

मडगाव: काँग्रेससोबत आघाडीसाठी सुरू असलेली बोलणी स्थगित केल्याची घोषणा आज गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. तथापि, पक्षातील नेत्यांचा एकूण रागरंग पाहता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती तुटल्यात जमा आहे.
पणजीत झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, ‘सध्या तरी आम्ही युतीसंदर्भातील बोलणी स्थगित केलेली आहेत. पुढचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. गरज पडल्यास आमची स्वबळावर निवडणुकीस सामोरे जायची तयारी आहे’.
एकूणच काँग्रेसच्या ‘हाता’वर पुन्हा विश्वास ठेवण्यास गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ तयार नसल्याचे संकेत असून, काँग्रेसकडून यावेळीही शेवटच्या क्षणी गोवा फॉरवर्डचा घात केला जाईल, अशी भावना या पक्षात बळावू लागली आहे.
काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते असलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची गोवा फॉरवर्डप्रति असलेली वर्तवणूक पाहून गोवा फॉरवर्डचे नेते प्रक्षुब्ध झाले आहेत. या एकाच मुद्द्यावरून या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई हेही आक्रमक झाले आहेत.
यापूर्वी सरदेसाई यांनी काणकोण येथे झालेल्या सभेत त्यांनी, ‘कदाचित कॉक्रोच जनता पार्टीला जास्त मते पडतील; पण काँग्रेसला मते पडणार नाहीत’, असे वक्तव्य केले होते. ही सर्व पार्श्वभूमी पाहता गोवा फॉरवर्ड पार्टीने काँग्रेसबरोबर पुढे जायचे नाही, हा निर्णय पक्का केला असल्याचे उद्घृत होते.
काँग्रेसकडून दोनदा घात; रस्त्यावरचा लढा महत्त्वाचा : विजय
राज्यभर पक्ष विस्तार, दौऱ्यांवर भर : राजकीय व्यवहार समितीची माहिती
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यातील संबंध अधिकच ताणल्याने येत्या विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत काँग्रेससह इतर पक्षांसोबतच्या चर्चेला तूर्तास स्थगिती देत, गोवा फॉरवर्डने पक्ष संघटना बळकटीसाठी चाळीसही मतदारसंघांत दौरे आणि यात्रेचे आयोजन केल्याची माहिती पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर म्हणाले, ‘गोवा फॉरवर्डची अजूनही कॉँग्रेससोबतची युती कायम आहे. परंतु, युरी आलेमाव यांनी आमदार विजय सरदेसाईंबाबत खोटा प्रचार सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्ही दु:खी होऊन आघाडीबाबतची चर्चा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात परिस्थिती बदलेल, त्यानुसार चर्चेचा निर्णय घेतला जाईल.
’ विधानसभा अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई कुशावती जिल्ह्यातील सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण या चार तालुक्यांचे दौरे करतील. तेथील लोकांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यावर अधिवेशनात आवाज उठवतील. त्यानंतर इतर तालुक्यांचे दौरे पूर्ण करून यात्रेस सुरुवात करण्यात येईल’, असे विकास भगत म्हणाले.
फॉरवर्डसोबत चर्चेसाठी कधीही तयार : गिरीश
‘येत्या विधानसभा निवडणुकीतील आघाडीसंदर्भातील चर्चेबाबत गोवा फॉरवर्डने जो निर्णय घेतला, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु, काँग्रेस मात्र आघाडीसाठी कधीही चर्चेस तयार आहे’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डने सध्या जो निर्णय घेतला आहे, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
परंतु, भाजपचा पराभव करू इच्छिणाऱ्या प्रत्येक पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस इच्छुक असून, त्यासाठीच्या चर्चेला आम्ही कधीही तयार आहे’, असे चोडणकर म्हणाले. दरम्यान, ‘आघाडीबाबतच्या चर्चेसाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाला (आरजीपी) लवकरच पत्र पाठवण्यात येणार आहे. सोबतच आपसोबतही लवकरच चर्चेस सुरुवात करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
आमचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. यापूर्वी दोनवेळा काँग्रेसने आमचा घात केला. आता कदाचित त्यांना घात करण्याची हॅट्रिक करायची आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांकडे जाऊ’.
- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.