

मडगाव: विरोधी पक्ष आमदारांच्या बैठकीला आधी आमंत्रण न देणे आणि नंतर मी विजय सरदेसाई यांना व्हॉट्स ॲप मेसेज केला होता, अशी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केलेली मखलाशी, या साऱ्यांवरून गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यामधील संबंध पुन्हा एकदा ताणले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांमधील आघाडी तुटण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डने आपल्या राजकीय व्यवहार समितीची महत्त्वाची बैठक ५ रोजी बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेससोबत युती करायची की नाही याचा सोक्षमोक्ष लागेल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षाने हा विषय फारच गंभीरपणे घेतला आहे, असे ते म्हणाले.
हा प्रकार घडल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने तातडीने राजकीय व्यवहार समिती पुनर्रचित करताना बैठकीची घोषणा केली. प्रसार माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी आलेमाव यांच्यावर प्रखर टीका केली. कदाचित युरींच्या डोळ्यांत मी सलत असेन. सध्या युरींना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत. वास्तविक ते विरोधी पक्षनेतेही अपघातानेच झाले. काँग्रेस आमदारांनी होलसेल पक्षांतर केल्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागली, असे सांगितले.
सरदेसाई यांनी युरी यांच्यावर गंभीर आरोप केले. आलेमाव हे माझी बदनामी करण्याचा आणि आपल्या विरोधी पक्षीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कट रचत असल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला आहे. ते म्हणाले की, गेल्या ९० दिवसांत त्यांना आलेमाव यांच्याकडून कोणताही मेसेज मिळालेला नाही. सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी आपला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्याची तयारी दर्शविली असून, आलेमाव यांनाही असेच करण्याचे आव्हान दिले आहे.
असा प्रकार घडण्याची ही दुसरी वेळ आहे. पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गोवा फॉरवर्डच्या राजकीय व्यवहार समितीची उद्या (ता. ५) बैठक होणार असून त्यात पुढील निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेत्यांनी ज्या नंबरवरून मला मेसेज केल्याचा दावा केला आहे, तो नंबर त्यांनी जाहीर करावा. तो नंबर माझा नसल्याचे आढळल्यास मी नक्कीच पोलिस तक्रार नोंदवेन, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्डची नवी राजकीय व्यवहार समिती
पुढील विधानसभा निवडणूक विचारात घेऊन गोवा फॉरवर्ड पक्षाने आज पक्षाची राजकीय व्यवहार समिती स्थापन करून ती जाहीर केली. आमदार विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अकबर मुल्ला, दुर्गादास कामत, डॉ. रेणुका डिसिल्वा, मोहनदास लोलयेकर, विकास भगत, दीपक कळंगुटकर, अश्मा बी, जॉन कुतिन्हो, मेशू डिकॉस्टा हेसदस्य आहेत.
काहीतरी गफलत, तोडगा निश्चित काढू : चोडणकर
हा प्रकार घडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून चोडणकर यांनी सरदेसाई यांना फोन करून हा वाद कसा संपुष्टात येईल, अशी विचारणाही केली. सरदेसाई यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. गिरीश यांचा मला फोन आला होता. या परिस्थितीवर कसा तोडगा काढणे शक्य आहे, हे त्यांनी मला विचारले. मात्र, काँग्रेसकडून हे असे प्रकार वारंवार का होतात असा मी त्यांना सवाल केला, असे सरदेसाई यांनी सांगितले. याबाबत गिरीश यांच्याशी संपर्क साधला असता, या दोघांमध्ये मेसेजबाबत काहीतरी गफलत झाली असावी; परंतु यावर तोडगा काढू, असे ते म्हणाले.
आप नेत्यांकडून अल्पसंख्याक लक्ष्य : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
आम आदमी पक्षासोबत गोव्यात आघाडी करण्याबाबत आम्ही गंभीर आहोत, म्हणूनच त्यांचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्याशी तीनवेळा संपर्क साधला. त्यांचे केंद्रीय नेते दिल्लीतून येतात आणि आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अल्पसंख्याकांना लक्ष्य करतात. त्यामुळे हे कसले राजकारण सुरू आहे हे कळत नाही.
तरीही आम्ही ‘आप’सोबत आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहोत, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले. आझाद मैदानात प्रसारमाध्यमांना चोडणकर म्हणाले, की आमचे एकूण तीन आमदार आहेत. त्यापैकी दोन दक्षिणेतील आहेत. आतिषी यांनी कथितरित्या एल्टन आणि युरी यांच्या मतदारसंघात जाऊन तेथे आध्यात्मिक नेत्यांना लक्ष्य केल्याच्या आणि त्यांना पैसे देऊ केल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण मिळविण्यासाठी मी ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी यांच्याशी चर्चा केली.
आमच्याकडे पुरावे आहेत; परंतु ते जाहीर करून आघाडीच्या वातावरणात व्यत्यय आणायचा नाही. ‘आप’सोबत आघाडीसाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि आमच्याकडे संयम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या आमदार विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यातील शाब्दिक वादाबाबत चोडणकर म्हणाले, की या दोन्ही नेत्यांमध्ये संवादाचा अभाव होता आणि अशी गोष्ट पुन्हा घडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.