

रीलमध्ये नेता... वास्तवात किती?
हल्ली राजकारणात एक नवा ट्रेंड जोरात आहे. सभा असो, दौरा असो किंवा एखाद्या गावाला भेट असो... आधी कॅमेरा सुरू होतो, मग स्लो मोशन, त्यावर दमदार संगीत आणि शेवटी भन्नाट रील! पाहणाऱ्याला वाटावे, जणू एखाद्या चित्रपटाचा ट्रेलरच सुरू आहे. पूर्वी नेत्याच्या कामाची चर्चा चौकात, चहाच्या टपरीवर आणि गावाच्या पारावर व्हायची. आता मात्र चर्चा कमी आणि रील जास्त दिसते. दोन मिनिटांची रील पाहिली की नेता किती लोकप्रिय, किती कार्यक्षम आणि किती जनतेत मिसळलेला आहे, याचेही काही जण अंदाज बांधून मोकळे होतात. आता निवडणुका जवळ आल्याने हा ‘रील राजकारणाचा’ हंगाम आणखी रंगात येणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे गावात आता एक मिश्कील प्रश्न विचारला जातो, "उमेदवार ठरवताना पक्ष तळागाळातील लोकांचे मत ऐकणार, की इंस्टाग्रामवरील व्ह्यूज, लाईक्स आणि रीलवरील कमेंट्स मोजणार?" कारण सध्या तरी काहींच्या मते, वास्तवापेक्षा रीलच जास्त ‘रिअल’ वाटू लागली आहे! ∙∙∙
कोण ‘तो’ साष्टीचा विरोधी आमदार?
नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे कधीकधी असे ‘यॉर्कर’ टाकतात की समोरचा फलंदाज ‘क्लीन बोल्ड’ झाल्याशिवाय राहत नाही. साष्टीचे काही आमदार ‘३९ अ’ या कायद्यावरून राणे यांना दोष देतात. अशाच एका साष्टीच्या आमदाराबद्दल बोलताना राणे यांनी, साष्टीतील एका विरोधी आमदाराने आपल्या मतदारसंघातील ‘एनडीझेड क्षेत्र वगळा’ ही मागणी आपल्याकडे आणली होती, असा खुलासा केला. आता हा साष्टीतील विरोधी पक्षाचा आमदार कोण? हा सवाल सारेच करू लागले आहेत. वार्का येथील युवा राजकारणी वॉरेन आलेमाव यांनी हेच सूत्र पकडत, ‘हे दोन तोंडांचे माळूळ कोण?’ असा सवाल केला आहे. विश्वजित आणि वॉरेन हे नेमके कोणावर बरे हे बाण सोडत असावेत?∙∙∙
गोवा फॉरवर्डची भूमिका नेमकी काय?
जून संपेपर्यंत वाट पाहा. आमच्या सर्व्हेचा रिपोर्ट आल्यावर आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले होते. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा फॉरवर्ड नव्या दमदार भूमिकेत दिसेल, असे सर्वांना वाटले होते. मात्र, आपल्या पक्षाची नवीन भूमिका काय असेल, हे विजय यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. उलट ते रविवारपासून १५ दिवसांच्या यूके दौऱ्यावर गेल्याने त्यांची रविवारी गिरीशबरोबर होणारी बोलणीही होऊ शकली नाहीत. ‘गोय आणि गोंयकार’ हे ब्रीद घेऊन चालणारे विजय आता स्वीडनमधील गोंयकारांबरोबर चर्चा करून गोवा फॉरवर्डचे पुढील धोरण तर ठरवणार नाहीत ना? ∙∙∙
आर्लेकरांची पंढरपूरवारी
गोव्याच्या राजकारणापासून सध्या दूर असलेले राजेंद्र आर्लेकर पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक झाले. पत्नी अनघा यांच्यासह दर्शन घेऊन सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याची माहिती त्यांनी स्वतःच फेसबुकवर दिली. तमिळनाडू आणि केरळचे राज्यपाल म्हणून मध्यंतरी राजकीय वादळांचा सामना केलेले आर्लेकर आता राज्यपालपदाच्या शांत वातावरणात भक्तिरसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या या पोस्टवर गोव्यातील काही राजकीय मंडळींनी, ‘विठ्ठलाच्या दरबारात गोव्यालाही आठवण काढली का?’ असा मिश्कील सवाल उपस्थित केला. ∙∙∙
फोंड्याचे समाजसेवक?
आता निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे फोंड्यात समाजसेवकांचे पेव फुटू लागले आहे. सोशल माध्यमांवरून या ‘सो-कॉल्ड’ समाजसेवेची प्रसिद्धीही केली जात आहे. यामुळे सध्या फोंडावासीयांना ‘अच्छे दिन’ आले असले, तरी यातले किती ‘समाजसेवक’ पुढे टिकणार, हे सांगणे कठीणच. आमदार कोणीतरी एकच होणार असल्यामुळे एकदा का निवडणूक झाली की उरलेले समाजसेवक गायब होणार, हे ठरलेलेच. त्यामुळे आता फायदा मिळतो तर घ्या, मतांचे नंतर बघूया... अशी मनोवृत्ती बाळगून फोंडावासीय सध्या वावरताना दिसत आहेत. ‘ये जो पब्लिक है, ये सब जानती है’ हेच शेवटी खरे. नाही का?∙∙∙
नाटक वाचवा
कला अकादमीने ‘कोंकणी नाटक : ५०’ या कार्यक्रमात दोन परिसंवाद ठेवावेत, अशी बहुतेकांची मागणी आहे. वाढलेल्या नाट्यचौर्यावर उपाय हा एक. दुसरा म्हणजे लाचखोरीने बक्षिसे मिळवण्यावर प्रतिबंध. या परिसंवादात रवींद्र लाखे, प्रेमानंद गज्वी, अतुल पेठे, मंजुळ भारद्वाज वगैरेंना निमंत्रित करावे. नाटक म्हणजे काय, रंगमंचाची आजची बदललेली स्थिती व उंची, संहितेतील संवादांचे आणि शब्दांचे महत्त्व या विषयांवर कित्येकांना पुरेशी माहिती नाही. वाङ्मयचौर्यामुळे नाट्यचळवळीची घसरण सुरू आहे; तिथे म्हालगड्यांचे लक्ष नाही. आपापसांतील संकुचित वाद, वितंडवाद, पॉलिटिक्स, स्टंटबाजी यात बहुतेक मश्गूल आहेत. सृजनशील, सखोल निर्मिती शून्य आहे. कामसू कला अकादमीने गटांगळ्या खाणारे कोंकणी नाटक वाचवावे, असे रसिकांना वाटते ∙∙∙
अकादमी नावाचे दोन पांढरे हत्ती
कोणे एके काळी कोंकणी अकादमीची समिती बदलतच नव्हती. चिमूटभर बुद्धिवंतांची चलती होती. (आज पोरकटांची आहे.) सर्व उपाय झाले. शेवटी काही घट्ट बुद्धिवंतांनी तत्कालीन अव्वल न्यायिक आयुक्त न्यायालयात याचिका दाखल केली. घटनेतील तरतूद दाखवली. समितीचा बदल तीन वर्षांत व्हायला हवा, ही तरतूद न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने नव्या समितीच्या नियुक्तीचे आदेश दिले. तेव्हापासून आजतागायत समिती वेळोवेळी बदलली जाते. तथापि, मराठी अकादमीच्या बाबतीत दहा वर्षे झाली, तरी तोच साचलेपणा आहे. अध्यक्ष व पदाधिकारी बदलत नाहीत. मनाची तरी लाज असली पाहिजे. भाषणातून जगाला नैतिक संतवचनांचे डोस पाजणे सोपे असते; आचरणही दिसायला हवे. ‘तू पतिव्रता दिसली पाहिजेस,’ असे शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकात आहे. आपली कथित संशोधनरूपी पुस्तके अकादमी पुरस्कृत योजनांखाली छापण्याचे सत्र सुरू आहे. जगावे की मरावे, हा प्रश्न नाहीच. सरकारला विनंती करणे किंवा न्यायालयात जाणे, हाच त्यावरचा उपाय आहे.∙∙∙
वाढदिवस कोणाचा... खर्च कुणाचा?
निवडणुका जवळ आल्या की काही नेत्यांचे वाढदिवसही अचानक भव्य-दिव्य होतात. मोठमोठे मंच, फुलांचे हार, केक, बॅनर, जेवणावळी आणि गर्दी पाहिली की वाटावे, हा वाढदिवस आहे की प्रचाराचा शुभारंभ! आपल्यामागे किती लोक आहेत, हे दाखवण्याची ही एक वेगळीच स्पर्धा सुरू असते. मात्र, यावेळी एका नेत्याच्या वाढदिवसाची चर्चा वाढदिवसापूर्वीही होती आणि नंतरही. आधी लोक म्हणत होते, "हे साहेब तर स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करत नाहीत, मग एवढा थाटामाट कसा?" आणि कार्यक्रम झाल्यावर दुसरी चर्चा सुरू झाली. म्हणे, पदावर असताना ज्यांना कामाला लावले, ज्यांच्यावर उपकार केले किंवा ज्यांच्याकडून उपकारांची परतफेड अपेक्षित होती, त्यांच्याच खिशातून वाढदिवसाचा सगळा खर्च उचलला गेला! खरे-खोटे देव जाणे. पण गावोगावी आता एकच मिश्कील प्रश्न ऐकू येतो, "वाढदिवस साहेबांचा... केकही साहेबांचा... पण बिल मात्र दुसऱ्यांच्या नावावर?" ∙∙∙
कुंकळ्ळी अग्निशमन दलाची शोकांतिका...
कुंकळ्ळीत मोठ्या थाटामाटात अग्निशमन दलाचे कार्यालय सुरू केले खरे; मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकारने हात आखडता घेतला असावा. केवळ एक बंब या कार्यालयाच्या सेवेसाठी असून त्यावरच सर्व काही भागवावे लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या अग्निशमन दलाच्या कार्यालयाचा आवाकाही मोठा आहे. हाती असलेल्या तुटपुंज्या साधनसुविधांच्या आधारे हा सारा कारभार कसा हाताळावा, या चिंतेत येथील जवान आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे गोवा सांभाळण्याची राजकीय भाषा बोलतात; परंतु आपल्या मतदारसंघातील एकमेव अग्निशमन दलाच्या कार्यालयात काय उणिवा आहेत, याकडे मात्र ते दुर्लक्ष का बरे करीत आहेत? मुख्यमंत्र्यांना तर या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला सर्व सुविधा उपलब्ध करणे सहज शक्य आहे. आम्हाला ‘अच्छे दिन’ कधी येणार, असे या कार्यालयातील जवान दबक्या आवाजात बोलतात. ∙∙∙
आम्ही पुढेच...
वाहतूक नियम पाळणाऱ्यांपेक्षा नियम मोडणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याचे चित्र अवघ्या एका दिवसात नोंदलेल्या ५६ हजार नियम उल्लंघनांच्या घटनांनी उघड केले. आतापर्यंत ‘कॅमेरे आहेत, पण कारवाई नाही’ या समजुतीत भरधाव धावणाऱ्यांना आता पाकिटाची चिंता करण्याची वेळ आली आहे. नियमांकडे डोळेझाक करून वाहन चालवणाऱ्यांना एआय कॅमेरेच आरसा दाखवणार असून, ‘चलन येणार नाही’ या आत्मविश्वासाचे रूपांतर लवकरच ‘चलन आले का?’ या धास्तीत होण्याची चिन्हे आहेत. ∙∙∙
मोसम निवडणुकीचा...
म्हापशात सध्या भलताच छत्र्यांचा पाऊस पडतोय! निमित्त काय तर, आपले सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार सक्रिय झालेत. गरजूंची सेवा, घरोघरी गाठीभेटी आणि सोबतीला मोफत छत्र्यांचा वर्षाव... सगळे कसे अगदी जोरात सुरू आहे. आता खोर्ली भागात छत्र्या वाटताना त्यांचा आत्मविश्वास इतका ओसंडून वाहत होता की, आगामी विधानसभेला भाजपचचे तिकीट आपल्यालाच मिळणार, हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले! एकीकडे सावकार तिकिटासाठी मोर्चेबांधणी करत जनसंपर्क वाढवतायत, तर दुसरीकडे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या गोटात मात्र थोडी धडधड वाढल्यासारखी दिसतेय. अर्थात, जोशुआंचे कट्टर समर्थक ‘छत्र्या वाटून कोणी आमदार होत नसते’, असे म्हणून स्वतःच मन वळवत आहेत आणि तिकीट जोशुआंनाच मिळणार असा दावा करतायत. पण राजकारणाचा रंगच न्यारा असतो... कोणाची छत्री कधी कोणावर सावली धरेल आणि कोण कोणाचा गेम करेल, हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे! ∙∙∙
‘तो’ सल्ला काँग्रेस, विरोधकांना!
राज्यातील पारंपरिक मोटारसायकल पायलटांसाठी सरकारने सोमवारपासून ‘माझे ड्रायव्हर’ ॲप सुरू केले. या ॲपचा पायलटांसह स्थानिक आणि देश–विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा होणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभारंभा प्रसंगी व्यक्त केला. परंतु, त्यानंतर मात्र या ॲपबाबत संभ्रम पसरवत असलेल्यांना त्यांनी फैलावर घेतले. ‘माझे ड्रायव्हर ॲप ऐच्छिक आहे. तरीही काहीजण ॲपबाबत संभ्रम पसरवत आहेत. ज्यांना ॲपमध्ये यायचे नसेल, त्यांनी रेनकोट घ्यावे आणि घरी जावे’, असा सल्ला त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधकांना सुरुवातीलाच दिल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
व्वा रे मडगाववासीय, पार्किंगसाठी शोधली जागा!
मडगावात नागरिकांबरोबर वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा पुरत नाही आणि ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी केलेल्या वाहनांवर पोलिस कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. आता पार्किंगसाठी लोकांनी नवी जागाच शोधून काढली आहे. ती म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या केणी पेट्रोल पंपासमोरील वाहतूक बेटाच्या बाजूची जागा. येथे वाहने तीन ते चार रांगांत पार्क केली जातात. तेथे सिटी बसेसही थांबविल्या जात असल्याने वाहनचालकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही तेथे अनेक अपघात होऊन काही नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर पोलिस, नगरपालिका, जिल्हाधिकारी आणि स्थानिक राजकीय नेते काही उपाय शोधून काढतील का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. ∙∙∙
निंबाळकरांची ‘एसआयआर’ माहिती
मतदार पडताळणीच्या प्रक्रियेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आता स्वतःच त्या प्रक्रियेत सहभागी होत आवश्यक माहिती सादर करण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर येथील आपल्या निवासस्थानी ‘एसआयआर’ अंतर्गत माहिती सादर केल्याचे स्वतः समाजमाध्यमांवर जाहीर केले. त्यामुळे विरोधासाठी विरोध आणि प्रत्यक्ष कृती यांतील फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला. ‘प्रक्रिया चुकीची’ असे म्हणतानाच त्याच प्रक्रियेचे पालन करावे लागत असल्याने राजकारणात घोषणांपेक्षा कागदपत्रेच शेवटी अधिक बोलकी ठरतात, अशी मिश्कील चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ∙∙∙
‘वादातीत’ विधान व बंद अनुदान
कोंकणीतील विचारवंत, प्रगतीशील लेखक व अनेक प्रकल्पांचे पुरस्कर्ते दत्ता दामोदर नायक यांनी कोंकणी भाषा मंडळाला देत असलेली घसघशीत निधीची मदत थांबवली. दत्ताबाबनी गोंयबाबवर एक लेख लिहिला होता, त्यात बदनामीकारक मजकूर आहे, अशी टीका भाषा मंडळाने व अ भा कों परिषदेने केली. त्यात वादातीत विधान असं म्हटलं आहे. वादग्रस्त व वादातीत या शब्दांचा फरक माहीत नसलेले हे बालगडे पत्रकं काढतात. वादातीत म्हणजे वाद नसलेला, निर्विवाद. दत्ताबाबनी सुपुत्र चिराग यांच्यासमवेत हल्लीच भाषा मंडळाला एक कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. त्या पाईपलाईनीतून वित्त पुरवठा चालू होता. याच्याआधी कोंकणीला हानी पोहोचविणारे कैक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते, तेव्हा मंडळाचा ‘मोनेळ’ (चुप्पी) होता. अकस्मात मंडळाच्या सहा कथित कर्त्यांना कळवळून पुळका येण्यासाठी पाताळयंत्री छुप्या रूस्तुमानी ऊर्जा कुठून कशी पुरवली, हे गूढच. त्यावर उलटसुलट चर्चा चाललीय. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.