राचे संरक्षण व कर्मचाऱ्यांचे हक्क यासाठी सामूहिक कृती आवश्यक आहे. मात्र ग्राहकांना रोख व्यवहार, धनादेश क्लिअरन्स व कर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. डिजिटल सेवा काही प्रमाणात मदत करतील, परंतु ग्रामीण भागातील ग्राहकांना व ज्येष्ठ नागरिकांना अडचणी संभवतात. एटीएम यंत्रात खडखडाट होण्याची शक्यता आहे. एकूणच, संपामुळे कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्या अधोरेखित होतातच. पण संवादातून तोडगा काढणे आवश्यक आहे, जेणेकरून खातेदारांनाही दगदग होऊ नये.

पात्रांवाची क्रेझ कायम

फोंड्याचे पात्रांव रवी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम नुकताच झाला. आपल्या राजकीय कारकिर्दीत रवींनी अनेक चांगले निर्णय घेतले, विकासकामे केली. ही कामे केवळ फोंड्यापुरती मर्यादित राहिली नाहीत तर संबंध गोव्याचा विचार त्यातून दिसून आला. खरे म्हणजे माणूस सत्तेवर असला तरच लोकांची गर्दी जमते, हे सत्य आहे. एकदा सत्ता गेली की राजकारणी माणसाची किंमत शून्य ठरते. पण पात्रांव गेल्यानंतरही त्यांची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले. खडपाबांध-फोंडा येथील टेकडीवर आयोजित या आदरांजली कार्यक्रमाला उपस्थितांची गर्दी हेच सांगून गेली.

सावियोंचे प्रयत्न फळास येतील?

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्‍हणीचा भावार्थ प्रत्येक वेळी सत्यात उतरतोच असे नाही. श्रम करून, प्रयत्न करूनही अनेकांच्‍या पदरी यश पडत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्षाचे सावियो कुतिन्हो. सरकार व मडगाव आमदाराविरोधात बोलण्‍याची, त्यांच्या चुका दाखवून देण्याची एकही संधी सावियो सोडत नाही. काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली सावियो यांनी अनेक घोटाळे उघड केले आहेत. आता एवढ्या सक्रिय नेत्याला काँग्रेसची उमेदवारी मिळायला नको का? तरीसुद्धा मडगावात सावियोंची डाळ शिजणे कठीणच. कारण राजकारणातील सूत आणि सूत्र.

शिष्यवृत्तीचा नाही पत्ता

जलदगतीने कामे व्हावीत म्हणून सरकारने सुरू केलेले डिजिटलायजेशन व ऑनलाईन पद्धत, ऑफलाईनपेक्षा ज्यात वेळकाढू बनत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. प्रज्ञाशोध परीक्षेत चांगली कामगिरी केलेल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र तीन वर्षांपूर्वी चौथीत असताना प्राप्त झालेली शिष्यवृत्ती ती मुले सातवीत गेली तरी अजून मिळाली नाही.शिष्यवृत्तीचे पैसे आले नाहीत म्हणून पालक व विद्यार्थी शाळेकडे खेपा मारतात. पण उत्तर कुणाकडेच नाही.

राजकीय वळणे

राष्ट्रवादी काँग्रेसपासून राजकीय कारकीर्द सुरू करून २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना आता गोव्याच्‍या प्रभारी म्‍हणून जबाबदारी मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. भाजपमधील संघटनात्मक अनुभव तुलनेने नवा असला तरी केंद्रातील सत्तेचा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे गोव्याचा राजकीय ‘नाडीचा ठोका’ ओळखताना जुन्या अनुभवापेक्षा नव्या जबाबदारीची कसोटी त्यांच्यासमोर असेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

कुंकळ्‍ळीत भाजपचा शिलेदार कोण?

कुंकळ्‍ळी मतदारसंघ भाजपने जिंकण्याचा दावा न केलेल्या दहा मतदारंघांत येत असल्याने हायकमांड या मतदारसंघाबाबत गंभीर नसल्याचे पक्षाचे कार्यकर्तेच बोलतात. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर सुदेश भिसे व विशाल देसाई यांनी दावा केला आहे. त्‍यांनी आपल्‍या प्रचारालाही सुरवात केली आहे. दोघांनी मतदारसंघात गणेश चतुर्थीच्‍या शुभेच्छा देणरे बॅनर लावले आहेत. आता पाहुया, उमेदवारी विशाल यांना मिळते की सुदेश यांना!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com