

राजू नायक
काँग्रेस नेत्यांचे ‘तर्कट’ - की सेक्युलर मते फोडण्यासाठी भाजपा एक नवा पक्ष स्थापन करेल - बंडखोरांना त्यात प्रवेश देईल... निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जो ‘तिकिट मेळा’ भरवेल त्यातूनच ‘सेक्युलर मत-फोड’ नेते तयार होणार नाहीत का? त्याशिवाय भाजपाने तयार केलेला प्रचंड पक्षनिधी - संपत्ती पाहून अनेकांची मती गुंग झाली, नीतीमत्ता खुंटीला टांगली गेलीय, त्याविरोधात काँग्रेसकडे काय रणनीती आहे, हा खरा प्रश्न आहे...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विविध कारणांसाठी वादग्रस्त बनले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी पेरेगूटमधून गोव्यात उडी घेऊन हे पद पटकावले, त्याबद्दल कार्यकर्ते आणि ख्रिस्ती पाठिराख्यांमध्येही नाराजी आहे. चोडणकर लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात उत्सुक होते. दर निवडणुकीत ते आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न लपून राहात नाहीत.
त्यांच्याबद्दल दुसरा संशय हा आहे की, गोव्यात काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना पाठवण्यात आले आहे. ज्यावेळी त्यांच्या मतदारसंघाचा पत्ता नाही, तेव्हा भू-परिस्थिती लक्षात न घेता काँग्रेस असा कसा निर्णय घेऊ शकते, असा प्रश्न राजकीय निरीक्षक विचारतात. गिरीश चोडणकर पक्षाचे निष्ठावान आहेत. गांधी घराण्याला निकट आहेत. त्यात ते भंडारी समाजाचे प्रतिनिधी आहेत, परंतु ही ‘बिरुदे’ गोव्यात काँग्रेस पक्षाला गोव्यात जिंकण्यास पुरेशी आहेत काय?
ख्रिस्ती समाजाला गोव्यात हुरहूर लागली आहे. ती काँग्रेस पक्षाला जिंकवण्याच्या ईर्षेने लागलीय, असे नव्हे. अल्पसंख्याकांचा अजेंडा भाजपाला हरवण्याचा आहे. त्यांचा हा कार्यक्रम पुढे नेण्याची तडफ काँग्रेसमध्ये सध्या तरी दिसत नाही, ती निकड काँग्रेसला वाटत असेल आणि त्यादृष्टीने गांभीर्याने ते प्रयत्न करणार असतील तरच त्यांना ख्रिस्ती मते - म्हणजेच ‘सेक्युलर’ मते प्राप्त होणार आहेत. माझ्याच कार्यक्रमात परवा भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर मला म्हणाले, म्हणजे भाजपाला पडतात ती सेक्युलर मते नाहीयेत काय?
२०१२च्या निवडणुकीत चर्च धर्मसंस्थेने मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक ख्रिस्ती आमदार भाजपाच्या तिकिटावर जिंकून येऊ लागले. बाबूश मोन्सेरात, मायकल लोबो, दिलायला, निलेश काब्राल, माविन गुदिन्हो, जेनिफर, जोशुआ डिसोझा हे सध्या आमदार आहेत व एकेकाळी तर मूळ भाजपापेक्षा पक्षात ख्रिस्ती आमदारांची संख्या अधिक होती. त्यामुळे आता सेक्युलर मतांवर काँग्रेसचा अधिकार कुठे राहिलाय?
त्याशिवाय आम आदमी पक्ष, रेव्होल्युशनरी, गोवा फॉरवर्ड हेही स्वतःचा हिस्सा घेऊन जाऊ लागले. रेव्होल्युशनरीचे युगोडेपाप्रमाणेच विघटन सुरू असल्याने काँग्रेसला अधूनमधून ख्रिस्ती मतांवर स्वतःचा अधिकार असल्याचा भास होतो एवढेच! त्यातूनच गिरीश चोडणकर यांनी सेक्युलर मतांचे विभाजन करून नवा पक्ष स्थापन करण्यासाठी भाजपाची फूस असून त्या पक्षाने १०० कोटींची थैली खुली सोडल्याचा आरोप केल्यानंतर नवीन वादाला सुरुवात झाली. ‘गोवा काँग्रेसच्या’ स्थापनेचे सूतोवाच झालेही!
त्या विषयावर मी एक चर्चा घडवून आणल्यानंतर पत्रकार देविका सिकैरासारख्या काँग्रेस पाठिराख्यांनी टिकेचे आसूड ओढले. त्यांचा दावा होता, तुम्ही सत्ताधारी पक्षावर टीका न करता काँग्रेसलाच लक्ष्य बनविणे सुरू केले आहे. कौस्तुभ नाईक यांनाही तसे वाटत होते. दूरचित्रवाणीच्या चर्चा या तत्काळ आयोजित केल्या जातात. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सहज उपलब्ध होत नसतील तर ते त्यांचे अपयश आहे. भाजपाचेही प्रवक्ते अनेकदा अशा टोकदार चर्चा टाळतात, असा माझा अनुभव आहे, परंतु विचारूनही त्यांचे प्रवक्ते आले नाहीत, असे सांगून मी चर्चा पुढे रेटल्या.
गिरीश चोडणकरांच्या आरोपात सनसनाटीपणा निर्माण करण्याचा प्रयत्न होता, परंतु आम्ही त्या वक्तव्याची त्वरित दखल घेतल्यामुळे चोडणकरांचा उद्देश सफल झाला हे चोडणकरांनाही मान्य करावे लागेल. म्हणजे सेक्युलर मतांना फाटाफुटीपासून सावध राहाता येईल! आमच्या आक्षेपाचा मुख्य मुद्दा हा आहे, सेक्युलर मते फोडण्यासाठी आज भाजपाला नवीन पक्षस्थापनेत खतपाणी घालण्याची आवश्यकता आहे काय? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्ष स्थापन होत आले आहेत, गोव्यात हा इतिहास आहे!
भूपरिस्थिती अशी आहे की, सेक्युलर मते ‘खेचणारे’ अनेक ख्रिस्ती नेते यापूर्वीच भाजपात गेले आहेत आणि ते आरामात १०-१२ जागा जिंकून आणू शकतात. मोन्सेरात, लोबो, गुदिन्हो, जोशुआ, काब्राल आदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडे कसलीही नीती नाही. चोडणकर यांचे मित्र संकल्प आमोणकर यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी काय कार्यक्रम रचला आहे? पुन्हा ‘फुटून जाण्यासाठी’ ते भाजपाचेच नेते आयात करणार आहेत काय?
महत्त्वाचे म्हणजे सासष्टीत नवीन पक्ष स्थापन झाला, ख्रिस्ती मते हे त्यांचे उद्दिष्ट राहिले, काँग्रेस पक्षातील बंडखोर त्यांनी आकृष्ट केले व ते सेक्युलर मते विभागू शकले तर ते काँग्रेस पक्षाचेच अपयश असेल व गिरीश चोडणकर यांच्या कारकिर्दीवरचा तो डाग ठरेल! काँग्रेस पक्षाचे अपयश हे की, जो गोवा फॉरवर्ड पक्ष विलीनीकरणासाठी गेले दीड वर्ष काँग्रेस पक्षाचे दरवाजे ठोठावतो आहे, त्यांना दाद दिली जात नाही व प्रादेशिक पक्षांनी युतीसाठी पुढे यावे असे आवाहन चोडणकर करतात.
त्यानंतर आम आदमी पक्ष जाहीररीत्या हे आमंत्रण स्वीकारतो. सध्या ‘आप’चे विधानसभेत दोन सदस्य असून बाणावली व वेळ्ळी या काँग्रेसच्या अत्यंत खात्रीशीर जागा आहेत. त्या ‘आप’ला देण्यास पक्षाचे दक्षिण गोव्याचे खासदार व्हिरियातो फर्नांडिस यांनी प्रखर विरोध केला आहे. (त्यांनी या दोन मतदारसंघांत तसे चेहरे उभे केले आहेत). काँग्रेसने सलोख्यासाठी ‘त्याग’ करायचा ठरविला, तर सासष्टीत त्यांना स्वतःसाठी जागाच राहाणार नाहीत, शिवाय त्यांना खात्रीशीर वाटणाऱ्या अनेक जागांवर यापूर्वीच दोन-तीन दावेदार आहेत.
मिकी पाशेको, चर्चिल आलेमाव आदी घटक सेक्युलर मतांवरचे पोसलेले आहेत. अनेकांना धक्का बसेल, परंतु सासष्टीसारखा तथाकथित बुद्धिमान तालुका फुटिरांना यापूर्वीही जिंकून देत आला आहे. यापूर्वी भाजपा-पाठिराखा पक्ष युगोडेपा होता, २०१२मध्ये ते स्थान गोवा विकास पक्षाने प्राप्त केले. (त्यांचा संस्थापक विकास प्रभुदेसाईंनी मान्य केलेय की पर्रीकरांनी त्यांना निधी पुरवून, राजकीय फूस दिली होती). त्यांनी मिकी पाशेको, कायतू सिल्वा यांना जिंकून आणले. त्या सर्वांना पैसे खर्च न करता जिंकून दिले जातात काय?
मिकींची औकात काय आणि कायतूंना तर दोन शब्दही बोलता येत नव्हते! ज्या सेक्युलर मतांचा एवढा गाजावाजा केला जातो, त्यांनी लोकशाहीचा केलेला हा सौदा नामुष्कीप्रद नाही का? या सर्व व्यूहरचनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी अमित पाटकरांच्या गटाशी चर्चा करणे आवश्यक होते. के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीदरम्यानच तो मुहूर्त पक्षाला मिळाला हे शोचनीय आहे, कारण त्या दरम्यान जे घडायचे ते घडून गेले आहे. आता केवळ सांत्वन करण्यासाठी गपक्ष निरीक्षकाला गोव्यात पाठवलेले तर नाही ना, असे वाटते.
भाजपाकडे प्रचंड पैसा, इतर अनेक आयुधे आहेत, प्रादेशिक पक्ष, बराच काळ सत्तेत राहिलेले नेते त्यांचे टार्गेट आहेत, यात तथ्य आहे. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना संपविण्याचा विडा उचललाय, तृणमूल काँग्रेसला खिंडार पडतेय. त्यात भाजपाचा हात नाही, असे कोणी म्हणत नाही. पैसाही पाण्यासारखा वाहतोय. भाजपा सध्या देशातील सर्वात श्रीमंत पक्ष बनलाय. त्यांची संपत्ती १२,१०० कोटी आहे, जी इतर चार राष्ट्रीय पक्षांहून दुप्पट आहे. ही आकडेवारी भाजपानेच आयकर कायद्यानुसार निवडणूक आयोगाला सादर केली आहे.
२०२४-२५ मध्ये देशातील सहा राष्ट्रीय पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली, त्यातील भाजपाचा हिस्सा ८६ टक्क्यांहून अधिक आहे. या निधीत गतसालापेक्षा १७१ टक्क्यांनी वाढ झाली. भाजपाची संपत्ती सिक्कीम व मिझोराम राज्यांच्या अर्थसंकल्पाहून अधिक आहे. ही राज्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते व पोलिस खाते यांवर खर्च करू शकत नाहीत, एवढा निधी भाजपाच्या तिजोरीत आहे, हे फारच औत्सुक्याचे नाहीये काय?
त्यामुळे गोव्यात काँग्रेसमधून १० आमदार भाजपात सहज निघून गेले. २०१०मध्ये गोवा व मणिपूरमध्ये मागल्या दाराने भाजपाने सत्ता हस्तगत गेली. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यात निवडणुका आहेत, तेथेही त्या पक्षाने काही कार्यक्रम रचून ठेवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा म्हणते, आम्ही कुठे काय केले, काँग्रेस व इतर पक्षांचेच नेते आपल्या पायांनी चालत आमच्याकडे आले. त्यात वास्तव नाही असे आम्ही म्हणू शकतो का? उद्या सांत आंद्रेचे ‘क्रांतिकारी’ आमदार वीरेश बोरकर भाजपामध्ये शिरले तर?
भाजपाला आज दोष दिला जातो, परंतु काँग्रेसने यापूर्वी गोव्यात ‘सेक्युलर’ पक्ष असलेल्या ‘युगो’चा खात्मा केला नव्हता काय? सेक्युलर काँग्रेसने मगोपला आपल्या कळपात प्रवेश दिला नव्हता काय? एक गोष्ट खरी आहे की, ‘पैसा सबकुछ बन गया’ व चोर उचक्के यांचेच राज्य जगभर चालू आहे. त्याच्याच पुढे जाऊन सांगायचे तर सत्ता भ्रष्ट बनविते व सर्वंकष सत्ता भ्रष्टाचाराचे थैमान निर्माण करते, त्यात माखून घेण्यात आता कोणाला लाज वाटत नाही. त्या अनिर्बंध भ्रष्टाचाराने लोकशाहीलाच धोका निर्माण केला आहे.
एकेकाळी हा पैसा केवळ निवडणुकीत ‘खेळ’ खेळत असे. आता, आमदारांना विकत घेण्यासाठी वापरला जातो. सत्तेसाठी नीतीमत्ता गहाण ठेवली गेली आणि भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनतो तेव्हा अनिर्बंध सत्ता व अचाट पैसा याचा नंगानाच सुरू होतो. सत्तेप्रमाणेच सध्या या पैशांनी लोकांची मती गुंग केली असून गोव्यासारख्या राज्याची जमीन, येथील पारंपरिक व्यवसाय, रोजगार, राज्यातील लोकांचे अस्तित्व हेलकावे खाऊ लागले आहे.
सत्ता व अमर्याद पैसा याला शह देण्याचे धाडस काँग्रेस व त्यांच्या नेत्यांमध्ये आहेय काय? तसे असेल तर सक्षम, ताकदवान, संघटना उभारा. प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ उमेदवार निवडा. व्यावसायिक राजकारणी दूर ठेवा. गावागावात फिरा. तरुणांना जागवा. जनमत कौलाची प्रेरणा निर्माण करा. दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू करा. आपले मत विकणे म्हणजे अपवित्र आहे, आपण ईश्वराशी प्रतारणा करतोय, असे मतदारांना वाटले वाटले पाहिजे. (दिगंबरांसारखे उमेदवारांना देवापुढे गाऱ्हाणे घालायला मात्र लावू नका...) सत्तेपुढे सध्या देवही खाली माना घालून बसले आहेत...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.