खरी कुजबुज: मयेत फॉरवर्ड विजयाच्या प्रतीक्षेत...

Khari Kujbuj Political Satire: मये मतदारसंघ काबीज करण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’ने पुन्हा एकदा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Khari Kujbuj Political Satire:
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

खरोखर खडखडाट की...

गोव्यातील एका नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खाऊ वृत्तीचे किस्से ऐकून-ऐकून आता कान किटलेत म्हणा; पण ही नवीनच लीला! म्हणतात ना, ‘मड्यावरचे लोणी खाणे’, ते इथे अगदी शब्दशः खरे ठरते. पालिकेच्या तिजोरीत एवढा खडखडाट की, कामासाठी लागणाऱ्या खोऱ्या-कुदळींना नवीन दांडे घालायची यांची ऐपत उरलेली नाही. मग काय, साहेबांच्या सुपीक डोक्यातून एक नामी शक्कल निघाली! थेट वैकुंठधामकडे नजर गेली आणि तिथल्या वापरलेल्या तिरडीचे बांबू आणून कामाला लावण्याचे थेट फरमान सुटले! आता त्या बिचाऱ्या बाबड्या कर्मचाऱ्यांनी तरी काय करावे? वरून आदेश सुटल्यावर ते बांबू हातात धरून काम करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. नंतर या तिरडीच्या दांड्यांची (खुटांची) बिलेही करण्यात आली. वा रे पालिका! गलथान कारभाराचे जिवंत आणि स्मशानातील उदाहरणच घालून दिले म्हणायचे! ∙∙∙

मडगाव पालिका अभियंत्याची पदानवती

मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांनी मडगाव पालिकेच्या तांत्रिक विभागाने करावयाच्या कामांसंदर्भात हल्लीच एक आदेश काढला आहे. त्यानुसार पालिकेचे मुख्य अभियंते विनय देसाई यांच्याकडे मडगाव मतदारसंघातील कामांचे नियोजन आणि सुपरव्हिजनची जबाबदारी देण्यात आली आहे, तर अभियंते राजेश देसाई यांच्याकडे फातोर्डा मतदारसंघातील कामांचे नियोजन आणि सुपरव्हिजन सोपविण्यात आले आहे. मात्र, हा आदेश जारी करताना दोन्ही अभियंत्यांचा दर्जा ‘ग्रेड-२’ असा नमूद करण्यात आला आहे. वास्तविक, विनय देसाई यांचा हुद्दा राजेश देसाई यांच्यापेक्षा वरचा असूनही मुख्याधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे त्यांना हाताखालच्या अभियंत्याच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी पालिका अभियंत्यांची पदानवती केली आहे का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

उदरभरण नोहे...

ओल्ड गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये भोजन केल्यानंतर २८ पर्यटकांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे संबंधित यंत्रणांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे. संबंधित रेस्टॉरंटची अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करायला हवी. मोठी दुर्घटना होईपर्यंत दुर्लक्ष करणे उचित नाही. ‘दोळ्यांआड मसंड पाड’ अशी कोंकणीत एक म्हण आहे. कुठल्याही हॉटेलच्या स्वयंपाकघरात आपण डोकावून पाहत नाही, तोपर्यंत सर्व काही ठीक असल्याचे भासते. भांडी व्यवस्थित धुतली जातात का? शिळे-विटलेले अन्न दिले जात नाही ना? सकाळची वास मारणारी चटणी किंवा इतर अन्नपदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात नाहीत ना? याची तपासणी होणे आवश्यक आहे. अन्नाऐवजी विषच दिल्यासारखे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रेस्टॉरंटना धडा शिकवला पाहिजे. अनेक ठिकाणी टेबल, खुर्च्या आणि वेटर यांची स्वच्छता समाधानकारक नसते. स्थानिक लोकसुद्धा अशा हॉटेलांतून घरी जाताना संध्याकाळचे खाद्यपदार्थ पार्सल घेऊन जातात. त्यामुळेे गोव्यात तुकाराम मुंढे तयार होतील का, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. ∙∙∙

पाऊसकर फॉरवर्ड कधी?

सावर्डेचे माजी आमदार आणि माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी आपण गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करणार, हे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करण्याचा त्यांचा मुहूर्त कधी हे अजून त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे ते ‘फॉरवर्ड’ होणार तरी कधी? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. १४ जून रोजी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा वाढदिवस आहे. सध्या पाऊसकर वरचेवर सरदेसाई यांना भेटत आहेत. कदाचित त्या दिवशी ते आपला फॉरवर्डमध्ये जाण्याचा मुहूर्त जाहीर करणार तर नाही ना! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

रोहित ‘ऑन ग्राउंड’

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अधिक ॲक्टिव्ह झाले आहेत. पणजीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, प्रत्यक्ष जाऊन कामांची पाहणी करणे आणि त्रुटी दूर करण्यावर ते भर देत आहेत. त्यांनी महानगरपालिका प्रशासनावरही आता चांगली पकड जमवली असून त्यांच्या या नव्या शैलीचे त्यांचे पिताश्री बाबूश मोन्सेरात यांनीही कौतुक केले आहे. ज्युनियर मोन्सेरात आमदारकीची पूर्वतयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता विधानसभा निवडणुकीची परीक्षा ते पणजीतून देतात की ताळगावातून, हे येणारा काळच ठरवेल. काहीही असो, गेल्या काही दिवसांत रोहित ‘ऑन ग्राउंड’ उतरले असून ते मैदानही गाजवत असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

मयेत फॉरवर्ड विजयाच्या प्रतीक्षेत...

मये मतदारसंघ काबीज करण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’ने पुन्हा एकदा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने मये येथे गट समितीची नव्याने बांधणी केली आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा फॉरवर्डने मये मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, या मतदारसंघात किमया साधता आली नाही. अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतसुद्धा गोवा फॉरवर्डला यश मिळाले नाही. आतापर्यंत गोवा फॉरवर्डला मयेत ‘विजय’ मिळवता आला नसला, तरी पक्षाची कामगिरी मात्र समाधानकारक राहिली आहे. याच कामगिरीच्या जोरावर आता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा ‘विजय’ होणारच, असा पक्षनेतृत्वाला विश्वास आहे. त्यादृष्टीने गोवा फॉरवर्डचे नेते आणि कार्यकर्ते मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. मात्र, भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मयेत ‘विजय’ मिळवणे म्हणजे ‘फॉरवर्ड’समोर मोठे आव्हानच ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

आंधळा दळतोय अन...

राजकारणी हे भलतेच हुशार असतात. लोकांच्या डोळ्यांत धूळ कशी फेकावी, याची कला त्यांना चांगलीच अवगत असते. आता हे सर्व पुराण सांगायचे कारण म्हणजे काणकोण पालिकेतील एका माजी नगरसेवकाने केलेली हातचलाखी. या महाशयांनी आपल्या प्रभागातील एका रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडू लागले. त्यानंतर खड्ड्यांवर मातीचा भराव टाकून केवळ नावापुरती मलमपट्टी करण्यात आली. पावसाळ्याची सुरुवात होताच संपूर्ण परिसर चिखलमय बनला आहे. त्यामुळे स्थानिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या माजी नगरसेवकाला त्याचे सोयरसुतक नसल्याचेच चित्र आहे. आता हेच महाशय आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा याच प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ‘मत मागण्यासाठी दारी येऊ देत, मग त्यांना चांगलीच अद्दल घडवू.’ अशी स्थानिकांनी भूमिका घेतली आहे. सध्या तरी या भागातील रहिवाशांना ‘आंधळा दळतोय अन् कुत्रं पीठ खातोय’ या म्हणीचा प्रत्यय पदोपदी येत आहे. ∙∙∙

कोंकणी अध्यापकांची नवी पिढी

महाविद्यालयांमध्ये कोंकणी शिक्षकांसाठी मुलाखती सुरू आहेत. काही पदे कंत्राटी स्वरूपाची, तर काही व्याख्याता तत्त्वावरील आहेत. अशाच एका महाविद्यालयात मुलाखती घेण्यासाठी एका निवृत्त प्राध्यापकांना बोलावण्यात आले होते. तीन उमेदवार होते. तिघेही एम.ए. (कोंकणी) झालेले. त्यांना विचारण्यात आले, ‘शणै गोंयबाब यांच्याविषयी सांगा.’ पण गोंयबाब कोण, हेच त्यांना माहीत नव्हते. पुढचा प्रश्न होता, ‘साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त दोन कोंकणी लेखकांची नावे सांगा.’ त्याचेही उत्तर मिळाले नाही. प्राध्यापकांनी मग ‘जोर रडटा पेजेक’ या म्हणीचा अर्थ विचारला. त्यावरही मख्ख शांतता. शेवटी त्यांना कोंकणीत चार ओळी लिहिण्यास सांगितले. त्या चार ओळींमध्ये शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या इतक्या चुका होत्या की प्राध्यापकांनी कपाळावर हात मारून घेतला. असे प्राध्यापक मिळाले तर ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

पर्वरी चौक नव्हे अपघात चौक!

पर्वरीतील ओ कोकेरो जंक्शन सध्या अपघातस्थळ म्हणून विकसित झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुधारण्याऐवजी प्रत्येक धडकेनंतर चालकांचेच ‘ट्रॅफिक व्यवस्थापन’ सुरू होते, असे चित्र दिसत आहे. चार दिशांनी येणाऱ्या वाहनांच्या गर्दीत संयम आणि शिस्त या दोन्हींचीच वाहतूक कोंडी झाल्याने किरकोळ अपघात रोजचेच झाले आहेत. बुधवारी एका पर्यटकाने समोरील वाहनाला धडक दिल्यानंतर रस्त्यावरच शाब्दिक फटकेबाजी रंगली. चोगम जंक्शनवर सिग्नल नसला, तरी ‘वादविवाद चौक’ म्हणून ओळख निर्माण होण्याची चिन्हे मात्र वेगाने दिसू लागली आहेत! ∙∙∙

फोंडेकरांची मानसिकता...

फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द झाली आणि हा मतदारसंघ पोरकाच राहिला. आता येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीतच फोंड्याला आमदार मिळेल, हे निश्चित. मात्र, फोंड्याचा आमदार बनण्यासाठी भाजपमधून दोघे, काँग्रेस आणि आम आदमी पक्षातून प्रत्येकी एक, तर इतरही अनेक जण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. काही जण अजूनही कुंपणावर बसले आहेत. इकडे उडी मारू की तिकडे, अशा संभ्रमात त्यांची अवस्था आहे. सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या परीने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध वस्तूंचे वितरण करीत आहेत. एक मात्र खरे, सद्यस्थितीत फोंडेकरांची चंगळ आहे बुवा. कोण काही देत असेल, तर त्याला नाही म्हणायचे नाही; मतदान कुणालाही करू दे, पण सध्या मिळतो तो फायदा करून घ्यावा, हीच मानसिकता अनेक फोंडेकरांची असल्याचे दिसून येते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

सॅम्युअल प्रकरणी रिपोर्ट कुणासाठी?

सॅम्युअलच्या आत्महत्येनंतर आता पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. काहीजणांचा आरोप आहे की, त्याला पोलिस ठाण्यात बोलावून मारहाण करण्यात आली होती, तर काहीजण या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, याची वाट पाहत आहेत. खरे काय आणि खोटे काय, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या म्हापशात वेगळीच चर्चा रंगली आहे. चौकशी होणार, अहवाल तयार होणार, निष्कर्ष निघणार; पण तो अहवाल नेमका कुणाला दिसणार? कारण सरकारी अहवालांचेही अनेक प्रकार असतात म्हणे. काही अहवाल प्रसिद्ध होतात, काही फायलींमध्ये राहतात, तर काहींची चर्चा जास्त आणि दर्शन कमी असे होते. त्यामुळे काही जण आता मिश्कीलपणे विचारू लागले आहेत की, जर चौकशी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असेल, तर अहवालही लोकांसाठी खुला असायला नको का? नाहीतर चौकशी झाली, अहवाल तयार झाला आणि तो कपाटात गेला, तर बाहेरच्या लोकांनी सत्य शोधायचे कसे? ∙∙∙

चर्चिल यांची चाल

दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन चर्चिल आलेमाव यांनी पुन्हा एकदा ‘राजकीय घड्याळाचे काटे’ फिरवण्याची चाहूल दिली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेशाची दारे उघडी आहेत का, याची चाचपणी सुरू असतानाच कन्या वालंका हिला नावेलीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा रंगली आहे. एवढेच नव्हे, तर चर्चिलबाब स्वतःही बाणावलीतून नशीब आजमावू इच्छित आहेत. निवडणुका जवळ आल्या की काही नेत्यांचे पक्षांशी असलेले प्रेम अचानक उफाळून येते, तर काहींच्या राजकीय पुनरागमनाच्या शक्यता वाढतात. आता काँग्रेस चर्चिल कुटुंबासाठी लाल गालिचा अंथरते की ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: मगो पक्षाला ‘आप’ किंवा ‘आरजी’ने नव्हे, तर स्वकीयांच्या धोरणांनीच रोखले; ढवळीकरांच्या वक्तव्यानंतर पक्षाच्या पडझडीच्या कारणांचा जाहीर पंचनामा

स्मार्ट मीटर नको रे बाबा!

स्मार्ट मीटरचा गजर इतका वाढला आहे की आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे गोव्याच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत की वीज खात्याचे वसुली एजंट, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. ‘स्मार्ट’ मीटर बसवण्याचा हट्ट मात्र जनतेला काहीसा ‘शॉक’ देणारा ठरत असून सर्व स्तरांतून टीकेची झोड उठत आहे. वीजदर, बिलांची भीती आणि सक्तीच्या अंमलबजावणीमुळे नागरिक संतप्त असताना मंत्री महोदयांनी वीज खात्याच्या बाजूने उभे राहण्याऐवजी गोमंतकीयांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. कारण जनतेला ‘पॉवर मिनिस्टर’ हवा आहे, ‘पॉवर डिपार्टमेंट’चा ‘रिकव्हरी मिनिस्टर’ नव्हे! ∙∙∙

भिकारी आपले की परके?

गोव्यात रस्त्यावर दिसणारे भिकारी हे गोव्याचे नसून बाहेरून आलेले आहेत, असे राज्यानेच न्यायालयात सांगितल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे आता काही जणांच्या डोक्यात एक नवीनच प्रश्न उभा राहिला आहे. जर एकही भिकारी गोमंतकीय नसेल, तर त्यांची जबाबदारी गोवा सरकारने का घ्यावी? आणि जर माणुसकीच्या नात्याने ती घ्यायचीच असेल, तर त्यांना दोन वेळचे जेवण द्यावे की थेट त्यांच्या गावी पोहोचवावे? काहींनी तर यावर भन्नाट गणित मांडले आहे. काहींना वाटते, भिकाऱ्यांना ‘आधार’ द्यावा; तर काहींना वाटते, त्यांच्या मूळ राज्यांनीच त्यांची जबाबदारी घ्यावी. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: 'आरजीपी'च्‍या गटसमित्‍या बरखास्‍त; मनोज परब पडले उघडे! वीरेश बोरकर सोमवारी सोडणार मौनव्रत,भूमिकेकडे राज्‍याचे लक्ष

पर्यटकांची ‘फ्री स्टाईल’!

गोव्याच्या पर्यटनाची नवी ओळख बहुधा तयार होताना दिसतेय! दिवसा समुद्रकिनारे, सूर्यास्त आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेणारे काही पर्यटक रात्री उशिरा थेट रस्त्यावरच ‘फ्री-स्टाईल बॉक्सिंग स्पर्धा’ रंगवताना दिसले. वागातोरमधील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी शांततेचा भंग होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. गोव्याला सुट्टी घालवण्यासाठी येणाऱ्यांनी येथील आदरातिथ्याचा आस्वाद घ्यावा की सार्वजनिक रस्त्यांना कुस्तीचा आखाडा समजावा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पर्यटनाला चालना देणारे असे ‘मारामारी पर्यटन’ नेमके कोणत्या प्रवास मार्गदर्शक पुस्तकात लिहिले आहे, याचा शोध घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे!∙∙∙

बस नको, रेल्वे हवी...

गोवा–बेळगाव आणि गोवा–विजयपूर दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करत कन्नड संघाने पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांना बुधवारी त्यांनी निवेदन दिले. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि बस प्रवासातील हेलकावे यांना कंटाळलेल्या प्रवाशांनी आता रेल्वेच्या शिट्टीचीच वाट पाहण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील कन्नड भाषकांसह विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळेल, असा दावा संघाने केला आहे. आता ही मागणी रेल्वेच्या रुळांवर धावते की फक्त निवेदनांच्या डब्यातच अडकून राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com