

गुन्हा घडल्यानंतर शेवटी पोलिस हजर होत असल्याचे पूर्वी हिंदी चित्रपटात हमखास दाखविले जात होते. आताही त्यात काही विशेष फरक पडलेला नाही. बांगलादेशी शेजारच्या कर्नाटकात सापडले, अशी खबर पसरल्यानंतर तातडीने वरच्या पातळीवर बैठक झाली. दक्षिण गोव्याचे एसपी संतोष देसाईंनी आपल्या अखत्यारित जिल्ह्यातील या सर्व पोलिसांना सतर्कतेचे फर्मान सोडले आणि भंगारअड्डे व चेकपोस्टवर कडक पडताळणी करण्यास बजावले. साहेबांचा आदेश असल्याने पोलिसांनी त्याची अंमलबजावणी सुरूही केली आहे. मात्र, अजूनही कुणी संशयास्पद आढळलेला नाही. सापडणार तरी कसे? चेकपोस्ट व भंगारअड्डे म्हणजे पोलिसांसाठी वरच्या कमाईचे साधन. त्यामुळे तपासणी करणे अनेकांसाठी कठीण बाब बनली आहे. तरीही साहेबांचा आदेश म्हणून पोलिस दाखविण्यासाठी म्हणून कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडतात. बड्या सायबांनाही ते माहीत असते. शेवटी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असाच हा सारा मामला असतो. ∙∙∙
यापूर्वी राज्यसभा खासदार म्हणून सहा वर्षांचा काळ केंद्रीय संसदेत घालवल्यानंतर सावर्डेचे माजी आमदार आणि माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनी आपण पुन्हा एकदा विधानसभेत येणार याचे ऐलान केले आहे. सावर्डे मतदारसंघातून आपल्याला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून सावर्डे मतदारसंघात सध्या ते भलतेच सक्रिय झालेले आहेत. काहीही झाले तरी २०२७ मध्ये मी आमदार होणारच, असे विनय छातिठोकपणे सांगू लागले आहेत. हल्लीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुठल्याही मतदारसंघातून आपण जिंकून येऊ शकतो, असे सांगत २०२७ मध्ये गोवा विधानसभेत माजी एन्ट्री नक्की, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ∙∙∙
२०२२ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (दर्जेदार) कामगिरी केली. एक आमदार निवडून आणण्यासह सात ते आठ मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना पराभूत करण्यात या पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वादाने या पक्षाला ग्रासले. त्यातून मनोज परब यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत, राजकारणातून संन्यासही घेतला. या घडामोडींनंतर मंत्री तथा ‘मगो’ पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी ‘आरजी’वर हल्लाबोल सुरू केला आहे. ‘आरजी’ हा पक्षच नसल्याचा दावा ते करीत आहेत. परंतु, गत निवडणुकीत या पक्षाने मिळवलेल्या दहा टक्के मतांकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत. ‘आरजी’ हा ‘मगो’प्रमाणेच स्थानिक पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचा धसका घेऊनच ते ‘आरजी’वर वारंवार बोलत असल्याची चर्चा मतदारांत सुरू झाली आहे. ∙∙∙
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी दिल्लीत वडील पांडुरंग, पत्नी सुलक्षणा आणि मुलगी पार्थिवी यांच्यासह गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी कुटुंबीयांसह भेट घेतल्यावर गोव्यात ती घटना ‘न्यूज’ ठरली. मात्र, काही वेळानंतर त्यामागे कोणताही ‘तर्क’ नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांचे वडील जनसंघाचे कार्यकर्ते, त्यांना पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची खूप महिन्यांपासून इच्छा होती. त्यामुळे भेटीची वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितली होती. पंतप्रधानांनीही तब्बल १५ मिनिटे मिनिटे मुख्यमंत्र्यांचे वडील व मुलगी पार्थिवी हिच्याशी संवाद साधला. या भेटीनंतर झालेला आनंद मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दडून राहिलेला नव्हता. ∙∙∙
‘डू नॉट अंडर एस्टिमेट कॉमन मॅन’ असे म्हणतात ते खरे. राज्यात राजकीय आरक्षण राबविण्याची कवायत सरकारने सुरू केली आहे. राज्यातील चाळीस पैकी चार मतदारसंघ राखीव ठेवण्याचे भाजप सरकारने व भाजप पक्षाने मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. भाजपने सांगे, केपे, काणकोण व प्रियोळ हे मतदारसंघ राखीव करण्यासाठी कवायत सुरू केल्यामुळे सामान्य गट विशेषकरून मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. शिक्षण, नोकरीत आरक्षण लागू झाल्यावर आता राजकीय आरक्षण जाहीर करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याच्या निर्णयाच्या विरोधात सामान्य गटाची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे. ठरावीक मतदारसंघात आरक्षण देण्याच्या विरोधात समाज कृती करण्याच्या प्रयत्नात असून राजकीय आरक्षण भाजपसाठी डोकेदुखी बनण्याचे संकेत मिळत आहेत. ∙∙∙
म्हापसा पालिकेच्या कारभाऱ्यांचे जाहीर कौतुक करायला हवे! पाच वर्षांचा कार्यकाळ संपला; पण काय ती स्थिरता! या पाच वर्षांत म्हापसावासीयांना तब्बल चार नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष पाहायला मिळाले. ‘सगळ्यांना खुर्ची मिळाली पाहिजे’ या तत्त्वाचे यांनी काय तंतोतंत पालन केले! सत्तेच्या या संगीतमय खेळात हे नेते इतके व्यग्र होते की, शहराचा विकास करायचा असतो, हेच ते विसरून गेले. कचरा व्यवस्थापन आणि पार्किंगची समस्या तर सुटली नाहीच, उलट आपल्या मासळी मार्केटमधील अस्वच्छतेचा वास थेट आरोग्य विभागापर्यंत पोहोचला. तिथल्या घाणीमुळे आरोग्य विभागाने अखेर मार्केट सील करण्याची नोटीस बजावली, हीच काय ती यांची मोठी कामगिरी! एवढेच नव्हे, तर एकाच विषयावर सलग तीन-तीन दिवस बैठका लांबवण्याचा जागतिक विक्रमही याच मंडळाच्या नावावर जमा झाला. अखेर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने म्हापसावासीयांची या मनोरंजनातून सुटका झाली असून, आता राजकारणापलीकडे जाऊन काही खरी विकासकामे तरी पाहायला मिळतील, अशी आशा असल्याचे शहरवासीय बोलू लागले आहेत. ∙∙∙
क्रिकेट हा एक असा खेळ, जिथे ज्युनियर्स-सिनियर्स असा भेदभाव असत नाही. तरीही क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर वावरताना काहीवेळा इतर क्रिकेटर्सही दचकतात. मात्र, मंगळवारी गोव्यात वेगळेच घडले. सध्या सचिन गोव्यात असून मंगळवारी त्यांना भेटायला त्यांच्या कासावली येथील निवासस्थानी युवा उद्योजक चिराग नायक हे आपला मुलगा रणवीर, तसेच पत्नी आणि मुलीला घेऊन गेले होते. रणवीर हा सचिन यांचा अगदी डाय हार्ड फॅन, त्यामुळे असेल कदाचित सचिन यांच्याबरोबर फोटो काढताना त्याने चक्क त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हा फोटो चिराग यांनी आपल्या फेसबुकवर अपलोड केल्यावर त्यावर कित्येकांच्या प्रतिक्रियाही आल्या. सचिनच्या खांद्यावर हात ठेवण्याचे धाडस फक्त दत्ता नायक यांचे नातूच करू शकतात, अशीही त्यात एक कमेंट होती. अर्थात या साऱ्या प्रतिक्रिया कौतुकाच्याच होत्या बरं का? ∙∙∙
गोव्यात सध्या सत्ताधारी पक्षाला तेहतीस आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तरीही येणाऱ्या २०२७च्या निवडणुकीत ही स्थिती अशीच राहणार की यात बदल होणार, याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘इन्फ ईज इन्फ’सारख्या संघटनेने सरकारविरोधात उभारलेले उघड उघड आंदोलन. यापूर्वी भाजप सरकार पाडण्यासाठी दक्षिण गोव्यातून ‘लोकशक्ती’ नावाने एक आंदोलन उभे राहिले होते आणि त्यामुळे पुढे कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले होते. या संघटनेबरोबर मराठी राजभाषा निर्धार समितीच्या परवाच्या पणजीच्या सभेला नाही म्हटले तर तशी मोठी गर्दी जमली आणि ही बहुतेक मते भाजपची पारंपरिक मते आहेत. ती जर यंदा भाजपपासून दूर गेली तर गोव्याची परत एकदा ‘त्रिशंकू’कडे वाटचाल होणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ∙∙∙
शिक्षण खात्याने गणवेश आणि रेनकोटसाठी विद्यार्थ्यामागे १,१०० रुपये देण्याचे जाहीर केल्यावर पालकांत चर्चा सुरू झाली आहे. गणवेशाचा एक जोड शिवण्यासाठी ८०० रुपये लागतात. दोन जोडांसाठी दीड हजार रुपये. रेनकोट त्यात घ्यायचा लागल्यास किमान २ हजार रुपये द्यावेत, असे पालकांचे म्हणणे ऐकू येऊ लागले आहे. सरकार आपल्याकडून गणवेश आणि रेनकोट दिल्याचे श्रेय घेणार असेल तर पूर्ण रक्कम द्यावी, असा हा युक्तिवाद आहे. ∙∙∙
पणजीच्या मुख्य परिसरात काही तरुण आणि तरुणी फिरत आहेत. ते आपण युनेस्कोचे कार्यकर्ते असल्याचे सांगून लोकांना भुलवतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्या मोहपाशात अडकाल. ही टोळी प्रामुख्याने १८ जून रस्त्यावर आणि पाटो परिसरात फिरताना दिसते. लहान मुलांना कुपोषणापासून वाचविण्यासाठी मासिक आणि वार्षिक देणगी देण्यासंबंधी सांगतात; परंतु युनेस्को अशाप्रकारे खरेच पैसे जमा करतात का? की हा एक मोठा घोटाळा आणि फसवणूक आहे? त्यांच्या या प्रकारावरून ते नक्कीच फसवणूक करत असल्याचे जाणवते. सरकारी यंत्रणेला भर राजधानीत चाललेल्या या प्रकाराची माहिती आहे की नाही? मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ∙∙∙
फोंड्यात पावसाळा म्हटला की, झाडे पडणार, रस्त्यावर पाणी साचणार, वाहतूक विस्कळीत होणार, हे जसे ठरलेलेच असते, तसेच मदतीसाठी सर्वांत आधी धावून येणारे होते ते म्हणजे डॉ. केतन भाटीकर. कुठे झाड आडवे झाले, कुठे नागरिक अडकले की केतन आपल्यापरीने मदतीला हजर असायचे. सरकारी आपत्ती निवारण यंत्रणा असली तरी अनेकदा घटना घडून गेल्यावरच ती पोहोचते, असा अनुभव नागरिकांनी घेतलाय; पण यंदाचा पावसाळा काहीसा वेगळा असेल. कारण संकटसमयी धावपळ करणारे, लोकांसाठी रात्रंदिवस उभे राहणारे केतन यंदा दिसणार नाहीत, हीच हळहळ आता फोंडावासीयांच्या मनात दाटून येत
आहे. ∙∙∙
‘वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळत नाही,’ असे म्हणतात ते खरे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या वाढदिनी त्यांना केपे मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती. सुभाष फळदेसाई हे चांगले काम करतात, त्यांची दुर्बल गटासाठी काम करण्याची जिद्द व उमेद मोठी आहे. तसेच त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना हल्लीच दिले होते. मात्र, आता डॉ. प्रमोद सावंत व दामू नाईक यांनी केपे व सांगे मतदारसंघ ‘एसटी’ आरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने सुभाष फळदेसाई व बाबू कवळेकर यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे. जर आरक्षण लागू झाले तर सुभाष व बाबू दोघांनाही राजकारणात तरण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्यांचे समर्थक म्हणायला लागले आहेत.∙∙∙
काणकोण, केपे, प्रियोळ, नुवे मतदारसंघांवर भाजपची विशेष नजर आहे. या मतदारसंघांत पक्ष संघटन कसे बळकट करता येईल, याचे नियोजन करण्यात येत आहे. हे चारही मतदारसंघ आदिवासींसाठी आरक्षित होऊ शकतात, असे गृहित धरून हे राजकीय पाऊल टाकण्यात येत आहे. काणकोण, प्रियोळ व नुवे मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत तर केपेत कॉंग्रेसचा आमदार आहे. नुवेतून कोणाला निवडणुकीत उतरवायचे याचा निर्णय महत्त्वाचा असेल आणि त्याची गणिते आतापासूनच जुळवली जात असल्याचे दिसते. ∙∙∙
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल सध्या फारसे चर्चेत नाहीत. मात्र, कुडचडेतील विकासकामांचे श्रेय अन्य कोणी घेऊ पाहत असल्याचे त्यांना सध्या सहनही होत नाही. अखेर भाजपच्या गाभा समितीत त्यांनी हा विषय काढला. एकेका मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक तयार झाले आहेत. हा प्रश्न पक्ष निवडणुकीच्या तोंडावर कसा सोडवणार, असा काब्राल यांचा प्रश्न होता. आता त्यांचा रोख कुडचडेत कोणाच्या दिशेने होता, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. मात्र, काब्राल यांनी या विषयास वाचा फोडण्याचे धाडस केल्याची चर्चा रंगली आहे. ∙∙∙
येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून घेण्यासाठी ‘एसटी’ समाजाचे नेते संघटित झाले आहेत. भाजपनेही त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार आरक्षण मिळणारच हे गृहित धरून एसटी समाजाची लोकसंख्या अधिक असलेल्या चार मतदारसंघांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. पण, त्याचवेळी भाजपात असलेले ‘एसटी’ आमदार मात्र पात्र असलेल्या नातलगांचा शोध घेत असल्याची चर्चा सुरू असून, आरक्षणाच्या राजकारणातून घराणेशाहीला खतपाणी मिळणार का, अशीही कुजबूज राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे..∙∙∙
‘आरजी’तील वादानंतर काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलेल्या आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाच्या कार्यालयात जाऊन केंद्रीय कार्यकारिणीच्या (सीईसी) सदस्यांना भेटणार आणि वादाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असे म्हटले होते. परंतु, अजूनही बोरकर पक्षाच्या कार्यालयात गेलेले नाहीत; पण दुसरीकडे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी गुप्तपणे बैठका घेऊन त्यांची मते ते जाणून घेत आहेत. ‘आरजी’ स्वत:च्या ताब्यात घेण्याच्या निर्णयाप्रत बोरकर पोहोचले आहेत. त्यामुळेच ‘सीईसी’समोर जात नसल्याचे पदाधिकाऱ्यांत बोलले जात आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.