

हा सूर्य, हा जयद्रथ
कागदावर एक व प्रत्यक्षात वेगळेच असे चित्र असू शकते. गोव्यातील भूजल साठ्यापैकी केवळ २१.४% उपसा होत असूनही आणि राज्याला ‘सुरक्षित’ म्हणून वर्गीकृत केले असले तरी, जलसंपदा विभागाने गेल्या पाच वर्षांत गोळा केलेल्या निरीक्षण आकडेवारीनुसार, उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात भूजल पातळी घटत असल्याचे दिसून येत आहे. याउलट, दक्षिण गोव्यातील भूजल निरीक्षण केंद्रांमध्ये भूजल पातळी सुधारत असल्याचे दिसून आले आहे. बार्देस आणि पेडणे पट्ट्यातील सर्व १२ किनारपट्टीवरील भूजल निरीक्षण केंद्रांनी भूजल पातळी घटत असल्याचे नोंदवले आहे. कांदोळीमधील दांडोवाडो, मोरोडवाडो येथील केंद्रांवर, तसेच कळंगुटमधील केंद्रावर २०२२ पासून भूजल पातळीत घट आणि वाळूच्या टेकड्यांच्या जलस्तराचे पुनर्भरण कमी झाल्याची नोंद झाली आहे. सुरक्षित काय आणि असुरक्षित काय? हे आकलन करण्यातच संभ्रम होऊ शकतो. आता उत्तर गोव्याची किनारी भागातील भूजल पातळी का घटत आहे, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा केली जात आहे.
राजकीय ‘इशारा’
दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्याचे काहींना गूढ वाटत असले, तरी शांतपणे विचार केला तर ही रॉय यांचीच एखादी ‘चाल’ असावी, अशी चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय अस्तित्व दाखवून देण्यासाठी पुन्हा प्रकाशझोतात येण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. शेवटी ते माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचेच पुत्र! राजकारणात डॅशिंग चाली खेळण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले असणार. आता विधानसभा त्यांना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून खुणावते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, जिथे इशारा पोहोचवायचा होता, तिथे तो पोहोचला असावा... एवढे मात्र नक्की!
दळवींचा ‘सर्वधर्मसमभाव’?
निवडणूक जवळ आल्याने सध्या इच्छुक उमेदवार गणेश चतुर्थीच्या उत्सवाची संधी साधताना दिसत आहेत. फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे इच्छुक उमेदवार विश्वनाथ दळवीही त्याला अपवाद नाहीत. मात्र, दळवींनी जरा वेगळीच शक्कल लढवली. हिंदूंना चतुर्थीच्या सामानाचे वाटप करतानाच त्यांनी इतरधर्मिंयानाही दूर ठेवलेले नाही. त्यांच्यासाठी खास मिठाईचे बॉक्स तयार करण्यात आले असून, संबंधित धर्माचे कार्यकर्ते आपापल्या बांधवांना त्याचे वाटप करताना दिसत आहेत. त्यामुळे दळवींचा हा ‘सर्वधर्मसमभाव’ सध्या फोंडा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुकीच्या मैदानात हा ‘सर्वधर्मसमभाव’ दळवींना किती हात देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
आणि दत्तराज कात्रीत?
काही युवा राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियाच्या भरात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अतिउत्साहीपणा दाखवतात आणि संकटात सापडतात. कुडचडे मतदारसंघातील दत्तराज देसाई हे असेच व्यक्तिमत्त्व. सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या या युवा राजकारण्याचे सामाजिक कार्य थोडेसे हटके असल्यामुळे ते वादात सापडतात. दत्तराज व सांगेचे मेश्यू डिकॉस्टा दोघेही आक्रमक बाण्याचे. दोघांनी राजकारणात फॉरवर्ड होण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सदस्यत्व घेतले व राज्य पातळीवर पक्षाची जबाबदारीही घेतली. सांगे पोलिस स्थानकावर दोघांनी राडा केल्यामुळे दोघांना पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. ‘हो गेलो कात्रीक’ हे दत्तराजाचे बोल बरेच गाजले होते. गोवा फॉरवर्ड पक्षाने अचानक पक्षातून काढून टाकल्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारे दत्तराज आता ‘गेलो हो कात्रीक’ या शब्दांनी ट्रोल व्हायला लागले आहेत. त्यानंतर आता गोवा फॉरवर्ड सोडून आम आदमी पक्षाबरोबर आंदोलन करणारे दत्तराजचे साथी मेश्यू कधी कात्रीक पडतात, हे पाहावे लागणार, असे आम्ही नव्हे ‘नेटीझन’ म्हणायला लागले आहेत.
दागिन्यांविनाच चतुर्थी
बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संप करू, असे म्हटले होते. चतुर्थीच्या तयारीच्या नादात बहुतांश गोमंतकीयांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. नेट बँकिंग, ई-बँकिंग, एटीएम यामुळे बँकेची शाखा सुरू आहे की बंद, याचा कोणाला तसा फरकच पडत नाही. मात्र, चतुर्थीवेळी बँकेच्या लॉकरात असलेले दागिने आणण्यासाठी अनेकांना बँक सुरू असलेली हवी होती. शुक्रवारी संप झाला आणि आता सोमवारी गणेश चतुर्थीसाठी परिधान करण्यासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणता येणार नाही, हे सत्य समोर आले आणि अनेकांना या संपाची आपल्याला कशी झळ बसली ते समजले.
फोंड्यात ज्ञानाची नवी वाट!
गोव्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकशास्त्राच्या शिक्षणासाठी आता राज्याबाहेर धाव घेण्याची गरज भासणार नाही. फोंड्यात सुरू होणाऱ्या नव्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील सर्व ४० जागा भरल्या असून, सप्टेंबरअखेर वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या तुकडीत २३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाविद्यालयाने प्राध्यापक भरतीची तयारीही सुरू केली असून, सध्या २६ पदांसाठी मुलाखती सुरू आहेत. भविष्यात विविध शाखांतील सुमारे ८० तज्ज्ञ प्राध्यापकांचा वर्ग उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गोव्याच्या पशुवैद्यक शिक्षणाला आता ‘घरच्या घरी’ नवी दिशा मिळणार आहे.
कुंकळ्ळीत कोण उमेदवार?
गोव्यात आम आदमी हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. आता आदमी पक्षाने जेव्हा पहिल्याच वेळी गोव्याच्या राजकारणात प्रवेश केला होता, तेव्हा चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. कुंकळ्ळी मतदारसंघाचे उमेदवार एल्विस गोम्स हे त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. मात्र, ‘आप’ अपयशी ठरला. मात्र, पक्षाने काम सुरू ठेवले व गेल्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आणले. खरे म्हणजे ‘आप’च्या चाळीसही मतदारसंघांत काम सुरू आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात ‘आप’चे कार्यालय आहे. कार्यालयात खास प्रचार व प्रसार टीम काम करते. मात्र, कुंकळ्ळी मतदारसंघात ‘आप’ उमेदवार उतरवणार? ‘आप’ची उमेदवारी कोणाला मिळणार? ‘आप’ व गोवा फॉरवर्डची युती झाल्यास हा मतदारसंघ कोणाला मिळणार? उमेदवार एल्विस गोम्स असणार? की डॉ. जर्सन फर्नांडिस असणार? की नवा चेहरा असणार? की ‘आप’ व गोवा फॉरवर्ड हा मतदारसंघ युरी आलेमाव यांच्यासाठी खुला सोडणार? प्रश्न अनेक आहेत. मात्र, उत्तरे निवडणूक जाहीर झाल्यावरच मिळतील.
‘झेडपी’ बैठकीत सरकारचे गोडवे
दक्षिण गोवा ‘झेडपी’ची शुक्रवारी पाचवी सर्वसाधारण बैठक अत्यंत खेळीमेळीत पार पडली. बैठकीच्या प्रारंभीच सरकारच्या गोवा उज्ज्वला योजनेचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या झेडपी सदस्यांनी माईक हातात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे तोंडभरून कौतुक केले व सर्वांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले. पंचवीस सदस्यांच्या या झेडपीत भाजपची एकहाती सत्ता आहे, हे निर्विवाद. मात्र, विरोधी पक्षांचेही झेडपी सदस्य आहेत. उज्ज्वला योजनेबाबत त्या सदस्यांनी काही ‘ब्र’ उच्चारला नाही. ते स्मितहास्य करत खुर्चीवर बसून होते. शेवटी, त्यांच्याही घरी गॅस आहेत व त्यांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, हे विसरून कसे चालणार म्हणा. सरकारची स्तुतिसुमने सुरू असताना या ‘झेडपी’चे अध्यक्ष सिद्धार्थबाबांची कळी खुलली.
सावर्डेत सुनामी?
सध्या गोव्यात काही मतदारसंघांकडे ‘हाय प्रोफाईल’ मतदारसंघ म्हणून पाहिले जात आहे, त्यात सावर्डेचाही समावेश होतो आणि त्यासाठी संकेत आर्सेकर यांची उपस्थिती मुख्य कारण आहे. आर्सेकर यांना भाजपची उमेदवारी मिळणार की नाही हे माहीत नाही, पण त्यांनी आपली हवा निर्माण केली आहे हे निश्चित. धारबांदोडा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर यांनी तर सावर्डेत सुनामी येणार, असे जाहीरही करून टाकले. बघूया भविष्यात काय होईल ते!
इंडक्शनवाले प्रतीक्षेत...?
उज्ज्वला योजनेचे पैसे मिळविण्यासाठी गावागावांत गर्दी... पण, ज्यांच्याकडे अजून गॅसच नाही, त्यांचे काय? नव्या गॅस कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्यांना सध्या ‘इंडक्शन’वरच स्वयंपाक करावा लागतोय. इराण-अमेरिका युद्धाच्या काळात गॅसची टंचाई निर्माण झाल्यापासून नवे कनेक्शन बंद आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेची रक्कम मिळणार याचा आनंद असला तरी, ‘नवे कनेक्शन कधी मिळणार?’ हा प्रश्न त्यांना सतावतोय. इंडक्शनवर स्वयंपाक करताना येणाऱ्या मर्यादा पाहता, ‘पैसे मिळाले, आता गॅस कधी मिळणार?’ अशी चर्चा सुरू आहे. चतुर्थीनिमित्त उज्ज्वला योजनेची भेट मिळालीच; आता गणरायाने गॅस कनेक्शनचीही भेट मिळवून द्यावी, एवढीच ‘इंडक्शनवाल्यां’ची अपेक्षा!
राजकीय ‘वजें’ मिळणार?
आपल्या गोव्यात चतुर्थीला लग्न करून दिलेल्या मुलीला माहेरून ‘वजें’ देण्याची परंपरा आहे. ‘वजें’ म्हणजे माहेरची भेट. यात करंज्या, मोदक, लाडू असे गोड पदार्थ व मुलीला गणेश चतुर्थीसाठी लागणारे साहित्य भेट दिले जाते. आता आपले राजकारणीही आपल्या मतदारांना असे वजें द्यायला लागले आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने राजकारण्यांसाठी ही गणेश चतुर्थी महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणी आपल्या मतदारांना साखर, पीठ, गूळ, कडधान्ये, तेल, तूप व गणेश चतुर्थीसाठी इतर साहित्य भेट देणार हे निश्चित. आता सगळेच राजकारणी उदार असतात असे नाही. काही आमदार व मंत्री न चुकता आपल्या मतदारांना गणेश चतुर्थीची भेट घरपोच पाठवितात व गणपतीबरोबरच मतदारांचेही आशीर्वाद घेतात. यंदा महागाई वाढल्याने बऱ्याच गणेश भक्तांसाठी हे राजकीय ‘वजें’ त्यांचा आर्थिक भार निश्चितच कमी करणार यात संशय नाही.
काहींना धक्का, तर काहींना सुटकेचा निश्वास!
पोलिस खात्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत बदल्यांचा अचानक आदेश आला आणि एकच खळबळ उडाली. यादीत स्वतःचे नाव पाहून अनेक बड्या अधिकाऱ्यांचे चेहरे पार उतरले, कारण आपली बदली इतक्यात होईल, अशी त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. ‘आपल्या मागे नक्की कोणी काड्या केल्या?’ यावर आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, काही पोलिस ठाण्यांमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. काही विचित्र स्वभावाच्या अधिकाऱ्यांची रवानगी झाल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास सोडला आहे. ‘साहेब गेले आणि डोक्याचा ताप टळला,’ असे म्हणत अनेक पोलिस ठाण्यांत आतल्या आत आनंद साजरा केला जात आहे. एकाच आदेशाने कुणाला धक्का, तर कुणाला दिलासा मिळाला आहे!
...म्हणून उशीर
पर्वरीचा उन्नत मार्ग शुक्रवारी दुपारी ४ वाजता खुला होणार, असे आधी जाहीर करण्यात आले होते. यामुळे अनेकजण त्यामार्गावरून जाण्यासाठी आले होते. मात्र नंतर सायंकाळी सहाची वेळ जाहीर करण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला. उद्घाटन आणि त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या कार्यक्रमासाठी रचण्यात आलेली व्यवस्था हटवणे कंत्राटदाराला शक्य झाले नव्हते. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यास दोन तासांचा उशीर झाला. सायंकाळी वाहतूक सुरू झाली आणि लोक सुसाट वेगाने जाऊ लागले.
उन्नत मार्गावर कामतांचेही ‘उड्डाण’
पर्वरी उन्नत मार्ग अखेर खुला झाला आणि त्यावरून पहिली सफर करण्यासाठी गोमंतकीयांनी गर्दी केली. उंचावरून पणजीचा नजारा पाहण्याची उत्सुकता होतीच; पण या सगळ्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामतही चांगलेच झळकले. अनेकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री कामत यांचे आभार मानले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साथीने उड्डाणपुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचे श्रेय कामतांना मिळणारच. गोमंतकीयांना दिलेले ‘कमिटमेंट’ भाजप सरकारच पूर्ण करू शकते, असे कामत यांनी यापूर्वीही सांगितले होते. उन्नत मार्गाच्या रूपाने त्या दाव्याची प्रचिती आलीच. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा अडथळा दूर करणारा ठरला नाही तर कामत यांच्या खात्यात आणखी एका पूर्णत्वास गेलेल्या वचनाची नोंद करून गेला, एवढे मात्र नक्की!
रस्त्यांच्या खड्ड्यांना आता ‘जेट पॅचर’ची धडकी!
काणकोणच्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनचालकांची परीक्षा घेण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर त्यांच्या दुरुस्तीसाठी ‘जेट पॅचर’ मैदानात उतरला आहे. त्यामुळे खड्ड्यांना आता ‘आपले दिवस भरले’ अशी चिंता वाटू लागली असेल. यंत्राच्या फवाऱ्याने डांबर आणि खडी टाकून रस्ते दुरुस्त होणार असल्याने वाहनचालकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खड्डे बुजवण्याचा वेग आणि त्यांचा पुन्हा जन्म घेण्याचा वेग यापैकी कोण जिंकते, हे पाहणेही तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.
रासवळ घराची चवथ
चतुर्थी(चवथी)साठी गावी जाणार, असे कुणाला विचारायची सोय नाही; कारण संयुक्त कुटुंबातील सदस्यांशी इन्व्हेन्टरी दावे वा अन्य कोर्टकचेऱ्या सुरू असू शकतात. भांडणे सुरू असतात. रासवळ घर वा वडिलोपार्जित एन्सेस्ट्रल घर हा एक वेगळाच विषय असतो. एक सदस्य कुणीतरी तिथे राहत असतो. तो घर सांभाळतो; पण त्याने घराची दुरुस्ती केलेली इतरांना आवडत नाही. ते कायद्याची भाषा बोलू लागतात. रासवळ घर अशा ताणामुळे दुरुस्तीविना, डागडुजीविना खंगल्यासारखे, म्हाताऱ्यासारखे जगत असते. रासवळ घर दुर्गम गावातच बहुधा. अनेक कुटुंबे एकत्र येतात. नांदतात. घराचे तात्पुरते सर्व्हिसिंग होते. खोलवर थर-थर नसो; पण स्वच्छता होते. काही कुटुंबातील सदस्य मात्र गणरायाची करूणा भाकत असतात - कुणाच्याही वितंडवादाविना चवथ सुखरूप सुकर होवो. तथापि रासवळ तसेच अन्य घरातील चवथ मंगलमय होवो, ही गणेशचरणी प्रार्थना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.