

मोरजी: काही दिवसांपूर्वी प्रवीण आर्लेकर यांनी बाबू आजगावकर यांच्यावर टीका केली होती. मात्र, आर्लेकर यांच्या पेडणे मतदारसंघात रविवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. धारगळ येथील झाडाचीवाडी येथील दाडेश्वर मंदिर सभागृहात झालेल्या जाहीर सभेत बाबू आजगावकर यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बाबूंनी रोजगाराचा मुद्दा उपस्थित करताच उपस्थितांनी हात वर करून त्यांना समर्थन दिले.
यावेळी आजगावकर म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांपूर्वी पेडणे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून प्रवीण आर्लेकर यांना संधी देण्यात आली. पक्षनिष्ठा जपत आम्ही त्यांना विजयी करण्यासाठी समर्थकांनाही आवाहन केले. मात्र, त्या बदल्यात आमच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि बेरोजगारीचा प्रश्न सरकारने सोडवला का? स्थानिक युवकांना किती नोकऱ्या मिळाल्या, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा.
ते पुढे म्हणाले, पेडणे मतदारसंघ वाचवूया; अन्यथा मतदारसंघ लुटण्यासाठी अनेकजण तयार आहेत. मोपा विमानतळासाठी सुमारे एक कोटी चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली. त्यापैकी ४० लाख चौरस मीटर क्षेत्रावर विमानतळ उभारण्यात आला असून, उर्वरित ६० लाख चौरस मीटर जागेवर विविध महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
त्या प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठीच आमची ही लढाई आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे, माजी सरपंच तुळशीदास गवस, पल्लवी परब, प्रदीप कांबळी, बबन डिसोझा, मंदार परब, सुभाष सावंत, धारगळच्या माजी सरपंच संपर्क म्हापसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन कुलदीप कामत यांनी केले. माजी जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे आणि माजी सरपंच तुळशीदास गवस यांनी बाबू आजगावकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करत आगामी निवडणुकीत त्यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
आर्लेकरांच्या वक्तव्याचा निषेध
सभेतील अनेक वक्त्यांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याबाबत विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. तोरसेचे माजी सरपंच बबन डिसोझा म्हणाले, सत्य बोलणाऱ्यांवर अन्याय करण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळे आमच्यावर विविध गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले. मात्र, या सर्व प्रकाराला जनता योग्य वेळी उत्तर देईल. आर्लेकरांनी आमच्या मतदार संघासाठी आतापर्यंत काय योगदान दिले याची जनतेला चांगली माहिती आहे.