Goa Politics: गोव्यात नव्या प्रादेशिक पक्षाची चर्चा; राजकीय गती की विरोधकांची अधोगती?

New Regional Party Goa: सत्ताधारी भाजप हा पक्ष कधी नव्हे इतका भक्कम असल्याचे प्रत्येक बाबतीत दिसून येते. त्या पक्षामध्ये उमेदवारीवरून बंडाळी माजेल व त्याचा आपणाला लाभ होईल, या मनोराज्यात काँग्रेसवाल्यांनी राहून चालणार नाही.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

सत्ताधारी भाजप हा पक्ष कधी नव्हे इतका भक्कम असल्याचे प्रत्येक बाबतीत दिसून येते. त्या पक्षामध्ये उमेदवारीवरून बंडाळी माजेल व त्याचा आपणाला लाभ होईल, या मनोराज्यात काँग्रेसवाल्यांनी राहून चालणार नाही. कारण, अशा बंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी साम, दाम या उपायांचा अवलंब करण्याची ताकद व कौशल्यही त्या पक्षाकडे आहे.

गोव्यात नवा स्थानिक राजकीय पक्ष जन्मास घालण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गेल्या आठवड्यात दिले अन् त्या नंतर गोव्यातील राजकारणाने एकप्रकारची गती घेतली, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. खरे तर गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये हायकमांडने जे बदल केले, त्यानंतरच येथील राजकारणात नव्हे तर खुद्द काँग्रेसमध्येच वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या.

त्यामुळेच हायकमांडच्या निर्देशानुसार, वेणुगोपाल तातडीने गोव्यात दाखल झाले. पण, नंतर त्यांनी घेतलेल्या बैठकीत सगळे नेते ज्या पद्धतीने एका टेबलावर आले व त्यांनी ज्या खेळीमेळीने चर्चा वा गप्पा गोष्टी केल्या व पक्ष किवा नेत्यांमध्ये कोणतीच समस्या नसल्याचे जाहीर केले, ते पाहता पक्षात कोणतीच बेदिली नाही, हे स्पष्ट झाले.

मग, नव्या प्रादेशिक पक्षाचे काय, हा मुद्दा मात्र सुटलेला नाही. प्रत्यक्षात नव्या पक्षाचा मुद्दा गिरीश यांनीच उघड केला होता व त्या मागे भाजप असून त्याने त्या पक्षासाठी शंभर कोटींची तरतूद केल्याचा दावाही केला होता. मात्र, माध्यमांनी या पक्षामागे काँग्रेसमधील ‘असंतुष्ट’ असल्याचे उघड करून त्यासाठी जे कोण कार्यरत आहेत, त्यांच्याकडे अस्पष्ट अंगुली निर्देश केला होता.

तर गिरीश यांनी सासष्टीतील अल्पसंख्यांकाची मते फोडण्याचा भाजपचा हा कट असल्याचा आरोप केला होता. तो आरोप जरी भाजपने फेटाळून लावलेला असला तरी गेल्या दीड, दोन दशकांतील सासष्टीतील निवडणुकांचा अभ्यास केला तर सासष्टीतील मते निवडणुकीत फुटतात व नंतर निवडून आलेले आमदार फुटतात, असे दिसून आले; पण ती मते वा आमदार का फुटतात याचा अभ्यास वा चिंतन संबंधित करत नाहीत, असेही दिसून आले.

Goa Politics
Goa Electricity: खासगी कंपनीला 'पॉवर' नाहीच, राज्य सरकारकडून स्पष्ट; खात्याकडूनच होणार वीज वितरण

बरे आणखी एक बाब म्हणजे सासष्टीतील ही मते आपलीच आहेत, असा दावा गिरीश वा काँग्रेसवाले कोणत्या आधारावर करतात, हा मुद्दाही येतो. कारण केवळ विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर यापूर्वी एकदा लोकसभा निवडणुकीतही (चर्चिल वेळी) तसा अनुभव आलेला आहे. त्या वेळी एदुआर्द फालेरो यांचा त्यांनी पराभव केला होता. याचाच अर्थ त्या पक्षाची आता सासष्टीवर मक्‍तेदारी राहिलेला नाही, हे स्पष्ट होते.

विधानसभा निवडणुकीत तर २०१२ पासून सतत काँग्रेस तो अनुभव घेत आहे. त्या मागे भाजपचाच हात असल्याचा आरोप न करता आपले भरंवशाचे मतदार ऐनवेळी आपल्यापासून दूर का जातात याचा अभ्यास खरे म्हणजे व्हायला हवा. पण, तो होताना दिसत नाही. त्या निवडणुकीत भाजपने समर्थन दिलेले वा उभे केलेले उमेदवार कुंकळ्ळी, वेळ्ळी, बाणावली, नावेलीसारख्या मतदारसंघातून निवडून येतात ही गोष्ट बरेच काही सांगते. त्या नंतर म्हणजे २०१७मध्ये त्या उलट अनुभव आलेला असला तरी २०२२ मध्ये पुन्हा नावेली व कुडतरीत पूर्वींचीच पुनरावृत्ती झाली.

कुडतरीत भाजपने पाठिंबा दिलेले रेजिनाल्ड तर नावेलीत भाजपचे तुयेकर निवडून येतात हे बदललेल्या वातावरणाचे निदर्शक म्हणावे लागेल. पण अनेक उमेदवारांमुळे मतविभाजन झाल्याचा तो परिपाक असल्याचे काँग्रेसवाले म्हणतात त्यावरून एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याची त्यांची तयारी नाही हेच दिसून येते. ही गोष्ट २०२२मधील ,त्या नंतर आता चार साडेचारवर्षे उलटून गेली तरी तो पक्ष सुस्त अवस्थेत आहे. वास्तविक त्या वेळी पराभव का झाला, सत्ता हातची कशी निसटली याचा कोणताच शोध घेतला गेला नाही की चुका दुरुस्त करण्याची तसदी घेतली गेली नाही.

नाही म्हणायला निवडणुका तोंडावर आल्यावर नेतृ्त्वात बदल करून पुन्हा गिरीश यांच्याकडे ते सोपविले गेले आहे. त्यांनी येता येता आपल्या स्वभावधर्मानुसार भाजपवर तोंडसुख घेणे सुरू केले आहे. पण त्यावरून तुम्हाला मते मिळणार का? मुळात कोणत्याच मतदारसंघात काँग्रेस सुस्थितीत नाही हे काँग्रेसवालेच सांगतात.

नव्या गोवा काँग्रेसमागे गोळा होत असलेली एकेक नावे पाहिली तर तेच दिसून येते. सत्ताधारी भाजप हा पक्ष कधी नव्हे इतका भक्कम आहे. त्या पक्षामध्ये उमेदवारीवरून बंडाळी माजेल व त्याचा आपणाला लाभ होईल या मनोराज्यात काँग्रेसवाल्यांनी राहून चालणार नाही. कारण, अशा बंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी साम, दाम या उपायांचा अवलंब करण्याची ताकद व कौशल्यही त्या पक्षाकडे आहे. त्या बाबतीत कमजोर आहे तो विरोधी पक्षच.

Goa Politics
Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

वास्तविक भाजप विरुद्ध सगळे विरोधी पक्ष एकत्र आले व एकास एक उमेदवार हा पवित्रा घेतला तर ते भाजपला जड जाऊ शकते; पण विरोधी पक्षांतील अहंकार त्याच्या आड येत आहे. काँग्रेस व गोवा फॅारवर्डचे सुध्दा तसे जमत नसावे अन्यथा ते नेते आमंत्रणासाठी वेळ काढत बसले नसते. सर्वांत अगोदर त्यांनी एकत्र बसून जागे वाटून घेतले तरी बरेच काही झाले असते. काँग्रेसने आताच कुठे काही ब्लॅाकमध्ये समित्या स्थापन करण्यास सुरवात केलेली असली तरी निवडणुकीसाठी उरलेला कालावधी व बाकी असलेले काम पाहिले तर त्याच्यासमोर शिवधनुष्य उभे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com