

पणजी: काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) आघाडीची सोमवारी दोनापावला येथील एका तारांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत ‘आरजी’कडून किमान १6 जागांचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवण्यात आला असून, त्यात सासष्टी मतदारसंघात किमान एक जागा तरी मिळावी, अशी अपेक्षा ‘आरजी’च्या संसदीय समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस तसेच ‘आरजी’तर्फे आमदार वीरेश बोरकर, प्रदेशाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर तथा अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस-‘आरजी’च्या आघाडीची बैठक होण्यापूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ही बैठक दोन मिनिटांत काँग्रेसने उरकली. त्यानंतर आघाडीविषयी बैठक झाली. त्यात दोन्ही पक्षांकडून जागा वाटपावर चर्चा सुरू करण्यात आली. त्यात ‘आरजी’च्यावतीने काँग्रेसपुढे किमान १6 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात सुरवातीला सासष्टीत बाणावली, नुवे आणि वेळ्ळी या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा ‘आरजी’च्या नेत्यांनी व्यक्त केली; परंतु काँग्रेस एवढ्या जागा देण्यास अनुकूल नसल्याने किमान एक तरी जागा सासष्टीत मिळावी, असा दुसरा प्रस्ताव त्यांनी ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने धारबांदोडा, सांगे, डिचोली, मये या चार जागा ‘आरजी’ला सहजपणे देण्याची तयारी दर्शविली आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने ‘आरजी’च्या मागण्या ऐकून घेतल्या असून, कोणत्या मतदारसंघांचा त्यात समावेश असेल हे काही समजू शकले नाही. मात्र, काँग्रेस उत्तर गोव्यात कमकुवत आहे, त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी भाजप मजबूत आहे, त्या जागा ‘आरजी’ने घ्याव्यात, त्याठिकाणी काँग्रेसचे सर्वजण ‘आरजी’च्या उमेदवारांसाठी मदत करतील, असेही सांगण्यात आले; परंतु ‘आरजी’च्या नेत्यांनी सध्या तरी काँग्रेस जागा वाटपावर काय आणि कशी भूमिका मांडतेय याची चाचपणी केली असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.
दरम्यान, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता हवी आहे. मात्र, यासाठी त्यांना काही निकष पार पाडावे लागतील. भारतात एका राजकीय पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने काही निकष ठरवलेले आहेत. त्यातील कोणत्याही एका अटीची पूर्तता केल्यास पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळू शकतो.
राज्य पक्ष म्हणून मान्यतेचे निकष
मते आणि विधानसभा जागा : विधानसभा निवडणुकीत राज्यात पडलेल्या एकूण वैध मतांपैकी किमान ६% मते मिळविणे आणि किमान २ विधानसभा जागा जिंकणे.
मते आणि लोकसभा जागा : लोकसभा निवडणुकीत त्या राज्यातून पडलेल्या एकूण वैध मतांपैकी किमान ६% मते मिळविणे आणि किमान १ लोकसभा जागा जिंकणे.
केवळ विधानसभा जागा : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकूण जागांच्या किमान ३% किंवा किमान ३ जागा (यापैकी जे जास्त असेल ते) जिंकणे.
लोकसभा खासदार (प्रमाण) : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक २५ किंवा त्याच्या पटीतील लोकसभा जागांमागे त्या राज्यातून किमान १ खासदार जिंकणे.
एकूण मते (वोट शेअर) : लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत त्या राज्यातून एकूण वैध मतांपैकी किमान ८% मते मिळविणे.
‘परब’ दहा ते पंधरा मिनिटे चर्चेत
‘आरजी’चे माजी अध्यक्ष मनोज परब हे २ ऑक्टोबरला राजकारणात परतणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ते ‘आरजी’त येणार काय? त्यांची भूमिका काय असणार आहे? याअनुषंगाने ‘आरजी’ आणि काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही पक्षांकडून पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.